मोदिल्यानी, फ्रांग्को :(१८जून १९१८ –     ). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व १९८५ च्या अर्थशास्त्राच्या नोबल पारितोषिकाचे मानकरी. जन्म रोम येथे. वडील एन्‌रीको व आई ओल्गा फ्लॅशेल. फ्रांग्को यांचे शिक्षण लिसिओ व्हिस्‌कोंती,रोम विद्यापीठ, न्यूयार्कस्थित न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च या शिक्षणसंस्थांमधून झाले. फ्रांग्को यांचा विवाह सेरेना कालाबी या युवतीशी १९३९ मध्ये झाला असून त्याना दोन मुले आहेत.

न्यूयॉर्कच्या न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च या संस्थेत १९४३–४४ यांदरम्यान अधिव्याख्याता म्हणून मोदिल्यानी यांची नियुक्ती झाली. तेथेच ते गणितीय अर्थशास्त्र आणि अर्थमिती या विषयांचे साहाय्यक प्राध्यापक झाले(१९४६–४८) नंतर इलिनॉय विद्यापीठात अर्थशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक (१९४९–५०) आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले (१९५०–५२) कार्नेगी तंत्रविद्या संस्थेत ते अर्थशास्त्र आणि औद्योगिक प्रशासन या विषयांचे प्राध्यापक होते (१९५२–६०) नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक (१९६०–६२) १९६२ पासून ते मॅसॅचूसेट्स तंत्रविद्यासंस्थेमध्ये (एम्‌आय्‌ टी) अर्थशास्त्र आणि वित्तव्यवस्था या विषयांचे प्राध्यापक आहेत. यांदरम्यानच्या काळात मोदिल्यानी यांनी फेडरल रिझर्व्ह सिस्टिमच्या अधिशासक मंडळाचे सल्लागार, चलनविषयक सांख्यिकी समितीचे सदस्य (१९७४–७६), अर्थव्यवहारविषयक ब्रुकिंग्ज मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार (१९७१–     ), आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थेचे उपाध्यक्ष (१९७६–८३) व सन्मान्य अध्यक्ष (१९८३), अर्थमिती संस्था तसेच अमेरिकन अर्थविषयक संस्था (अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन) यांचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय विज्ञान अकादमी तसेच अमेरिकन कला व विज्ञान अकादमी यांचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.

केन्सप्रणीत ‘क्रांती’, अभिजात अर्थशास्त्र व चलनविषयक सिद्धांत यांमधील संबंधांचे स्पष्टीकरण तसेच चलनविषयक व वित्तीय स्थिरीकरण धोरणांच्या परिणामांचे विश्लेषण मोदिल्यानींनी केले. अमेरिकन शासनाच्या फेडरल रिझर्व्ह सिस्टिम या मध्यवर्ती बँकेसाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे प्रतिमान तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

मोदिल्यानी यांचे संशोधन मूलतः कौटंबिक बचत आणि वित्तबाजार यांच्याशी संबंधित आहे. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांनी प्रसिद्ध केलेल्या (१९५७) आपल्या ‘बचतसिद्धांता’ अगोदर तीन वर्षे मोदिल्यानींनी रिचर्ड ब्रंबर्ग या आपल्या विद्यार्थ्यांसमवेत ‘जीवनचक्र प्रमेय’ प्रसिद्ध केले होते (१९५४). फ्रीडमन याच्याप्रमाणेच मोदिल्यानी-ब्रंबर्ग यांनीही कुटुंबे ही भविष्यकालीन सेवनासाठी (उपभोगासाठी) कमाल बचत करण्यात सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादिले होते. दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतांमध्ये योजना कालावधीबाबतचा फरक होता. फ्रीडमन सिद्धांतांनुसार हा काळ अनंत असतो, म्हणजेच लोक केवळ स्वतःकरिताच बचत करतात असे नसून आपल्या वंशजाकरिताही(मुलाबाळांसाठीही) बचत करून ठेवतात. मोदिल्यानी ब्रंबर्ग सिद्धांतानुसार योजनाकाळ परिमित असून लोक केवळ स्वतःसाठीच बचत करीत असतात. उपयोगिता महत्तमीकरण गृहीतानुसार सेवन हे कालपटावर समप्रमाणात वितरित झालेले असते आणि याचाच अर्थ असा होतो की, मनुष्यप्राणी आपल्या काम करण्याच्या काळामध्ये पैसा साठवून ठेवतो आणि तो आपल्या उतारवयात खर्च करतो.

जीवनचक्र प्रमेय हे सूक्ष्म-अर्थशास्त्रांच्या कक्षेत (व्यक्ती, उत्पादनसंस्था, वस्तूंच्या किंमती, उत्पादन घटक मूल्ये इत्यादींचा सूक्ष्मविभागशः अभ्यास) येते. तथापि मोदिल्यानी यांनी पुढे लिहिलेल्या अनेक संशोधनग्रंथांमधून हे प्रमेय साकलिक अर्थशास्त्रासही (एकूण राष्ट्रीय उत्पन्न, भांडवलसंचय, रोजगार इत्यादींचा समग्र अभ्यास) लागू पडते असे दाखवून दिले. उदा., समग्र बचत गुणोत्तर हे दीर्घकाळात कायम असते समग्र बचत ही मूलतः अर्थव्यवस्थेच्या विकासदरावर अवलंबून असते ती आर्थिक तसेच जनांकिकीय (लोकसंख्येची वयोमान रचना, सरासरी आयुर्मान इ.) घटकांनी निर्धारित केली जाते आर्थिक विकासदरातील वाढीमुळे तरुण वयोमानाच्या पिढ्यांना अनुकूल होईल असे उत्पन्नाचे पुनवितरण करणे भाग पडते.

जीवनचक्र प्रमेयाचा उपयोग अनेक अनुभवाधिष्टित संशोधनांकरिता तात्त्विक पाया वा अधिष्ठान म्हणून होत असतो. विशेषतः विविध निवृत्तिवेतनपद्धतींच्या परिणामांचे विश्लेषण करण्याचे एक प्रभावी वा आदर्श साधन म्हणून जीवनचक्र प्रमेय अत्यंत उपयोगी ठरले आहे.


माणसे आपल्या वार्धक्यासाठी बचत करीत असतात, ही जीवनचक्र प्रमेयाची पायाभूत कल्पना तशी नवी नाही. व मोदिल्यानी यांनी ती स्वतः प्रथमच मांडली, असेही नाही. या कल्पनेचे सुसूत्रीकरण, तिचे एका सयुक्तिक अशा प्रतिमानात रूपांतर आणि त्या प्रतिमानाचा विविधांगी विकास मोदिल्यानी यांनी केला. या प्रतिमानावरून त्यांनी उपर्युक्त साकलिक अर्थशास्त्रीय ध्वनितार्थ तयार करून त्यांना अनेक अनुभवाधिष्ठित कसोट्या लावल्या. अर्थशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने ही मोदिल्यानींची मोठी कामगिरी मानण्यात येते. जीवनचक्र प्रतिमानाचा पुढील काळातील सैद्धांतिक आणि अनुभवाधिष्टित संशोधनाच्या विकासावर फार मोठा प्रभाव पडल्याचे आढळते. हे प्रतिमान म्हणजे सेवन (उपभोग) व बचत यांच्या अभ्यासातील एक नवीनच नमुना मानण्यात येत असून तो या प्रकारच्या अभ्यासाकरिता वापरण्यात येणाऱ्या गतिमान प्रतिमानांचा पायाच बनला आहे.

जीवनचक्र प्रमेय अर्थशास्त्राशी, तर मोदिल्यानी-मिलर सिद्धांत निगम वित्तव्यवस्थेशी संबद्ध आहेत. १९५८ मध्ये मोदिल्यानी व मर्टन मिलर यांनी संयुक्तपणे आपले सिद्धांत (एखाद्या उत्पादनसंस्थेची कर्जे व त्यांची रचना यांचा त्या उत्पादनसंस्थेच्या विपणीय किंमतीवर–बाजारमूल्यावर–कसा परिणाम घडून येतो, याबाबत ऊहापोह करणारे सिद्धांत) मांडले त्याच सुमारास जेम्स टोबिनप्रभृतींनी ‘शेअरनवड सिद्धांता’चा (पोर्टफोलियो इन्व्हेस्टमेंट थिअरी) विकास करण्यास प्रारंभ केला यातूनच गुंतवणूक, कर्जे, कर इत्यादींचा वित्तप्रबंध व वित्तबाजार वैशिष्ट्ये या दोहोंमधील संबंधाबाबतचा शास्त्रीय सिद्धांत विकसित झाला.

मोदिल्यानी-मिलर यांच्या मते उत्पादनसंस्थेचे मूल्य म्हणजे शेअर बाजारातील त्या उत्पादनसंस्थेच्या भागांचे (शेअर) बाजारमूल्य व तिच्या कर्जांचे बाजारमूल्य या दोहोंची बेरीज होय. सरासरी भांडवली खर्च हा कर्जराशीवर अवलंबून नसून तो अशा प्रकारच्या जोखमीच्या उत्पादनसंस्थाच्या भागांमध्ये केलेल्या गुंतवणुकीपासून येणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाबरोबर असतो. मोदिल्यानी-मिलर यांचा दुसरा सिद्धांत, गुंतवणूक धोरण गृहीत धरल्यास, उत्पादनसंस्थेचे मूल्य हे तिच्या लाभांश-धोरणापासून निराळे व स्वतंत्र असते, असे प्रतिपादन करतो.

मोदिल्यानी-मिलर सिद्धांतांचे गुंतवणूक निर्णय सिद्धांतावर पुढीलप्रमाणे परिणाम घडून आले आहेत : (१) असे गुंतवणूक निर्णय वित्तीय निर्णयापासून अलग करता येतात, (२) गुंतवणूक निर्णयाची सयुक्तिक कसोटी त्या उत्पादनसंस्थेची महत्तम बाजारकिंमत मिळण्यावर निर्धारित केली जाते. अशा प्रकारे मोदिल्यानी-मिलर सिद्धांतामुळे निगम वित्तसिद्धांताला अनुकूल अशी चालना मिळाली आहे.

कौटुंबिक बचतविषयक जीवनचक्र प्रमेयाची रचना व विकास तसेच उत्पादनसंस्था व भांडवली खर्च यांच्या मूल्यविषयक मोदिल्यानी-मिलर सिद्धांतांची रचना या दोहोंतील प्रावीण्याबद्दल मोदिल्यानी यांना १९८५ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आले. यांशिवाय मोदिल्यानी यांना अनेक विद्यापीठांकडून डॉक्टरेट (शिकागो १९६७ कॅथलिक दे लूव्हेन-बेल्जियम १९७४ बरगॅमो विद्यापीठ १९७९) ह्या सन्मान्य पदव्या बहाल करण्यात आल्या.

नॅशनल इन्कम्स अड इंटरनॅशनल ट्रेड (१९५३) प्लॅनिंग, प्रॉडक्शन, इन्व्हेंटरीज अँड वर्कफोर्स (१९६०) रोल ऑफ अँटिसिपेशन्स अँड प्लॅन्स इन इकॉनॉमिक बिहेव्हिअर अँड देअर यूस इन इकॉनॉमिक ॲनलिसिस अँड फोअरकास्टिंग (१९६१) न्यू मॉर्गिज डिझाइन्स फॉर स्टेबल हाउसिंग इन ॲन इन्फ्लेशनरी इन्व्हायरनम्‌न्ट (१९७५) द कलेक्टेड पेपर्स ऑफ फ्रांग्को मोदिल्यानी- ३ खंड (१९८०) हे मोदिल्यानी यांचे महत्त्वाचे ग्रंथ होत.

गद्रे, वि. रा.