ॲगमार्क: (AGMARK). शेतमाल, फळफळावळ आणि प्राणिज पदार्थांचा दर्जा व विशुद्धता ह्यांसाठी वापरले जाणारे चिन्ह. भारत सरकारने वरील पदार्थांचा दर्जा व उच्च प्रत ह्यांसाठी ‘शेतमाल (ग्रेडिंग अँड मार्केटिंग) कायदा’ १९३७ मध्ये केला. त्याअन्वये ज्या वस्तूंचा दर्जा पाहण्यात येतो, प्रतवारी ठरविण्यात येते, त्यांच्यावर ‘ॲगमार्क’ हे चिन्ह लावण्यात येते. लेबलावर अनुक्रमांक, सीलबंद करणाऱ्याचे नाव, माल भरल्याची तारीख आणि ठिकाण इ. निर्देश असल्यामुळे ग्राहकाला लेबलावरील दर्जानुसार आतल्या वस्तूबदल विश्वास बाळगता येतो.

ॲगमार्क

ॲगमार्क-लेबलामागे प्रचंड यंत्रणा उभी असते. तीत सरकारनियुक्त वैज्ञानिक व तंत्रज्ञ असतात. हे लेबल फक्त अधिकृत संस्थांनाच लावता येते. त्यासाठी त्यांना प्रयोगशाळा व सरकारी रसायनशास्त्रज्ञ ठेवावे लागतात व भारत सरकारच्या शेतमाल-व्यापार-विभागाच्या सल्लागारांकडून अधिकारपत्र मिळवावे लागते. हे सल्लागार अशी अधिकारपत्रे त्या त्या कारखान्याची व प्रयोगशाळेची तपासणी केल्यानंतरच कारखानदारांना देत असतात. मालाचा दर्जा ठरविवल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर माल तयार होत असताना ⇨गुणवत्ता-नियंत्रणकसोशीने पाळले जाते कारखानदार, घाऊक व किरकोळ व्यापारी ह्यांच्याकडून नमुना म्हणून मिळविलेले पदार्थ सीलबंद करून तपासणीसाठी नियंत्रित प्रयोगशाळांकडे पाठविले जातात. तेथे त्यांचे सविस्तर रासायनिक पृथक्करण करण्यात येते. दर्जा ठरवून देण्यात आलेला पदार्थ, त्यापेक्षा कमी दर्जाचा असल्याचे आढळून आल्यास त्यावरील ॲगमार्क-लेबले नष्ट करतात.

ॲगमार्कविषयक कायदा १९४३ मध्ये दुरुस्त करण्यात येऊन त्याचे विस्तारक्षेत्रही वाढविण्यात आले. त्यामध्ये पुढील वस्तू येतात : फळ-फळावळ, भाजीपाला, चामडी, दूधपदार्थ, तंबाखू, कॉफी, डबाबंद फळे, तीळ, तेले, कापूस, तांदूळ, गहू, सनताग (सॅन हेम्प), गूळ, लोकर, रेझीन, टर्पेंटाईन, सुपारी इत्यादी. आतापर्यंत ॲगमार्क-लेबल ३६ वस्तूंना लागू करण्यात आले असून, त्यांमध्ये त्या वस्तूंपासून बनविलेले २३० पदार्थ येतात.

निर्यातीच्या मालावर ॲगमार्क-लेबल लावण्याची सक्ती १९४२ पासून करण्यात आली. वस्तूंची प्रतवारी व संवेष्टन करावयाच्या महत्त्वाच्या सर्व केंद्रांवर निरीक्षक-अधिकारी ठेवले जातात. वस्तूंचे संवेष्टन, वर्गवारी व दर्जा ठरविला जाण्यापूर्वी ह्या वस्तू ते तपासतात.

तंबाखूसाठी गुंतूर, राठ केसांसाठी कानपूर, सनतागासाठी कलकत्ता, सुगंधी तेलासाठी कोचीन व कानपूर, लोकरीसाठी मुंबई व राजकोट या शहरांत व अन्यत्र मिळून १६ उत्कृष्ट साधनसामग्रीयुक्त प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत. केंद्रीय प्रयोगशाळा नागपूर येथे आहे. मिरी, वेलची, काजू, आले, सुगंधी तेले, लाख, कापोक व त्रिफळा ह्यांसारख्या निर्यातीच्या ३८ वस्तूंची सक्तीने प्रतवारी केली जाते.

पहा : कृषिविपणन.

गद्रे, वि. रा.