हिंद मजदूर सभा : भारतातील एक प्रमुख कामगार संघटना. तिची स्थापना २४ डिसेंबर १९४८ रोजी झाली. हिंद मजदूर सभेमध्ये सामील झालेले कामगार संघ सुरुवातीला ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’ (आयटक) मध्ये व नंतर ‘इंडियन फेडरेशन ऑफ लेबर’ व हिंद मजदूर पंचायतशी संलग्न होते. साम्यवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबर काम करणे शक्य नाही, असे संघाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा वाटले, तेव्हा त्यांनी एकत्र येऊन हिंद मजदूर सभा या नवीन मध्यवर्ती संघटनेची स्थापना केली. संघटनेच्या स्थापनेमध्ये समाजवादी, फॉर्वर्ड ब्लॉकचे सदस्य व स्वतंत्र विचारसरणीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. अशोक मेहता, बसवंतसिंग, आर्. एस्. रुईकर, शिबनाथ बॅनर्जी, आर्. ए. खेडगीकर, टी. एस्. रामानुजम्, व्ही. एस्. माथूर, जी. जी. मेहता हे सर्वजण या सभेचे संस्थापक सदस्य होते. रुईकर हे पहिले अध्यक्ष, तर अशोक मेहता हे महाचिटणीस म्हणून निवडले गेले. मार्च १९४९ मध्ये ‘रॉयिस्ट इंडियन फेडरेशन ऑफ लेबर’ व समाजवादी हिंद मजदूर पंचायत यांचे हिंद मजदूर सभेत विलिनीकरण करण्यात आले. परिणामतः हिंद मजदूर सभेला व्यापक रूप येऊन तीमध्ये ३८० कामगार संघटना व त्यांचे सहा लाखांच्यावर सभासद सक्रिय झाले. २००२ मध्ये झालेल्या कामगार मंत्रालयाच्या पाहणीनुसार हिंद मजदूर सभेच्या सदस्यांची एकूण संख्या तीन कोटी चौतीस लाखांच्या वर होती. हे प्रमाण देशातील एकूण कामगारांच्या तेरा टक्के एवढे होते. हिंद मजदूर सभा सध्या ‘इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फेडरेशन’ या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून दिल्ली व मुंबई येथे तिची कार्यालये आहेत. सदस्यसंख्येनुसार ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’, ‘इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस’ (इंटक) या संघटनांनंतर तिचा तिसरा क्रमांक लागतो. 

 

कामगार संघ व त्याची मध्यवर्ती संस्था स्वतंत्र म्हणजेच भांडवलदार, सरकार व राजकीय पक्ष यांच्यापासून विमुक्त असावी, असा हिंद मजदूर सभेचा सुरुवातीपासूनचा दृऽष्टकोन आहे. या सभेचे बहुसंख्य कार्यकर्ते समाजवादी विचारसरणीचे व समाजवादी पक्षाला मानणारे असले, तरी त्या पक्षाचे दडपण सभेवर पडू नये, अशी काळजी सभेद्वारे घेतली जाते. राजकीय पक्षाबरोबरच उद्योगपती व शासनाच्या दबावाशिवाय सभा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. संख्यात्मक दृष्टीने सभा ही तिसऱ्या स्थानावर असली, तरी भारतीय कामगार चळवळीत तिचे वैशिष्ट्यपूर्ण असे एक स्थान आहे. शासकीय धोरणांना व कृतींना सदोदित पाठिंबा देणे हे जसे सभेचे ब्रीद नाही, तसेच पक्षीय कारणासाठी सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करणे, हे देखील तिचे धोरण नाही. मध्यम मार्गाचा अवलंब करून कामगारांचे हित जोपासण्याचे प्रयत्न सभा करीत आहे. औद्योगिक लोकशाही, कामगार प्रबोधन, सहकारी चळवळ व सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून व सामाजिक परिवर्तन करण्याच्या उद्देशाने संघटन बांधण्याचे काम सभा करीत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणाऱ्या कर्मचारी वर्गाचे योगदान विचारात घेता कर्मचाऱ्यांची काळजी घेणे व राहणीमान उंचावणे यांसाठी सभा कार्यरत आहे. भारतासारख्या देशात, जेथे आर्थिक व सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर प्रचलित असून दारिद्र्य व बेरोजगारीचे प्रमाणही खूप आहे तेथे, सभेचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था नफा कमाविण्याच्या प्रमुख उद्देशाने काम करीत असल्याने सामाजिक हिताकडे, विशेषतः दुर्बल घटकांकडे, दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याबरोबरच बालकामगार प्रथांचे उच्चाटन, लैंगिक समानता, पर्यावरण रक्षण, कामगारांत पसरत असलेल्या एच्आय्व्ही (एड्स) या रोगाशी मुकाबला, प्रौढ साक्षरता व सामाजिक अरिष्टांना थोपवणे या सर्वच क्षेत्रांत कामगार संघ महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ही सर्व उद्दिष्टे एकसंध व बळकट अशा संघटनामुळे साध्य होऊ शकतात. सध्या जागतिकीकरणामुळे कामगार चळवळीपुढे मोठी आव्हाने उभी ठाकलेली दिसून येतात. एक दबावगट म्हणून हिंद मजदूर सभेचे महत्त्व वादातीत आहे. 

 

चौधरी, जयवंत