कार्नेगी, अँड्रू : (२५ नोव्हेंबर १८३५–११ ऑगस्ट १९१९). अमेरिकेतील दानशूर उद्योगपती. याचा जन्म डन्फर्मलाइन, स्कॉटलंड येथे झाला. कार्नेगीचे वडील विणकर होते. यंत्रमागांचा वापर आणि १८४८ ची इंग्लंडमधील मंदी ह्यांच्यायोगे कार्नेगी कुटुंबाने इंग्लंड सोडून अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ॲलेगेनी (आताचे पिट्‌सबर्ग) शहरी वास्तव्य केले. दिवसा नोकरी व रात्रीच्या शाळेत हिशोबशास्त्राचे शिक्षण यांत अ‍ँड्रूचे बालपण गेले. पिट्‌सबर्गमधील तारखात्यात अँड्रूला १८५० मध्ये निरोप्याची नोकरी मिळाली. निरोप्याचे काम अधिक जलद होण्यासाठी अँड्रूने उद्योगधंद्यांची केंद्रे व तेथील कर्मचारी ह्यांची नावे स्मरणाने पाठ केली. तारप्रणालीचा प्रायोगिक अभ्यास केला व चर्चासत्रांत भाग घेतला. १८५२ मध्ये त्याला बदली तारायंत्रपरिचालकाचे काम मिळाले. नंतर तो पेनसिल्व्हेनिया रेलरोड कंपनीत नोकरीस लागला व अवघ्या सहा वर्षात पिट्‌सबर्ग विभागाचा अधीक्षक झाला. यादवी युध्दाच्या प्रारंभीच्या काळात अँड्रूने पूर्वविभागीय लष्करी तारखाते व रेल्वे व्यवस्था यांचे संघटन केले. याच सुमारात त्याने इतर ठिकाणी पैसे गुंतवून अधिक पैसा मिळविण्याच्या संधी दवडल्या नाहीत. लाकडी पुलांचा जमाना बदलत चालल्याचे लक्षात घेऊन १९६२ मध्ये कार्नेगीने स्कॉट व इतर अधिकाऱ्यांबरोबर ‘कीस्टोन ब्रिज कंपनी’ या आगगाड्यांचे लोखंडी पूल बांधणाऱ्या कंपनीत मोठया प्रमाणावर भांडवल गुंतविले. या कंपनीने ओहायओ नदीवर पहिला लोखंडी पूल बांधला. कार्नेगीने ‘सुपीरिअर रेलमिल अँड ब्लास्ट फर्नेसेस’, ‘युनियन आयर्न वर्क्स’ ह्यांत व पेनसिल्व्हेनियातील तेलखाणींमध्येही प्रचंड भांडवल गुंतविले. १८६८ मध्ये बेसीमर लोहपरिवर्तकाचा वापर करणारी ‘युनियन आयर्न वर्क्स’ ही पहिलीच अमेरिकन कंपनी होय. १८६५ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन कार्नेगीने झपाट्याने वाढत चाललेल्या लोखंड-पोलाद उद्योगात लक्ष गुंतविले. अवघ्या तीन वर्षातच कार्नेगीची वार्षिक प्राप्ती ५०,००० डॉलर झाली.

अँड्रू कार्नेगी

पोलादनिर्मितीच्या प्रक्रियांमध्ये कार्नेगीने स्वतः केव्हाच खास लक्ष गुंतविले नाही परंतु त्याने भांडवल पुरविले, मोठमोठाली कंत्राटे मिळविली आणि सर्वसाधारण धोरण आखून दिले. उत्पादन परिव्यय कमी करण्याकरिता त्याने परदेशप्रवासातून आणलेल्या नवप्रवर्तनांचा वापर करण्यास विशेष प्रोत्साहन दिले. उच्च दर्जाच्या उत्पादित वस्तू धडाडीने विकण्याचे तंत्र आत्मसात करुन व उत्पादन परिव्यय कमी करण्यावर भर देऊन कार्नेगीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. १८७० मध्ये ल्यूसी फर्नेस उभारल्यावर कार्नेगी उद्योगसमूहाने कच्च्या लोखंडाच्या उत्पादनास सुरुवात केली. १८७३ च्या घबराटीमुळे अनेक कंपन्यांचे दिवाळे वाजले, पण ही घबराट म्हणजे आपल्या कंपनीची वाढ करण्यास चालून आलेली संधीच, असे कार्नेगीने मानले. परदेशांत मिळविलेल्या ज्ञानाने प्रभावित होऊन कार्नेगीने पेनसिल्व्हेनिया राज्यात ब्रॅडॉक येथे ‘जे.एडगर टॉम्सन वर्क्स’ नावाचा लोखंड-पोलादाचा कारखाना उभारला व तेथे उत्पादनाचे अनेक उच्चांक प्रस्थापित केले. १८८८ मध्ये कार्नेगीने पिट्‌सबर्ग शहराच्या परिसरातील सात उद्योगधंदे व ‘होमस्टेड स्टील वर्क्स’ ह्यांचे संचालन स्वतःकडे घेतले. १८९९ मध्ये वरील सर्व कंपन्या ‘ कार्नेगी स्टील कंपनी’ त समाविष्ट करण्यात आल्या. १९०० साली अमेरिकेतील एकूण पोलाद-उत्पादनाच्या २५ टक्के उत्पादन कार्नेगी उद्योगसमूहाद्वारा होत होते.

कार्नेगीने आपल्या उद्योगाच्या यशाचे श्रेय संघटनपद्धतीस दिले. त्याने उद्योगसमूहाच्या सर्व धोरणांवर नियंत्रण ठेवले होते. अधीक्षक आणि व्यवस्थापक ह्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण करुन तो उत्पादनवृध्दीस वेग आणित असे. वेळोवेळी, कामात गुणवत्ता दाखविलेल्या तरुणांस कार्नेगी भागीदारी देत असे. एकावेळी त्याने अशाप्रकारे ४० तरुणांना भागीदार केले होते. कार्नेगी स्टील कंपनी १८९९ मध्ये ‘न्यू जर्सी कॉर्पोरेशन’ या नावाने ३२ कोटी डॉलर भांडवलावर संघटित करण्यात आली. १९०० मध्ये ह्या कंपनीस चार कोटी डॉलर नफा झाला. त्यापैकी कार्नेगीच्या वाट्यास अडीच कोटी डॉलर आले. पुढच्याच वर्षी त्याने आपली कंपनी जे. पी. मॉर्गनच्या ‘युनायटेड स्टेट्‌स स्टील कॉर्पोरेशन’ या कंपनीस विकली या व्यवहारात कार्नेगीस ५० कोटी डॉलर मिळाले.

कार्नेगी १९०१ मध्ये उद्योग-संचालनातून मुक्त झाला. धनिकांनी स्वतःजवळील संपत्ती आपल्या हयातीतच वाटून टाकावी, असे मत कार्नेगीने मासिकांमधून अनेक लेखांद्वारा व द गॉस्वेल ऑफ वेल्थ (१८८९) ह्या महत्त्वाच्या प्रबंधामधून व्यक्त केले. निवृत्तीनंतर कार्नेगीने आपल्या उद्योग-समूहातील कामगारांकरिता निवृत्तिवेतननिधी उभारला शिक्षण व संशोधन ह्यांच्या विकासार्थ ‘कार्नेगी प्रतिष्ठान’ स्थापन केले (१९०५). निसर्गेतिहास वस्तुसंग्रहालय, ललितकला व सुशोभन कला-विभाग, संगीत व चर्चासत्रदालने ह्यांनी सुसज्ज अशी पिट्‌सबर्ग येथील ‘कार्नेगी इन्स्टिट्यूट’ (१८९५) व ‘कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ स्कॉटलंडमधील विद्यापीठांसाठी उभारलेला ‘कार्नेगी ट्रस्ट’ (१९०१) ‘कार्नेगी इन्स्टिटयूशन ऑफ वॉशिंग्टन’ (१९०२) व ‘कार्नेगी डन्फर्मलाइन ट्रस्ट’ (१९०३) ह्यांना कार्नेगीने कायमची वर्षासने जाहीर केली. अमेरिकेतील लहान शिक्षणसंस्थांना तसेच २,८०० च्या वर मोफत सार्वजनिक वाचनालयांना कार्नेगीने कित्येक देणग्या दिल्या. हेग येथील कार्नेगीने बांधलेला ‘शांतता प्रासाद’ (१९०३), आंतरराष्ट्रीय शांततेसाठी त्याने दिलेली देणगी (१९१०), ‘कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्क’ हा स्थापिलेला ट्रस्ट (१९११) आणि मेरी क्यूरीच्या रेडियम संशोधनास त्याने केलेले ५०,००० डॉलरचे साहाय्य, ह्या सर्व गोष्टी कार्नेगीने चर्चसाठी हजारो डॉलर देणग्या दिल्या. कार्नेगीने आयुष्यात सु. ३५ कोटी डॉलरचा दानधर्म केला.

ट्रायंफंड डेमॉक्रसी (१८८६), द एम्पायर ऑफ बिझिनेस (१९०२) हे त्याचे इतर ग्रंथही जगद्‌विख्यात आहेत. कार्नेगी वयाच्या ८४ व्या वर्षी लेनॉक्स, मॅसॅचूसेट्‌स येथे मरण पावला. त्याच्या निधनानंतर १९२० साली ऑटोबायॉग्रफी ऑफ अँड्रू कार्नेगी हे कार्नेगीचे वेधक आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.

संदर्भ : 1. Hacker, L. M. The World of Andrew Carnegie, Washington, 1968.

2. Malone, Mary,  Andrew Carnegie : Giant of Industry, New York, 1969.

 

गद्रे, वि. रा.