सौंदर्यशास्त्र : सौंदर्याचे व कलेचे तत्त्वज्ञान म्हणजे सौंदर्यशास्त्र.यात सौंदर्याविषयी व कलेविषयी सिद्धांतन केले जाते. कला व सौंदर्य यांचे स्वरूप काय, त्यांच्या आवश्यक अटी कोणत्या, त्यांचे काही नियम असतात का, विविध कलांमधील परस्परसंबंध कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांतून कलांच्या वर्गीकरणाची व्यवस्था लावता येते का, यांसारख्या प्रश्नांचा विचार करून त्यांच्याविषयी सर्वसामान्य स्वरूपाचा सिद्धांत मांडणे, हे सौंदर्यशास्त्राचे मुख्य कार्य मानले जाते. सौंदर्यशास्त्राच्या एकूण व्याप्तीचा विचार केल्यास येथे दोन पातळ्यांवर विश्लेषण केलेले असते : एक म्हणजे संकल्पनांच्या व विधानांच्या तार्किक वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणारी आकारिक पातळी, तर दुसरी म्हणजे संकल्पनांचे आशयविषयक विश्लेषण करणारी पातळी. याचा अधिक विचार पुढे येईलच.

अठराव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ ⇨ अलेक्सांडर बाउमगार्टेन (१७१४-६२) याने ‘ईस्थेटिक्स’ ही संज्ञा वरील अर्थाने अठराव्या शतकात प्रथम वापरली. ‘aisthesis’ (संवेदन) या मूळ ग्रीक शब्दावरून ‘ईस्थेटिक्स’ हा शब्द आला. ‘ईस्थेटिक्स’ हा शब्द बाउमगार्टेनने तत्त्वज्ञानात्मक परिभाषेत समाविष्ट केला. ‘ईस्थेटिक्स’ याचा शब्दशः अर्थ ‘संवेदनशास्त्र’ असा आहे. बाउमगार्टेनने सौंदर्यशास्त्राचा अंतर्भाव संवेदन-शास्त्रात केला. ईस्थेटिक्स या संज्ञेला पर्याय म्हणून आधुनिक मराठीमध्ये सौंदर्यशास्त्र ही संज्ञा सर्वसामान्य वापरात आहे. काही अभ्यासकांनी सौस्थ्यशास्त्र (पु. शि. रेगे), कलास्वरूपशास्त्र (दि. के. बेडेकर) आणि आभिरौचिकी (दि. य. देशपांडे) यांसारखे पर्याय सुचविले असले, तरी ते फारसे प्रचलित नाहीत.

ईस्थेटिक्स किंवा सौंदर्यशास्त्र या संज्ञा आधुनिक असल्या, तरी सौंदर्य व कला यांच्या स्वरूपाचा वेध घेणारी आणि त्यांच्याविषयी सिद्धांतन करणारी परंपरा प्राचीन काळातही होती. संस्कृतमध्ये सौंदर्यशास्त्रीय विचाराची परंपरा निदान भरताच्या ⇨ नाट्यशास्त्राइतकी प्राचीन आहे (इ. स. पू. सु. २००-इ. स. २००) आणि संस्कृतमध्ये ज्याला काव्यशास्त्र वा ⇨ साहित्यशास्त्र म्हटले जाते, ती सौंदर्यशास्त्रीय विचाराचीच एक परंपरा आहे. पाश्चात्त्य परंपरेतही कलेचा सैद्धांतिक पातळीवरील विचार ⇨ प्लेटो (४२८-३४८ इ. स. पू. सु.) व ⇨ ॲरिस्टॉटल (३८४-३२२ इ. स. पू.) यांच्यापासून चालत आलेला आहे.

आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानामध्ये सौंदर्यशास्त्र हा विषय तत्त्वज्ञानाची एक उपशाखा म्हणून मानला जातो. ⇨ तर्कशास्त्र, ⇨ ज्ञानमीमांसा, अतिभौतिकी किंवा ⇨ तत्त्वमीमांसा (मेटॅफिजिक्स) यांच्याबरोबरच मूल्यविचार ही तत्त्वज्ञानाची शाखा मानली, तर ⇨ नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या तिच्या उपशाखा मानाव्या लागतील. सौंदर्यशास्त्रामध्ये सौंदर्य या मूल्यवाचक संकल्पनेचा तात्त्विक विचार होतो. सौंदर्य आणि त्याच्याशी संबंधित संकल्पनांचे व विधानांचे तार्किक विश्लेषण करणे व त्यांच्याविषयीच्या सिद्धांतांची सुसंगत मांडणी करणे, हे सौंदर्यशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट म्हणता येईल.

सौंदर्यशास्त्रासंबंधीच्या दोन गैरसमजुतींची नोंद येथे घ्यायला हवी. एक म्हणजे, सौंदर्य व शास्त्र या संकल्पना परस्परविरोधी आहेत, असा एक समज बराच रूढ आहे. यामागची तात्त्विक भूमिका शोधायची तर ती पुढीलप्रमाणे मांडता येईल : सौंदर्य ही एक साक्षात अनुभूती असते व त्यामुळे त्याचा केवळ आस्वादच शक्य असतो उलटपक्षी शास्त्र हे तर्क व विश्लेषण यांवर आधारलेले असते व त्यामुळे सौंदर्याचे शास्त्र असू शकत नाही. कलाव्यवहाराच्या बाबतीत ही भूमिका स्वीकारायची म्हटली, तर कलेचे अध्ययन-अध्यापन व एकूणच समीक्षाव्यवहार अशक्य कोटीतला ठरतो कारण अध्ययन-अध्यापन व समीक्षा यांतील कोणतीही गोष्ट शक्य व्हायची असेल, तर संकल्पनांची आवश्यकता आहे आणि संकल्पना आल्या की नियम, व्यवस्था आणि शास्त्र या गोष्टीही अपरिहार्यपणे येतात. तेव्हा कलांचे अध्ययन-अध्यापन आणि समीक्षा या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे मान्य केले की, सौंदर्यशास्त्र भक्कम पायावर उभे राहू शकते. खरे म्हणजे त्याचा पायाच संकल्पनायुक्त कलानुभवात असतो मात्र कलाविषयक संकल्पनांची तत्त्वज्ञानात्मक मांडणी करणारे शास्त्र हे विज्ञानाप्रमाणे केवळ वर्णनात्मक वा स्पष्टीकरणात्मक स्वरूपाचे नसून त्याला मूल्यनप्रक्रियेचा, म्हणजेच मूल्यसंकल्पनांचा व निकषांचा वेध घ्यायचा असतो, हे येथे ध्यानात ठेवायला हवे.

पहिल्या गैरसमजुतीशी संबंधित असणारी दुसरी गैरसमजूत म्हणजे कलासमीक्षा व सौंदर्यशास्त्र यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असे मानणे ही होय. या दोहोंचा संबंध नाकारणाऱ्या भूमिकेमागील मुख्य धारणा अनन्यत्वाची आहे मग हे अनन्यत्व कलाकृतीचे असेल, किंवा कलानुभवाचे असेल. कलेच्या संदर्भात केवळ भावनात्मक प्रतिसाद शक्य असतात आणि प्रत्येक भावनात्मक प्रतिसाद हा अनन्य असतो, तेथे सामान्यीकरण वा तार्किक विश्लेषण शक्य नसते, ही आस्वादक समीक्षेमागची धारणा आहे व ती सौंदर्यशास्त्रालाच नव्हे तर समीक्षेलाही नाकारणारी आहे. यापेक्षा काहीशी वेगळी भूमिका म्हणजे कलासमीक्षा ही कलाकृतीच्या अनन्यत्वाचा वेध घेत असते व त्यामुळे सर्वसामान्य स्वरूपाचे सिद्धांत मांडणाऱ्या सौंदर्यशास्त्राला तेथे स्थान नसते, ही आहे. या टोकाच्या भूमिकांमध्ये खरे म्हणजे कोणत्याच संकल्पनांना स्थान राहत नाही. कारण संकल्पना या सामान्य स्वरूपाच्याच असतात. संकल्पना नाकारून कोणताही मानवी अनुभव वा व्यवहार शक्य होत नाही. कलासमीक्षेत कलानुभवामध्ये अनुस्यूत असणाऱ्या संकल्पनांची व तत्त्वांची संगती लावण्याचा प्रयत्न असतो तर सौंदर्यशास्त्रामध्ये समीक्षाव्यवहारातील संकल्पना, तत्त्वे व निकष यांची–म्हणजेच पर्यायाने प्रत्यक्ष कलानुभवातील संकल्पना, तत्त्वे व निकष यांची–संगती लावण्याचा प्रयत्न असतो. कलासमीक्षेत कलाकृतींचे मूल्यमापन ज्या संकल्पनांच्या व तत्त्वांच्या साहाय्याने होत असते, त्यांचे काटेकोर विश्लेषण सौंदर्यशास्त्र करीत असल्यामुळे ते समीक्षेला व पर्यायाने सुजाण कलानुभवाला उपकारकच ठरते.

सौंदर्यशास्त्रीय सिद्धांतनाचे मुख्यत्वे तीन प्रकार दिसून येतात. आपल्या व्यापक अशा अतिभौतिकीय सिद्धांताचा एक भाग म्हणून सौंदर्यशास्त्रीय विचार मांडणे, हा त्यातील एक प्रकार होय. हा प्रकार ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४) व विश्वचैतन्यवादी वा केवल ⇨ चिद्वादी (ॲब्सोल्यूट आयडिॲलिस्ट) तत्त्वज्ञांच्या लेखनात आढळतो. कांटची सौंदर्यमीमांसा त्याच्या क्रिटिक ऑफ जज्‌मेन्ट (१७९०) या ग्रंथात समाविष्ट आहे. कांटच्या एकूण तत्त्वज्ञानाच्या चौकटीमध्ये ज्ञानमीमांसा (कार्यकारणादी संकल्पनांनी सिद्ध झालेल्या प्राकृतिक सृष्टीच्या ज्ञानाचे विश्लेषण) आणि नीतिमीमांसा (मानवी संकल्पशक्तीच्या स्वातंत्र्यांवर आधारलेल्या नीतिविश्वाचे विश्लेषण) यांतला दुवा म्हणून सौंदर्यशास्त्रीय सिद्धांत वावरतो. विश्वचैतन्यवादी चौकटीमध्ये सर्व विश्व हे एकाच चैतन्याचा आविष्कार मानले जाते आणि त्याचा आविष्कार वेगवेगळ्या माध्यमांत होत असतो इंद्रियगोचर माध्यमातील विश्वचैतन्याचा आविष्कार म्हणजे कला होय. या प्रकारच्या सिद्धांतनामध्ये सर्वंकष असा व्यूह रचताना कलेच्या खास वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

सौंदर्यशास्त्रीय सिद्धांतनाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष कलाव्यवहारा-तून हाती लागणाऱ्या तत्त्वांचा विचार करून त्यातून कलांचे एकमेव सत्त्व शोधू पाहणारे सिद्धांत होय. उदा., ⇨ क्लाइव्ह बेल (१८८१-१९६४) याने मुख्यत्वे दृश्यकलांमधील रचनातत्त्वांच्या आधारे सौंदर्यभावनेचा वेध घेऊन ‘अर्थपूर्ण रूपबंध’ (सिग्निफिकंट फॉर्म) हे सर्व कलांचे सत्त्व सांगू पाहणारे तत्त्व मांडले. सौंदर्यशास्त्रात बेल याने रूपवादी किंवा आकारवादी (फॉर्मलिस्ट) उपपत्तीचा पुरस्कार केला. कलाकृतीचे सौंदर्य केवळ तिच्या आकारात सामावलेले असते किंवा केवळ तिच्या आकारावर अधिष्ठित झालेले असते. तिच्या सौंदर्याचा तिच्या आशयाशी काही संबंध नसतो. ज्या प्रकारच्या आकारात कलाकृतीचे सौंदर्य सामावलेले असते (किंवा ज्या प्रकारच्या आकारावर कलाकृतीचे सौंदर्य अधिष्ठित असते) त्याला बेलने ‘अर्थपूर्ण आकार’ वा ‘अर्थपूर्ण रूपबंध’ म्हटले आहे. ज्या आकारामुळे आपली सौंदर्यभावना जागृत होते, तो आकार म्हणजे अर्थपूर्ण आकार होय. सौंदर्यानुभव हा लौकिक-व्यावहारिक अनुभवापेक्षा वेगळा, अलग व स्वायत्त असा अनुभवाचा प्रांत आहे अशी बेलची भूमिका आहे. हॅरल्ड ऑझ्बर्न याने संगीतादी साहित्येतर कलांचा आधार घेऊन ‘कलाकृती म्हणजे संवेदनांच्या (सेंद्रिय) रचनेची दीर्घकाल टिकणारी शक्यता’ अशी कलेचे सत्त्व सांगू पाहणारी व्याख्या केली. त्याच्या थिअरी ऑफ ब्यूटी (१९५२) व ईस्थेटिक्स अँड क्रिटिसिझम (१९५५) या पुस्तकांत त्याचे सौंदर्यशास्त्रीय विवेचन आहे.


 आधुनिक काळात अधिक मान्यता पावलेला तिसरा प्रकार म्हणजे कलाव्यवहारातील संकल्पनांचे विश्लेषण व व्यवस्थितीकरण करणारी मांडणी होय. यात कलास्वरूपविषयक संकल्पना, तत्त्वे इत्यादींचे सौंदर्यशास्त्रामधील विश्लेषण हे दोन पातळ्यांवर होत असते. एक, या संकल्पनांची तार्किक वैशिष्ट्ये आणि दुसरी, त्यांचा आशय. ‘सौंदर्य’ ही संकल्पना व्याख्येय आहे का, ‘सुंदर’ या संज्ञेने एखादा गुणधर्म निर्देशित केला जातो का, हा गुणधर्म कोणत्या जातीचा (प्राकृतिक की अप्राकृतिक) असतो, या स्वरूपाचे प्रश्न हे तार्किक प्रश्न आहेत, आणि या प्रश्नांच्या चर्चेच्या पातळीला ‘अतिसमीक्षे ‘ची (मेटॅ-क्रिटिसिझम) पातळी असे म्हणतात. येथे समीक्षा या संकल्पनेमध्ये कलाकृतीची प्रत्यक्ष समीक्षा आणि सैद्धांतिक समीक्षा या दोहोंचा समावेश होतो. दुसरी पातळी म्हणजे सौंदर्याचे निकष कोणते, कोणत्या विशिष्ट गुणधर्मांमुळे वस्तू सुंदर ठरतात, या प्रश्नांच्या चर्चेची पातळी. ही सौंदर्यविषयक संकल्पनांच्या आशयाची पातळी होय.

सौंदर्यशास्त्रीय संकल्पनांच्या आशयाचा विचार करताना कलानिर्मिती, कलाकृती आणि कलानुभव या तीन घटकांचा विचार सौंदर्यशास्त्राला करावा लागतो. निर्मितीच्या प्रक्रियेचे विश्लेषण करताना कलेच्या उत्पत्तीविषयीचे सिद्धांत सौंदर्यशास्त्राला तपासावे लागतात. यामध्ये कलावंताच्या मानसिक प्रक्रिया, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती यांसारख्या मनोव्यापारात्मक संकल्प-नांचा, त्याचप्रमाणे कलानिर्मितीमागच्या सामाजिक प्रेरणा, कलावंताने अनुभवलेली सामाजिक परिस्थिती यांचा अंतर्भाव होतो. कलाकृतीच्या स्वरूपाचा विचार करताना कलेच्या माध्यमाविषयीचे व घाटाविषयीचे वा रूपाविषयीचे विविध सिद्धांत (उदा., सेंद्रिय एकात्मता, भावलेली संगती, लयतत्त्वे इ.), कलाप्रकारांची संकल्पना, कलांचे परस्परसंबंध, कलाकृतीचे सत्ताशास्त्रीय स्थान यांसारख्या बाबींचा तसेच कलानुभवाविषयी विचार करताना कलात्मक दृष्टिकोन, सौंदर्यभावना, सौंदर्यानंद आदींचा विचार होतो.

कलात्मक मूल्य वा सौंदर्यमूल्य आणि ज्ञान, नीती व उपयुक्तता ही मानवी जीवनातील इतर मूल्ये यांचे परस्परसंबंध काय, हाही सौंदर्यशास्त्रामधील एक केंद्रवर्ती प्रश्न आहे. यासंबंधीच्या भूमिकांची विभागणी स्वायत्ततावादी किंवा केवल-कलावादी भूमिका एका बाजूला आणि लौकिकतावादी भूमिका दुसऱ्या बाजूला अशी झालेली दिसते. ज्ञानात्मक, नैतिक व उपयुक्ततावादी मूल्यांवर कलामूल्य अवलंबून नसते तर ते स्वतंत्र, स्वयंभू, स्वायत्त असते अशी स्वायत्ततावादी भूमिका आहे. अभिजात संगीता-सारख्या ‘जीवनार्थविरहित’ कलाप्रकारांचा आधार या सिद्धांतामध्ये सामान्यतः घेतला जातो आणि कलेच्या ‘विशुद्धते ‘च्या तत्त्वावर आधारून कलांची एक श्रेणिव्यवस्थाही मांडली जाते. उदा., ⇨ वॉल्टर पेटर (१८३९-९४) आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या भूमिका. वॉल्टर पेटरची ‘कलेसाठी कला’ या तत्त्वाचे समर्थन करणारी कलावादी भूमिका त्याच्या स्टडीज इन द हिस्टरी ऑफ रेनेसान्स (१८७३) या ग्रंथात व्यक्त झाली आहे. सौंदर्याची अमूर्त, सर्वमान्य व्याख्या देणे नव्हे तर त्याच्या विशिष्ट, मूर्त स्वरूपाची समग्र जाणीव व्यक्त करणे, हे सौंदर्यशास्त्राचे कार्य होय. हे त्याच्या सौंदर्यवादी भूमिकेचे सार होय. बा. सी. मर्ढेकरांनीही कलेची स्वायत्त मूल्ये प्रमाण मानून आपली सौंदर्यशास्त्रीय भूमिका मांडली आहे. याउलट सौंदर्यमूल्य हे कलामूल्यांबरोबरीनेच ज्ञानात्मक, नैतिक व उपयुक्ततावादी मूल्यांनीही निश्चित होते, अशी लौकिकतावादी भूमिका आहे.

आधुनिक पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्रीय विचारांत मोलाची भर घालणारे काही प्रमुख तत्त्वज्ञ व कलासमीक्षक पुढीलप्रमाणे होत : जर्मन तत्त्वज्ञ ⇨ जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल (१७७०-१८३१) केवल चिद्वादी ब्रिटिश तत्त्ववेत्ता ⇨ बर्नार्ड बोझांकेट (१८४८-१९२३) ब्रिटिश कलासमीक्षक ⇨ रॉजर फ्राय (१८६६-१९३४) अमेरिकन सौंदर्यशास्त्रज्ञ ⇨ सुसान लँगर (१८९५-१९८५) इत्यादी.

हेगेलने केलेली सौंदर्याची व्याख्या अशी : सौंदर्य म्हणजे नियमिततेचा, चैतन्याचा इंद्रियगोचर आविष्कार. संवेदनांच्या विश्वात दिसणारे चैतन्याचे रूप म्हणजे सौंदर्य, हा हेगेलचा सिद्धांत बोझांकेटला मान्य आहे पण हेगेलने केलेला निसर्गसौंदर्याचा अधिक्षेप त्याला मान्य नाही. कारण परमतत्त्वाचा आविष्कार जसा कलेत होतो, तसाच तो निसर्गसौंदर्यातही होतो. त्यामुळे हेगेलचे कलास्वरूपशास्त्र किंवा कलामीमांसा (फिलॉसॉफी ऑफ आर्ट) बोझांकेटच्या लेखनात सौंदर्यशास्त्र बनते. त्याने हेगेलप्रणीत सौंदर्यसिद्धांत तर मांडलाच शिवाय कांटने स्वायत्त सौंदर्य (फ्री ब्यूटी) व परायत्त सौंदर्य (डिपेन्डंट ब्यूटी) हे जे सौंदर्याचे दोन प्रकार मानले, त्यांनाही आपल्या सौंदर्यसिद्धांतात सामावून घेतले. हे सौंदर्याचे दोन प्रकार म्हणजे एकाच तत्त्वाचे दोन आविष्कार आहेत, असे बोझांकेट म्हणतो. ज्याला कांट स्वायत्त सौंदर्य म्हणतो, त्याला बोझांकेटने केवल-चैतन्याविष्कार किंवा केवल-आत्माविष्कार (ॲब्स्ट्रॅक्ट किंवा अ प्रॉयरी एक्स्प्रेशन) असे नाव दिले आहे. बोझांकेटची द हिस्टरी ऑफ ईस्थेटिक (१८९२ पुनर्मुद्रण १९५६) व थ्री लेक्चर्स ऑन ईस्थेटिक (१९१५) ही सौंदर्यशास्त्रावरची पुस्तके महत्त्वाची आहेत. कलावंताला वास्तवाचे केवळ इंद्रियगोचर रूप शोधावयाचे असते. सुंदर गोष्ट इंद्रियगोचर किंवा मनश्चक्षूला दिसणारी अशी असायला हवी, ही सौंदर्यानुभवाची अट आहे. या इंद्रियगोचर रूपाला सौंदर्यानुभवात फार महत्त्व असते. याला बोझांकेट ‘द फंडामेंटल डॉक्ट्रिन ऑफ ईस्थेटिक सेम्बलन्स’ असे म्हणतो.

रॉजर फ्रायने आपल्या कलासमीक्षेला सौंदर्यवादी वृत्तीची जोड दिली. कलेतील आकारिक घटकांच्या स्वायत्त मूल्यांवर भर देणारी सौंदर्यवादी भूमिका त्याने मांडली. चित्रातील रंग व अमूर्त आकारांच्या परस्परसंबंधांतून सौंदर्यात्मक प्रतिसाद उत्पन्न होतात चित्राचा वर्ण्य विषय वा त्यातून प्रकट होणारा सांस्कृतिक आशय हा दुय्यम स्वरूपाचाच असतो, हे त्याच्या सौंदर्यमीमांसेचे मुख्य सूत्र होते. त्याची रूपवादी भूमिका क्लाइव्ह बेलच्या अर्थपूर्ण रूपबंध या उपपत्तीशी मिळतीजुळती आहे.

आधुनिक काळातील सौंदर्यशास्त्रज्ञ सुसान लँगर हिने फीलिंग अँड फॉर्म (१९५३) या आपल्या पुस्तकात ‘कला ही भावनेच्या घडणीचे प्रतीक असते’, हा सिद्धांत मांडला. त्याचा उगम कांटच्या, ‘सौंदर्य हे नैतिकतेचे प्रतीक असते, कारण या दोहोंतील घडणीची तत्त्वे समान असतात’, या विचारात आढळतो. भावनेला (फीलिंग) जी अंतर्गत घडण (फॉर्म) असते, ती कलाव्यापारामुळे आपल्याला कळते, असा लँगरचा दावा आहे. कलाकृतीचे कार्य भावनेच्या घडणीचे ज्ञान देणे हे आहे. हे ज्ञान मिळाले म्हणजे एका वेगळ्याच भावनेचा अनुभव येतो. या ज्ञानमिश्रित भावनेला ‘सौंदर्यभावना’, ‘सौंदर्यानंद’ अशी नावे दिली जातात. लँगरच्या कलासौंदर्यविषयक विवेचनात प्रतीक (सिम्बॉल) या संकल्पनेलाही विशेष महत्त्व आहे. लँगरच्या मते आपल्याला कोरा अनुभव कधी येत नाही. जो अनुभव येतो तोच मुळी प्रतीकांनी संस्कारित होऊन येतो. कला हा प्रतीकांचा आविष्कार करण्याचा मानवाचा एक मार्ग आहे. लँगरच्या मते, कलाकृती हे उपस्थापक (प्रेझेंटेशनल) प्रतीक असून ते विशिष्ट भावना व्यक्त करते. एक विशिष्ट भावना हाच त्या प्रतीकाचा अर्थ. या भावनेला विशिष्ट आकार असतो व तो तिच्या स्वतःत अनुस्यूत असतो, तो तिचा आंतरिक विशिष्ट आकार असतो. या कलास्वरूपविषयक विवेचनात लँगरच्या सौंदर्यसिद्धांताचे मर्म दडले आहे.

गेल्या सु. पंचवीस वर्षांमध्ये उत्तर-संरचनावादी भूमिकांमधून एक प्रकारची तात्त्विक गुंतागुंत निर्माण झालेली आहे, असे म्हणावे लागेल. पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये एकसत्त्वतर्काभासाची चर्चा झालेली असली आणि बहुनिकषतावादी भूमिका मांडली गेलेली असली, तरी विविध विद्याशाखांच्या मूलभूत संकल्पनांविषयी आणि सिद्धांतनप्रक्रियेविषयी साधारणपणे एकमत होते. परंतु चिन्हव्यवस्था या मूलतः कमालीच्या अस्थिर असतात असे मानून, तसेच एकसंधता, सलगता, सुसंगतता यांचा संबंध बौद्धिक धुरीणत्वाशी (हेजिमनी) जोडून उत्तर-संरचनावादाने या कल्पनांना विरोध केलेला आहे. मानव्यविद्यांच्या क्षेत्रांमध्ये कोणतीही अभ्यासशाखा ही सिद्धांतनाच्या दृष्टीने एकसंध राहू शकत नाही, हे उत्तर-संरचनावादाचे एक प्रमुख सूत्र आहे. त्यामुळे तार्किक विश्लेषण, संकल्पनांची व सिद्धांतांची सुसंगत मांडणी, या सर्वच तात्त्विक प्रक्रियांविषयी संभ्रमात टाकणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सौंदर्यशास्त्राच्या बाबतीत हेसुद्धा एक सुसंगत असे शास्त्र असू शकणार नाही, अशी भूमिका उत्तरसंरचनावादामधून सूचित होते. परंतु उत्तर-संरचनावादी भूमिका हीच मुळात आपल्याला कशी आकलन होऊ शकते, असा प्रश्न येथे उपस्थित होतो आणि त्याला समाधानकारक उत्तर या भूमिकेमध्ये आढळत नाही.


 मराठीतील सौंदर्यशास्त्रीय विचार : सौंदर्यशास्त्र या विषयासंबंधी मराठीत कुतूहल निर्माण करण्याचे आणि एका महत्त्वाच्या स्वायत्ततावादी रचनातत्त्वाची मांडणी करण्याचे श्रेय ⇨ बा. सी. मर्ढेकर (१९०९-५६) यांना द्यायला हवे. सौंदर्यविषयक विविध लेखांमधून त्यांनी कलेचे माध्यम, सौंदर्यभावना, सौंदर्यविधान, कलेची फलश्रुती इत्यादींविषयी विचार मांडून मराठीतील सौंदर्यशास्त्रीय चर्चेला प्रारंभ करून दिला. त्यांच्या सौंदर्य आणि साहित्य (१९५५ दुसरी आवृ. १९६०) आणि कला आणि मानव (१९८३ मूळ इंग्रजी–आर्ट्‌स अँड मॅन, १९३७) या पुस्तकांत त्यांचे साहित्य व सौंदर्यविषयक लेखन समाविष्ट आहे.

मर्ढेकरांनी मराठीत प्रथमच कलासौंदर्यविषयक विचारांना तात्त्विक बैठक देऊन सौंदर्यशास्त्राचा पाया रचण्याचे कार्य केले. मर्ढेकरांच्या मते, कलाकृतीच्या घाटाचे चैतन्यतत्त्व म्हणजेच लयतत्त्व. संवादलय, विरोधलय व समतोललय ही तीन लयतत्त्वे मर्ढेकरांनी विशद केली. या लयतत्त्वांची एकात्म, सेंद्रिय सुसंघटना कलाकृतीच्या घाटात सौंदर्य निर्माण करते. सौंदर्याचे अस्तित्व अनुभूतीवर अवलंबून नाही ते स्वतंत्र, स्वयंभू असते. मर्ढेकरांनी आपल्या सौंदर्यविचारात सौंदर्यभावनेला विशेष महत्त्व दिले आहे. संवेदनांच्या गुणांनी व त्यांच्याच फक्त संवाद-विरोधकात्मक लयीने जी भावना उत्पन्न होते, ती सौंदर्यभावना. हा अनुभव स्वयंपूर्ण असतो. त्याचे महत्त्व केवळ साधनात्मक, जीवशास्त्रीय नसते. सौंदर्यभावना ही लौकिक जीवनव्यवहारातील भावनांपेक्षा (उदा., राग, द्वेष, भीती, प्रेम इ.) सर्वस्वी वेगळी, स्वयंपूर्ण व स्वायत्त असते. संवेदनांच्या केवळ अंगभूत गुणांवर गुंफलेल्या संवेदना आकृतीचा आस्वाद मर्ढेकरांना महत्त्वाचा वाटतो. रेषा, रंग, घनरूप, ध्वनी इ. संवेदनांच्या लयबद्ध रचनांनी वेडावून जाणे त्यांना महत्त्वाचे वाटते. मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचे हे सार म्हणता येईल. मर्ढेकरांनंतरच्या काळात सुरेंद्र बारलिंगे, नरहर कुरुंदकर, प्रभाकर पाध्ये, शरच्चंद्र मुक्तिबोध, माधव आचवल प्रभृतींनी वेगवेगळ्या दृष्टिकोणांतून सौंदर्यशास्त्रीय विचारांच्या तात्त्विक चर्चेत बरीच भर घातली आहे. तसेच अलीकडील यूरोपीय कलाविचारांचा परिचय गंगाधर पाटील यांनी करून दिला आहे. समीक्षेची नवी रूपे (१९८१) व समीक्षामीमांसा (२०११) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके होत. मराठीमधील सौंदर्यशास्त्रीय लेखनाचे प्रारंभीच्या टप्प्यांचे आकलन तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोणातून कसे करता येईल, याचे दिग्दर्शन मे. पुं. रेगे यांच्या लेखनामध्ये आढळते. सौंदर्यशास्त्र या विषयाची सांगोपांग आणि समग्र मांडणी करण्याचे कार्य ⇨ रा. भा. पाटणकर (१९२७ -२००४) यांच्या सौंदर्यमीमांसा (१९७४) या ग्रंथाने केलेले आहे. स्वायत्ततावाद आणि लौकिकतावाद या दोन कलाविषयक संकल्पनाव्यूहांना दोन ध्रुव कल्पून विविध सौंदर्यशास्त्रीय सिद्धांतांची एक सुसंगत व्यवस्था या ग्रंथामध्ये लावलेली आढळते. याखेरीज पाटणकरांचे क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य (१९७४) व कांटची सौंदर्यमीमांसा (१९७७) हे ग्रंथही अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत.

प्रभाकर पाध्ये (१९०९-८४) यांनी मुख्यत्वे सौंदर्यानुभवाची संकल्पना विकसित केली. त्यांनी मर्ढेकरांच्या आणि रा. भा. पाटणकरांच्या सौंदर्यशास्त्रीय विचारांचे विश्लेषण अनुक्रमे मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा (१९७७) आणि पाटणकरांची सौंदर्यमीमांसा (१९७७) या ग्रंथांतून केले, तसेच मराठीतील कलाविचारांचा ऐतिहासिक दृष्टीने परामर्शही घेतला. पाध्यांनी स्वतःची सौंदर्यशास्त्रीय भूमिका त्यांच्या सौंदर्यानुभव (१९७९) या ग्रंथातून स्पष्ट केली. सौंदर्यास्वाद किंवा कलानुभव यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोणातून विचार त्यात मांडला आहे. सौंदर्यानुभव हा इतर अनुभवांपेक्षा वेगळा असून त्याचे स्वरूप साक्षात्कारी असते, आणि अनुभवात केवलास्वाद वृत्तीने रमून गेल्यामुळे तो निर्माण होतो. कलानिर्मिती, कलानुभव किंवा सौंदर्यानुभव मानवी मेंदूतील आदिम भागाशी संबंधित असतो, हा अभ्युपगम पाध्ये मांडतात. सौंदर्यानुभव घेण्याची क्षमता प्रतिभेच्या मुक्त अशा विशिष्ट स्वरूपामुळे लाभते. कलाकृतीची निर्मिती आणि आस्वाद या दोहोंचाही आधार ही मुक्त प्रतिभाशक्तीच होय. रसिकाची केवलास्वाद वृत्ती म्हणजेच सौंदर्यदृष्टी ही कलानुभवाची आवश्यक अट आहे. या सौंदर्यवृत्तीमुळे मानवाच्या मनातील आदिम व विशुद्ध ऊर्जेला कलाकृती जाग आणू शकते. पाध्यांचा सौंदर्यविचार थोडक्यात अशा स्वरूपाचा आहे.

अशोक दा. रानडे (१९३७-२०११) यांनी संगीताचे सौंदर्यशास्त्र (१९७१) या ग्रंथात त्यांची भूमिका मांडली आहे. स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र (१९७५) हे त्यांचे पुस्तकही महत्त्वाचे आहे. स्वर, लय आणि बंदीश (संगीतकृतीचा घाट वा रूपबंध) यांचे मेलन संगीतकृतीत सौंदर्य निर्माण करते. संगीतकृतीत लयबंध हे सौंदर्यतत्त्व असते. लय म्हणजे सर्जक केंद्रांचा नियमित पुनरुद्भव होय, अशी उपपत्ती मांडून रानडे यांनी लयतत्त्वात लवचिक व जिवंत नियमिततेला प्राधान्य दिले आहे.

माधव आचवल (१९२६-८०) यांनी मुख्यत्वे त्यांच्या किमया (१९६१) या पुस्तकात वास्तुकलेच्या अनुषंगाने एकूणच दृश्य-कलांतील सौंदर्यतत्त्वांचा वेध घेतला आहे. त्यांचे विवेचन चित्रकला, शिल्पकला यांनाही लागू पडणारे आहे. त्यांच्या रसास्वाद : वाङ्मय आणि कला (१९७२) व जास्वंद (१९७४) ह्या समीक्षापर पुस्तकांतूनही त्यांच्या सौंदर्यलक्ष्यी कलावादी भूमिकेचा प्रत्यय येतो. विशिष्ट भावपरिपोषाच्या दृष्टीने केलेली कालाची आणि अवकाशाची बंदीश हा जसा संगीतकलेचा तसाच वास्तुकलेचाही प्राण आहे. प्रकाश, पाणी, द्रव्य (मटेरिअल), रंग, रेषा, घनता, अवकाशाला वास्तूने दिलेले आकार आणि या सर्वांच्या संघटनेतून निर्माण झालेले अलौकिक सौंदर्य वास्तुरचनेत महत्त्वाचे आहे. मर्ढेकरांच्या केवळ रूपवादी लयतत्त्वाला आशयसापेक्ष, आशयाविष्कारी कलाविचारांची जोड दिल्याने आचवलांची सौंदर्यमीमांसा अधिक व्यापक वाटते.

रानडे व आचवल यांनी साहित्येतर ललित कलांच्या (संगीत व वास्तुकला) अनुषंगाने सौंदर्यमीमांसा केली असल्याने मराठी सौंदर्यविचारांत तिला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ललित कलांत सौंदर्य हे मूल्य अभिप्रेत असते आणि कोणत्याही कलाकृतीत सौंदर्य हे लयतत्त्वांच्या आविष्कारातून सिद्ध होते हा या भूमिकेचा सारांश म्हणता येईल.

मालशे, मिलिंद पाटणकर, वसंत इनामदार, श्री. दे.

अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र असा एक नवा विचार दलित साहित्याच्या आविष्कारानंतर जन्मास आला. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर उदयाला आलेले हे दलित साहित्य ब्राह्मणी साहित्याशी नाळ तोडणारे पहिले आधुनिक साहित्य असून ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राविरोधी त्याने विद्रोहाची भूमिका मांडली आहे. साहित्य क्रांतिकारक असते पण ते क्रांतिशास्त्र नसते. साहित्य क्रांती करीत नाही, क्रांतीला उद्युक्त करते असा जीवनवादी, परिवर्तनवादी विचार त्यातून अभिव्यक्त झाला आहे. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र भारतीय परंपरेतील सौंदर्यशास्त्राबद्दल आक्षेप नोंदवून मार्क्सवादी व दलित सौंदर्यशास्त्राचे मूलतत्त्व स्पष्ट करते. त्यांच्या मताप्रमाणे विश्व-चैतन्यवादी वा अध्यात्मवादी सौंदर्यशास्त्र हे मूलतःच सर्वोदयवादी वा तथाकथित वर्णजात वर्गातीतवादी आहे. उलट मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र कलाकृतीचे सौंदर्य वर्गीय वास्तवतेच्या कलात्मक आविष्कारांत, तर दलित आणि मध्यमजातीय सौंदर्यशास्त्रे अनुक्रमे दलित व मध्यमजातीय वास्तवतेच्या कलात्मक आविष्कारांत आहेत. दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र या ग्रंथात शरणकुमार लिंबाळे यांनी सौंदर्यशास्त्रातील सांरचनिक, कलात्मक घटकांपेक्षा सापेक्ष, वास्तववादी, जीवनानुभूतीला स्पर्श करणाऱ्या घटकांना महत्त्व दिले आहे. एकूणच सौंदर्यशास्त्राचा विचार कलासापेक्ष वा शास्त्रसापेक्ष करण्यापेक्षा तो अधिक जीवनसापेक्ष पद्धतीने करण्याचा प्रयत्न अब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राच्या निमित्ताने झाला आहे.

भटकर, जगतानंद

 

पहा : कला-२ कलासमीक्षा साहित्यसमीक्षा.

संदर्भ : 1. Cooper, David E. Ed., A Companion to Aesthetics, Oxford, 1992.

           2. Knox, I. The Aesthetic Theories of Kant, Hegal and Schopenhauer, 1958.

          3. Osborne, Harold, Aesthetics and Criticism, 1955.

          4. Rader, Melvin, Ed., A Modern Book of Aesthetics, 1965.

          5. Sparshott, Francis, The Structure of Aesthetics, Toronto, 1963.

          ६. इंदूरकर, विनोद, पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्र, नागपूर, २०१२.

          ७. पाटणकर, रा. भा. सौंदर्यमीमांसा, मुंबई, १९७४.

          ८. पाटील, शरद, अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, पुणे, १९८८.

          ९. पाध्ये, प्रभाकर, सौंदर्यानुभव, मुंबई, १९७९

         १०. मर्ढेकर, बा. सी. सौंदर्य आणि साहित्य, मुंबई, १९६०.

         ११. रेगे, मे. पुं. ‘तत्त्वज्ञानाच्या आधारावर मराठी सौंदर्यशास्त्रीय लेखन’, मराठी टीका (संपा. वसंतदावतर), १९६६.