वस्तुविनिमय : पैशाचा वापर न करता वस्तू वा सेवा ह्यांची केली जाणारी देवघेव. पैशाचा शोध लागण्यापूर्वी व्यापाराचे स्वरूप वस्तुविनिमयाचेच होते. जगाच्या अनेक भागांत/प्रदेशांत अशिक्षित समाजांमध्ये अद्यापही वस्तुविनिमयाची प्रथा व्यापक प्रमाणावर चालू आहे. तथापि राष्ट्राराष्ट्रांच्या चलनांचा पैशाच्या स्वरूपात केल्या जाणाऱ्या वापरामुळे जवळजवळ सर्व ठिकाणी पूर्वापार चालत आलेली वस्तुविनिमयाची पद्धत लोप पावत असल्याचे दिसून येते.

बाजारांचा उदय व विकास हा वस्तुविनिमयाच्या संकल्पनेतूनच झाला. या बाजारांमध्ये ‘न्याय्य’ वा ‘योग्य मूल्य’ (फेअर व्हॅल्यू) तसेच ‘समानमूल्य’ (किंमत) यांसारख्या संकल्पनांचा जन्म प्रमाणशीर असे विनिमयमाध्यम नसतानाही झाला. मूल्य वा किंमत यांसारख्या संकल्पना सौदा करण्याच्या वा घासाघीस करण्याच्या प्रक्रियेतून उदयास आल्या, कारण अशा सर्वसामान्यांच्या मतांतूनच उचित किंमत वा मूल्य निर्धारित करणे (ठरविणे) शक्य होत असे. एखाद्या मनुष्यास आपल्याजवळ असणाऱ्या अधिक प्रमाणातील (जादा) बटाट्यांची वस्तुविनिमयपद्धतीने देवघेव करावयाची असल्यास प्रथम त्याला बटाट्यांची आवश्यकता असणाऱ्या (गरज असणाऱ्या) दुसऱ्या माणसाचा शोध घ्यावा लागेल आणि दुसरे म्हणजे त्या दुसऱ्या माणसाजवळ पहिल्या माणसाला गरज भासणारी (लागणारी) विनिमययोग्य अशी वस्तू असली पाहिजे. उलटपक्षी असेही म्हणता येईल की, एखाद्याला बटाटे हवे असतील, तर त्याच्याजवळ दुसऱ्या माणसाला बटाट्यांच्या बदल्यात देण्यासारखी अशी दुसरी एखादी वस्तू असणे आवश्यक आहे. असे झाले म्हणजे, दोघे एकमेकांना भेटून बटाटे व अन्य आवश्यक वस्तू यांच्यात देवाणघेवाण करणे शक्य होईल.

व्यक्ति-व्यक्तींपेक्षा जमाती व समूह यांच्यामध्ये अधिककरून वस्तुविनिमय होत असल्याचे मानवशास्त्रज्ञांना आढळून आले आहे. त्यांच्या मते जमातींमधील आंतरिक विनिमयांचे स्वरूप हे सामाजिकदृष्ट्या व समारंभपूर्वक वस्तूंच्या भेटी देणे असे असू शकते, तर दोन समूह वा गट यांच्यामध्ये होणारे वस्तुविनिमयाचे प्रकार म्हणजे पारस्परिक आर्थिक गरजा भागविण्यासारखेच असू शकते. जमातींमधील लोक हे, राष्ट्र-राज्यांप्रमाणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर क्वचितच असतात त्यामुळे आपल्याला काय हवे (काय आवश्यक, जरुरीचे आहे) याचे भान ठेवून त्याप्रमाणे त्यांना वागावे लागते.

वस्तुविनिमयाचे सर्वांत ठळक उदाहरण म्हणजे ‘निःशब्द व्यापार’ (स्तब्ध व्यापार-सायलेंट ट्रेड) हे होय. या प्रकारात वस्तुविनिमयामध्ये भाग घेणाऱ्या दोन्ही समूहांमध्ये (पक्षांमध्ये) प्रत्यक्ष-संपर्क नसतो. पहिल्या समूहातील व्यक्ती एका विनिर्दिष्ट जागी (ठिकाणी) देवघेव वा विनिमय करावयाच्या वस्तू ठेवतात. दुसऱ्या समूहातील व्यक्ती (सदस्य) त्या विनिर्दिष्ट ठिकाणी जातात आणि त्यांना तेथे ठेवलेल्या वस्तू अपेक्षेनुसार हव्याशा वाटल्या, तर त्या घेतात व आपल्याजवळील वस्तू त्या ठिकाणी ठेवतात. शत्रुत्व वा वैर असणाऱ्या किंवा परस्पर-संबंध नसणाऱ्या त्याचप्रमाणे एकमेकांच्या भाषा न समजणाऱ्या समूहांमध्ये अशा प्रकारचा वस्तुविनिमय आढळून येतो. ‘निःशब्द व्यापारा’ची उदाहरणे हीरॉडोटस, इब्नबतूता यांसारख्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहासकारांनी नोंदल्याचे आढळते. अर्वाचीन मानवशास्त्रज्ञांच्या मते कॅलिफोर्निया-इंडियन जमाती, काँगोमधील पिग्मी व बांटू लोक, न्यू गिनीमधील स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये अशा प्रकारचा व्यापार चालत असावा. व्यापाराची आवश्यकता अनेक अडचणींवर कशी मात करू शकते, याची ही उदाहरणेच होत.

जमाति-जमातींमधील (आंतरजमात) व्यापाराच्या योगे व्यापार-भागीदाऱ्यांचा उदय होत जाऊन काही भागीदाऱ्यांनी साखळी-व्यापाराचे स्वरूप धारण केले असून त्या व्यापार-साखळ्या अनेक समूह वा गट यांमध्ये शेकडो किलोमीटर अंतरावर पसरत गेलेल्या आढळतात. अशा प्रकारच्या विनिमयाची उदाहरणे ऑस्ट्रेलियातील जमातींमध्ये आढळतात. याच प्रकारच्या व्यापारसाखळ्यांमार्फत मेक्सिकोच्या आखातातून बॅराकुडाचे जबडे व रॉकी मौंटन्स प्रदेशातून अभ्रक या वस्तू ओहायओ राज्यातील प्रागैतिहासिक होपवेल जमातींमध्ये दिल्या गेल्याचे त्यांच्या पुरातत्त्वीय उत्खननांतून आढळले आहे .

 

औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांत आजही काही प्रमाणात वस्तुविनिमयाची पद्धती चालू आहे. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत वृत्तपत्रस्तंभांतून केले जाणारे विनिमय व्यवहार (स्वॅपिंग) हा वस्तुविनिमयाचाच एक विशुद्ध प्रकार मानला जातो. पैसा हे विनिमयमाध्यम असणाऱ्या देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातही वस्तुविनिमयाची उदाहरणे आढळतात. तथापि अशा व्यवहारांत वस्तूंचे मूल्य पैशात ठरविले जाते. वस्तूंची मूल्ये ठरविणे आणि आपल्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात आपल्याला हवी असणारी वस्तू देणारा माणूस शोधणे वा मिळणे ही गोष्ट जिकिरीची असल्याने वस्तुविनिमयप्रधान अर्थव्यवस्थेतील व्यवहारांना फारच मोठी मर्यादा पडते. ही मर्यादा नाहीशी करण्याच्या प्रयत्नांतूनच पैशाचा उगम झाला.

पहा : आंतरराष्ट्रीय व्यापार पैसा.  

केळकर, म. वि.