दुहेरी रक्षण : (हेजिंग). वस्तूंच्या बाजारभावांत होणाऱ्या अनपेक्षित चढउतारांच्या जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी हजरबाजार व वायदेबाजार यांच्यामध्ये एकाच वेळी दुहेरी परस्परविरुद्ध करार करण्याची पद्धत. हजरबाजारात मालाची खरेदी करणाऱ्यास तो माल विकण्यापूर्वीच त्याचा बाजारभाव उतरल्यास नुकसानीचा धोका संभवतो. अशा जोखमीपासून आपला बचाव करण्यासाठी त्याला हजरबाजारातील व्यवहाराबरोबरच वायदेबाजारात विरुद्ध प्रकारचा म्हणजे विक्रीचा वायदेकरार करावा लागतो. दोन्ही बाजारांतील किंमती सामान्यतः एकाच दिशेने बदलत असल्याने हजरबाजारात खरीदलेल्या मालाची किंमत कालांतराने कमी झाली, तरी खरेदीसमयी केलेला वायदेबाजारातील विक्रीकरार त्याला संरक्षण देऊ शकतो कारण रोख किंमतीबरोबरच वायदेकराराची किंमतही उतरल्यामुळे या उतरलेल्या किंमतीतच तो वायदेकराराची खरेदी करू शकतो. वायदेकराराची विक्री मात्र आगाऊ ठरलेल्या उच्च पातळीवरील किंमतीने त्याला करता येते. त्यामुळे वायदेव्यवहारात त्याला होणारा नफा हजरबाजारातील संभाव्य नुकसानीची भरपाई करू शकतो. अशा दुहेरी व्यवहारांमुळे मिळणाऱ्या संरक्षणास ‘दुहेरी रक्षण’ असे म्हणतात [→ वायदेबाजार].

पहा : कृषिउत्पादन विनिमय केंद्रे.

धोंगडे, ए. रा.