पत: वस्तू आणि सेवा ह्यांच्या देवघेवीत वस्तूची व सेवेची किंमत काही काळानंतर चुकती करण्याची ग्राहकाला विक्रेत्याकडून मिळणारी सवलत. पैशाची परतफेड विशिष्ट काळानंतर करणार असल्याच्या ऋणकोच्या वचनावर विसंबून धनको जेव्हा त्याला कर्जाऊ रक्कम देतो, तेव्हा तो पतीचे व्यवहार करीत असतो. पत व्यवहाराचा आधार म्हणजे विक्रेत्याचा ग्राहकावर किंवा धनकोचा ऋणकोवर असणारा विश्वास. ग्राहकाच्या वा ऋणकोच्या प्रामाणिकपणावर आणि आर्थिक कुवतीवर अनुक्रमे विक्रेत्याचा वा धनकोचा विश्वास असेल, तरच पतीचे व्यवहार सुरळीतपणे होऊ शकतात. विनिमय लहान प्रमाणावर असेल, तर तोंडी आश्वासनावर काम भागते पण व्यवहार फार मोठ्या प्रमाणावर असतील, तर ग्राहकाला व ऋणकोला पतसाधनांच्या स्वरूपात लेखी आश्वासन द्यावे लागते. वचनपत्र, हुंडी, धनादेश, धनाकर्ष ही पतीची काही महत्त्वाची साधने होत.

अधिकर्ष आणि पतसाधने यांच्या साहाय्याने बँका पतपैसा निर्माण करतात आणि एकूण क्रयशक्तीत भर घालतात. परिणामी प्रचारात असलेल्या पैशात वाढ होते. मोठ्या प्रमाणावर आणि दूरच्या ठिकाणी चलनाऐवजी पतसाधने पाठविणे कमी खर्चाचे व कमी त्रासदायक असते. लहान प्रमाणावर जमणारा अनेक लोकांचा पैसा बँकांत येतो व बँकांमार्फत तो उत्पादन कार्यासाठी वापरणे पतसाधनांमुळे शक्य होते. आज कोणत्याही देशात पतसाधनांच्या आधारे कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होत असतात. व्यापार-उद्योगांच्या अवाढव्य यंत्राला वंगण पुरविण्याचे महत्त्वाचे कार्य पतसाधने बजावतात. मात्र अनेकदा पतीवर घेतलेल्या पैशाचा काळजीपूर्वक उपयोग करण्याकडे ऋणकोची प्रवृत्ती नसते. हाती  आलेल्या पैशाची तो उधळपट्टी करतो. त्याचप्रमाणे पतपैशाच्या जोरावर अकार्यक्षम संस्था काही काळ तग धरतात असे दिसते. पतव्यवहार प्रमाणाबाहेर वाढले, बँका जरुरीपेक्षा जादा पतपैसा निर्माण करू  लागल्या, तर भाववाढ होते व आर्थिक स्थैर्य धोक्यात येते. पतनिर्मिती घटली तर आर्थिक मंदी येते. पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवणे मध्यवर्ती बँकेचे म्हणजे पर्यायाने सरकारचे महत्त्वाचे कार्य होय.

भेण्डे, सुभाष