इब्‍न सीना : (९८०–१०३७). एक अरबी तत्वज्ञ व वैद्यकवेत्ता. पूर्ण नाव अबुल अली अल्-हुसेन इब्‍न अब्दल्ला इब्‍न सीना. त्याचे लॅटिन नाव ॲव्हिसेना. मुसलमानांमध्ये त्याला अल्‌-शेख अल् रईस (विद्वानांचा राजा) मानतात. बूखाराजवळील अफशाना येथे त्याचा जन्म झाला. गव्हर्नर म्हणून नेमणूक झाल्यामुळे त्याचे वडील बूखारा येथे रहावयास गेले. यावेळी तो दहा वर्षांचा होता. या वयातच त्याचा वाङ्‌मयाचा भरपूर अभ्यास झाला होता. कुराण तर त्याला मुखोद्‌गत होते. वडिलांचा कल इस्माइली पंथाकडे असल्याने साहजिकच त्याच्या विचारांवरही त्या पंथाचा थोडाफार प्रभाव पडला. नंतर न्यायशास्त्राचा (फिक्‌ह) विशेष अभ्यास करून तो तर्कशास्त्र, भूमिती आणि खगोलशास्त्र या विषयांकडेही वळला. प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभली असल्याने भौतिकी, तत्त्वमीमांसा आणि वैद्यक यांचा अभ्यास त्याने कुणाचीही मदत न घेता पूर्ण केला आणि वयाच्या सतराव्या वर्षीच तो शेख (विद्वान) म्हणून मान्यता पावला.

बूखारा येथील नूह इब्‍न मन्शूर नावाच्या सुलतानचा रोग बरा केल्यामुळे त्याला सुलतानाच्या ग्रंथालयात अभ्यास करण्याची परवानगी मिळाली. मूळची असामान्य स्मरणशक्ती, सर्वगामी प्रखर बुद्धिमत्ता आणि ही संधी यामुळे तो लवकरच ज्ञानसंपन्न झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याने लेखनास सुरुवात केली. त्याची शैली त्या वेळेपासूनच सुबोध आणि सारग्रही होती. त्याकाळी उपलब्ध असलेले सर्व ज्ञान त्याच्या लेखनात संकलित झालेले आहे. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याचे वडील वारले. त्यानंतरचे त्याचे आयुष्य अगदी हालअपेष्टांत जरी नाही, तरी काहीशा अनिश्चिततेत आणि अस्वस्थतेत गेले. दारू अणि तशाच इतर चैनींच्या अतिरिक्त आसक्तीमुळे त्याचे आयुष्य कमी झाले असे म्हणतात. आयुष्यातील अखेरीचे दिवस त्याने इस्फाहनमध्ये अल्ला अल्-दौलाच्या नोकरीत घालविले आणि इराणमधील हामादान येथे तो मृत्यू पावला.

त्याचे दोन अतिशय मोठे व महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे किताब अल्शिफा (तत्त्वज्ञानपर विश्वकोश) आणि अल्कानून फी अल्तिब्ब (वैद्यकावरील सर्वसंग्रहात्मक ग्रंथ) हे होत. पर्वतांच्या उत्पत्तीसंबंधी त्याने केलेल्या वर्णनावरून त्याला भूविज्ञानाचा जनक मानण्यात येते. त्याने लहानमोठे शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. तो खऱ्याअर्थाने जगातील सर्व ज्ञान संग्रहित करणारा कोशकार होता.

ईश्वरविद्या, तत्त्वज्ञान, आणि वैद्यक ह्या विषयांतील त्याचा अधिकार फार मोठा समजला जात असे. ⇨ अल्फाराबीचा त्याच्या विचारांवर बराच प्रभाव होता. तर्कशास्त्र आणि ज्ञानमीमांसा ह्या विषयांपुरता तर तो अल्-फाराबीचा अनुयायीच होता. तर्कशास्त्र म्हणजे मधल्या पायरीवरचे शास्त्र असे तो मानीत असे. त्याच्या मते तत्त्वज्ञानाचे सैद्धांतिक आणि व्यावहारिक असे दोन प्रकार संभवतात. सैद्धांतिक तत्त्वज्ञानाचे भौतिकी, गणितशास्त्र आणि तत्त्वमीमांसा असे, तर व्यावहारिक तत्त्वज्ञानाचे नीतिशास्त्र, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र असे विभाग तो मानीत असे. त्याची भौतिकी प्रामुख्याने ॲरिस्टॉटलप्रणीत भौतिकीवर आधारित आहे परंतु काही प्रमाणात तिच्यावर नव-प्लेटोमताचाही प्रभाव आहे.

नव-प्लेटोमतातून स्वीकारलेल्या काही मूळ कल्पनांच्या आधारे ॲरिस्टॉटल आणि प्लेटो ह्यांच्या विचारांचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न त्याच्या तत्त्वमीमांसेत दिसून येतो. मन आणि द्रव्य (किंवा विद्यमानता-क्षमता) तसेच ईश्वर आणि जगत यांमधील द्वैत अल्-फाराबीपेक्षा त्याच्या विचारात अधिक ठळकपणे दिसून येते. आत्म्याच्या अमरत्वाविषयीचा सिद्धांत त्याने स्पष्टपणे मांडला आहे. ईश्वराला केवल आणि मूलभूत स्वरूपाची सत्ता (अस्तित्व) आहे आणि ह्या विश्वाचे मूलकारणही तोच आहे, असे तो म्हणतो. त्याच्या मते विश्व ही एक अनंत व शाश्वत प्रक्रिया आहे.

वैद्यकातील त्याचे कार्य तर अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. त्याच्या या क्षेत्रातील कार्याचा प्रभाव सतराव्या शतकापर्यंत दिसून येतो. सु. तिसऱ्याशतकात होऊन गेलेला विख्यात ग्रीक वैद्य व तत्त्वज्ञ गेलेन ह्याच्याप्रमाणेच त्याचेही कार्य असल्यामुळे त्याचा अरब गेलेन म्हणून गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. नारू व काळपुळी या रोगांचे त्याने वर्णन केलेले असून मधुमेहाच्या रोग्याचे मूत्र गोड असते, असे त्याने म्हटले आहे. सल्फ्यूरिक अम्‍ल आणि अल्कोहॉल यांचे वर्णन त्यानेच प्रथम केले असे म्हणतात. वैद्यकावरील ग्रंथांतून त्याने बहुधा स्वतःचेच प्रयोग आणि निरीक्षणे समाविष्ट केली असावीत परंतु हे पडताळून पहावयास हवे.

इब्‍न सीनाच्या जीवनावर आणि कार्यावर यूरोपात विपुल साहित्य निर्माण झालेले आहे.

संदर्भ : Afnan, S.m. Avicenna, His Life and Works, New York, 1958.

फैजी, अ. अ. अ. (इं.); सुर्वे, भा. ग. (म.)