नव–प्लेटो मत: (नीओ-प्लेटॉनिझम). नव-प्लेटो मत हे ग्रीक तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील शेवटचे प्रकरण होय. पाश्चात्त्यांचे जग पूर्णपणे ख्रिस्ती धर्माच्या आहारी जाण्यापूर्वी तेथील चिकित्सक बुद्धीने रचलेले हे अखेरचे दर्शन होय. ते इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात उदयास आले व अल्पावधीतच सर्वत्र पसरले. रोम, अथेन्स, सिरिया, ॲलेक्झांड्रिया, पर्गामम येथील विद्यापीठांत हेच एक दर्शन अभ्यासिले जाऊ लागले. त्याच्या पुढे ⇨ स्टोइक मत, ⇨ एपिक्यूरस मत इ. जुनी तत्त्वज्ञाने फिकी पडली. हे नवे दर्शन बरेचसे गूढवादाकडे झुकलेले होते परंतु ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले नव्हते. त्यामुळे ख्रिस्ती धर्मास पर्याय म्हणून तत्कालीन विचारवंतांना ते अतिशय आकर्षक वाटले परंतु इ. स. सहाव्या शतकात ख्रिस्ती धर्मास राजाश्रय मिळून सर्व अख्रिस्ती विद्यापीठे राजाज्ञेनुसार बंद करण्यात आली. त्यामुळे नव-प्लेटो मताचा अंत झाला आणि त्याचसोबत ग्रीक तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपराही संपुष्टात आली.

नव-प्लेटो मताचा उगम ॲलेक्झांड्रिया येथे झाला. तेथील ॲमोनिअस सॅकस (१७०–२४१) नावाच्या दृष्ट्या विचारवंताने या मताचे सूतोवाच केले परंतु या नव्या तत्त्वज्ञानाचे सविस्तर प्रतिपादन सॅकसचा शिष्य ⇨ प्लोटायनस (२०५–७०) याने केले. प्लोटायनस म्हणूनच नव-प्लेटो मताचा संस्थापक मानला जातो. प्लोटायनसचा जन्म ईजिप्तमध्ये लायकॉपलिसनामक शहरात झाला. त्याच्या कुलवंशाविषयी काहीच अधिकृत माहिती मिळत नाही. ज्ञानार्जनासाठी तो ॲलेक्झांड्रियास गेला. तेथे त्याने अनेक विद्वानांची प्रवचने श्रवण केली परंतु त्याचे समाधान सॅकसची शिकवण ऐकल्यावरच झाले. सॅकसजवळ तो अकरा वर्षे राहिला.

पौर्वात्य देशांत जाऊन पर्शियन व भारतीय तत्त्वज्ञानाची माहिती मिळवावी अशी त्याची तीव्र इच्छा होती. म्हणून पर्शियावर स्वारी करावयास निघालेल्या रोमन सम्राटाच्या सैन्यात तो दाखल झाला परंतु वाटेत त्या सम्राटाचा खून होऊन त्याच्या सैन्याची पांगापांग झाली आणि प्लोटायनसला कसाबसा आपला जीव बचावून रोमला परतावे लागले. रोममध्ये लवकरच त्याने आपले बस्तान बसविले व तेथे आपले विद्यापीठ स्थापन केले.

प्लोटायनसचे तत्त्वज्ञान:(१) ईश्वर : प्लोटायनसच्या तत्त्वज्ञानात प्रथम जगत्कारण अशा ईश्वराचे स्वरूप वर्णन केले असून नंतर जगाची उत्पत्ती कशी होते, हे सांगितलेले आहे. पुढे आत्म्याचे ईश्वराशी असलेले नाते विशद करून आत्म्याच्या उद्धाराचा मार्ग दर्शविलेला आहे. प्लोटायनसच्या मते, जगत्कारण ईश्वर हा जगावेगळा असतो असे मानलेच पाहिजे. कारण, कारण हे कार्याहून भिन्न असते. ईश्वराचे जर सृष्टीशी संपूर्ण तादात्म्य असते, तर सर्व सृष्ट वस्तू या एकसारख्या दिसल्या असत्या आणि त्यांच्यामध्ये भेद राहिलेच नसते. म्हणून ईश्वर जगतातीत असून त्याचे स्वरूप अगम्य, मनोहर आहे. त्याची गुणसंपदा इतकी अफाट आहे, की तिचे वर्णन करावयास मानवाची भाषा असमर्थ ठरते. या भाषेत सान्त वस्तूंचे वर्णन करता येते परंतु अनंत असे ईश्वरी स्वरूप वर्णिता येणेच शक्य नाही. भाषेमधील सर्व विशेषण-पदे ही मुळी द्वैतसूचक असतात त्यांत पदार्थ व त्यांचे गुणधर्म या दोहोंमधील द्वैत अभिप्रेत असते. अशा द्वैतवाची पदांनी द्वैतातीत ईश्वराचे खरे स्वरूप व्यक्त होऊच शकत नाही. ‘एकत्व’ आणि ‘शिवत्व’ ही पदेदेखील द्वैतसूचक आहेत. ‘एकत्व’ या पदात अनेकत्वाचा निषेध सुचविलेला असतो, तर ‘शिवत्व’ या पदाने एका वस्तूचा दुसरीवरील परिणाम दर्शविलेला असतो. एकंदरीत ईश्वराचे स्वरूप अनिर्वचनीय व अवर्णनीय असते हेच खरे.

(२) विश्व: ईश्वरापासून विश्वाची उत्पत्ती होते परंतु या विश्वोत्पत्तीच्या प्रक्रियेमुळे ईश्वराच्या पूर्णतेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही. त्याची परिपूर्णता अखंड ओसंडत असते आणि त्यातूनच जगाची उत्पत्ती होते. सूर्यापासून जसे तेज प्रकट होते तसे ईश्वरापासून जग प्रकट होते. प्रकाशाचे अखंड दान करूनही ज्याप्रमाणे सूर्याचे तेज कमी होत नाही, त्याचप्रमाणे सृष्टीची निर्मिती करूनही ईश्वराची पूर्णता बाधित होत नाही. 

अशा प्रकारे ‘निःसरणा’च्या प्रक्रियेनुसार आदिकारणापासून जग उत्पन्न होते. आणखी असे, की सूर्यापासून निःसृत होणारा प्रकाश मंदावत जाऊन अखेर अंधःकारात लुप्त होतो. जणू सूर्यापासून अंधःकारापर्यंत प्रकाशाची उतरंड अथवा उतरती श्रेणी असते. ईश्वरापासून सृष्टीचीदेखील अशीच उतरंड उलगडत जाते आणि ती जड वस्तूमध्ये समाप्त होते. या उतरंडीमध्ये प्रथम विवेकतत्त्व वा बुद्धी (नाउस) प्रकट होते. नंतर जगड्व्याळ विश्वात्मा अवतीर्ण होतो, नंतर छोटे छोटे जीवात्मे उत्पन्न होतात.

जडवस्तू ही निःसरणाच्या उतरंडीवरील शेवटची पायरी होय. निःसरणप्रक्रियेचा आरंभबिंदू ईश्वर असून जडद्रव्य हे तिचे दुसरे टोक होय आणि म्हणून जडवस्तूचे स्वरूप हे ईश्वराच्या स्वरूपास बरोबर विरोधी आहे. ईश्वर हा पूर्णतेचा अथवा गुणसंपन्नतेचा अथांग सागर असतो, तर जडवस्तू ही अपूर्णतेचे अथवा दोष-दुर्गुणांचे माहेरघर असते. ईश्वर म्हणजे स्थिर, नित्य, अपरिवर्तनीय सद्‌वस्तू होय परंतु जडद्रव्य हे परिवर्तनशील आभासांचे चंचल चक्र होय.

इंद्रियगोचर सृष्टी ही जडद्रव्याने घडविलेली आहे. येथे आढळून येणारी दुरिते, दोष, उपाधी जडद्रव्यापोटीच उद्‌भवतात. सर्व दुरितांचा उगम जडद्रव्यातूनच होतो परंतु प्लोटायनसच्या मते दुरित हे स्वतंत्र तत्त्व नाही. ईश्वरी पूर्णतेपासून सुरू होणाऱ्या निःसरणाच्या उतरंडीवर ते प्रकटते, म्हणून ते सापेक्ष असते. कृष्णपक्षातील चंद्रकोरीप्रमाणे दुरित हे शिवतत्त्वाचे क्षीणतर रूप असते. शिवतत्त्व आणि दुरित या दोहोंमध्ये केवळ कमी अधिकतेचा, परिमाणात्मक भेद असतो. म्हणूनच प्लोटायनसने इंद्रियगोचर सृष्टीचा पूर्णपणे अधिक्षेप केला नाही. ईश्वराच्या पूर्णतेतून ही सृष्टी उत्पन्न झालेली असल्यामुळे तिचे ईश्वराशी अतूट नाते असते. तिच्या व्यवहारात सुंदर सुसूत्रता नांदते.

(३) आत्मा आणि नैतिक जीवन: प्लोटायनसच्या मते, अगम्य ईश्वरी स्वरूपातून प्रथम विवेकतत्त्व वा बुद्धी उदयास येते. ती एक विश्वव्यापी, त्रिकालज्ञ, चिरंतन, आनंदमय अशी ज्ञानशक्ती आहे. तिच्या उदरात वस्तूंची मर्मतत्त्वे नांदतात. या विवेकशक्तीतून आत्मा उत्पन्न होतो. प्रथम विश्वात्मा प्रकटतो आणि नंतर जीवात्मे. आत्मा हा अविनाशी, चैतन्यमय, कालातीत असतो. तो अतींद्रिय आणि इंद्रियागोचर सृष्टी यांच्या सीमेवर असतो. उच्च आणि नीच अशा दोन पातळ्यांवर त्याचा संचार होतो. उच्च पातळीवर असला, की त्याचा अतींद्रिय सृष्टीशी संपर्क राहतो आणि नीच पातळीवर घसरला, की तो इंद्रियगोचर सृष्टीच्या व्यवहारात बुडून जातो. विश्वात्मा हा उच्चतर पातळीवर असताना विवेकतत्त्व आणि ईश्वर यांच्याशी एकरूप असतो. नीच स्तरावर उतरला, की तो जडवस्तूच्या पसाऱ्यात गुरफटतो आणि त्याला निसर्गाची नामरूपे प्राप्त होतात. विश्वात्म्याप्रमाणे जीवात्मेदेखील उच्च आणि नीच अशा दोन स्तरांवर संचार करतात. उच्च स्तरावर असले, की ते ईश्वरासमीप जाऊन पोहोचतात आणि नीच स्थरावर उतरले, की सृष्टीच्या व्यापारात गुंतून पडतात.


मानवी जीवात्मादेखील दोन पातळ्यांवर जगत असतो. त्याने आपली स्वाभाविक उच्चतर पातळी गाठली, की त्याला विवेकतत्त्व व ईश्वर यांची गूढरम्य प्रचीती येते पण निःसरणाच्या प्रवाहात सापडून तो खालच्या पातळीवर उतरला, की जडदेहाच्या पाशात गुरफटून जातो आणि दुरितांच्या आवर्तात गोते खातो. नीचतर पातळीवर उतरून मानवी जीवात्म्याने जडवस्तुमय देहाशी जवळीक केली, की मनुष्याला दुःख, दुरित यांचे भोग भोगावे लागतात परंतु देहाची जवळीक टाकून आत्मा जेव्हा उच्चतर पातळीवर विहार करतो तेव्हा या दुःख, दुरितांचे निरसन होते आणि त्याला ईश्वरभेटीचा अनिर्वचनीय आनंद अनुभवास येतो.

यास्तवच ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे श्रेष्ठ उद्दिष्ट होय. नैतिक आचरण आणि बौद्धिक चिंतन यांच्या बळावर हे उद्दिष्ट साध्य करता येते. ईश्वरसन्निध जातेवेळी साधकाला कोणकोणते टप्पे ओलांडावे लागतात, याचे प्लोटायनसने वर्णन केले आहे. प्रथम इंद्रियनिग्रह, धैर्य, शहाणपण आणि न्यायप्रियता या चार सद्‌गुणांचे संवर्धन केले पाहिजे. नंतर विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचे परिशीलन केले पाहिजे आणि विवेकतत्त्वाची ओळख करून घेतली पाहिजे. विवेकतत्त्वाशी आत्मा एकरूप करून उच्चतर भरारी घेतली, की ईश्वरभेटीचा, साक्षात्काराचा सोहळा अनुभवास येतो. खुद्द प्लोटायनसला अशा साक्षात्काराचा अनुभव चारदा आला होता, असे त्याच्या चरित्रकाराने म्हटले आहे. प्लोटायनसच्या मते, आत्म्याला संकल्पस्वातंत्र्य असते. देहेंद्रियांच्या पाशात गुंतून रहायचे व नाना व्याधी भोगावयाच्या, की सद्‌गुणांचे संवर्धन करावयाचे व ईश्वरभेटीस पात्र व्हावयाचे? यांतील कुठलाही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मनुष्याला असते. तसेच नैतिक जीवन हे मानवास स्वभावसुलभ असते, असे प्लोटायनस मानीत असे. ईश्वरापासून दुरावलेल्या जीवात्म्याची दुरवस्था होते आणि त्याला ईश्वराकडे परतण्याची आंतरिक ओढ लागते. ईश्वरापासून आत्म्याचे जे बहिर्गमन होते ते प्रत्यागमनाप्रीत्यर्थच होते. प्रत्यागमनाची ही आत्मिक तळमळ, हीच नीतिमत्तेची मूळ प्रेरणा होय.

प्लोटायनसनंतरचे नव-प्लेटो मत: प्लोटायनसच्या अनुयायांनी त्याच्या तत्त्वज्ञानाचे लोण रोमन साम्राज्याच्या सर्व भागांत नेऊन पोहोचविले. त्याकाळी जनमानसात ज्या आध्यात्मिक प्रवृत्ती नांदत होत्या त्या प्रवृत्तींना या मतात यथोचित अवसर व स्थान मिळाले होते. शिवाय प्लेटो, ॲरिस्टॉटल इ. पूर्वसूरींच्या तत्त्वविचारांचे या मतात उत्कृष्ट संकलन केलेले होते. यामुळे तत्कालीन बहुतेक विचारवंतांना हे मत ग्राह्य वाटू लागले आणि त्या काळच्या प्रमुख विद्यापीठांत त्याचे परिशीलन होऊ लागले.

रोम येथील विद्यापीठ: प्लोटायनसच्या पश्चात त्याच्या रोम येथील विद्यापीठात त्याचा शिष्य पॉर्फिरी (२३४–३०५) हा पीठप्रमुख झाला. त्याने प्लोटायनसचे चरित्र लिहिले आणि प्लोटायनसचे तत्त्वज्ञानविषयक लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले. ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्रावरही त्याने एक चिकित्सात्मक ग्रंथ लिहिला. तार्किक पदार्थ-प्रकारांविषयी (कॅटिगरीज) काही नवे विचार मांडले. तार्किक विभाजनाचा एक नमुना ‘पॉर्फिरीचा वृक्ष’ म्हणून प्रसिद्ध झाला. ख्रिस्ती धर्मावर दारुण टीका करणारा त्याचा एक ग्रंथ पुढे ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांनी जाळून टाकला.

सिरिया येथील विद्यापीठ: पॉर्फिरीचा शिष्य आयँब्लिकस (२७०–३३०) याने सिरिया येथे आपले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्याच्या नव-प्लेटो मतावर पायथॅगोरियन गूढवादाची छाप पडली होती. ईश्वर आणि सृष्टी या दोहोंच्या दरम्यान अनेक तत्त्वे अथवा ‘दैवते’ नांदतात, असे मत मांडून त्याने चमत्कार, मंत्रतंत्र आणि अंधश्रद्धासुलभ गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले.

पर्गामम येथील विद्यापीठ: आँयब्लिक्सचा शिष्य ईडेशियस याने आशिया मायनरमधल्या पर्गाममनामक नगरात आपले विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठाच्या मॅक्झिमस इ. विचारवंतांनी अनेक देवतावादाचा पुरस्कार केला. रोमन सम्राट ज्यूल्यन (३३१–६३) याचे या विद्यापीठातच शिक्षण झाले होते. गादीवर आल्यानंतर त्याने ग्रीक संस्कृती आणि ग्रीक लोक यांविषयी सहानुभूती दर्शविणारे धोरण अवलंबिले. ख्रिस्ती धर्मास त्याचा विरोध होता. ख्रिस्ती धर्मावर टीकाप्रहार करणारा त्याचा ग्रंथ पुढे ख्रिस्ती धर्मीयांनी जाळून टाकला.

अथेन्स येथील अकादमी: प्लेटोने अथेन्स येथे स्थापन केलेल्या अकादमीमध्ये [→ अकादमी–१] प्लूटार्क (सु. ३५०–४३०) नावाच्या पीठप्रमुख विचारवंताने नव-प्लेटो मताचा पुरस्कार करावयास आरंभ केला. यामुळे अकादमी नव-प्लेटो मताच्या आहारी गेली आणि तिच्या प्रदीर्घ इतिहासाचे शेवटचे पर्व सूरू झाले. या कालखंडात तेथे प्रॉक्लस (सु. ४१०–सु. ४८५) नावाचा एक गाढा पंडित होऊन गेला. ‘प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ स्कोलॅस्टिक’ अशी त्याची ख्याती झाली. त्याने नव-प्लेटो मतावर विपुल लेखन केले. त्याची विवेचनपद्धती अत्यंत सुसूत्र होती. या पद्धतीचे पुढे ख्रिस्ती आणि अरब धर्मविद्यावेत्त्यांनी अनुकरण केले.

ॲलेक्झांड्रिया येथील विद्यापीठ: येथील विचारवंत प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या ग्रंथांची सटीक विवरणे करीत असत आणि गणितशास्त्र, खगोलशास्त्र, तर्कशास्त्र इ. शास्त्रांचे अध्ययन करीत असत. त्यांनी नव-प्लेटो मतास अत्यंत सोपे स्वरूप दिले. हायपेशिया (सु. ३६५–४१५) नावाच्या तेथील विदुषीला धर्मवेड्या ख्रिस्ती जमावाने ठार मारले तथापि या विद्यापीठाच्या विचारवंतांनी ख्रिस्ती धर्माविरुद्ध आघाडी उघडली नाही. उलट त्यांच्यापैकी काहीजणांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली.

रोमन साम्राज्याचा पश्चिम विभाग: वर उल्लेखिलेली रोम, अथेन्स, ॲलेक्झांड्रिया, सिरिया, पर्गामम ही नव-प्लेटो मताची केंद्रे रोमन साम्राज्याच्या पूर्व विभागात होती. त्याचप्रमाणे या साम्राज्याच्या पश्चिम विभागातही काही विद्यापीठे होती. तेथेही नव-प्लेटो मताचा प्रसार झाला. बोईथियस (सु. ४८०–५२५) हा तेथील सर्वश्रेष्ठ विचारवंत होय. तो स्वकर्तृत्वाने राजदरबारात अत्युच्च अधिकार पदावर चढला परंतु दैवगती उलटल्यावर त्याच्या वाट्यास तुरुंगवास आणि गळफास आला. तुरुंगात असताना त्याने De Consolatione Philosophiae (म. शी. तत्त्वज्ञानामुळे सांत्वन) नावाचा ग्रंथ लॅटिनमध्ये लिहिला आणि तो अतिशय लोकप्रिय झाला. त्याने ॲरिस्टॉटलच्या काही ग्रंथांची लॅटिनमध्ये भाषांतरेही केली. ती मध्ययुगीन विचारवंतांनी मोठ्या प्रमाणावर वापरली.

नव-प्लेटो मताचे विचारवंत स्वतःस ‘प्लेटो-मतवादी’ म्हणवीत असत. आपण मूळ प्लेटोचेच तत्त्वज्ञान विशद करीत आहोत, असा त्यांचा दावा होता. त्यांच्या तत्त्वप्रणालीमधील बरीच तत्त्वे प्लेटोच्या ग्रंथांमधून घेतलेली होती यात शंका नाही परंतु त्याचसोबत ॲरिस्टॉटलप्रभृती अन्य तत्त्वज्ञांचेही विचार या तत्त्वप्रणालीत सामावून घेतलेले होते आणि विशेषतः उत्तराकालीन नव-प्लेटो मताच्या पुरस्कर्त्यांनी अनेकदेवतावाद, धर्मश्रद्धा, मंत्रतंत्र इ. गोष्टींना पाठिंबा देऊन प्लेटोच्या मूळ शिकवणीलाच हरताळ फासला, असे म्हटले पाहिजे. त्यांनी बुद्धिवादाचा अव्हेर केला, तर्कनिष्ठ चिकित्सा बाजूला सारली आणि अध्यात्मशास्त्रास धार्मिक अंधश्रद्धेच्या दरीत लोटून दिले.

काही नव-प्लेटो मताच्या विचारवंतांनी ख्रिस्ती धर्मास विरोध केला आणि ख्रिस्ती धर्माने अखेर राजसत्तेची मदत घेऊन नव-प्लेटो मताचा पाडाव केला हे जरी खरे असले, तरी ख्रिस्ती धर्मीयांनी नव-प्लेटो मतातून अनेक गोष्टी शिकून घेतल्या, हे निर्विवाद होय. धर्माची गूढवादात्मक शिकवण बुद्धिगम्य पद्धतीने कशी मांडावी, याचे तंत्र त्यांना नव-प्लेटो मतात शिकावयास मिळाले. प्लोटायनस, आयँब्लिकस, प्रॉक्लस यांच्या ग्रंथांचा ख्रिस्ती विचारवंतांवर चांगलाच प्रभाव पडला. सेंट ऑगस्टीन (३५४–४३०), एरिजेना (सु. ८१०–७७), माइस्टर एक्‌हार्ट (सु. १२६०–सु. १३२८), निकोलस (१४०१–६४) इ. मध्ययुगातील ख्रिस्ती विचारवंत नव-प्लेटो मताच्या ग्रंथांनी उघडच प्रभावित झालेले होते. त्याचप्रमाणे कडवर्थ (१६१७–८८), हेन्‍री मूर (१६१४–८७) इ. सतराव्या शतकातील ‘केंब्रिज प्लेटॉनिस्ट’ विचारवंतही प्रभावित झालेले होते.

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान प्लेटो.

संदर्भ : 1. Copleston, F. A History of Philosophy, Vol. 1, London, 1961.

           2. Inge, W. R. The Philosophy of Plotinus, London, 1948.

           3. Turnbull, G. H. The Essence of Plotinus, New York, 1934.

           4. Whittaker, Thomas, The Neo-Platonists, New York, 1928.

केळशीकर, शं. हि.