अकादमी – १ : प्राचीन ग्रीसमध्ये सुविख्यात ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो (४२७-३४८ इ.स.पू.) याने स्थापिलेल्या विद्यापीठास ‘अकॅडमी’ किंवा ‘अकादमी’ म्हणण्यात येते. अथेन्स नगराच्या तटबंदीपलीकडे अकादमस, लायशियम् आणि सायनोसार्गेस नावाची तीन उद्याने होती. त्यांतल्या अकादमस या उद्यानात प्लेटोने आपले विद्यापीठ सु. ३८७ इ.स.पू. मध्ये स्थापन केले. ते अकादमी या नावाने सर्वश्रुत झाले. अकादमी हे नाव अकादमस या वीराच्या नावावरून पडले. विद्येचे माहेरघर म्हणून प्लेटोच्या विद्यापीठाची अल्पावधीतच ख्याती पसरली आणि देशोदेशींचे विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येऊ लागले. याच अकादमीत प्लेटोच्या हयातीत, वीस वर्षे वास्तव्य करून, ॲरिस्टॉटल (३८४-३२२ इ.स.पू.) याने आपल्या लोकोत्तर पांडित्याचा पाया रचला. तेथे तत्त्वज्ञान, गणितशास्त्र, सृष्टिशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांचे शिक्षण दिले जात असे. 

अकादमीचा इतिहास मुख्यतः चार कालखंडांत विभागलेला आहे. (१) जुनी अकादमी : ३४७-२६४ इ.स.पू. (२) मधली अकादमी: २६४-१६० इ.स.पू. (३) नवी अकादमी : सु.१६०-१00 इ.स.पू. (४) शेवटली अकादमी: इ.स.पू. पहिले शतक-इ.स.५२९.

(१) जुनी अकादमी : अकादमीच्या या पहिल्या कालखंडात स्प्यूसिपस, झीनॉक्राटीझ, पॉलेमो आणि क्रेटीझ हे अकादमीचे ‘स्कॉलर्क्स’ अथवा पीठप्रमुख होऊन गेले.

स्प्यूसिपस :  (४००-३३९ इ.स.पू.) प्लेटोच्या पश्चात, त्याचा भाचा स्प्यूसिपस हा अकादमीचा अधिपती बनला. त्याने प्लेटोच्या शिकवणीतला पायथॅगोरीय तत्त्वज्ञानाचा अंश उचलून धरला आणि असे प्रतिपादन केले, की ‘एकम्’ या आदितत्त्वापासून सृष्टीची संख्यात्मक मूलतत्त्वे उगम पावतात आणि या संख्यात्मक मूलतत्त्वांपासून सारे सृष्ट पदार्थ प्रकट होतात. तसेच सृष्ट पदार्थाचा कालौघात विकास होते वेळी ‘शिवम्’ तत्त्व आविर्भूत होते. सारंश, एकम् आणि शिवम् या दोन तत्त्वांचा प्लेटोने अभिन्नता कल्पिलेली होती तर स्प्यूसिपसने त्या दोहोंत भेद करून एक विश्वप्रक्रियेच्या प्रारंभी, तर दुसरे शेवटी येते असे मत मांडले. त्याने विश्वाच्या स्वरूपाचा उत्क्रांतिवादात्मक अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, तत्त्वज्ञान आदी विषयांवर त्याने ग्रंथ लिहिले. त्याचे ग्रंथ ऑरिस्टॉटलने विकत घेतले होते. 

झीनाँक्राटीझ (३९६-३१४ इ.स.पू.) : याने आपल्या शिकवणीत पायथॅगोरीय विचारसरणीचा, तसेच धर्मग्रंथांच्या रूपकात्म भाषेचा आश्रय घेतला. सृष्टीच्या मुळाशी ‘संख्या’ तत्त्वे असून, ती ‘एकम्’ आणि ‘युग्म’(सीमित आणि असीमित) या आदिम तत्त्वांपासून निःसरण पावतात असे सांगून, त्याने ही दोन आदिम तत्त्वे सर्व देवतांचे ‘जनक’ आणि ‘जननी’ आहेत, असे वर्णन केले. या विश्वात देवदेवता आणि मानवजाती या दोहोंच्या मध्ये ‘डीमन्स’ नामक मध्यम कोटीचे प्राणी वास करतात, अशी त्याची कल्पना होती. त्याच्या विचारांचा नंतरच्या काळात उदयास आलेल्या नव-प्लेटोमत आणि ख्रिस्ती धर्म यांच्या तत्त्वज्ञानांवर प्रभाव पडला.

जुन्या अकादमीच्या कालखंडात युडॉक्सस (४०८-३५५ इ.स.पू.), हेराक्लायडीझ (सु. ३२२-? इ.स.पू.) आदी विद्वानांच्या हातून उत्कृष्ट गणितशास्त्रीय संशोधन घडले. युडॉक्ससने १ वर्ष = ३६५ १/४ दिवस हे समीकरण सिद्ध केले. हेराक्लायडीझने पृथ्वी स्वत:च्या आसाभोवती फिरते, तसेच शुक्र आणि बुध हे सूर्याभोवती फिरतात असे सिद्धांत मांडून, पृथ्वीदेखील सूर्याभोवती फिरत असावी असा कयास व्यक्त केला.            

(२) मधली अकादमी : आर्केसिलॉस (३१६-२४१ इ.स.पू.) या पीठप्रमुखाने अकादमीमधल्या तत्त्वज्ञानास वेगळेच वळण दिले. प्लेटोने इंद्रियदत्त ज्ञानावर केलेल्या टीकेचा विपरीत अर्थ लावून, त्याने पिरोप्रणीत (३६५-२७५ इ.स.पू.) संशयवादाचा पुरस्कार केला आणि समकालीन स्टोइक विचारवंतांच्या ‘निश्चित स्वरूपाचे ज्ञान शक्य आहे’  ह्या मतावर हल्ला चढविला. प्रत्यक्षानुभवात आपणास सत्याची प्रचिती येते, हे स्टोइकांचे म्हणणे त्याने खोडून काढले आणि संशयातीत सत्यज्ञानाच्या अभावी आपण कधीही कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय घेऊ नये हेच उत्तम, अशी शिकवण दिली.

(३) नवी अकादमी : अकादमीच्या इतिहासात आणखी एक नवा कालखंड सुरू करणारा अधिपती कार्नीआडीझ (२१४-१२९ इ.स.पू.). हा इ.स.पू.१५५ मध्ये परिक्रमी (पेरिपॅटेटिक) विचारवंत क्रिटोलेयस आणि स्टोइक तत्त्वज्ञ डायोजीनीझ यांच्या समवेत राजनैतिक कामकाजासाठी रोमला गेला होता. तेथे या तीन तत्त्वेत्यांनी आपल्या व्याख्यानांद्वारे सुशिक्षित रोमन लोकांना ग्रीक तत्त्वज्ञानाची ओळख करू दिली. त्यावेळी रोमन श्रोत्यांवर कार्नीआडीझचा विशेष प्रभाव पडला. न्याय आदी संकल्पनांचे मंडन तसेच खंडनही सारख्याच परिणामकारक युक्तिवादांनी करण्याचे त्याचे चातुर्य स्तिमित करणारे होते. कार्नीआडीझने आर्केसिलॉसचा संशयवाद पूर्णपणे झुगारून दिला नाही परंतु त्या मतास त्याने संभवनीयतेच्या सिद्धांताची विधायक पुस्ती जोडली. मनुष्यास जरी पूर्ण विश्वासार्ह सत्याचे ज्ञान होत नसले, तरी दैनंदिन जीवनात पदोपदी निर्णय घ्यावेच लागतात. हे निर्णय घेण्यासाठी, कार्मीआडीझच्या मते, संभवनीय स्वरूपाचे ज्ञान पुरेसे ठरते. एखादे विधान जरी १०० टक्के सत्य असल्याचे सिद्ध करून दाखविता येत नसले, तरी ते दुसऱ्या विधानापेक्षा आधिक संभवनीय आहे की नाही, हे निश्चीत ठरविता येते. ज्या विधानाविषयी अधिक सबळ पुरावा सादर करता येतो ते विधान अधिक संभवनीय असते आणि अशा अधिकतर संभवनीय विधानांवरच आपल्या दैनंदिन जीवनातले निर्णय आधारावयाचे असतात, असे कार्नीआडीझचे प्रतिपादन होते.

(४) शेवटली अकादमी : अकादमीचा शेवटचा कालखंड जितका प्रदीर्घ तितकाच अंधुक आहे. फायलो, अँटायओकस, प्लूटार्क, सायरीनियस, प्रॉक्लस, डामॅशियस, अशी या काळातील अकादमीच्या काही कुलगुरूंची नावे आहेत. संशयवादाचा त्याग करून, अकादमीमधले तत्त्वज्ञान प्रथम मतसंग्रहवादाकडे आणि नंतर नव-प्लेटोमताकडे झुकले.

 फायलो (? – ७९ इ.स.पू.) आणि अँटायओकस (? – ६८ इ.स.पू.) : यांनी अकादमीमधल्या संशयवादास मूठमाती दिली. विशेषतः अँटायओकसने उत्कृष्ट तार्किक युक्तिवाद करून सांगितले, की ‘आपण कोणतेच विधान निश्चितपणे करू शकत नाही असे विधान निश्चीतपणे करणे यात उघडच आत्मविसंगती आहे. सत्याला झुगारून निव्वळ संभवनीयतेवर विसंबून राहता येत नाही. कारण सत्याच्या आश्रयाविना संभवनीयतेला अर्थच राहत नाही’. जेथे मान्यवर विचारवंतांचे एकमत होते तेथे सत्य नांदते, असे सत्याचे लक्षण ठरवून त्याने मतसंग्रहवादाचा पुरस्कार केला. अकादमीमध्ये मतसंग्रहवादी विचारसरणी बळावल्याकारणाने तेथे प्लेटोप्रणीत तत्त्वज्ञानासोबत अन्यपंथीय तत्त्वज्ञानही मनःपूर्वक आभ्यासिले जाऊ लागले. प्लेटोच्या ग्रंथांप्रमाणे ऑरिस्ट‍ॉटलच्याही ग्रंथांवर तेथे विवरणात्मक टीकाटिप्पणी लिहिल्या जाऊ लागल्या. 

मतसंग्रहवादाचा तत्त्का‍लीन पंडितांवर पुष्कळच प्रभाव पडलेला होता. सिसेरो (१०६-४३ इ.स.पू), व्हॅरो (११६-२७ इ.स.पू),

सेक्स्टियस (इ.स.पू ७० – ?), सोटियन यांच्यासारखे रोमन विचारवंत हे मतसंग्रहवादी होते. इतकेच नव्हे, तर युडॉरस ( इ.स.पू.२५) आणि प्रसिद्ध चरित्रकार प्लूटार्क (इ.स. ४५-१२५) यांनी किंचित गूढवादाकडे झुकलेला मध्यमार्गी प्लेटोमतवाद पुरस्कारिला होता त्यावरही मतसंग्रहवादाची छाप पडलेली दिसून येते.

संशयवाद आणि मतसंग्रहवाद अन्यत्र उदयास आले आणि अकादमीमध्ये प्रविष्ट झाले. त्याचप्रमाणे ॲलेक्झांड्रिया येथे तिसऱ्या शतकात उदयास आलेला नव-प्लेटोमतवाद यथावकाश अकादमीमध्ये प्रविष्ट होऊन दृढमूल झाला. सायरीनियस (?-सु. ४३०). प्रॉक्लस (४१०-४८५) आदी अकादमीप्रमुखांनी या नव्या वादाचा पुरस्कार केला. त्या काळातील ‘सर्वश्रेष्ठ स्कोलॅस्टिक’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रॉक्लसने आपल्या ग्रंथात अकादमीमधल्या तत्त्वज्ञानी, विशेषतः नव-प्लेटोमताची, तत्त्वे सुसूत्रपणे मांडून विशद केली. त्याच्या विवरणपद्धतीचा कित्ता पुढे ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मशास्त्रवेत्त्यां‍नी आपापल्या धर्माचे तत्त्वज्ञान विशद करताना गिरविला.

अकादमीचा शेवटचा पीठप्रमुख डामॅशियस याच्या कारकीर्दीत, इ.स. ५२९ मध्ये, जस्टिनियन (५२७-५६५) या रोमन सम्राटाने सर्व खिश्चनेतर विद्यापीठे बंद करण्याचे फर्मान काढले. तदनुसार प्लेटोने स्थापन केलेली अकादमी बंद करण्यात आली आणि तिच्यासोबतच प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाचाही अंत झाला.

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Merlan, Philip, Form Platonism to Neo-Platonism, Hague, 1953.

            2. Witt, R. E.Albinus and the History of Middle Platonism, Cambridge, 1937.

            3. Zeller, E. Plato and the Older Academy, London, 1876.

केळशीकर, शं. हि.