व्हिडिओ : व्हिडिओ या शब्दाचा वापर दोन प्रकारे केला जातो. ‘इलेक्ट्रॉनिकी माध्यमे वापरणारे चित्रसाहित्य’ अशा अर्थाने नाम म्हणून हा शब्द वापरतात. उदा., व्हिडिओ पाहणे, तसेच इलेक्ट्रॉनिकी माध्यमे वापरणाऱ्या चित्रांशी संबंधित’ अशा अर्थाने विशेषण म्हणूनही तो वापरला जातो. उदा., व्हिडिओ कॅसेट. दूरचित्रवाणीच्या वापरानंतर व्हिडिओ हा शब्द प्रचारात आला. दूरचित्रवाणीमध्ये ध्वनी आणि चित्र अशी दोन माध्यमे वापरली जातात. या प्रणालीमध्ये ध्वनीशी संबंधित सर्व बाबींसाठी ‘ऑडिओ’(श्राव्य) व चित्रांशी संबंधित बाबींसाठी ‘व्हिडिओ’(दृक्) हे शब्द उपयोगात आणले जातात. अलीकडे अंकीय इलेक्ट्रोनिकी व संगणक यांच्या प्रसारानंतर व्हिडिओ शब्दाचा उपयोग अधिक व्यापक बनला आहे. आता सर्व प्रकारच्या इलेक्ट्रोनिकी आणि सॉफ्टवेयर प्रणालींमध्ये चित्रसाहित्य व चित्रसाहित्याशी संबंधित घटकांसाठी व्हिडिओ या शब्दाचा प्रयोग होतो.

दूरचित्रवाणीमध्ये व्हिडिओ कॅमेरा वापरला जातो. हा कॅमेरा समोरील दृश्यांच्या प्रतिमा ग्रहण करतो आअणि त्यांचे इलेक्ट्रॉनिकी संकेतांमध्ये रूपांतर करतो. हे संकेत प्रक्षेपित केले जातात व दूरचित्रवाणी संचावर ग्रहण केले जातात. अशा रीतीने कॅमेऱ्यासमोरील दृश्य दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर दिसते. चलच्चित्रांचे प्रक्षेपण करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरील चित्रित केलेली दृश्ये प्रतिसेकंद पंचवीस या गतीने पाठविली जातात. दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर त्याच गतीने चित्रे उमटल्यामुळे प्रेक्षकांपुढे चलच्चित्राचा आभास निर्माण होतो. व्हिडिओ कॅमेऱ्याला एक ध्वनिग्राहक जोडून ध्वनी ग्रहण करण्याची व्यवस्था केलेली असते. या ध्वनीचेही इलेक्ट्रॉनिकी संकेतांमध्ये रूपांतर केले जाते. प्रतिसेकंद पंचवीस चित्रे आणि त्याबरोबर असलेला ध्वनी या सर्व संकेतांचे वेळ संबंध जसेच्या तसे राहण्यासाठी म्हणून कालनियंत्रक संकेत निर्माण करून समकालीकरण साधले जाते. चित्रसंकेत, ध्वनिसंकेत आणि कालनियंत्रक संकेत या तीन संकेतांचे संयुक्तपणे प्रक्षेपण केले जाते. व्हिडिओ टेप रेकॉर्डरमध्ये (दृक्-फीत-मुद्रकामध्ये) चुंबकीय फितीवर चित्रासाहित्याचे मुद्रण करताना वरील तिन्ही संकेतांची एकत्रितपणे नोंद केली जाते. ही फीत वाचून तिच्यावर नोंदलेले तिन्ही संकेत पुन्हा प्रक्षेपित करता येतात. तसेच व्हिडिओ टेप रेकॉर्डर थेट दूरचित्रवाणी संचाला जोडूनही या संकेतांचे ग्रहण करता येते. [आ.१.(आ)].

व्हिडिओ संकेत : इलेक्ट्रॉनिकी प्रणाली या चित्रसाहित्यातील माहितीवर अनेक प्रकारचे संस्करण करतात [→ माहिती संस्करण]. यासाठी ही माहिती सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिकी व्हिडिओ संकेतांमध्ये रूपांतरित करावी लागते. त्यानंतर या संकेतांचे वर्धन करणे, त्यातील गोंगाट कमी करणे, प्रक्षेपण करणे, दर्शक पडद्यावर ते दाखविणे अशी अनेक कार्ये इलेक्ट्रॉनिकी प्रणाली करतात. व्हिडिओ संकेतांमध्ये चित्रामधील सर्व तपशील भरलेले असतात. या संकेतांसाठी विविध आंतरराष्ट्रीय मानके वापरात आहेत. अमेरिका, जपान इ. देश NTSC (नॅशनल टेलिव्हिजन स्टँडर्डस कमिटी) रशिया, फ्रान्स इ. देश SECAM (Systeme Electronic Pour Couleur Avec Memoire) तर ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आशियातील बरेचसे देश PAL (फेज अल्टरेशन लाइन) हे मानक वापरतात. भारतात PAL-B हे मानक वापरले जाते. या मानकाप्रमाणे प्रत्येक चित्र ६२५ आडव्या रेषांचे बनलेले असते. कृष्णधवल व्हिडिओ संकेतांमध्ये यातील प्रत्येक रेषेतील बिंदूंच्या उजळपणाच्या समप्रमाणात व्हिडिओ संकेताचे मान बदलते. रंगीत व्हिडिओ संकेत लाल, हिरवा व निळा या तीन प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने बनतात. रंगीत व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये लाल (R), हिरवा (G), निळा (B) या रंगांचे प्रकाश वेगवेगळे काढण्याची व्यवस्था केलेली असते. यामुळे तीन रंगांचे तीन स्वतंत्र व्हिडिओ संकेत तयार होतात. या तीन संकेतांपासून पुढील सूत्रांनूसार एक कृष्णधवल संकेत व दोन रंग फरक-संकेत असे तीन नवीन संकेत तयार केले जातात.

                        कृष्णधवल संकेत (Y) = ०·२९९ x लाल संकेत + ०·५८७ x हिरवा संकेत + ०·११४ x निळा संकेत.

                        लाल रंग फरक-संकेत = लाल संकेत – कृष्णधवल संकेत.                         निळा रंग फरक-संकेत = निळा संकेत – कृष्णधवल संकेत.

प्रक्षेपण करताना पुढील सूत्रांनुसार U आणि V संकेत तयार केले जातात आणि त्यांचा पट्टविस्तार ०·५ मेगॅहर्टझ् इतका मऱ्यादित ठेवून Y, U, V या तीन संकेतांचे प्रक्षेपण केले जाते.

                       U = ०·४९३ x निळा रंग फरक-संकेत     

                       V = ०·८७७ x लाल रंग फरक-संकेत

रंगीत व्हिडिओ संकेत मूळ RGB स्वरूपात न ठेवता वरीलप्रमाणे YUV संकेत तयार करण्यामध्ये तिहेरी उद्देश असतो. त्यामुळे कृष्णधवल दूरचित्रवाणी संचावर रंगीत प्रक्षेपणातूनही उत्तम कृष्णधवल चित्र दिसते, तर रंगीत संचावर तीन रंगांच्या योग्य मिश्रणातून जास्तीत जास्त रंग निर्माण करता येतात. शिवाय कृष्णधवल संकेतांच्या पट्टविस्ताराच्या मऱ्यादेत राहून रंगीत प्रक्षेपण शक्य होते. YUV संकेतामध्ये कालनियंत्रक संकेत मिसळल्यावर संयुक्त व्हिडिओ संकेत तयार होतो. सर्व आंतर्राष्ट्रीय मानकांमध्ये व्हिडिओ संकेतांबरोबर ध्वनिसंकेतही समाविष्ट केलेले असतात.

इलेक्ट्रॉनिकी प्रणालींमध्ये व्हिडिओ संकेतांचे प्रतिरूप विद्युत्-चुंबकीय स्वरूपात असते. रूढ दूरचित्रवाणी प्रणालींमध्ये व्हिडिओ संकेत सदृश स्वरूपात प्रतिरूप केले जातात. सदृश संकेतांमध्ये कृष्णधवल व्हिडिओ संकेतांचे मूल्य चित्राच्या उजळपणाच्या समप्रमाणात अखंड रीतीने बदलते. रंगीत व्हिडिओ संकेतांमध्ये लाल, हिरवा व निळा या तीन रंगांच्या संकेतांचे मूल्य त्या-त्या रंगाच्या तीव्रतेच्या सम प्रमाणात अखंड रीतीने बदलते. अंकीय इलेक्ट्रॉनिकी व संगणकाच्या प्रसारानंतर व्हिडिओ संकेत अंकीय स्वरूपात प्रतिरूपित करणाऱ्या प्रणाली वापरात आल्या. यांमध्येही सदृश संकेतांप्रमाणेच चित्र अनेक आडव्या रेषांचे बनलेले असते. मात्र प्रत्येक रेषेतील संकेत अखंड स्वरूपात न ठेवता ते स्वतंत्र बिंदूबिंदूंचे बनलेले असतात. या प्रत्येक बिंदूला पिक्सेल (पिक्चर एलिमेंटचे संक्षिप्त रूप) असे म्हणतात. कृष्णधवल चित्रांसाठी प्रत्येक बिंदूवरील चित्राच्या उजळपणाचे अंकांमध्ये मापन केले जाते. रंगीत चित्रांसाठी प्रत्येक बिंदूवरील तीन रंगांच्या तीव्रतेचे अंकांमध्ये मापन केले जाते. अंकीय इलेक्ट्रॉनिकीमध्ये सर्व व्हिडिओ माहिती अंकांमध्येच प्रतिरूपित होते. चित्र अधिक सुस्पष्ट दिसण्यासाठी सदृश प्रणालींना अधिक पट्टविस्तार वापरावा लागतो, तर अंकीय प्रणालींमध्ये पिक्सेलची संख्या आणि त्यांचे सूक्ष्म मापन यांवर चित्राची स्पष्टता अवलंबून असते. उदा. चित्राची स्पष्टता ६४० x ४८० x ८ अशी असेल, तर याचा अर्थ चित्र ४८० आडव्या रेषांचे बनलेले असून प्रत्येक रेषेत ६४० पिक्सेल व प्रत्येक पिक्सेलचे मापन आठ द्विमान अंकांत केलेले आहे. आठ द्विमान अंकांनी रंगाच्या तीव्रतेच्या २५६ पातळ्या दर्शविता येतात.  ६४० x ४८० x ८ इतक्या स्पष्टतेचे चित्र स्मृतीमध्ये तीन रंगांत साठविण्यासाठी सु. ९·२ मेगॅबाइट इतकी स्मृती लागते.

आ. १. (अ) व्हिडिओ टेप रेकॉर्डरची रचना : (१) ताण रूळ (२) मार्गदर्शक खुंट्या (३) व्हिडिओ चक्र (४) मुद्रण शीर्ष (५) पुनर्वादन शीर्ष (६) पुसणारे शीर्ष (आ) दृक् फितीवरील संकेतांची मांडणी : (१) ध्वनिसंकेत (२) व्हिडिओ (दृक्) संकेत (३) कालनियंत्रक संकेत.

संक्षिप्त व्हिडिओ : चित्र जितके अधिक स्प्ष्ट हवे असेल तितकी ते साठविण्यासाठी अधिक स्मृती लागते. तसेच स्पष्ट चित्रांचे प्रक्षेपण करण्यासाठी अधिक मोठा पट्टविस्तार लागतो. या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक चित्रावर संस्करण करून चित्रे संक्षिप्त अंकीय स्वरूपात प्रतिरूपित करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले. स्थिर चित्रे संक्षिप्त करण्यासाठी प्रामुख्याने जॉइंट फोटोग्राफिक एक्सपर्टस् ग्रुप (JPEG संयुक्त छायाचित्रण तज्ञ गट) या संस्थेची मानके वापरली जातात. यात चित्रातील अतिरिक्तता काढून त्यांचा संक्षेप केला जातोच. शिवाय एकामागून एक संपूर्ण चित्रे न घेता लागोपाठच्या चित्रांतील केवळ बदल प्रतिरूपित केले जातात. यामुळे चलच्चित्रांचा मोठ्या प्रमाणावर संक्षेप होऊन चित्रांसाठी लागणारी स्मृती मूळ चित्राच्या एकसोळांश इतकी किंवा त्याहूनही अधिक प्रमाणात कमी होऊ शकते.

व्हिडिओ टेप रेकॉर्डर : (दृक् फीत मुद्रक) ध्वनिमुद्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या फीत मुद्रकाप्रमाणेच (टेप रेकॉर्डरप्रमाणेच) व्हिडिओ टेप रेकॉर्डरमध्ये प्लॅस्टिकच्या एका लांब पट्टीवर आयर्न ऑक्साइडचा लेप चढविलेला असतो आणि त्यावर चित्र व ध्वनी यांचे मुद्रण केले जाते. [→ ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन]. या मुद्रकाचा वापर १९५०च्या दशकात सर्वप्रथम दूरचित्रवाणीसाठी केला गेला. तत्पूर्वी दूरचित्रवाणीच्या सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण थेटच करावे लागे. कार्यक्रम फितीवर मुद्रित करून त्यांचे संपादन करून मग प्रक्षेपण करायची व्यवस्था झाल्यावर हे काम सोयीचे झाले. सध्या दूरचित्रवाणीचे जवळजवळ सर्वच कार्यक्रम फितीवर मुद्रित करून मग प्रक्षेपित केले जातात.


व्यावसायिक दर्जाच्या फीत मुद्रकामध्ये फितीची मोठी रिळे वापरली जातात. सुरुवातीच्या प्रणालींमध्ये त्यातील फीत ५·०८ सेंमी. इतकी रुंद असे. नंतर २·५४ सेंमी. रुंदीच्या फिती वापरात आल्या. व्हिडिओ कॅमेऱ्याकडून येणारे व्हिडिओ संकेत विद्युत्-स्वरूपात असतात. त्यांचे चुंबकीय संकेतांमध्ये रूपांतर करून मुद्रण केले जाते. प्लेबॅक (पुनर्वादन–उलट कृतीने पुनरुत्पादन करणे) करताना  बरोबर त्याच्या विरुद्ध क्रिया होऊन मूळ विद्युत्-संकेत परत मिळतात. व्यावसायिक मुद्रक महाग असले, तरी त्यात व्हिडिओ संकेतांचा दर्जा उत्तम राखला जातो. वापर करते वेळी एका रिळावरील फीत अनेक खुंट्या, शीर्ष (हेड) व रूळ (रोलर) यांतून ओवून ती दुसऱ्या रिळावर चढविण्याचे काम कुशल व्यक्तीला करावे लागते.

  घरगुती व्हिडिओ मुद्रकामध्ये व्हिडिओ संकेतांच्या दर्जाबाबत थोडी तडजोड करून किंमत कमी राखली जाते. शिवाय रिळांऎवजी कॅसेट वापरल्याने सर्वसामान्य व्यक्ती ते चालवू शकतात. कॅसेटसाठी अनेक प्रकारच्या मांडण्या वापरल्या जातात. त्यांतील बीटामॅक्स व व्हीएचएस (व्हिडिओ होम सिस्टिम) हे दोन प्रकार अधिक प्रचलित आहेत. घरगुती मुद्रकासाठी व्हीसीआर (व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर) हे नाव अधिक प्रचलित आहे. भारतामध्ये व्हीएचएस पद्धती सर्वत्र वापरत आहे. याची कॅसेट १८७ x  १०४  x २५ मिमी. आकारमानाची असून आतील चुंबकीय फीत १२·५ मिमी. रुंदीची असते. या रुंदीतील एका बाजूची थोडीशी किनार ध्वनिमुद्रणासाठी, तर दुसरी किनार कालनियंत्रक संकेतांसाठी वापरली जाते. मध्यावर ०·०२५ मिमी. रुंदीच्या तिरप्या पट्ट्यांच्या स्वरूपात चित्रसंकेत मुद्रित केले जातात. मुद्रण (रेकॉर्डिंग), वाचन (रीडिंग) व पुसण्याचे काम (इरेझिंग) करणाऱ्या हेडचा (शीर्षाचा) समूह ६२ मिमी. व्यासाच्या एका चक्रावर बसविलेला असतो. हे चक्र स्वतःभोवती मिनिटाला २५ या गतीने फेऱ्या मारते. व्हिडिओ फीत या चक्राला चिकटून कॅसेटमधील एका रिळावरून दुसऱ्या रिळावर जाते. मुद्रित करण्याच्या संकेतांबरहुकूम चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याचे काम मुद्रण शीर्ष करते. या चुंबकीय क्षेत्रानुसार फितीवर संकेतांचे आकृतीबंध मुद्रित केले जातात. पुनर्वादन (प्लेबॅक) करते वेळी शीर्षावरून फीत वाचन जाताना त्यातील चुंबकीय आकृतीबंधांचे विद्युत्-संकेतांमध्ये रूपांतर होते. एका कॅसेटवर तीन ते चार तासांचे ध्वनिचित्रण कार्यक्रम मुद्रित करता येतात.

बीटामॅक्स कॅसेट थोडीशी लहान म्हणजे १५५ X ९५ X २५ मिमी. अशा आकारमानाची असते. हिच्यावरील मुद्रणाची लांबी थोडी कमी असते. मात्र काही बीटामॅक्स मुद्रकांमध्ये एकावर एक अनेक कॅसेट रचून एका वेळी १४ तासांपर्यंतचे कार्यक्रम पाहता येतात. औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये एसव्हीएचएस (सुपर व्हिडिओ होम सिस्टिम) ही मांडणी वापरली जाते. त्यात १२·५ मिमी. रुंदीची फीत वापरतात. त्यातील व्हिडिओ संकेत निराळे असून एस-व्हिडिओ (व्हिडिओ संकेतांतील सर्व घटक संयुक्तपणे प्रदान न करता उजळपणा व रंगांचे संकेत स्वतंत्रपणे प्रदान करणाऱ्या संकेतांचे एक मानक) या नावाने ओळखले जातात. एस-व्हिडिओचा वापर अंकीय व्हिडिओ फीत मुद्रकामध्येही केला जातो.

ज्या मुद्रकावर मुद्रण केले जाते त्यावरच पुनर्वादन केल्यास उत्तम चित्र व ध्वनी मिळतात. कारण अभिलेखन शीर्ष व वाचन शीर्षाची फिरण्याची गती व फितीशी त्याचा होणारा कोन हे तंतोतंत जुळतात. एका यंत्रावर मुद्रित केलेली फीत दुसऱ्या यंत्रावर चालविताना ‘ट्रॅकिंग’ बटनाने (मार्गानुसारी कळीने) शीर्षाचा कोन थोडा कमी-जास्त करून चित्र शक्य तितके सुस्पष्ट करून घेता येते.

व्हिडिओ कॅमेरा : समोरील दृश्यांचे चित्रण करून त्यातून संयुक्त व्हिडिओ संकेत तयार करण्याचे काम व्हिडिओ कॅमेरा करतो. हा संकेत त्याच्या अंगभूत किंवा बाह्य मुद्रकामध्ये मुद्रित करता येतो. तसेच कॅमेरा थेट दूरचित्रवाणी संचाला जोडून पडद्यावर चित्र पाहता येतात. या कॅमेऱ्याला दूरची व जवळची दृश्ये परिणामकारक रीतीने चित्रित करण्यासाठी अनेक दुर्बीणी असलेली प्रकाशीय प्रणाली असते. साध्या कॅमेऱ्याप्रमाणे यात फिल्म नसते, तर प्रकाशाला संवेदनक्षम असलेला एक छोटा पडदा असतो. यासाठी पूर्वी व्हिडिओकॉन पद्धतीची काचनलिका वापरली जाई. आधुनिक कॅमेऱ्यामध्ये हा पडदा सीसीडी (चार्ज कपल्ड डिव्हाइस) म्हणजे ⇨ विद्युत्-भारयुग्मित प्रयुक्ती या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिकी घटकांचा बनलेला असतो. सीसीडी पडदे अतिशय संवेदनक्षम असतात. ते अत्यंत कमी प्रकाशात चित्रिकरण करू शकतात. तसेच चित्रातील जलद बदलांना अधिक गतीने प्रतिसाद देतात. दुर्बीणीतून येणाऱ्या प्रकाशाचे लाल, हिरवा व निळा हे तीन घटक वेगळे केले जातात. यासाठी अर्धपरावर्तक गाळण्या (छानक) किंवा लोलक यांनी बनलेली प्रणाली वापरली जाते.

व्हिडिकॉन आणि काही सीसीडी कॅमेर्यांतमध्ये पडद्यावर तीन रंग घटकांसाठी उभ्या पट्ट्यापट्ट्यांची रचना बनविलेली असते. प्रत्येक पट्टीमध्ये प्रत्येक रंगासाठी एक अशा तीन उपपट्ट्यांवरच पडेल अशी व्यवस्था केलेली असते. या पडद्यामधून त्यावर पडलेल्या प्रकाशाच्या तीव्रतेप्रमाणेच विद्युत्-संकेत मिळतात व त्यांतून लाल, हिरवा व निळा असे तीन स्वतंत्र व्हिडिओ संकेत तयार होतात. अधिक स्प्ष्ट चित्रांसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅमेर्यांतमध्ये तीन रंगांसाठी तीन स्वतंत्र सीसीडी घटक वापरले जातात. तीन रंग-संकेतांमधून संयुक्त व्हिडिओ-संकेत तयार केला जातो. कॅमेऱ्यामधून तीन स्वतंत्र रंग-संकेत व संयुक्त संकेत असे दोन्ही प्रकारचे संकेत मिळू शकतात.

हातातून घेऊन जाता येईल अशा लहान आकारमानाचे व हलक्या कॅमकॉर्डरच्या साहाय्याने सर्वसामान्य व्यक्ती व्हिडिओ चित्रिकरण करू शकते. कॅमकॉर्डर हे कॅमेरा व रेकॉर्डरचे संक्षिप्त रूप असून त्यात व्हिडिओ कॅमेरा व फीत मुद्रक हे दोन्ही असतात. व्हीएचएस, व्हीएचएस-सी, एस-व्हीएचएस, बीटामॅक्स असे वेगवेगळ्या मांडण्या वापरणारे कॅमरेकॉर्डर उपलब्ध आहेत. व्हिडिओ माहिती मोठ्या पडद्यावर दाखविण्यासाठी व्हिडिओ प्रक्षेपक वापरले जातात. अशा प्रक्षेपकाला संयुक्त व्हिडिओ संकेत किंवा संगणकाकडून येणारा RGB व्हिडिओ संकेत देता येतो. जुन्या प्रकारच्या प्रक्षेपकामध्ये तीन रंगांच्या प्रकाश देणाऱ्या तीन काचनलिका वापरल्या जात. आधुनिक प्रक्षेपकामध्ये द्रव स्फटिक दर्शन [लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एलसीडी → द्रव स्फटिक ] घटकांचा एकच पडदा वापरून रंगीत चित्र मोठ्या पडद्यावर दाखविले जाते. [→ कॅमेरा रचित्रवाणी].


व्हिडिओदर्शक : इलेक्ट्रॉनिकी माध्यमात असलेले चित्रसाहित्य दृश्य स्वरूपात दाखविण्यासाठी व्हिडिओदर्शक वापरतात. दूरचित्रवाणी संचामध्ये यासाठी ⇨ ऋण किरण नलिका वापरली जाते. यामध्ये मेलन केलेल्या वाहिनीवरून मिळालेल्या संयुक्त व्हिडिओ संकेतांमधून लाल, हिरवा व निळा हे तीन संकेत वेगळे काढून नलिकेच्या तीन इलेक्ट्रॉन क्षेपकांना दिले जातात (इलेक्ट्रॉन नलिकेत एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन शलाका निर्माण करणारी विद्युत्-अग्ररचना म्हणजे इलेक्ट्रॉन गन क़िंवा इलेक्ट्रॉन क्षेपक यंत्रणा होय. ती या इलेक्ट्रॉन शलाकांचे नियमन, केंद्रीभवन, विचलन वा एकत्रिकरण करू शकते). नलिकेच्या पडद्यावर तीनतीन ठिपक्यांच्या समूहांत फॉस्फर या अनुस्फुरक द्रव्याचा थर दिलेला असतो. प्रत्येक रंगासाठी एक असे हे तीन ठिपके त्यांच्यावर इलेक्ट्रॉन्सचा मारा झाल्यावर तो रंग उत्सर्जित करतात. इलेक्ट्रॉन सोडणाऱ्या क्षेपकाचे कोन असे बरोबर साधलेले असतात की, लाल रंगाचे संकेत देणारे इलेक्ट्रॉन लाल प्रकाश देणाऱ्या ठिपक्यावर, हिरव्याचे हिरव्यावर व  निळ्याचे निळ्यावर पडतील. संपूर्ण पडदाभर मिळून तीन ठिपक्यांचे असे सु. दहा लाख समूह असतात. तिन्ही ठिपके अगदी चिकटून असल्याने तीन रंग व्हिडिओ संकेतांच्या प्रमाणात मिसळून एकत्रित दृश्यमान होतात व त्यांच्या सुयोग्य मिश्रणाने कित्येक रंग तयार होऊ शकतात. कृष्णधवल संचांमध्ये ठिपक्यांऎवजी संपूर्ण पडदाभर पांढरा प्रकाश देणाऱ्या फॉस्फराचा थर दिलेला असतो.

       

दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावरील चित्र आडव्या रेषांनी बनलेले असते. अशा दर्शकांना रेषा चौकट किंवा रास्टर (क्रमवीक्षक रेषांचा आधीच निश्चित केलेला आकृतीबंध ) पद्धतीचे दर्शक म्हणतात. दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर एकाआड एक विषम क्रमांकांच्या रेषा उमटतात. पुढील वेळी एकाआड एक सम क्रमांकाच्या रेषा उमटतात. सम व विषम रेषांनी बनलेली अर्धचित्रे अशी आलटूनपालटून उमटत असतात. रेषांची अशी गुंफण केल्यामुळे संपूर्ण चित्र प्रतिसेकंद ५० वेळा उमटल्याचा परिणाम साधतो. या तंत्राला इंटरलेसिंग (आंतरगुंफण) असे म्हणतात.

आ. २. डोळ्यांसमोर बसविता येणारा एलसीडी व्हिडिओदर्शकव्हिडिओदर्शक अग्र (टर्मिनल) हा संगणकाचा आवश्यक असा घटक आहे. १४ इंचापासून ते २१ इंचापर्यंत (सु. ३५ ते ५२·५ सेंमी.) आकाराच्या व्हिडिओ अग्रावर संगणकाचा प्रदान मिळतो. संगणकाला जोडलेल्या व्हिडिओदर्शक अग्रामध्ये दूरचित्रवाणी संचाप्रमाणे तीन ठिपक्यांचा समूहाचा बनलेला पडदा असतो. तसेच त्यातील रंगांची तीव्रता अंकीय स्वरूपात असते. सर्वसाधारण वापरातील व्हिडिओदर्शक ६०० X ४८० पिक्सेलचे बनलेले असतात. उच्च दर्जाच्या प्रणालींमध्ये १६०० X १२०० पिक्सेलची चित्रे प्रतिसेकंद ८५ वेळा उमटविणाऱ्या दर्शकामधून अति स्प्ष्ट व स्थिर चित्र दिसू शकते. इंटरलेसिंग वापरणारे व न वापरणारे असे दोन्ही प्रकारचे दर्शक संगणकासाठी वापरले जातात.

वहीच्या आकारमानाच्या छोट्या संगणकाचे व्हिडिओदर्शक चपट्या आकाराचे असून एलसीडीचे बनलेले असतात. दूरचित्रवाणीसाठी उच्च तद्रूपता असलेले दूरदर्शन (हाय डेफिनिशन टेलिव्हिजन एचडीटीव्ही) हे नवीन आंतरराष्ट्रीय मानक बनले असून त्याचे प्रक्षेपण संपूर्णपणे अंकीय आहे. इ. स. २००५ पासून ही सेवा सुरू झालेली आहे. यातील व्हिडिओ चित्रे १९२० X १०५० पिक्सेलची असतील व त्यांची स्प्ष्टता सिनेगृहात दिसणाऱ्या ३५ मिमी. फिल्मच्या चित्रांच्या तोडीची आहे.

भासमान वास्तवता प्रणालींमध्ये त्रिमिती चित्रे दर्शविली जातात. त्यासाठी चष्म्याप्रमाणे डोळ्यांवर लावण्याच्या एका उपकरणात दोन डोळ्यांसमोर दोन छोटे एलसीडी व्हिडिओदर्शक पडदे असतात. दोन पडद्यांवरील प्रतिमा त्रिमितीय (स्टीरिओ) स्वरूपात असल्याने त्रिमिती चित्र दिसते. (आ.२).

व्हिडिओ तबकड्या : व्हिडिओ चित्रे साठविण्यासाठी प्रकाशीय तबकड्या वापरल्या जातात. १२ इंच (सु. ३० सेंमी.) व्यासाच्या लेसर तबकड्या १९८०च्या दशकात वापरात आल्या. यात व्हिडिओ माहिती सदृश स्वरूपात नोंदविली जाई. अंकीय व्हिडिओचा विकास झाल्यावर अंकीय माहिती साठविण्यासाठी वापरात असलेल्या कोणत्याही स्मृतीमध्ये व्हिडिओ माहिती ठेवता येऊ लागली. याच्या परिणामस्वरूप पुढे संगणकात वापरली जाणारी सीडी (कॉम्पॅक्ट डिस्क) व्हिडिओसाठी वापरण्यात आली. यात ७४ मिनिटे लांबीची चलच्चित्रे संक्षिप्त स्वरूपात नोंदवून ठेवता येतात. १९९०च्या दशकाच्या अखेरीस डीव्हीडी (डिजिटल व्हिडिओ डिस्क अंकीय व्हिडिओ तबकडी) विकसित करण्यात आली. हिच्यावर व्हिडिओ सीडीहून अधिक स्पष्ट चित्र साठविता येते व एकाच तबकडीत दोन तासांहून अधिक लांबीचे चलच्चित्र कार्यक्रम ठेवता येतात. शिवाय हिच्यावर ध्वनीचे आठ मार्ग आखता येतात. त्यामुळे चित्र व ध्वनी या दोन्हींमध्ये अधिक जिवंतपणा येतो.

प्रकाशीय तबकड्या पॉलिकार्बोनेटाच्या (पॉलिकार्बोनेट हे कार्बॉनिक आम्लाचे बहुवारिक असून ते ऊष्मामृदू कृत्रिम-संश्लेषित-रेझीन आहे.) बनविलेल्या असून त्यावर एक मायक्रोमीटर (१ मायक्रोमिटर म्हणजे मीटरचा एकदशलक्षांश भाग) इतक्या सूक्ष्म खोलीच्या खाचांच्या स्वरूपात माहिती साठविली जाते. ही माहिती सूक्ष्म लेसर किरणांच्या साहाय्याने वाचली जाते. रॉम (रीड ओन्ली मेमरी) प्रकारची तबकडी तयार करताना कारखान्यात तीवर माहिती मुद्रित केली जाते. नंतर ती पुसता येत नाही. वोर्म (राइट वन्स रीड मेनी) या प्रकारची तबकडी कोऱ्या स्वरूपात मिळते. तीवर विशिष्ट मुद्रक वापरून आपण हवी ती माहिती साठवून ठेवतो. मात्र एकदा साठविल्यावर ती पुसता येत नाही. चुंबकीय प्रकाशीय तबकडीवरील माहिती पुसून तीवर पुन्हा नवीन माहिती मुद्रित करता येते.

संगणकाचे सर्व कार्य अंकीय स्वरूपात असल्याने व्हिडिओ माहिती आणि संगणक यांची सांगड जुळली आहे. व्हिडिओ माहितीवर संगणक सर्व प्रकारचे संस्करण करू शकतो. चित्र अधिक सुस्पष्ट करणे, लहान-मोठे करणे, चित्राचा एखादा भाग वेगळा करणे अशी अनेकविध कार्ये संगणकाद्वारे केली जातात. संगणकामध्ये चित्राबरोबरच ध्वनी, आलेख, आकृत्या, मजकूर अशी सर्व माध्यमे एकत्रितपणे वापरता येतात. अशा बहुमाध्यमी प्रणालींमध्ये डीव्हीडी पद्धतीच्या तबकड्यांचा वापर उपयुक्त ठरतो. यामुळेच डीव्हीडी याचे नामकरण अनेक जण डिजिटल व्हर्सटाइल डिस्क (अंकीय सर्वकामी तबकडी) असे करतात. दोन नावांचा गोंधळ टाळण्यासाठी डीव्हीडी हे संक्षिप्त नावच अधिक वापरात आहे.

हातातून सहज नेता येण्याजोगे, विद्युत्-घटमालेवर चालणारे तबकडी वादक (डिस्क प्लेअर) डीव्हीडी, श्राव्य (ऑडिओ) व दृक्(व्हिडिओ) सीडी अशा सर्व प्रकारच्या तबकड्या चालवू शकतात. त्यांना डोळ्यांसमोर बसणारा व्हिडिओदर्शक जोडता येतो. प्रवासातही मोठ्या दूरचित्रवाणी संचावर व्हिडिओ पाहत असल्याचा परिणाम त्यातून साधला जातो.

व्हिडिओ संदेशवहन : व्हिडिओ माहिती संक्षिप्त करून पाठविण्याचे तंत्र विकसित झाल्यानंतर संदेशवहन क्षेत्रामध्ये अंकीय व्हिडिओ प्रणाली वापरात येऊ लागल्या. व्हिडिओ दूरध्वनीमध्ये ध्वनीबरोबर बोलणार्यांमचे चेहेरेही एकमेकांना पाहता येतात. यामध्ये चलच्चित्रे व ध्वनी हे दोन्ही संक्षिप्त स्वरूपात पाठविले जातात. अशा प्रकारच्या संदेशवहनामध्ये दोन्ही बाजूंना संगणक वापरल्यास चित्र व ध्वनी यांखेरीज आलेख, मजकूर अशी माध्यमे वापरून व्हिडिओ परिषद प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स सिस्टिम) तयार होते. यामध्ये बोलणार्यां चे चेहरे व आवाज एकमेकांपर्यंत पोहोचतातच शिवाय काचपट्टिका, रेखाचित्रे अशा माहितीची देवाणघेवाण करून चर्चा करता येते. स्टुडिओ (कलागृह) दर्जाच्या व्हिडिओ परिषदेमध्ये एका वेळी तीन-चार ठिकाणचे लोक भाग घेऊ शकतात. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे, दूरचित्रवाणी संच, प्रक्षेपक अशा सुविधांनी सुसज्ज स्टुडिओ असतात व सर्वांची मिळून दृक् (व्हिडिओ) परिषद भरविता येते. दृक् दूरध्वनी व व्हिडिओ परिषद या प्रणालींसाठी संकलित सेवांचे अंकीय जाल (इंटिग्रेटेड सर्व्हिसेस डिजिटल नेटवर्क आयएसडीएन) हे आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या दूरध्वनी प्रणालींचा वापर केला जातो. याशिवाय थेट कृत्रिम उपग्रहाद्वारे अथवा संगणक जालाद्वारे व्हिडिओ परिषद भरविता येते.

व्हिडिओ खेळ : व्हिडिओ खेळांच्या प्रकारांमध्ये काही बटणे (कळी) व इतर नियंत्रकांच्या साहाय्याने पडद्यावरील दृश्ये नियंत्रित करून अनेक खेळ खेळता येतात. तीन प्रकारचे व्हिडिओ खेळ उपलब्ध आहेत. खास व्हिडिओ खेळ खेळण्यासाठी बनविलेल्या प्रणालींमध्ये घरगुती व व्यावसायिक अशा दोन प्रकारच्या प्रणाली मोडतात. घरगुती व्हिडिओ खेळ उपकरण दूरचित्रवाणी संचाला जोडून खेळ खेळता येतात. निरनिराळ्या खेळांसाठी निरनिराळ्या फिती किंवा तबकड्यांवरून आज्ञावली उपकरणात भरता येते. बटणे, जॉयस्टिक (नियामक कळ) अशा साधनांद्वारे खेळावर नियंत्रण ठेवता येते. व्यावसायिक व्हिडिओ खेळ त्यासाठी असलेल्या खास केंद्रांमध्ये ठेवले जातात. प्रत्येक खेळासाठी खास वेगळी प्रणाली उत्पादित केलेली असते. या खेळांमध्ये खेळाच्या अनुषंगाने विशिष्ट नियंत्रक बनविलेले असतात. उदा. मोटारगाड्यांच्या शर्यतीच्या खेळात दिशानियंत्रक चाक, गतिरोधक, वेगवर्धक हे नियंत्रक असतात. तिसऱ्या प्रकारच्या व्हिडिओ खेळांसाठी विशिष्ट प्रणाली न वापरता ते खेळ वैयक्तिक संगणकावर (पर्सनल कॉम्प्युटर पीसी) खेळले जातात. संगणकावर अनेक खेळांचे सॉफ्टवेअर भरून ठेवता येते. जो खेळ खेळायचा असेल ते सॉफ्टवेअर स्मृतीमध्ये भरून खेळ सुरू करता येतो. खेळाडू संगणकाच्या कळफलकावरून किंवा जॉयस्टिक, माऊस अशा साधनांनी पडद्यावरील चित्रे व त्यांच्या हालचाली नियंत्रित करतो. उदा. एखाद्या खेळात राजपुत्र राक्षसाच्या तावडीतील राजकन्येला सोडवून आणणार असेल, तर राजपुत्राच्या सर्व हालचाली खेळाडू नियंत्रित करू शकतो. युद्ध, मोटरगाड्यांच्या शर्यती, अवकाश उड्डाणे असे अनेक खेळ संगणकावर खेळता येतात. प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर असते.

पहा : दूरचित्रवाणी माहिती संस्करण संगणक.

संदर्भ : 1. Dickson, E. M. Bowers, R. The Video Telephone, 1974.           2. Lsailovic, J. Video Disc Systems, New York, 1978.           3. Mayo, J. L. Optical Discs, 1990.           4. McDaniel, T. W. Handbook of Magneto-optic Data Recording, 1995.           5. Owen, D. Dunton, M. The Complete Handbook of Video, Harmondsworth (Middlesex), 1982.

           6. Sullivon, G. Screen Play, 1983.

           7. Williams, E. W. The CD-ROM and Optical Disk Recording Systems, 1994 

आपटे, आल्हाद गो.