रॉइस, जोसाया : (२० नोव्हेंबर १८५५−१४ सप्टेंबर १९१६). प्रमुख चिद्वातदी (आयडिअलिस्ट) अमेरिकन तत्त्ववेत्ते. जन्म अमेरिकेत ग्रास व्हॅली, कॅलिफोर्निया येथे. कॅलिफोर्निया विद्यापीठातून १८७५ मध्ये ते बी. ए. झाले आणि जॉन्झ हॉपकिन्झ विद्यापीठातून १८७८ मध्ये त्यांनी डॉक्टरेट घेतली. मध्यंतरीच्या काळात त्यांनी जर्मनीत लाइपसिक व गटिंगेन विद्यापीठांतही अध्ययन केले. नंतर १८७८ मध्ये ते कॅलिफोर्निया विद्यापीठात आले व तेथे त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. नंतर ते हार्व्हर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्यापनासाठी गेले. तेथे १८८५ मध्ये तत्त्वज्ञानाचे सहायक प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. हार्व्हर्ड विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागात प्रसिद्ध अमेरिकन तत्त्ववेत्ते ⇨विल्यम जेम्स (१८४१−१९१०) यांचे रॉइस हे सहकारी प्राध्यापक होते. 

केवळ तार्किक युक्तीवादांच्या साह्याने तत्त्वमीमांसेची (मेटॅफिझिक्स) रचना करू पाहणारी ⇨विवेकवादी (रॅशनॅलिस्ट) परंपरा आणि प्रत्यक्ष अनुभव व व्यवहार यांच्या आधारे तत्त्वज्ञानाचा विकास करू पहाणारी ⇨फलप्रामाण्यवादी (प्रॅग्मॅटिक) परंपरा यांचा रॉइस यांच्या तत्त्वज्ञानात मिलाफ झाला आहे. विशेषतः ⇨चार्ल्स सँडर्स पर्स (१८३९−१९१४) ह्या प्रसिद्ध अमेरिकन फलप्रामाण्यवादी तत्त्ववेत्त्याचा त्यांच्या विचारांवर विशेष प्रभाव आहे. 

आपल्या ⇨चिद्वादी भूमिकेची रॉइस यांनी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडणी केली आहे. सत्तेची किंवा वास्तवतेची (रिॲलिटी) व्याख्या ज्ञानप्रक्रियेच्या द्वारे केली पाहिजे, असे ते मानतात. ज्ञानाचा विषय असलेली वस्तू ज्ञानाहून भिन्न, वेगळी असते परंतु ती ज्ञानाच्या पलीकडे असू शकत नाही. आपल्या मनात ज्या कल्पना असतात त्यांचे उद्दिष्ट म्हणजे एका विशिष्ट वस्तूच्या स्वरूपाचे आकलन करून घेणे, हे असते. हे उद्दिष्ट सफल होऊ शकते ह्याचे एक कारण म्हणजे, सर्व वस्तूंचा समान किंवा सार्वत्रिक असा आकार असतो. उदा., प्रत्येक खऱ्याखुऱ्या वस्तूला अवकाशात स्थान असते, ती कालात बदलत जाते, इतर वस्तूंशी तिचे कार्यकारणात्मक संबंध असतात, इत्यादी. पण विशिष्ट वस्तूंच्या अंगी ज्याप्रमाणे हा सार्वत्रिक आकार असतो, त्याप्रमाणे तिचे स्वतःचे वैशिष्ट्यही असते. ह्या विशिष्टत्वाचे ज्ञान ज्ञात्याला कसे होऊ शकते ? रॉइस यांचे म्हणणे असे, की प्रत्येक विशिष्ट वस्तू हा केवळ इच्छाशक्तीचा (ॲब्सोल्यूट विल) विशिष्ट आविष्कार असतो. त्या विशिष्ट वस्तूद्वारा केवल इच्छाशक्तीचे एक विशिष्ट प्रयोजन सफल होत असते. तिचे ज्ञान प्राप्त करून घेऊ पहाणारा ज्ञाता हाही केवळ इच्छाशक्तीचा विशिष्ट आविष्कार असतो निसर्ग आणि निसर्गाचे ज्ञान मिळविणारे ज्ञाते हे एकाच केवल इच्छा शक्तीच्या सुव्यवस्थित आविष्कारातील भिन्न प्रकारचे घटक आहेत. म्हणून ज्ञेय वस्तू ही ज्ञात्याहून आणि ज्ञात्याच्या ज्ञानाहून भिन्न असली, तरी त्यांच्या पलीकडची नसते. ज्ञाता आणि ज्ञेय वस्तू ह्यांच्यामध्ये आंतरिक अनुबंध असतो. म्हणूनच ज्ञात्याला स्वतःहून भिन्न असलेल्या वस्तूचे ज्ञान होऊ शकते. म्हणूनच ज्ञात्याला स्वतःहून भिन्न असलेल्या वस्तूचे ज्ञान होऊ शकते. रॉइस यांचा चिद्वाद हा ⇨आर्थर शोपेनहौअर (१७८८−१८६०) यांच्या चिद्वाहदाप्रमाणे, इच्छावादी चिद्वातद (व्हॉलंटरिस्टिक आयडिअलिझम) आहे.

नीतिशास्त्रात रॉइस निष्ठा ह्या सद्गुवणाला मूलभूत स्थान देतात. निष्ठा म्हणजे आपण स्वतंत्रपणे स्वीकारलेले साध्य मूर्त करण्यासाठी त्याला वाहून घेणे. आता वाईट साध्यांवरसुध्दा माणूस निष्ठा ठेवू शकेल. तेव्हा रॉइस असा युक्तीवाद करतात, की कोणतीही निष्ठा नैतिक असते असे म्हणता येत नाही तर निष्ठेवरची निष्ठा नैतिक असते, अस मानावे लागते. माझी जर निष्ठेवर निष्ठा असेल, तर इतरांनी स्वीकारलेल्या साध्यांवर त्यांची जी निष्ठा असेल, तिचाही मला आदर करावा लागेल. तेव्हा निष्ठेवर निष्ठा ठेवणाऱ्या सर्वांची साध्ये परस्परांशी सुसंगत असावी लागतील आणि सुसंवादी सामाजिक जीवन शक्य होईल. निष्ठेवर निष्ठा असणे हे नीतीचे अंतिम आधारभूत तत्त्व आहे.               

धार्मिक तत्त्वज्ञानावरही रॉइस ह्यांनी लिखाण केले आहे. व्यक्ती एकाच वेळी अनेक भिन्न समाजांत जगत असतात. उदा., राजकीय