पाठ चिकित्सा : पाठचिकित्साशास्त्र म्हणजे उपलब्ध साधनांची चिकित्सा करून एखाद्या ग्रंथाची मूळ किंवा शक्य तितकी प्राचीनतम व प्रामाणिकतम संहिता निश्चित करण्याचे शास्त्र. उपलब्ध साधनांचे प्रकार दोन : मुख्य व पूरक, मुख्य साधने म्हणजे त्या ग्रंथाच्या हस्तलिखित व मुद्रित प्रती. पूरक साधने म्हणजे वेचे, उद्धरणे, टीका, भाषांतर, सार, मौखिक परंपरागत पाठ वगैरे नात्यांनी मूळ ग्रंथाशी संबंधित असलेले साहित्य.

एखाद्या ग्रंथाची ग्रंथकर्त्याच्या हस्ताक्षरातील प्रत किंवा एकुलती एकच हस्तलिखित वा मुद्रित प्रत उपलब्ध असल्यास संहितानिश्चितीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. त्या प्रतीत उघड उघड दिसणारे लेखनप्रमाद वा मुद्रणदोष दाखविणे एवढेच संपादकाचे काम. परंतु एखाद्या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित वा मुद्रित प्रती उपलब्ध असून त्यांत अनेक पाठांतरे असतात, तेव्हा मूळ पाठांचा शोध घेणे आवश्यक ठरते. मूळ हस्तलिखिताच्या नकला, त्या नकलांच्या नकला अशा परंपरेने जेव्हा अनेक हस्तलिखित प्रती निष्पन्न होतात. तेव्हा प्रत्येक लेखनाच्या वेळी त्यांत पाठांतरे उत्पन्न होत असतात. ही पाठांतरे दोन प्रकारची. एक अभावितपणे म्हणजे वाचनप्रमादामुळे अथवा लेखनप्रमादामुळे झालेली आणि दुसरी बुद्धिपुरस्सर केलेली, म्हणजे अर्थसुलभीकरण, आधुनिकीकरण, स्वकृत रचनेचे समाविष्टीकरण इत्यादींसारखी. मुद्रित ग्रंथांतही दरेक आवृत्तिगणिक पाठांतरे संभवतात. त्यांत मूळ लेखकानेच किंवा संपादकाने नव्या आवृत्तीत बदल केलेले असण्याचा किंवा मुद्रकाकडून अभावितपणे बदल झालेले असण्याचा संभव असतो. 

हस्तलिखित ग्रंथांची संहिताचिकित्सा ही पुढील चार टप्प्यांनी केली जाते : (१) शक्य होतील तितक्या उपलब्ध प्रती जमवून, त्यांतील विशिष्ट वाटणाऱ्या प्रतींची निवड करणे आणि एखाद्या कार्यतः स्वीकृत (व्हल्गेट) प्रतीतील पाठांच्या अनुरोधाने, त्यांतील भिन्न पाठांची नोंदणी करणे, (२) अशा नोंदलेल्या पाठांचा तुलनात्मक अभ्यास करून त्या प्रतींचा वंशवृक्ष तयार करणे, (३) ज्या एका अनुपलब्ध आद्य प्रतीवरून उपलब्ध प्रती तयार झाल्या त्या आद्य प्रतीची संहिता निश्चित करणे आणि (४) या निश्चित केलेल्या आद्य प्रतीतील अपपाठ दुरुस्त करून त्या ग्रंथाच्या लेखकाला अभिप्रेत असलेली मूळ संहिता निश्चित करणे.

पाठनोंदणीकरिता आडव्या व उभ्या ओळी आखलेला लांबरुंद कागद घेऊन पहिल्या आडव्या ओळीत प्रत्येक चौकात एक अक्षर या पद्धतीने कार्यतः स्वीकृत प्रतीतील एक श्लोक, ओवी, चरण वा वाक्य नोंदले जाते. ग्रंथाच्या सर्वपरिचित अशा प्रतीचाच कार्यतः स्वीकृत प्रत म्हणून सामान्यपणे उपयोग करण्यात येतो. या प्रतीतील संहिता पहिल्या ओळीत नोंदली जात असल्यामुळे, हिला आधारप्रत असेही म्हटले जाते. कार्यतः स्वीकृत प्रतीतील संहितेखाली प्रत्येक ओळीत एकेका विशिष्ट वाटणाऱ्या उपलब्ध प्रतीतील पाठांतरे तेवढी त्या त्या पाठाखालील चौकात नोंदली जातात, पाठनोंदणीकरिता घेतलेल्या प्रतींना बोधचिन्हे दिली जातात व प्रत्येक पानावर निश्चित क्रमानेच पाठभेद नोंदण्यात येतात. 

या नोंदलेल्या पाठांचा तुलनात्मक अभ्यास करून पाठचिकित्सेकरिता घेतलेल्या प्रतींचा वंशवृक्ष तयार करण्यात येतो. हा वंशवृक्ष तयार करण्याची साधने म्हणजे या प्रतींतील ग्रंथसंख्या, प्रक्षेप व अवक्षेप, पाठांतरे व प्रमाद, प्रारंभ व शेवट, नमन व पुष्पिका यांतील साम्य व भेद आणि प्रतींचे लेखनकाल व लेखनस्थल. हा वंशवृक्ष करताना अनेक पूर्वज प्रती गृहीत धराव्या लागतात. उदा., क, ग१, ग२, ग३, च, छ, ज, त, थ आणि ब अशा दहा प्रती उपलब्ध प्रतींतून विशिष्ट म्हणून निवडल्या आणि त्यांचा वंशवृक्ष पुढीलप्रमाणे निश्चित करता आला, तर यांतील नक्षत्रांकित प्रती या अनुपलब्ध पूर्वज प्रती असतील. * ख ही ग १, ग २, ग ३ या उपलब्ध प्रतींची अनुपलब्ध पूर्वज प्रत * प ही उपलब्ध क आणि अनुपलब्ध * ख या प्रतींची अनुपलब्ध पूर्वज प्रत * फ ही उपलब्ध च, छ, ज या प्रतींची अनुपलब्ध पूर्वज प्रत *क्ष ही सर्व उपलब्ध प्रतींची आणि *ख, *प, * फ या अनुपलब्ध प्रतींची आद्य अनुपलब्ध प्रत आणि * ज्ञ ही ग्रंथकर्त्याची अनुपलब्ध प्रत असे मानता येईल.

 उपलब्ध प्रतींचा असा वंशवृक्ष तयार केल्यावर प्रत्येक शाखेतील पाठांतरांची चिकित्सा करून क्रमाक्रमाने *ख, *प, *फ या अनुपलब्ध पूर्वज प्रतींतील पाठ सिद्ध करायचे आणि *प, *फ, ब या प्रतींच्या आधारे सर्व उपलब्ध प्रती ज्या एका प्रतीवरून परंपरेने निष्पन्न झाल्या असल्या पाहिजेत, त्या अनुपलब्ध आद्य *क्ष प्रतीची संहिता निश्चित करायची. या संहितानिश्चितीला वंशवृक्ष फार उपयुक्त ठरतो. 

उपलब्ध प्रतींचा वंशवृक्ष सिद्ध करून त्याच्या आधारे संहिताचिकित्सा करण्याचे हे शास्त्र आकारास येण्यापूर्वी, मिळतील तेवढ्या प्रती जमवून त्यांतील पाठांतरांतून आपणास योग्य वाटतील ते पाठ निवडून संपादक मूळ ग्रंथाची संहिता सिद्ध करीत असे. या पद्धतीने सिद्ध केलेली संहिता अर्थाच्या दृष्टीने सुबोध आणि छंदाच्या दृष्टीने सुबद्ध होत असली, तरी ती मूळ ग्रंथाची संहिता असण्याचा संभव कमीच असे. संपादकाने निश्चित केलेला पाठच मूळ का, या प्रश्नांची उत्तरे (१) संपादकास तो योग्य वाटतो म्हणून, (२) त्या पाठाने अर्थ नीट लागतो म्हणून, (३) छंदाच्या विटाळ्यात तो चपखल बसतो म्हणून किंवा (४) तो पाठ जुन्यात जुना वाटतो म्हणून, अशी ढोबळ असत. उपलब्ध प्रतींत जी पाठांतरे आढळून येतात ती कशी आली, याचाही उलगडा या पद्धतीने होत नसे. 


उपलब्ध प्रतींचा वंशवृक्ष सिद्ध केल्याने आता सोयिस्कर व वस्तुनिष्ठ पद्धतीने पाठनिश्चिती करता येते. (१) विचारात घ्यायच्या प्रतींची संख्या मर्यादित करता येते. उदा., वरील वंशवृक्षातील त आणि थ या प्रती ज्या प्रतीवरून आल्या ती मूळ ब प्रत उपलब्ध असल्यावर त आणि थ या प्रती विचारात घ्यायचे कारण पडत नाही. (२) उपलब्ध प्रतीचे तौलनिक महत्त्व कळते. उदा., वरील वंशवृक्षातील ग१, ग२ आणि ग३ या प्रती सर्वांत कमी महत्त्वाच्या आणि ब ही प्रत सर्वांत अधिक महत्त्वाची, हे वंशवृक्षाकडे पाहूनच लक्षात येते. (३) आद्य प्रतीची संहिता कोणत्या क्रमाने बदलत गेली ते कळून त्याच्या उलट म्हणजे प्रतिप्रसव क्रमाने मूळ पाठांचा शोध घेत घेत आद्य प्रतीकडे जाता येते आणि आद्य प्रत व प्रचलित प्रत यांतील पाठांतरांतील मधले दुवे सापडून पाठविकृती कसकशी होत गेली याचा नीट उलगडा होतो. (४) मूळ पाठांना हा शोध क्रमाक्रमाने घ्यायचा असल्यामुळे एका वेळी एकाच शाखेतील पाठांतरांची चिकित्सा करायची असते. उदा., ग१, ग२, ग३ या तीन प्रतींतील पाठांची तुलना करूनच* ख प्रत सिद्ध करायची क आणि *ख या दोन प्रतींतील पाठांची तुलना करुनच *प प्रत सिद्ध करायची च, छ आणि ज या तीन प्रतींतील पाठांची तुलना करूनच *फ प्रत सिद्ध करायची *प, *फ आणि ब या तीन प्रतींतील पाठांची तुलना करूनच *क्ष प्रत सिद्ध करायची. ही पद्धत एकाच वेळी सर्व दहा प्रतींतील पाठांची तुलना करण्याहून जास्त सोयीची ठरते.

भिन्न पाठांतरांतून मूळ पाठाची निवड करताना नक्कलकाराकडून चुकीच्या वाचनामुळे, लेखनामुळे वा पदविच्छेदामुळे, अनवधानाने वा सुलभीकरणाच्या स्वाभाविक प्रवृत्तीमुळे अपपाठ कसे निर्माण होतात आणि मूळ ग्रंथातील संदर्भ, भाषा, व्याकरण, संकेत, शैली, वृत्त, यमक इत्यादींशी जुळणारा पाठ कोणता, या दोन गोष्टी विचारात घ्यायच्या असतात. त्याचप्रमाणे कळण्यास सोप्या पाठापेक्षा कठीण पाठच मूळचा असण्याचा संभव अधिक असतो, आपल्या दृष्टिने दोषास्पद वा गौण पाठ मूळ ग्रंथात असण्याची शक्यता असते इ. शक्यतांचे व संभवांचे अवधानही राखायचे असते. त्यातूनही दोन वा अधिक पाठांतरांपैकी मूळ पाठ कोणता याचा निर्णय घेता येत नाही असे वाटले, तर त्यातील एक पाठ स्वीकारून आपला संदेह त्याखाली नागमोडी रेषा देऊन दाखवावा आणि तळटिपांत पर्यायी पाठ द्यावेत, पाठनिश्चितीचे तंत्र जास्तीत जास्त नियमबद्ध व वस्तुनिष्ठ करून, शक्य झाले तर गणकयंत्राकडून ही संहितानिश्चिती करवून घ्यावी, अशी या शास्त्राची आकांक्षा आहे. 

अशा प्रकारे आद्य प्रतीची (*क्ष प्रतीची) संहिता सिद्ध केल्यावरही संहिताचिकित्साप्रक्रियेचा आणखी एक टप्पा असतो तो टप्पा म्हणजे मूळ ग्रंथ म्हणजेच ग्रंथकर्त्याला अभिप्रेत असलेली मूळ संहिता (*ज्ञ प्रत) निश्चित करणे. सिद्ध केलेली प्रत (*क्ष प्रत) म्हणजे उपलब्ध प्रती ज्या एका प्रतीवरून परंपरेने आल्या ती अनुपलब्ध आद्य प्रत. ही प्रत म्हणजे मूळ ग्रंथ असतोच असे नव्हे. मूळ ग्रंथ आणि ही प्रत यांच्या लेखनकाळात कित्येक शतकांचा अवधी गेला असेल. मूळ ग्रंथ रचला गेल्यानंतर त्यावरून व त्याच्या नकलांवरून साक्षात वा परंपरेने ही प्रत अस्तित्वात आली असणार. म्हणजे या प्रतीतील सर्वच पाठ हे मूळ पाठ असणे संभवनीय नाही. परंतु या मधल्या काळातील एकही प्रत उपलब्ध नसल्यामुळे ज्या पद्धतीने, म्हणजे पाठांतरांची चिकित्सा करून, ही प्रत सिद्ध केली त्या पद्धतीने मूळ ग्रंथ सिद्ध करणे शक्य नाही हे उघड आहे. मग मूळ ग्रंथ कसा सिद्ध करायचा? इथे पाठदुरुस्ती केल्याशिवाय गत्यंतर नसते. पण ही पाठदुरुस्ती फार सावधपणे आणि अपरिहार्य तेथेच व तेवढीच करायची असते. ग्रंथरचनाकालीन भाषा व व्याकरण, ग्रंथकर्त्याची शैली व दृष्टी, मागील व पुढील संदर्भ, छंद व यमक यांच्याशी विसंगती वा विरोध इत्यादींमुळे पुनर्रचित प्राचीनतम प्रतीतील पाठ ग्रंथकर्त्याला अभिप्रेत असण्याचा काडीमात्र संभव नाही, अशी संपूर्ण खात्री झाल्याशिवाय तो पाठ दुरुस्त करणे इष्ट नसते. यांतील काही विसंगतींना वा विरोधांना खुद्द ग्रंथकर्ताही जबाबदार असणे शक्य आहे. आक्षेपार्ह पाठ दुरुस्त करणे सोपे नसते. त्याकरिता संपादकाला ग्रंथकर्त्याच्या काळाशी, भाषेशी, शैलीशी, विचाराशी आणि विशेष म्हणजे निर्मितिप्रक्रियेशी संपूर्ण एकरूप होता आले पहिजे. ही गोष्ट महाकठीण. अशा प्रकारे ग्रंथकर्त्याला अभिप्रेत असलेली संहिता सिद्ध केलेल्या प्रतीला चिकित्सक संपादणी म्हणतात. यातील दुरुस्त पाठ कोणते हे कळावे म्हणून ते नक्षत्रांकित करण्यात येतात.

पाठदुरुस्ती कितीही साक्षेपाने केली, तरी ते दुरुस्त पाठ मूळ ग्रंथकाराला अभिप्रेत असतीलच असे नाही. यामुळे अशी पाठदुरुस्ती करूच नये, असेही एक मत आहे. परंतु संपादक जर तेवढ्या योग्यतेचा असेल तर पाठदुरुस्त संपादणी मूळ ग्रंथाच्या जास्त जवळ जाण्याचा संभव आहे, हे दृष्टीआड करून चालणार नाही. चिकित्सक संपादणी केल्यावर जर अधिक प्राचीन प्रत मिळाली तर त्यावरून त्या संपादकाच्या योग्यतेची परीक्षा होऊ शकते. डॉ. वि. सी. सुकथनकर यांनी महाभारताच्या आदिपर्वाची चिकित्सक संपादणी प्रसिद्ध केली, तेव्हा त्यांनी एकूण छत्तीस पाठ दुरुस्त केले होते. कालांतराने जेव्हा त्या पर्वाची अधिक प्राचीन अशी नेपाळी प्रत उपलब्ध झाली, तेव्हा त्या छत्तीस दुरुस्त पाठांतील अठरा पाठ त्या नेपाळी प्रतीत असलेले आढळून आले. अधिकारी संपादकाने अत्यंत साक्षेपाने केलेली पाठदुरुस्ती मूळ ग्रंथाच्या किती जवळ जाऊ शकते, याचे हे प्रत्ययकारी उदाहरण आहे. 

पाठदुरुस्तीची आवश्यकताचा न वाटल्यामुळे किंवा तेवढा आपला अधिकारच नाही अशा भावनेने काही संपादक चौथा टप्पा गाळून उपलब्ध प्रतींची आद्य प्रतच संपादित करतात. या संहितेला पुनर्रचित प्राचीनतम संहिता म्हणतात. तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीपर्यंत न जाता, म्हणजे सर्व उपलब्ध प्रतींची आद्य प्रत सिद्ध न करता, एका विशिष्ट शाखेतील आद्य प्रत सिद्ध करणे, एवढेच मर्यादित उद्दिष्ट काही संपादक ठेवतात. ही त्या शाखेची पुनर्रचित प्राचीनतम संहिता. परंतु याकरिता केवळ त्या शाखेतील पाठ नोंदवूनच निभत नाही. कित्येक स्थळी अन्य शाखेतील पाठही विचारात घ्यावे लागतात. म्हणजे, सर्व शाखांची आद्य प्रत सिद्ध करण्यासाठी करावी लागते तेवढीच पूर्वतयारी या प्रकारच्या संपादणीसाठी करणे आवश्यक असते. तेव्हा थोडे अधिक श्रम करून सर्वच शाखांची आद्य प्रत सिद्ध करणे श्रेयस्कर. कित्येक संपादक तिसरा टप्पाही गाळतात. पाठनोंदणी करून वंशवृक्ष सिद्ध केल्यावर त्यांतील जी प्रत प्राचीनतम व प्रमाणिकतम वाटेल तीच प्रत, इतर प्रतींतील महत्त्वाचे पाठभेद तळटिपांत देऊन संपादावी असे त्यांचे मत असते, अशा प्रकारची संपादणी ती एका विशिष्ट प्रतीची संपादणी. कित्येक संपादक दुसरा टप्पाही गाळतात. म्हणजे प्रतींचा वंशवृक्षही सिद्ध न करता पहिल्या टप्प्यात नोंदविलेल्या पाठभेदांचा विचार करून आपणास योग्य वाटतील ते पाठ निवडतात आणि आपल्या मते ग्रंथकर्त्यास अभिप्रेत असलेली मूळ संहिता सिद्ध करतात. हिला सर्वसंग्राहक संपादणी म्हणतात. विलक्षण पाठमिश्रण झालेले असल्यामुळे प्रतींचा वंशवृक्ष निश्चित करणेच अशक्य, अशी खात्री झाल्यावरच संपादक गौणपक्ष म्हणून या पद्धतीचा अवलंब करतात. 


मुद्रित ग्रंथाच्या पाठचिकित्सेची प्रमुख साधने म्हणजे ग्रंथकाराच्या हस्ताक्षरातील अथवा त्याने मान्य केलेली मुद्रणप्रत, त्या ग्रंथातील लेखन पहिल्य़ाने नियतककालिकातून प्रकाशित झालेले असल्यास नियतकालिकातील ते मुद्रण आणि ग्रंथाच्या सर्व आवृत्त्या. हस्तलिखित ग्रंथाची पाठचिकित्सा आणि मुद्रित ग्रंथाची पाठचिकित्सा यांतील महत्त्वाचा भेद म्हणजे हस्तलिखित ग्रंथाची लेखकाच्या हस्ताक्षरातील प्रत मिळाली तर पाठचिकित्सेचे प्रयोजनच राहत नाही, परंतु मुद्रित ग्रंथाची तशी प्रत मिळाली तरी तीच केवळ प्रमाण धरून चालत नाही. या मुद्रणप्रतीहून वेगळे असे पाठ मुद्रितात आढळले तर ते अनधिकृतच असतील असे नाही. मूळ लेखकानेच ग्रंथाची स्थूलमुद्रिते तपासताना काही बदल केले असण्याचा संभव असतो. ग्रंथाची प्रत्येक नवी आवृत्ती ही बहुशः त्या आधीच्या आवृत्तीवरूनच मुद्रित होत असल्यामुळे दर आवृत्तीगणिक नवे मुद्रणदोष उद्भवण्याचा संभव असतो. यामुळे सामान्यतः पहिली आवृत्ती जास्त प्रमाण समजली जाते. परंतु दोन-तीन आवृत्त्या निघाल्यावरच तिसऱ्या-चौथ्या आवृत्तीचे मुद्रण लेखकाने व्यवस्थित करून घेतल्याचीही उदाहरणे आहेत. अशा वेळी पहिल्या आवृत्तीऐवजी तिसरी-चौथीच आवृत्ती प्रमाण ठरते. कित्येक वेळा नव्या मुद्रणाच्या वेळी लेखक मूळ संहितेचे परिष्करण करतो. अशा वेळी मूळ व परिष्कृत संहिता सारख्याच प्रमाण ठरतात. उदा., माधव जूलियनांचे विरहतरंग.

यूरोपमध्ये चौदाव्या शतकात सुरू झालेल्या प्रबोधनकाळात ग्रीक व लॅटिन ग्रंथांबद्दल विद्वानांत जी आदराची भावना निर्माण झाली, तिच्या पोटी मूळ ग्रंथांचा शोध घेण्याची प्रवृत्ती सुरू झाली. परंतु पाठांतरे जमविणे आणि त्यांची चर्चा करणे या पलीकडे हा शोध गेलेला दिसत नाही. कार्ल लाखमान (१७९३–१८५१) याने पाठचिकित्सेचे शास्त्र बनवून बायबल आणि लॅटिन, ग्रीक व जर्मन भाषांतील अभिजात ग्रंथ यांच्या चिकित्सक आवृत्त्या संपादिल्यावर यूरोप-इंग्लंडमध्ये खरे पाठचिकित्साशास्त्र सुरू झाले. हे शास्त्र आता एवढे प्रगत झाले आहे, की त्याकरिता गणकयंत्राचेही साहाय्य घेण्यात येऊ लागले आहे. 

भारतात पाठचिकित्साशास्त्राचा प्रथम उपयोग केला गेला तो संस्कृत, प्राकृत ग्रंथांच्या बाबतीत. शाकुंतल (संपा. पिशेल, १८७७), कर्पूरमञ्जरी (प्राकृत नाटक संपा. स्टेन कॉऩॉव्ह, १९०१), मालतीमाधव (संपा. रा. गो. भांडारकर, १९०५) हे सुरुवातीचे काही विशेष उल्लेखनीय ग्रंथ. पुढील काळात पाठचिकित्सेचे जे प्रचंड उद्योग झाले, त्यांत पुण्याच्या ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’ ने प्रसिद्ध केलेली महाभारत हरिवंश  यांची चिकित्सक आवृत्ती ही विशेष उल्लेखनीय आहे. १९१९ साली डॉ. रा. गो. भांडारकरांनी स्वहस्ते सुरू केलेले महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे हे कार्य १९६६ साली, म्हणजे  ४७ वर्षांनी, पूर्ण झाले. भूर्जपत्रे, ताडपत्रे व वंशपत्रे (कागद) यांवर बारा भिन्नभिन्न लिप्यांत लिहिलेली जवळजवळ १,३०० हस्तलिखिते तपासून पाठचिकित्सेकरिता त्यांतील सु. ८०० निवडण्यात आली. १९२५ ते १९४३ या काळात डॉ. वि. सी. सुकथनकर १९४३ ते १९६१ या काळात डॉ. श्री कृ. बेलवलकर आणि १९६१ ते १९६६ या काळात डॉ. प. ल वैद्य या तिघांनी इतर सात विद्वानांचे साहाय्य घेऊन हे कार्य सिद्धीस नेले. या आवृत्तीने एकंदर १३,००० पृष्ठे व्यापिली आहेत. महाभारत  जेवढे अपूर्व तेवढेच हे कार्यही अपूर्व म्हटले पाहिजे. महाभारताच्या मूलचिकित्सात्मक आवृत्तीपासून प्रेरणा घेऊन बडोद्याच्या ‘ओरिएण्टल इन्स्टिट्यूट’ने सहा संपादकांक़डून संपादित करून घेतलेली रामायणाची आवृत्ती (१९६०–७५) आणि प्रा. दा. ध. कोसंबी यांनी संपादिलेली भर्तृहरीच्या शतकत्रयाची आवृत्ती (१९४८) यांचाही प्रस्तुत संदर्भात उल्लेख करावयास पाहिजे.

पाठचिकित्साशास्त्रानुसार मराठी ग्रंथांच्या ज्या चिकित्सक आवृत्त्या निघाल्या, त्यांत अ. का. प्रियोळकर संपादित दमयंतीस्वयंवर (१९३५) व मुक्तेश्वरी भारताचे आदिपर्व (१९५१–५९), कृ. पां. कुलकर्णी संपादित विवेकसिंधु (१९५७) आणि श्री. ना. बनहट्टी संपादित ज्ञानदेवी, अध्याय बारावा (१९६७) आणि अध्याय पहिला व सातवा (१९७३) या विशेष उल्लेखनीय आहेत. या संपादकांनी पुष्कळच हस्तलिखिते मिळवून आणि त्यांचे वंशवृक्ष सिद्ध करून पाठचिकित्सा केली असली, तरी अंती संहिता सिद्ध केली ती सर्वसंग्राहक पद्धतीनेच. 

संदर्भ : 1. Katre, S. M Gode, P. K.Introduction to Indian Textual Criticism, Poona, 1954.

   2. Maas , Paul Trans. Flower, Barbara, Textual Criticism, Oxford, N. J., 1958.

   3. Sukthankar, V. S. Prolegomena, Critical Studies in the Mahabharata, Poona, 1944.

   ४. कोलते, वि. भि. “पाठचिकित्सा”,  प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृतिग्रंथ, मुंबई, १९७४.

   ५. धोंड, म. वा. आधुनिक मराठी संहिताचिकित्सा, मुंबई, १९७५.

   ६. प्रियोळकर, अ. का. संपा. रघुनाथपंडितविरचित दमयंतीस्वयंवर, मुंबई, १९३५. 

धोंड, म. वा.