लिस्टर जोसेफ : (बॅरन लिस्टर ऑफ लाइम रेजिस किंवा सर जोसेफ लिस्टर बॅरोनेट). (५एप्रिल १८२७-१० फेब्रुवारी १९१२). ब्रिटिश शस्त्रक्रियाविशारद व वैद्यकीय शास्त्रज्ञ. पूतिरोधक (पू तयार होण्यास रोध करण्याची दक्षता घेणाऱ्या) शस्त्रक्रियाविज्ञानाचे जनक आणि रोगप्रतिबंधक वैद्यकाचे एक आद्य प्रणेते. पूतिरोधकांवर आधारलेली त्यांची पद्धत आता वापरात नसली, तरी शस्त्रक्रियेतील जखमेत सूक्ष्मजंतूंचा कधीही शिरकाव होता कामा नये हे त्यांचे तत्त्व आजही शस्त्रक्रियाविज्ञानात मूलभूत महत्त्वाचे समजले जाते.

लिस्टर यांचा जन्म एसेक्समाधील अप्टन येथे झाला. त्यांचे वडील⇨जोसेफ जॅक्सन लिस्टर यांनी त्यांना निसर्गेतिहास व सूक्ष्मदर्शकाचा उपयोग यांसंबंधी प्रथम मार्गदर्शन केले. क्केकर पंथीय शाळांत शिक्षण घेतल्यावर त्यांनी लंडल येथील युनिव्हर्सिटी कॉलेजात कला शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळविली. नंतर १८४८ मध्ये वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ करून १८५२ मध्ये एम्.बी. ही पदवी संपादन केली. त्या काळचे अग्रेसर स्कॉटिश शस्त्रक्रियाविशारद जेम्स साइम यांचे सहाय्यक म्हणून एडिंबरो येथील रॉयल इन्फर्मरीमध्ये १८५४-६० या काळात काम केल्यावर ग्लासगो विद्यापीठात त्यांची शस्त्रक्रियाविज्ञानाच्या रेजियस प्राध्यापकपदावर नेमणूक झाली. त्यानंतर १८६९ मध्ये ते एडिंबरोला नैदानिक शस्त्रक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून परत गेले परंतु पुढे १८७७ मध्ये लंडनच्या किंग्ज कॉलेजात शस्त्रक्रियाविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व १८९२ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी तेथेच काम केले.

रॉबर्ट लिस्टन यांनी ईथराचा शुद्धिहारक म्हणून १८४६ मध्ये इंग्लंडमध्ये प्रथमच यशस्वीपणे उपयोग केला त्या वेळी लिस्टर तेथे उपस्थित होते. शुद्धिहारकाच्या उपयोगामुळे जरी रुग्णाला व शस्त्रक्रियाविशरदाला शस्त्रक्रिया करणे सुसह्य झाले, तरी वैद्यकीय व्यवसायात फारसी प्रगती झाली नाही. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर अपरिहार्यपणे उद्भवणाऱ्या  पूयविषाक्ततेमुळे (पू निर्माण करणारे सूक्ष्मजीव व त्यांच्यापासून बनविलेली विषे शरीरात पसरल्याने उद्भवणाऱ्या तीव्र विषारी ज्वरसूचक अवस्थेमुळे) होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप असल्याने शुद्धिहरणाची पूर्ण गुणकारिता विकसित झाली नाही. परिणामी शुद्धिहरणाची चांगली सोय असलेल्या प्रमुख रुगणालयांतही प्रत्यक्षात फारच थोड्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्यात येत. ग्लासगो येथील रॉयल इन्फर्मरीमध्ये लिस्टर नव्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख म्हणून काम करीत असताना नव्या इमारतीत शस्त्रक्रियेनंतरच्या पूयविषाक्ततेमुळे होणाऱ्याल मृत्यूंचे प्रमाण कमी होईल अशी तेथील व्यवस्थापकांची अपेक्षा होती. तथापि १८६१-६५ या काळात तेथील पुरूषांच्या अपघात कक्षात अवयवच्छेदनाच्या (शरीराचा एखादा अवयव उदा., पाय कापून काढण्याच्या) रुग्णांपैकी ४५ ते ५०%रूग्ण शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या पूयविषाक्ततेमुळे मृत्यू पावले, असे लिस्टर यांना आढळून आले.

लिस्टर यांचे प्रारभी प्रसिद्ध झालेले संशोधन बहुतांशी रक्तक्लथनाची (रक्त साखळण्याची) यंत्रणा व शोथाच्या (दाहयुक्त सुजेच्या) पहिल्या टप्यांतील रक्तवाहिन्यांचे कार्य यांविषयी होते. या दोन्ही विषयांतील संशोधन सूक्ष्मदर्शकावर अवलंबून होते व जखमा भरून येण्याशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता. लिस्टर यांनी तोपावेतो जखमा स्वच्छपणे भरून येण्यास मदत होण्यासाठी निरनिराळ्या पद्धती वापरून पाहिल्या होत्या व पूयविषाक्ततेच्या प्रादुर्भावासंबधी सिद्धांतही योजले होते. पूयविषाक्तता दूषित रोगट हवेमुळे प्रत्यक्ष संसर्ग होऊन उद्‌भवते ही त्या काळी लोकप्रिय असलेली संकल्पना दूर सारून परागांसारख्या धुळीमुळे ती उद्भवते असे त्यांनी गृहीत धरले. १८६५ मध्ये लूई पाश्चर यांच्या किण्वन (आंबण्याची क्रिया) व रोग यांना हवेतील सूक्ष्मजीव कारणीभूत असतात या सिद्धांताशी लिस्टर यांचा परिचय झाला. अशा सूक्ष्मजीवांचा जखमेत शिरकाव होण्यापूर्वीच नाश करण्याच्या पद्धतींविषयी संशोधन करण्याच्या द्दष्टीने त्यांनी प्रयोग करण्यास सुरुवात केली. या बाबतीत कार्लाइल येथे सांडपाण्यावर करण्यात आलेल्या फिनॉलांच्या (कार्बॉलिक अम्लाच्या) संस्करणामुळे झालेल्या परिणामाच्या वृत्ताने लिस्टा प्रभावित झाले.मार्च १८६५ मध्ये त्यांनी विरल न केलेल्या फिनॉलाच्या विद्रावाचा पूतिरोधक म्हणून उपयोग केला. पण तो अयश्स्वी ठरला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी पायाच्या सव्रण (जखमेसह झालेल्या) अस्थिभंगावर उपचार करण्यासाठी फिनॉलाच्या विद्रावात बुडविलेल्या लोकरीवजा कापडाच्या पट्टीचा वापर केला व त्यामुळे जखम भरून आली. तथापि विरल न केलेला फिनॉलाचा विद्राव त्याच्या दाहक गुणधर्मामुळे सर्वसाधारण शस्त्रक्रियेत वापरण्यास सोयीचा नव्हता. यामुळे त्याचे कार्य सौम्य करण्यासाठी त्यात कोणता पदार्थ मिसळावयास पाहिजे याचा लिस्टर यांनी शोध धेतला. स्फटिकीकृत फिनॉल व शेलॅक यांचे मिश्रण समाधानकारक असल्याचे नंतर त्यांना दिसून आले. हे मिश्रण सुती कापडावर पसरून त्यावर बेंझिनातील गटापर्चाचा विद्राव लावल्यास ते गटापर्चातून जखमेपर्यंत जाते. मात्र ते पुवाचा निचरा होण्यास प्रतिबंध होईल इतक्या घट्टपणे त्वचेला चिकटत नाही. ऑगस्ट १८६५ ते एप्रिल १८६७ या कालावधीत लिस्टर यांनी याच पद्धतीने उपचार केलेल्या अकरा रुग्णांपैकी नऊ रुग्ण बरे झाले. यामुळे उत्तेजन मिळून त्यांनी आपल्या नेहमीच्या शस्त्रक्रिया प्रक्रियेत फिनॉलाच्या पट्ट्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. १८६७ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या दोन छोट्या पण क्रांतीकारक ठरलेल्या निबंधांद्धारे पूतिरोधक शस्त्रक्रियेची तत्त्वे मांडली. १८७० पावेतो अवयवच्छेदन शस्त्रक्रियांमधील मृत्यूचे प्रमाण ४०%  वरून १५%वर आल्याचा त्यांनी दावा केला. पुढे एडिंबरो येथील आपल्या वास्तव्यात केलेल्या शस्त्रक्रियांच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर त्यांनी १८७१-७७ या काळात केलेल्या ७२५ मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये मृत्यूचे प्रमाण केवळ ५.१ होते, असे निवेदन केले.

लिस्टर यांनी १८६९ मध्ये शस्त्रक्रियेतील जखमा शिवण्यासाठी परंपरेने वापरण्यात येणाऱ्या व जंतुसंसर्गाचा एक प्रमुख उगम असलेल्या रेशमी धाग्याऐवजी तातीच्या (कॅटगटाच्या) धाग्याचा उपयोग करून आणखी एक नवीन पायंडा पाडला. या धाग्यांचे नंतर शरीरात अभिशोषण होते व ते फिनॉलात भिजवून निर्जंतुक करता येतात असेही त्यांनी दाखविले. बरेच प्रयोग केल्यावर शेवटी त्यांनी १८८० मध्ये सल्फोक्रोमिक तातीचा शस्त्रक्रियेत उपयोग करण्यास सुरुवात केली. शस्त्रक्रियागृहात फिनॉल विद्रावाचा फवारा [⟶ पूतिरोधके] उडवून तेथील वातावरण पूतिरोधक ठेवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यामुळे तेथे काम करणे फार अप्रिय होऊ लागल्याने नंतर ही पद्धत सोडून देण्यात आली. शस्त्रक्रिया व्यवसायातून १८९३ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी विविध पारायुक्त द्रव्यांवर निर्जंतुकीकारक या दृष्टीने प्रयोग केले. त्यांनी काही शस्त्रक्रियांमध्ये (उदा., मूत्राशय व मूत्रमार्ग यांच्या शस्त्रक्रियांमध्ये) सुधारणा केल्या व काही नवीन उपकरणे (उदा., मूत्रामार्गाच्या अष्ठीला भागातील खडे काढण्याचा चिमटा) प्रचारात आणली.

किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये १८७७ साली गुढघ्याच्या वाटीचा सव्रण अस्थिभंग तारेने जोडण्याची शस्त्रक्रिया पूतिरोधक परिस्थितीत यशस्वीपणे करून दाखविल्यावर लिस्टर यांच्या पद्धतीला फारसा विरोध न राहता तिचा विलक्षण वेगाने स्वीकार झाला व १८८० पावेतो बहुतेक सर्व ठिकाणी ती शस्त्रक्रियेची प्रमाणभूत कार्यपद्धती म्हणून वापरात आली. आपल्या क्रियाशील आयुष्यातच आपल्या तत्वांचा जवळजवळ सार्वत्रिक स्वीकार झाल्याचे पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना अनेक ब्रिटिश व परदेशी विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, विविध देशातील सु. ६० वैज्ञानिक व वैद्यकिय संस्थांचे सदस्यत्व तसेच कॉप्ली व इतर अनेक पदके असे बहुमान आयुष्यभरात मिळाले. ते रॉयल सोसायटीचे (१८९५-१९००) व ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर ॲडव्हॉन्समेंट ऑफ सायन्सचे (१८९६) अध्यक्ष होते. त्यांना १८८३ मध्ये बॅरोनेट व १८९७ मध्ये बॅरन लिस्टर ऑफ लाईम रेजिस हे किताब देण्यात आले. ब्रिटनच्या लॉर्ड्स सभेचे सदस्य होण्याचा बहुमान मिळालेले ते पहिलेच वैद्य होते. १८९१ मध्ये लंडन येथे स्थापन झालेल्या ब्रिटिश इस्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या पाश्चार इन्स्टिट्यूटच्या धर्तीवरील संस्थेचे ते एक संस्थापक होते. या संस्थेला पुढे लिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असे नाव देण्यात आले. लिस्टर यांनी पुस्तके लिहिली नाहीत, परंतु व्यावसायिक नियतकालिकांत त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले व ते १९०९ मध्ये द कलेक्टेड पेपर्स ऑफ जोसेक बॅरन लिस्टर (२ खंड) या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. मृत्यूपूर्वी काही वर्षे ते पूर्णत: अंध व बहिरे झाले होते. ते केंट मधील बॉलमेर येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं. भदे, व. ग.