स्टोन, जॉन रिचर्ड निकोलस : (३० ऑगस्ट १९१३—६ डिसेंबर १९९१). नामवंत ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. जन्म लंडन येथे. अर्थशास्त्रातील लेखांकन प्रतिमान विकसित केल्याबद्दल १९८४ सालचे नोबेल पारितोषिक त्यास देण्यात आले. विविध आर्थिक संकल्पना निश्चित करून त्यांची चलनवलन क्षमता वाढविण्यासाठी सुरुवातीस राष्ट्रीय व नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या प्रतिमानांचा वापर करण्यात आला. द्विलेखा ( डबल-एन्ट्री ) ही संकल्पना राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप करण्यासाठी पहिल्यांदाच विकसित केल्याने त्याला राष्ट्रीय उत्पन्न लेखा पद्धतीचे जनक म्हणून संबोधले गेले.

स्टोनने प्रारंभी केंब्रिज विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला मात्र अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स याच्या प्रभावामुळे अर्थशास्त्रामध्ये त्याने पदवी घेतली (१९३५). पुढे १९५७ मध्ये विज्ञानातील डी.एस्सी. पदवी घेतली. तत्पूर्वी लंडनच्या दलाली पेढीमध्ये त्याने काही काळ काम केले (१९३६—४०). १९४० मध्ये केन्सच्या निमंत्रणावरून त्याने ब्रिटिश सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामध्ये ( सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ) काम करण्यास प्रारंभ केला. दुसर्‍या महायुद्धानंतर केंब्रिज विद्यापीठातील नवस्थापित अनुप्रयुक्त अर्थशास्त्र विभागाच्या संचालकपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. १९५५ पर्यंत तो या पदावर कार्यरत होता. याच विद्यापीठात तो लेखाशास्त्र आणि वित्तव्यवस्था या विषयांचा प्राध्यापक होता (१९५५—८०). त्यानंतरही तो गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी त्यास नाइटहुड करण्यात येऊन ‘ सर ’ ही उपाधी लाभली (१९७८).

ग्रेट ब्रिटनचे पहिले अंदाजपत्रक ‘ स्टोन मेथड ’ च्या आधारे तयार करण्यात आले (१९४१). १९५० च्या दशकामध्ये स्टोनने गुंतवणुकीचे परिमाण, सरकारी खर्च व सेवन यांचा परिचय करून देणारे विश्वसनीय मोजमाप व उपाय शोधून काढले. ही त्याची सर्वांत उल्लेखनीय कामगिरी होय. या संशोधनातून राष्ट्रीय जमा-खर्च प्रणाली उदयास आली. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी हे प्रतिमान सादर करताना त्यामध्ये त्याने अनेक फेरफार केले. त्याने ⇨ जेम्स एडवर्ड मीड या सहकार्‍याच्या मदतीने नॅशनल इन्कम अँड एक्स्पेंडिचर हा ग्रंथ सिद्ध केला (१९४४). स्टोनने अर्थशास्त्रातील विविध घटकांचे विवेचन करणारे पुढील ग्रंथ लिहिले : इनपुट-आउटपुट अँड नॅशनल अकाउन्ट्स (१९६१), मॅथिमॅटिक्स इन द सोशल सायन्सिस अँड अदर एसेज (१९६६) आणि मॅथिमॅटिकल मॉडेल्स ऑफ द इकॉनॉमी अँड अदर एसेज (१९७०). ए प्रोग्रॅम फॉर ग्रोथ (१९६२—७४) या नियतकालिकाचा तो मुख्य संपादक आणि लेखक होता.

केंब्रिज येथे त्याचे निधन झाले.

राऊत, अमोल