जडप्राणवाद : (‍ॲनिमिझन), आत्म्याचे वा प्राणतत्त्वाचे स्वयंभू अस्तित्व सर्वत्र मानणारी एक उपपत्ती. विश्वातील सर्व जड व चेतन वस्तूंमध्ये प्राण किंवा आत्मा असतो, असे ह्या उपपत्तीनुसार मानले जाते. इंग्रजीत जडप्राणवादासाठी ‘ॲनिमिझम’ ही संज्ञा असून ती मूळ लॅटीन Anima म्हणजे प्राण किंवा आत्मा ह्या शब्दापासून आलेली आहे. प्रथम जी. ई. श्टाल (१६६०–१७३४) याने अठराव्या शतकाच्या आरंभी मांडलेल्या उपपत्तीस अनुलक्षून ‘ॲनिमिझम’ ही संज्ञा वापरली गेली. त्याच्या मते प्राणतत्त्व आणि आत्मा एकरूपच होत. परंतू नंतर ही संज्ञा ई. बी. टायलर (१८३२–१९१७) याने आपल्या प्रिमिटिव्ह कल्चर (१८७१) ह्या ग्रंथात प्रतिपादिलेल्या अर्थी वापरली जाते.

प्राणमय किंवा चैतन्यमय आत्म्याच्या स्वतंत्र, स्वयंभू अस्तित्वावरील श्रद्धा हे कुठल्याही धर्माचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे टायलर प्रतिपादन करतो. त्याच्या मते आदीम मानवासमोर दोन समस्या होत्या : (१) जिवंत व मृत देह हा फरक कशामुळे होतो? तसेच जागृती, निद्रा, मूर्च्छा, आधिव्याधी व मृत्यू यांची कारणे काय ? आणि (२) जागृतावस्थेत भासमान होणाऱ्या वा स्वप्नात दिसणाऱ्या मानवी आकृती काय आहेत?

वरील दोन समस्यांची उकल आदिम मानवाने प्राणमय किवां सर्व जडचेतन वस्तूंत असणाऱ्या भूतात्म्यांच्या अस्तित्त्वाची कल्पना मांडून केली. ह्या भूतात्म्यांचे अस्तित्व हे भ्रामक मानवी प्रतिमेसारखे, धूसर किंवा छायेसारखे असते. ज्या व्यक्तीत हा भूतात्मा वावरतो त्या व्यक्तीच्या जिवंतपणाचे तसेच मानसिक व वैचारिक प्रक्रियांचेही कारण तोच असतो. हा प्राण किंवा भूतात्मा मूळ व्यक्तीचे शरीर सोडून बाहेर भटकू शकतो व इतर व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा स्वप्नात मूळ व्यक्तीच्या प्रतिमारूपात दिसण्यास समर्थ असतो. इतकेच नव्हे तर अन्य व्यक्ती, प्राणी व निसर्गातील जड वस्तूंतही तो प्रवेश करू शकतो. स्वप्न पाहत असलेला मनुष्य जेव्हा जागा होतो तेव्हा त्याची अशी समजूत असते, की त्याचा आत्मा खरोखरीच त्याचे शरीर सोडून बाहेर गेलेला असतो किंवा इतरांचे आत्मे ती ती शरीरे सोडून प्रत्यक्ष त्याच्याकडे आलेले असतात. कधी कधी मानवास अशा भूतात्म्यांचे निर्वस्तुभ्रमही होत असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर मृत व्यक्तीची आकृती लोकांना स्वप्नात दिसत असते तसेच ती जागृतावस्थेतही भासमान होत असते. हे भूतात्मे क्षणभर दिसून चटकन अदृश्य होतात.

आदिम मानवाच्या कल्पनेनुसार केवळ मनुष्याला किंवा प्राण्यालाच व्यक्तित्व असते असे नाही, तर जड वस्तूंनाही व्यक्तित्व असते. ह्या भूतात्म्यांनी सर्व निसर्ग व विश्व भरलेले असते. सर्व सजीव–निर्जीव वस्तूंत हे भूतात्मे वास करतात. आपले अस्तित्व म्हणजे काही सर्वस्वी नवीन जीवन नाही, तर ती एक भूतात्म्यांच्या आपल्या शरीरातील आश्रयामुळे सुरू असलेली अखंड बाब होय. प्राथमिक धर्मांत ह्या कल्पनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानव, प्राणी, वनस्पती, दगडादी जडवस्तूंमध्ये हे भूतात्मे पुन्हा जन्म घेतात. मरणोत्तर ती व्यक्ती आपला जिवंतपणीचा स्वभावधर्म भूतात्म्याच्या स्वरूपात टिकवून ठेवते आणि भूतकालीन किंवा तत्कालीन कारणाने आपले शत्रुत्व करणाऱ्या व्यक्तीस आजारी पाडून आपला सूड उगवून घेते. आपल्या स्वभावधर्मानुसार हे भूतात्मे बरी वाईट कृती करण्यास समर्थ असतात. टायलरच्या मते केवळ कुटुंबप्रेमामुळेच नव्हे, तर भूतात्म्यांच्या ह्या सामर्थ्यामुळेही साहजिकपणेच पूर्वजांची पूजा करण्याची पद्धती अनेक धर्मांत दिसून येते.

सर्वसामान्य भूतात्म्यांहून श्रेष्ठ असे काही भूतात्मे प्राथमिक मानवाने देवतास्वरूप मानले तसेच श्रेष्ठ व कर्तृत्ववान मनुष्यांचे आत्मे मरणोत्तर आपले श्रेष्ठत्व टिकवून ठेवतात, ह्या समजुतीतून अशा भूतात्म्यांची पूजा करण्याची पद्धतीही रूढ झाली.

शरीर व भूतात्मा ह्यांच्या व्दैतस्वरूपात टालयरने दिलेले वरील स्पष्टीकरण धर्माच्या तत्त्वज्ञानास तो म्हणतो तसे आधारभूत आहे. केवळ प्राथमिक अवस्थेतील लोकच नव्हे, तर अधिक प्रगत अशा संस्कृतींचे लक्षावधी लोक जडप्राणवादी आहेत. त्यांचे वैद्यक, ⇨ जादूटोणा, धर्म यांवर जडप्राणवादाचा प्रभाव दिसतो. टायलरच्या उपत्तीत आज बऱ्याच त्रुटी जाणवत असल्या, तरी त्याने प्राथमिक धर्मांच्या उपपत्ती बाबत त्या काळी केलेले जडप्राणवादी विवरण मोलाचे आहे. आर्. आर्. मॅरेट (१८६६–१९४३) याने टायलरच्या उपपत्तीतील त्रुटी दाखवून देऊन तीत जडप्राणमयतावादाची (ॲनिमॅटिझम) कल्पना मांडून सुधारणा केली. त्याच्या मते जडप्राणवादी कल्पनेच्या सोबतच किंबहुना तिच्याही आधी ⇨माना   ही कल्पना प्राथमिक धर्मांच्या मुळाशी असते. मॅरेट याने आपली जडप्राणमयतावादाची कल्पना आर्. एच्. कॉडरिंग्टन याने वर्णिलेल्या मेलानीशियनांच्या माना कल्पनेवर आधारलेली आहे. मानाशक्ती म्हणजे आत्मा अथवा प्राणतत्त्व वा भूतात्मा नसून ती एक सर्वत्र संचारणक्षम (कम्युनिकेबल) असलेली अव्यक्तिगत, पण अलौकीक अशी शक्ती आहे. ती भौतीक शक्तीहून वेगळी असून सर्वच प्रकारे शुभाशुभ, इष्टानिष्ट, बरेवाईट परिणाम घडवून आणते. मॅरेट यास मानाशक्तीची कल्पना आपल्या जडप्राणमयतावादी कल्पनेस पोषक वाटल्याने त्याने ती उचलून धरली. त्याच्या मते वस्तू ही तीत आत्मा किंवा प्राण असल्याशिवायही कार्यक्षम असू शकते व ती आपल्या अंगच्या मानाशक्तीने शुभाशुभ वा बरावाईट प्रभाव पाडू शकतो. यासच मॅरेट ‘ॲनिमॅटिझम’ किंवा ‘प्रिॲनिमिझम’ म्हणजे जडप्राणमयतावाद किंवा पूर्वजडप्राणवाद म्हणतो.

अँड्रू लँग (१८४४–१९१२) याने आपल्या द मेकिंग ऑफ रिलीजन  (१८९८) ह्या ग्रंथात टायलरच्या उपपत्तीवर कडाडून हल्ला चढविला. काही प्राथमिक वंशातील लोकांच्या अनेक देवतांमध्ये प्राणतत्त्व किंवा आत्म्याची कल्पनाच आढळत नाही, असे त्याने अनेक उदाहरणांनी दाखवून दिले. त्याच्या मते मानवारोपित ईश्वरवादाचा व धर्मांचा उगम जडप्राणवादी कल्पनेनुसार झाला नाही तर तो ‘हे जग निर्माण करणारा कोणी तरी निर्माता असला पाहिजे’, ह्या कल्पनेतून झाला असावा. म्हणून टायलरने जडप्राणवादाद्वारे प्रतिपादलेली उपपत्ती प्राथमिक धर्मांचा उगम स्पष्ट करण्यास आधारभूत मानता येत नाही. फार तर त्याच्या उपपत्तीमुळे प्राथमिक धर्मशास्त्राची उकल होण्यास मदत होते.

संदर्भ : 1. Frazer, J. G. The Golden Bough, London, 1963.

           2. Lang, Andrew, The Making of Religion, London, 1898.

           3. Marett, R. R. The Threshhold of Religion, London, 1914.

           4. Tylor, E. B. Primitive Culture, 2 vols., London 1920.

सुर्वे, भा. ग.