इलेक्ट्रॉनीय वाद्ये: विद्युत् कंपनांचे (तरंगांचे) श्राव्य ध्वनी कंपनांत रूपांतर करणारी वाद्ये इलेक्ट्रॉनीय वाद्ये होत.

ह्या वाद्यांचे दोन प्रकारांत विभाजन करता येते : (१) यांत्रिक वाद्ये : या प्रकारात प्रचलित वाद्यांच्या साहाय्याने स्वरनिर्मिती करून ध्वनिग्राहकाच्या योगे त्यांचे विद्युत् तरंगांत रूपांतर करतात. क्लॅरिनेट, विद्युत् गिटार यांसारखी वाद्ये या प्रकारात मोडतात. (२) स्वयंकंपन निर्मितीक्षम वाद्ये :या प्रकारात प्रचलित वाद्ये न वापरता इलेक्ट्रॉनीय मंडले वापरून विद्युत् तरंग निर्माण करतात. ह्या प्रकारातील बरीच वाद्ये संयोग व त्यजन (टाकणे) या दोन पद्धतींत विभागता येतात. पहिल्या पद्धतीत वेगवेगळी ज्या-वक्रीय [त्रिकोणमितीतील ‘ज्या’ गुणोत्तराच्या आलेखाच्या आकाराची, त्रिकोणमिती] कंपने हवी तेवढी प्रबल करून एकत्र करतात दुसऱ्या पद्धतीत प्रथम विपुल संनादी (मूळ कंप्रतेच्या म्हणजे दर सेकंदास येणाऱ्या मूळ कंपनसंख्येच्या पूर्णांकी पटीत असणारी) कंपने असणारे विद्युत् तरंग निर्माण करून अनावश्यक कंप्रता छानकाच्या (गाळणी मंडलाच्या) साहाय्याने वगळतात. या सर्व प्रकारांची उदाहरणे देऊन खाली विवेचन केले आहे.

(१) यांत्रिक वाद्ये : क्लॅरिनेटच्या आंदोलनक्षम जिव्हाळीजवळ (रीडजवळ) विशिष्ट जागी विद्युत् स्थितिक ध्वनिग्राहक [→ ध्वनिग्राहक]बसवून पहिल्या प्रकारात मोडणारे वाद्य तयार होते. जिव्हाळीच्या कंपनांमुळे ध्वनिग्राहकाची धारणा (विद्युत् भार साठवून ठेवण्याची क्षमता) बदलते. त्यायोगे कंपनांबरहुकूम बदलणारा विद्युत् दाब निर्माण होतो व तो प्रबल करून ध्वनिक्षेपकास पुरवून स्वरनिर्मिती होते. ह्यातील स्वरविशेष हा ध्वनिग्राहकाची जिव्हाळीजवळची विशिष्ट जागा व विद्युत् मंडलांचे गुणविशेष ह्यांवर प्रामुख्याने अवलंबून असतो. वुर्लिट्झर यांच्या ऑर्गनमध्ये भात्यातील हवेने जिव्हाळी कंप पावते व वरीलप्रमाणे स्वरनिर्मिती होते.

विद्युत् गिटार : साध्या गिटारमध्ये स्वराची नादगुणवत्ता वाढविण्यासाठी पेटीसारखा एक पोकळ बंदिस्त भाग म्हणजे ध्वनिमंजुषा असते. विद्युत् गिटारला अर्थातच अशा ध्वनिमंजुषेची गरज नसते. त्यात साध्या गिटारच्या ध्वनिमंजुषेच्या आकाराच्या परंतु सपाट असलेल्या भागावरील एका तरफेवरून सहा ताणलेल्या तारा नेलेल्या असतात व या तरफेजवळच ध्वनिग्राहक बसवितात. छेडलेल्या तारांची कंपने तरफेला पोहोचतात. ध्वनिग्राहकाने ह्या कंपनांचे रूपांतर समस्वरूप विद्युत् कंपनांत होते. विवर्धकाने कंपने प्रबल करून ध्वनिक्षेपकास पुरवून गिटारचा आवाज पाहिजे तेवढा लहानमोठा करता येतो.

(२) स्वयंकंपन निर्मितीक्षम वाद्ये : रशियातील लिओ थेरेमिन यांनी तयार केलेले ‘थेरेमिन’ हे दुसर्‍या प्रकारचे वाद्य होय. ह्या स्वयंविद्युत् कंपननिर्मितीक्षम वाद्यात निर्वात नलिका [→ इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति], संवाहक तारेचे वेटोळे व विद्युत् धारित्र (विद्युत् भार साठवून ठेवणारा घटक) यांनी मिळून तयार केलेल्या विद्युत् मंडलात विद्युत् कंपने निर्माण होतात. वादकाने आपला हात विद्युत् मंडलापासून दूर वा जवळ नेल्यास विद्युत् धारित्राचे मूल्य व त्या प्रमाणात कंप्रता बदलते. वाद्यवृंदात सूत्रसंचालक हातवाऱ्यांच्या संकेतांनी वेगवेगळ्या वादकांकडून जशी संगीताकृती घडवून घेतो जणू तसेच थेरेमिन वाद्यवादक हात हालवून स्वर निर्माण करतो. ह्या वाद्यातील विद्युत् कंपने उच्च व म्हणून श्रवणातीत असतात. श्राव्य-ध्वनिनिर्मितीसाठी एक स्थिर व दुसरे बदलणारी कंप्रता असलेले अशी दोन विद्युत् मंडले योजून त्यांच्यापासून निर्माण होणारी कंपने एकत्र मिसळून दोन कंप्रतांच्या वजाबाकी एवढी कंप्रता निर्माण करतात. ही कंप्रता श्रवण मर्यादेत येते. ही विद्युत् कंपने ध्वनिक्षेपकाच्या योगे स्वररूपात प्रकट होतात. फ्रान्समधील मॉरिस मार्तेनो यांचे ‘मार्तेनो’ (१९२८), जर्मनीतील फ्रीड्रिक ट्रॉटविन यांचे ‘ट्रॉटोनियम’ (१९३०), रशियातील निकोलस ऑबकॉव्ह यांचे ‘आबकॉव्ह’(१९४०) व रने बर्ट्रंड यांचे ‘डायनाफोन’ (१९३८) ही वाद्ये थोड्याफार फरकाने थेरेमिनसारखीच आहेत.

हॅमंड ऑर्गन हे संयोग पद्धतीचे वाद्य होय. यात नित्य (स्थिर) चुंबकाच्या एका टोकाला वेटोळे बसविलेले असते. त्याच्यासमोर अनेक दाते असणारी, साधारण २·५ सेंमी. व्यासाची लोह तबकडी नित्य चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रात चक्राकार फिरविली जाते. त्यामुळे चुंबकीय क्षेत्रात बदल होतो व प्रवर्तनाने (त्या बदलामुळे होणार्‍या क्रियेने) वेटोळ्यात ज्या-वक्रीय विद्युत् प्रवाह निर्माण होतो. ह्या विद्युत प्रवाहाचे स्वरूप तबकडीची गती व दात्यांची संख्या ह्यांवर अवलंबून असते. अनेक वेटोळी योजून त्यातील प्रवर्तित विद्युत् प्रवाह एकत्र करून, ते प्रबल करून ध्वनिक्षेपकाच्या योगे स्वरविशेष निर्मिता येतात. ह्या वाद्यात स्वर पट्ट्या हाताने (वा पायाने) दाबून स्वर निर्माण केले जातात.

कॉम्पटन यांच्या ‘इलेक्ट्रोन’ ह्या ऑर्गनमध्ये एक तबकडी स्थिर व तिच्यासमोर दुसरी फिरती असते. ही दुसरी तबकडी दोहोंच्या मध्यातून जाणार्‍या अक्षाभोवती फिरते. तबकड्यांवर नागमोडी पण वर्तुळाकार खाचा असतात. ह्यामुळे बदलत्या क्षेत्रफळाचे विद्युत् धारित्र तयार होऊन ते अपेक्षित कंप्रतेचा विद्युत् प्रवाह निर्माण करते व त्यापासून हवा तो स्वरविशेष निर्मिता येतो. हॅमंड कॉर्ड ऑर्गनवर एक स्वरपट्टी दाबून वादक एकावेळी अनेक स्वर निर्माण करून सुसंवाद निर्माण करू शकतो. भारतात बी. बी. देशपांडे ह्यांनी फँटॅस्ट्रॉन आंदोलक विद्युत् मंडल (विद्युत् स्पंद निर्माण करणारे एक मंडल) वापरून स्वरभेद करण्याची सोय केली. त्यांच्या स्वरपेटीत स्वरसप्तक कायम ठेवून सप्तकातील सुरुवातीच्या सुराचे स्वरपद (ध्वनीची उच्चनीचता) विशिष्ट मर्यादेत बदलू शकते व पेटीतून भारतीय संगीतशास्त्राचे वैशिष्ट्य असणाऱ्या श्रुती काढता येतात.

बाल्डविन ऑर्गनमध्ये इलेक्ट्रॉनीय विद्युत् मंडलापासून करवती दात्यांसारख्या कंपनांची निर्मिती करून विद्युत् छानकायोगे अनावश्यक कंपने वगळून वेगवेगळाले स्वरविशेष काढण्याची व्यवस्था असते. हा त्यजन पद्धतीचा ऑर्गन होय.

पुढील प्रगती : इलेक्ट्रॉनीय वाद्यांनी संगीतक्षेत्रास नवेच दालन उघडून दिले आहे. अमेरिकेतील ए. डग्‍लस ह्यांच्या स्वरमेलाच्या कॉर्ड ऑर्गनवर वेगवेगळ्या स्वरविशेषांनी नटलेला प्रत्येक स्वरमेल संगीताचा स्वर एकाच वेळी एकच वादक स्वत:च्या प्रतिभेनुसार वाद्यवृंदाशिवाय श्रुतिमधुर करू शकतो. श्रुतींची संख्या वाढविणे, त्या कमी जास्त प्रबल करणे, फिरत असणारा व चंचल कंपयुक्त स्वर निर्माण करणे, कृत्रिम निनादनिर्मिती (ध्वनि-उगम बंद करूनही आवाज काही काल ऐकू येत राहणे) व एका वाद्यातील स्वराचा दुसर्‍या वाद्यातील स्वराने भेद करणे ही सर्व कार्ये आता एका वाद्यामुळे सहजी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संगीताच्या लिपीतही आवश्यक बदल होऊ लागला आहे. स्वराचा काल, त्याची तीव्रता व स्वरपद ह्यांवरच संगीताची रचना करून नवसंगीतनिर्मितीचे प्रयत्‍न सुरू आहेत. ह्या कामासाठी संगणकांचा (गणितकृत्ये करणाऱ्या यंत्रांचा) मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.

पुणतांबेकर, व. अ.