बेल, क्लाइव्ह : (१६ सप्टेंबर १८८१-१८ सप्टेंबर १९६४). प्रसिद्ध इंग्लिश कला समीक्षक आणि साहित्य समीक्षक जन्म ईस्ट शेफर्ड, बर्कशर येथे. संपूर्ण नाव आर्थर क्लाईव्ह हॉवर्ड बेल. शिक्षण केंब्रिज येथे. प्रसिद्ध ब्लूम्सबरी गटा’ चे ते एक सदस्य होते. व्हर्जिनीया व लिओनार्ट वुल्फ, लिटन स्ट्रेची, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स इ. चा ह्या गटांत अंतर्भाव होत होता. क्लाईव्ह बेल यांचा विवाह ⇨ सर लेस्ली स्टीव्हन्स यांची कन्या आणि ⇨ व्हर्जिनीया वुल्फ यांची बहिण व्हॅनेसा स्टीव्हन्स यांच्याशी झाला होता. आर्ट (म. शी. कला – १९१४), सिन्स सेझान (सेझाननंतर -१९२२), प्राउस्ट (१९२९), अकाउन्ट ऑफ फ्रेंच पेंटींग (फ्रेंच चित्रकलेची हकिकत-१९३१) हे त्यांनी लिहिलेले प्रमुख ग्रंथ होत.

सौंदर्यशास्त्रात बेल यांनी रूपवादी किवा आकारवादी (फॉर्मलिस्ट), उपपत्तीचा पुरस्कार केला. मात्र आपली आकारवादी उपपत्ती त्यांनी चित्रकलेसारख्या दृष्य कला व संगीत यांच्यापुरती मर्यादीत ठेवली आणि ललीत साहित्य तिच्या व्याप्तीपासून वगळले. ह्या उपपत्तीप्रमाणे कलाकृतीचे सौंदर्य किंवा तिचे कलाकृतीपण हे पूर्णपणे तिच्या आकारात सामावलेले असते. तिच्या सौदर्याचा तिच्या आशयाशी काही संबंध नसतो. उदा., चित्राचा आशय काय आहे, ते कशाचे चित्र आहे, ते ज्या प्रकारच्या वस्तूचे किंवा प्रसंगाचे आहे, त्याचे जीवनात किती महत्व आहे, त्या वस्तूच्या किंवा प्रसंगाच्या, त्या चित्राने घडविलेल्या दर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनात कोणत्या करूणा, शोक, आनंद इ. भावना जागृत होतात ह्या गोष्टीवर चित्राचे सौंदर्य यत्किंचितही अवलंबून नसते, तर चित्राचे चित्र म्हणून जे रंग, रेषा, पृष्ठभाग इ. भाग असतात. त्यांच्या परस्परसंबंधांमधून सिद्ध होणाऱ्या त्याच्या आकारावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते. थोडक्यात, कलाकृतीच कलामूल्य तिच्या जीवनमूल्यांवर अधिष्ठित नसते, तर तिच्या आकारीक मूल्यांवर अधिष्ठित असते.

ह्यामुळे कलाकृतीचे सौंदर्यग्रहन करताना आपला जीवनानुभव बाजूला सारून तिच्या केवळ आकारावर लक्ष केंद्रित करावे लागते. ह्या आकारवादी सिद्धांतापासून निष्पन्न होणारा एक निष्कर्ष असा, की कोणत्याही कालखंडातील किंवासंस्क्ृतीतील व्यक्ती कोणत्याही कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला समथ्र असते. कारण रसिकाला कलाकृतीच्या आशयाचे किती यथार्थपणे आकलन झाले आहे आणि ह्या आशयाला तो भावनिक प्रतिसाद कितपत देऊ शकतो ह्या गोष्टींचा तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रक्रियेंशी काही संबंध असत नाही. उलट, कलाकृतीचा आशय जर आपल्या व्यावहारिक जीवनाशी व भावनांशी निगडित असला, तर त्याच्या आकलनामुळे आपलया मनात अनेक विचार व भावना उत्तेजित होतील. आपल्या प्रत्यक्ष जीनाच्या दृष्टीने त्यांचे कितीही महत्व असले, तरी कलाकृतीच्या सौंदर्यास्वादाच्या दृष्टीने त्या पूर्णपणे गैरलागू असतात. आणि कलाकृतीच्या सौंदर्याचा शुद्ध आस्वाद घेताना त्यांचा अडथळा होऊ शकतो.

तेव्हा कलाकृतीचे सौंदर्य केवळ तिच्या आकारात सामावलेले असते किंवा केवळ तिच्या आकारावर अधिष्ठित झालेले असते. ज्या प्रकारच्या आकारावर अधिष्ठित झालेले असते. ज्या प्रकारचया आकारात कलाकृतीचे सौंदर्य सामावलेले असते (किंवा ज्या प्रकारच्या आकारावर कलाकृतीचे सौंदर्य अधिष्ठित असते) त्याला बेल `अर्थपूर्ण आकार’ म्हणतात. हे काहीसे दिशाभूल करणारे पद आहे कारण अर्थपूर्ण आकार स्वतःपलीकडचा कोणताही अर्थ व्यक्त करीत नाही. त्याला अर्थ नसतो. तो स्वतःच अर्थपूर्ण असतो. ह्या अर्थपूर्ण आकाराच्या स्वरूपाचे विश्लेषणही बेल करीत नाहीत. त्याच्या स्वरूपाचे त्यांनी केलेली व्याख्या अशी, की ज्या आकारामुळे आपली सौंदर्य भावना जागृत होते, तो आकार म्हणजे अर्थपूर्ण आकार होय. पण सौंदर्य भावना म्हणजे कोणती भावना, तिचे स्वरूप् काय असते ह्याचे उत्तर एवढेच मिळते की, `अर्थपूर्ण आकारामुळे जी भावना जागृत होते ती सौंदर्य भावना होय’. अर्थात राग, द्वेष, प्रेम इ. आपल्या जीवनविषयक भावनाहुन सौंदर्यभावना वेगळी असते. [→आकार, कलेतील].

थोडक्यात बेल यांची भूमिका अशी, की, सौंदर्यानुभव हा आपल्या अनुभवाचा अलग व स्वायत्त असा प्रांत आहे. त्याचा इतर अनुभव प्रकारांशी काही संबंध असत नाही आणि अर्थपूर्ण आकाराचे दर्शन आणि त्याने उत्तेजित होणारी आणि त्याच्याशी अनुरूप असणारी अशी एक विशिष्ठ अशी सौंदर्यभावना यांचा मिळून सौंदर्यानुभव घडलेला असतो.[→सौंदर्यशास्त्र].

बा.सी. मर्ढेकर (१९०९-५६) यांच्या सौंदर्यविषयक उपपत्तीवर बेल यांच्या विचारांचा बराच प्रभाव आहे हे उघउ आहे. लंडन येथे ते निधन पावले.

रेगे, मे. पुं.