परमाणु वाद, ग्रीक: ग्रीक परमाणुवादाची मांडणी प्रथम ल्युसिपस (इ. स. पू. सु. ४५०) ह्या तत्त्ववेत्त्याने केली आणि तिचा विकास करून तिला सुव्यवस्थित रूप देण्याची कामगिरी डीमॉक्रिटसने (इ. स. पू. सु. ४६०–३६०) केली. ल्युसिपस हा बहुधा मायलीटस ह्या नगराचा रहिवासी होता. त्याच्या लिखाणाचे काही तुटक भागच आज अवशिष्ट आहेत पण ग्रेट वर्ल्ड सिस्टिम आणि ऑन माइंड हे दोन ग्रंथ त्याने लिहिले आहेत, अशी समजूत आहे. त्याचा शिष्य डीमॉक्रिटस ह्याने परमाणुवादाची जी रचना केली, तिच्यात ल्युसिपसकडून लाभलेले सिद्धांत नेमके कोणते आहेत, हे सांगणे कठीण आहे.

डीमॉक्रिटस हा परंपरेप्रमाणे पाहता ॲब् डेरा ह्या थ्रेसमधील नगराचा सुखवस्तू नागरिक होता आणि त्याने खूप प्रवासही केला होता. त्याने ६० हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत व त्यांच्यात तत्कालीन समग्र ज्ञानाचा परामर्ष त्याने घेतला आहे. आज त्यांतील काही तुटक खंडच, विशेषतः नीतिशास्त्रावरील त्याच्या ग्रंथाचे खंड, उपलब्ध आहेत.

ग्रीक परमाणुवादाचा उगम पार्मेनिडीझ (इ.स.पू. ६ वे–५ वे शतक) याच्या सिद्धांतात आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे जे आहे ते एक आहे आणि हे एक सत् अपरिवर्तनीय, अनिर्मित, अविनाशी, एकविध, सघन व अविभाज्य असे आहे. ह्या सिद्धांताच्या समर्थनासाठी पार्मेनिडीझने काही युक्तिवाद दिले आहेत. त्याचप्रमाणे पार्मेनिडीझने रिक्त पोकळीचे अस्तित्व नाकारले आहे. कारण रिक्त पोकळी म्हणजे जे नाही आहे ते आणि जे नाही आहे त्याला अस्तित्व असू शकत नाही आणि रिक्त पोकळी जर नसेल, तर गती किंवा गमन असू शकणार नाही. तेव्हा पार्मेनिडीझ उत्पत्ती, विनाश, परिवर्तन ह्यांच्याप्रमाणेच गमनाचे अस्तित्वही नाकारतो.

पण परिवर्तन आणि गमन ह्यांना अस्तित्व आहे, ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे. तेव्हा पार्मेनिडीझच्या सिद्धांतांना मुरड घातली पाहिजे, असा ल्युसिपसने निष्कर्ष काढला. एकतर रिक्त पोकळी आहे कारण जे आहे त्याला जसे अस्तित्व आहे तसेच जे नाही आहे त्याला–म्हणजे रिक्त पोकळीला–अस्तित्व आहे, असा ल्युसिपसचा युक्तिवाद आहे. आता जे आहे ते पार्मेनिडीझने दाखविल्याप्रमाणे अनादी, अनिर्मित, अविनाशी, एकविध, सघन आणि अविभाज्य असले पाहिजे. पण पार्मेनिडीझ जे आहे ते एक आहे असे जे मानतो, ते मानायचे कारण नाही. पार्मेनिडीझ असे मानतो ह्याचे कारण तो रिक्त पोकळी नाकारतो. जर अनेक असतील, तर त्यांच्या दरम्यान रिक्त पोकळी असली पाहिजे पण रिक्त पोकळी नाही, तेव्हा अनेक नाहीत, जे आहे ते एक सघन असे सत् आहे, असा पार्मेनिडीझचा युक्तिवाद आहे. पण रिक्त पोकळी मानल्यानंतर अनेक आहेत, पार्मेनिडीझच्या सत्‌च्या स्वरूपाचेच अनेक आहेत, असे मानता येते. रिक्त पोकळीमुळे गमन आणि अनेकता ह्या दोन्ही गोष्टी शक्य होतात.

परमाणुवादाचा मूलभूत सिद्धांत असा, की अनादी, अनिर्मित, अविनाशी, अपरिवर्तनीय, एकविध, सघन आणि अविभाज्य असे अनेक आहेत–हेच परमाणु–आणि त्याचप्रमाणे रिक्त पोकळीही आहे ह्यांशिवाय अन्य काही नाही. रिक्त पोकळी अनंत आहे आणि तिच्यात अनंत परमाणू पसरलेले आहेत. विश्वामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक वस्तू असल्याचे आपल्या अनुभवास येते, त्यांच्यामधील भेदांचा उलगडा परमाणूंचे आकार, त्यांची रचना आणि त्यांची अवस्थिती ह्यांच्या साहाय्याने करता येतो.

‘मधुर आणि कडू, ऊष्ण आणि शीत रंग ह्यांना संकेतामुळे अस्तित्व आहे वास्तवात परमाणू आणि रिक्त पोकळी आहे’, अशा अर्थाचे डीमॉक्रिटसचे एक वचन आहे. ह्याचा अर्थ असा, की आपल्या इंद्रियसंवेदनांना जाणवणारे वस्तूंचे रंग, चव इ. जे गुण असतात, ते भौतिक वस्तूंचे स्वतःचे गुण नसतात. त्या वस्तूंनी आपल्या शरीरावर परिणाम केल्यामुळे ह्या संवेदना आपल्याला प्राप्त होत असतात. भौतिक वस्तूंच्या स्वतःच्या ठिकाणी असलेले गुण–ज्यांना ‘प्राथमिक गुण’ म्हणतात–आणि त्यांच्यापासून प्राप्त होणाऱ्या संवेदनांचे आशय असलेले रंगरसादी गुण – ‘दुय्यम गुण’ – ह्यांच्यात जो भेद आधुनिक तत्त्वज्ञानात करण्यात येतो, तोच डीमॉक्रिटसला अभिप्रेत आहे. परमाणूंचे स्वरूप एकविध असते, पण त्यांचे आकार भिन्न असतात तसेच त्याच परमाणूंची भिन्न रचना होऊ शकते तसेच त्यांची अवस्थितीही भिन्न असू शकते. ॲरिस्टॉटलने हे भेद असे दाखविले आहेत : A  आणि N यांच्यात आकारभेद आहे AN आणि NA यांच्यात रचनाभेद आहे आणि H व * यांच्यात अवस्थितीचा भेद आहे. परमाणूंचे आकारमान भिन्न असते असेही डीमॉक्रिटसचे मत होते पण ते इतके लहान असते, की सर्व परमाणू अदृश्य असतात, असेही तो मानीत असे. ज्याप्रमाणे परमाणू नित्य असतात त्याप्रमाणे परमाणूंची गतीही नित्य असते ती कोणत्याही कारणामुळे परमाणूंच्या ठिकाणी निर्माण होत नाही. परमाणूंच्या गतीमुळे ते सतत एकमेकांवर आदळत असतात. ह्या टकरीमुळे ते एकमेकांपासून दूर तरी सरतात किंवा एकमेकांत अडकतात दोन परमाणूंचे आकार एकमेकांशी जुळत असल्यामुळे ते सांधले जातात आणि त्यांच्यापासून संयुक्त पदार्थ बनतात. सर्व भौतिक बदल हे मूलतः परमाणूंचे झालेले संयोग किंवा विभाजन ह्या स्वरूपाचे असतात. जगाची उत्पत्ती ह्याच प्रक्रियेला अनुसरून होत असते. ल्युसिपसचे एक वचन असे आहे, की ‘काहीही आगंतुकपणे घडत नाही जे जे घडते ते काही कारणामुळे अनिवार्यतेने घडते’. म्हणजे गतिमान परमाणूंमध्ये यांत्रिक नियमांना अनुसरून ज्या क्रियाप्रतिक्रिया घडतात, त्यांतून विश्वाची उत्पत्ती आणि विश्वातील फेरबदल घडून येत असतात.

आत्मा हाही परमाणूंचा बनलेला असतो. हे परमाणू आकाराने गोल असतात. भौतिक वस्तू ‘प्रतिमा’ ढाळत असतात आणि त्या इंद्रियांद्वारे आत येऊन त्यांचा आत्म्यावर जेव्हा आघात होतो, तेव्हा संवेदना निर्माण होते. जेव्हा ह्या प्रतिमा इंद्रियांद्वारे नव्हे, तर सरळ आत्म्याच्या परमाणूंवर आघात करतात, तेव्हा तो विचार असतो. डीमॉक्रिटस ‘अनौरस’ आणि ‘औरस’ किंवा विहित ज्ञान ह्यांच्यात भेद करतो. संवेदनांद्वारे होणारे ज्ञान अनौरस असते. विहित ज्ञान, परमाणू आणि रिक्त पोकळी यांचे ज्ञान, विचाराद्वारे होते. पण डीमॉक्रिटस हा पार्मेनिडीझसारखा केवळ विवेकवादी नव्हता. इंद्रियसंवेदनांद्वारा लाभणाऱ्या पुराव्याचे चिकित्सक विश्लेषण करून विहित ज्ञान प्राप्त करून घेता येते व विहित ज्ञानही ‘अनौरस’ ज्ञानाहून स्वरूपतः भिन्न नसते प्रतिमांचे आत्म्याच्या परमाणूंवर होणारे आघात ह्याच स्वरूपाचे असते–अशी त्याची भूमिका होती.

डीमॉक्रिटसच्या मते ‘स्वास्थ्य’ किंवा ‘संतोष’ हे नैतिक आचरणाचे साध्य आहे. इंद्रियसुखे अल्पजीवी असल्यामुळे त्यांच्यामागे न लागता आपल्या इच्छांना व आकाक्षांना आवर घालावा, स्वयंपूर्ण व्हावे व साध्या सुखात समाधान मानावे, अशी त्याची शिकवण होती. मरणोत्तर जीवन किंवा दुष्कृत्यांबद्दल देवांकडून होणारे शासन, ह्या कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या होत्या. आपल्या कृत्यांपासून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, ह्यावर त्याचा भर होता. तो लोकशाहीवादी होता. ‘ज्याप्रमाणे गुलामीपेक्षा स्वातंत्र्य पसंत केले पाहिजे, त्याप्रमाणे हुकूमशाहीतील तथाकथित सुखापेक्षा लोकशाहीतील दारिद्र्य पतकरले पाहिजे’, असे त्याने म्हटले आहे.

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Bailey, Cyril, The Greek Atomists and Epicurus, Oxford, 1928.

   2. Diels, Hermann Trans. Freeman, Kathleen, Ancilla to the Pre-Socratic Philosophers, Oxford, 1947.

   3. Guthric, W.K.C. A History of Greek Philosophy, Vol. 2, Cambridge, 1965.

रेगे, मे. पुं.