ध्वनिसिद्धांत : काव्याचा आत्मा म्हणजे त्याचे मुख्य व श्रेष्ठ आत्मभूत तत्त्व हे ‘ध्वनि’ अथवा व्यंजित वा सूचित अर्थ हेच आहे, असे प्रतिपादण्यात आलेले काव्यविषयक मत (काव्यसय आत्मा ध्वनिः) म्हणजेच ध्वनिसिद्धांत होय. ‘रीति’ (वामनप्रणीत) किंवा ‘रस’ (विश्वनाथप्रणीत) हेच काव्याचे आत्मभूत तत्त्व होय, वा ‘वक्रोत्कि’ (कुंतकप्रणीत), अथवा ‘औचित्य’ (क्षेमेन्द्रप्रणीत) हे काव्याचे जीवित होय, ही मते बरोबर नसून व्यंग्यार्थ किंवा सूचित अर्थ हा काव्याचा आत्मा होय, असे या सिद्धांताचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. काव्याचा आपाततः म्हणजे वरवर प्रतीत होणारा वाच्यार्थ हा त्यास काव्यरूप देण्यास अपर्याप्त असतो पण त्या वाच्यार्थापासून व त्याच्या मागोमाग प्रतीत होणारा सूचितार्थच त्याला खरोखर काव्यत्व देतो, हे या सिद्धांताचे मुख्य सूत्र आहे. ‘प्रतीयमान’, ‘ध्वनित’, ‘व्यंग्यार्थ’, ‘ध्वन्यर्थ’ इ. शब्दही या दुसऱ्या अर्थाचे वाचक शब्द आहेत, तसेच ‘व्यक्ति’ वा ‘अभिव्यक्ति’ हे शब्द व्यंजनाशक्तीचे वाचक आहेत. तथापि ध्वनी या शब्दावरूनच या सिद्धांतास नाव प्राप्त झाले आहे.

ध्वनी हा शब्द आद्य विद्वान (प्रथमे विद्वांसः) जे वैयाकारण, त्यांच्यापासून उचललेला शब्द आहे, असे ध्वनिसिद्धांतवादी सांगतात. वयाकरणांनी शब्दार्थचर्चेच्या संदर्भात ध्वनी आणि स्फोट असे दोन शब्द वापरले होते. शब्द म्हणजे एक किंवा अनेक वर्णांचे विशिष्ट क्रमाने केलेले उच्चारण किंवा काढलेला ध्वनी होय. हे त्याचे बाह्य स्वरूप होय. त्या शब्दाच्या किंवा विशिष्ट ध्वनीच्या साहाय्याने श्रोत्याच्या मनात शब्दतत्त्व प्रतीत होते. व ते तत्त्व अर्थ व्यक्त करते हे शब्दतत्त्व ‘स्फोट’ होय. हा अर्थ त्या वर्णाच्या किंवा वर्णसमूहाच्यापेक्षा वेगळा असतो परंतु त्याच्यापासूनच निघालेला असतो. याच धर्तीवर अनेक शब्दांच्या वाच्यार्थापासूनच मिळणाऱ्या, परंतु त्याच्यापासून वेगळ्या, अशा अर्थाची प्राप्ती जेव्हा होते, तेव्हा आपल्याला ध्वनित अर्थ प्रतीत होतो. सीताहरणानंतर तिचे दागिने जेव्हा सापडले, तेव्हा रामाने ते लक्ष्मणास दाखविले आणि ‘तू हे ओळखतोस काय?’ असे त्यास विचारले. त्याने जे उत्तर दिले ते ध्वनीचे उदाहरण समजले जाते. ते असे होते: लक्ष्मण रामास म्हणतो, ‘नाही जाणत केयूरे, न ओळखति कुंडले । जाणे मी नूपुरे मात्र नित्य पादाभिवंदने’ याचा वाच्यार्थ ‘मला यांतील काही दागिने ओळखतात, काही ओळखत नाहीत’, एवढाच होतो. परंतु हा येथेच थांबत वा संपत नाही. सीतेचे नित्य पादाभिवंदन करीत होतो, त्यामुळे पायांतील दागिने तेवढे ओळखू शकतो, पण आपल्या जेष्ठ भातृजायेकडे वर मुख करून पाहणे शक्य नसल्याने यांतील केयूर किंवा कुंडले मात्र सीतेची, हे आपण ओळखू शकत नाही, असे त्यास सुचवायचे आहे. लक्ष्मणाची सीतेकडे पाहण्याची वृत्ती अत्यंत शालीनत्वाची होती, हा अर्थ आपल्याला लक्ष्मणाच्या उत्तरावरून लक्षात येतो. लक्ष्मणाच्या उत्तरातून हा अर्थ निघतो, पण तो शब्दांपासून सरळ मिळणारा वाच्यार्थ नव्हे. हा जो दुसरा अर्थ मिळतो तो ध्वनी होय. असा अर्थ शब्दांच्या आणि वाच्यार्थाच्या ज्या शक्तीने मिळतो ती व्यंजनाशक्ती होय. लक्ष्मणाच्या साध्या दिसणाऱ्या वाक्याच्या सरळ अर्थापासून हा जो अर्थ मनात येतो, त्यामुळे त्याचे बोलणे हे काव्यरूप पावते. अशा अर्थाची सूचना व प्रतीती हेच काव्याचे आत्मभूत तत्त्व आहे, असा सिद्धांत म्हणजे ध्वनिसिद्धांत होय.

हा अर्थ शब्दाच्या अभिधा आणि लक्षणा या आधी मान्यता पावलेल्या शक्तींच्या द्वारे मिळत नसतो, असे या सिद्धांताचे म्हणणे आहे. अभिधा ही शब्दांचा मुख्यार्थ म्हणजे वाच्यार्थ सांगून विराम पावते या मुख्यार्थाला बाध झाल्यासच, म्हणजे मुख्यार्थ सुसंगत नसल्यास, लक्षणा होऊ शकते. तो बाध प्रस्तुत उदाहरणात होत नसल्याने येथे लक्षणाशक्तीही कार्य करू शकत नाही. सूचितार्थ तर लक्षात येतो, तेव्हा तो आणखी कोणत्या तरी तिसऱ्या शक्तीमुळे प्रतीत होतो, असे समाजावे लागते. ही शक्ती म्हणजे व्यंजना शक्ती होय, असे ध्वनिसिद्धांतास म्हणावयाचे आहे. या शक्तीने सूचितार्थ होण्याची क्रिया व सूचित अर्थही ध्वनी ठरतो.

या ध्वनीचे प्रकार पुष्कळ असले, तरी वस्तुध्वनी, अलंकारध्वनी आणि रसध्वनी हे त्याचे तीन प्रमुख प्रभेद होत. यांपैकी रसध्वनी हा मुख्य असून वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी यांचे पर्यवसान अखेर रसध्वनीमध्येच होते, निदान रसनिर्मितीस ते पोषक ठरतात, असेही ध्वनिवादी लोकांचे म्हणणे आहे. ‘रस एव हि वस्तुतः आत्मा’ असे अभिनवगुप्त हा आपल्या ध्वन्यालोकावरील टीकेत स्पष्टपणे म्हणतो (ध्वन्यालोक, उद्योत १, श्लोक ५). असे असूनही ‘काव्यस्थ आत्मा ध्वनिः’ हे ध्वनिसिद्धांताचे मूलभूत तत्व आहे. रस हाही ध्वनीच आहे, ध्वनीचा एक प्रकार आहे, असा ध्वनिवाद्यांचा दावा आहे. कोणत्याही रसाचे नाव घेतले, की तो निर्माण होतो असे नाही, आणि विभावादी रससामग्रीचे वर्णन आल्यास नाव न घेताही तो निर्माण होऊ शकतो, म्हणून ध्वनितच असतो फक्त त्याचा निर्मितिक्रम हा असंलक्ष्य असतो, असे त्यांचे म्हणणे आहे. असंलक्ष्यक्रम म्हणजे ज्याच्या उत्पत्तीचा क्रम ध्यानात येत नाही तो. वस्तुध्वनीमध्ये (वर लक्ष्मणाचे उदाहरण दिले आहेच) रसाविष्कारास विशेष जागा नसताही व्यंजना व ध्वनी असल्याने त्यात काव्य येते, तेव्हा केवळ रसामुळेच काव्य येते असे नसून ध्वनिमुळेही ते येते, असे म्हणावे लागते. काव्याचा आत्मा एकच असावयास हवा, असेही वाटत असावे. म्हणून वस्तुध्वनीबरोबर रसालाही ध्वनित म्हणावे, किंबहुना अलंकारध्वनीलाही उत्तम काव्य समजावे, असे म्हणून ध्वनिकारांनी ध्वनीची काव्याच्या आत्मपदी स्थापना केली आहे. वस्तुतः काव्यात रसालाच सर्वाधिक महत्त्व आहे हे त्यांना मान्य आहे.


काव्यचर्चेत ध्वनीचा आणि त्याबरोबर व्यंजनाशक्तीचा पुरस्कार करण्याचे पहिले श्रेय ध्वन्यालोककार ⇨ आनंदवर्धन (नववे शतक) यालाच जाते.

ध्वनिकल्पना प्रथम प्रतिपादिली गेली, तेव्हा तिला स्वाभाविकपणेच विरोध झाला. स्वतः ध्वनिकारांनीच तिच्या तीन प्रतिपक्षांचा उल्लेख केला आहे. जयरथाने अलंकारसर्वस्वावरील आपल्या टीकेमध्ये दोन कारिका उद्‌घृत करून ‘स्वतंत्र ध्वनि’ मतास विरोधी असणाऱ्या बारा विरोधी पक्षांचा उल्लेख केला आहे. कित्येकांचे म्हणणे व्यंजनेने मिळणारा अर्थ हा सारा अभिधाशक्तीच्याच दीर्घ–दिर्घ व्यापाराने मिळतो असे होते (मीमांसक) धनंजय आणि धनिक (नाट्यचर्चा करणारे) हे त्याचा अंतर्भाव तात्पर्यार्थामध्ये करीत काही (महिमभट्ट आणि नैयायिक) तो अनुमानाने किंवा त्याला निकट असणाऱ्या अर्थापत्तीने प्राप्त होतो असे मानत काही तो लक्षणेनेच मिळू शकतो असे म्हणत (उदा., मुकुलभट्ट) इतर काही (कुंतक आणि आलंकारिक) त्याचा समावेश अलंकार किंवा वक्रोत्कीमध्ये करीत. भट्टनायक हा रसवादी असून रसध्वनीला मात्र प्रतिकूल होता. असे असले तरी, बाराव्या शतकाच्या प्रारंभी मम्मटाच्या काव्यप्रकाशामध्ये ध्वनीला मान्यता मिळाल्यावर त्याला होणारा विरोध मावळला, असे म्हणता येते.

संदर्भ: De, Sushil Kumar, History of Sanskrit Poetics, 2 Vols., Calcutta, 1960.

जोग, रा. श्री.