स्त्रीवादी साहित्य : स्त्रियांचे, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षाने व्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरूपतः वेगळे ठरते तथापि स्त्रीवादी साहित्य याचा अर्थ केवळ स्त्रीनिर्मित साहित्य नव्हे, तर पुरुषकेंद्री विचारव्यूहातून मुक्त अशा परिप्रेक्ष्यातून कोणीही — स्त्री वा पुरुषाने — निर्माण केलेले साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य असेही व्यापक अर्थाने म्हणता येईल. वास्तविक साहित्याच्या आविष्कारातील कोणत्या साहित्याला स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे परंतु एवढे निश्चित म्हणता येईल, की मानव म्हणजे पुरुष स्त्री हे त्याचे उपांग ह्या विचाराला छेद देणारे, त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणारे, त्यातील जटिलता,धूसरता यांची जाणीव करून देणारे साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल. बाईच्या असण्याचा, होण्याचा — म्हणजेच अस्तित्वाचा, स्वत्वाचा व अस्मितेचा — समग्रतेने वेध घेणारे,तिच्या आत्मशोधाचा प्रवास वाङ्मयीन आविष्कार म्हणून मांडणारे लेखन स्त्रीवादी म्हणता येईल परंतु स्त्रियांच्या दुःखाच्या करुण कहाण्या पराभूत नियतिवादी दृष्टिकोणातून मांडणारे,त्यांच्याविषयी केवळ दया, सहानुभूती निर्माण करणारे, तसेच उद्धारकाच्या भूमिकेतून केलेले लिखाण हे स्त्रीवादी साहित्य म्हणता येणार नाही. स्त्रीच्या देहात्मतेभोवती गूढता उभारून मूळ दडपणुकीचे वास्तव धूसर करणारे साहित्य स्त्रीवादाच्या कसोट्यांना उतरणारे नव्हे.

स्त्रीवाद ही एक समाजपरिवर्तन घडवू पाहणारी ‘ राजकीय ’ जाणीव आहे. या स्त्रीवादी जाणिवेचा विविध दृष्टिकोणांतून, भिन्न भिन्न पातळ्यांवरचा आविष्कार स्त्रीवादी साहित्यात आढळून येतो.उदारमतवादी, मार्क्सवादी, समाजवादी, उत्तर-आधुनिक अशा अनेक विचारप्रणालींमध्ये स्वतःची भर घालून, स्त्रीवादी भान स्त्री-पुरुष विषमतेच्या प्रश्नांची मीमांसा करते. म्हणून काळाच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीवादाची भिन्न रूपे तर दिसतातच परंतु त्यांच्यात अनेकदा परस्परविरोधही आढळून येतो. ह्याचेच प्रतिबिंब वेगवेगळ्या काळांत लिहिल्या गेलेल्या स्त्रीवादी साहित्यात दिसते. ह्या भिन्न भिन्न स्त्रीवादी जाणिवा व्यक्त करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. पुरुषाच्या आधाराशिवाय स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता येऊ शकते आणि प्रेमाइतकीच, माणसासारखे जगण्याची भूक स्त्रीलाही असते हे दर्शविणारे आणि स्त्री म्हणून घडताना आलेल्या विविध अनुभवांना अभिव्यक्त करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. पुरुषप्रधानतेला विरोध करणारे आणि स्त्रीचे माणूस म्हणून चित्रण करणारे साहित्य, मग ते पुरुषाने लिहिले असले तरी स्त्रीवादी ठरेल कारण तत्त्वतः स्त्रीवादी जाणीव स्त्री व पुरुष दोघांमध्येही विकसित होऊ शकते परंतु पुरुषी वर्चस्वाचा अनुभव बाई होऊन घेणे स्त्रीला अधिक समर्थपणे करता येते, असेही मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचे लेखन अधिक नेमके, धारदार व प्रखर होते. जहाल स्त्रीवाद्यांच्या मते स्त्रियांची बाईपणाच्या भानातून निर्माण झालेली भाषा, प्रतीके, प्रतिमा खर्‍या अर्थाने विकसित होण्यासाठी काही काळ तरी जाणीवपूर्वक अलगतावादी भूमिका घेणे इष्ट ठरेल.

पाश्चात्त्य देशांत स्त्रीवादाचा उदय साधारणपणे १ ९६० च्या आसपास झाला व भारतात स्त्रीवाद सु. १ ९७५ नंतर रुजला. असे असले, तरी स्त्रीवादी जाणीव तत्पूर्वी अस्तित्वात नव्हती, असे मात्र नव्हते.व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना आपल्या वाट्याला आलेल्या दुय्यमत्वाची, गौण स्थानाची जाणीव होतीच आणि ती त्यांच्या साहित्यातून व्यक्तही होत होती पण आपला हा अनुभव व त्याचा आविष्कार व्यक्तिगत आहे, असे त्यांना वाटत होते. त्याला संघटित चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते. मात्र जे खाजगी आहे, ते राजकीय आहे हे भान स्त्रीजातीला आल्यानंतर स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचा उदय झाला.

स्त्रीवादी जाणीव कशाला म्हणायचे, हे आधी स्पष्ट केले पाहिजे. जगभर प्रदीर्घकाळ जी पितृसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात आहे, त्या व्यवस्थेने जैविक लिंगभेदाला ( सेक्स ) सांस्कृतिक लिंगभेदाचे ( जेंडर ) रूप दिले. आपले हितसंबंध जपण्यासाठी स्त्री-पुरुष यांच्यात एक विशिष्ट सत्तासंबंध रचला. या सत्तासंबंधात स्त्रीला गौण व दुय्यम ठरविले गेले. स्त्रीचा स्वभाव, लक्षणे, कार्यक्षेत्रे, कर्तव्ये या सत्तेने निश्चित केली व स्त्रीवर लादली. या गोष्टीची जाणीव म्हणजे स्त्रीवादी जाणीव होय. ‘ स्त्री ही स्त्री म्हणून जन्मत   नाही, तर ती घडवली जाते ’ ( वन इज नॉट बॉर्न अ वुमन, रादर वन बिकम्स अ वुमन ), हे फ्रेंच स्त्रीवादी लेखिका सीमॉन द बोव्हारचे विधान म्हणजे स्त्रीवादी जाणिवेचे महत्त्वाचे प्रमेय आहे.

स्त्रीवादी जाणीव ही स्त्री व पुरुष या दोघांत उदित होऊ शकते. पुरुष या जाणिवेचा समर्थक होऊ शकतो परंतु या जाणिवेचा अनुभव मात्र स्त्रीच घेत असते. स्त्री-पुरुष विषमतेचे भान येणे,ही या जाणिवेची पहिली अवस्था होय. पुरुषरचित स्त्रीत्वाच्या कल्पनेला नकार देणे, ही या जाणिवेची दुसरी अवस्था, तर एक व्यक्ती म्हणून स्वतःचा शोध घेता घेता स्त्रीत्वाचा शोध घेणे, ही स्त्रीवादी जाणिवेची यापुढील व अंतिम अवस्था म्हणता येईल. या अवस्थांमधून जात असताना स्त्री-पुरुष समतेच्या तत्त्वावर आधारलेल्या नवसमाजाची निर्मिती करणे, हे स्त्रीवादाचे उद्दिष्ट आहे. स्त्रीवादी जाणिवेच्या या तिन्ही अवस्थांचे आविष्कार वाङ्मयेतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या कालखंडांत आढळून येतात.

स्त्रियांच्या साहित्यातील पृथ्गात्म वेगळेपण शोधून त्यांची चिकित्सा करण्याचे कार्य गेल्या काही वर्षांत स्त्रीवादी समीक्षकांनी केले आहे. स्त्रियांच्या कथा, कादंबर्‍या, कविता इ. साहित्यांतून त्यांच्या ‘स्व ’ त्वाचा शोध त्यांनी कसा घेतला आहे, त्याची जाणीव त्यांना कशा प्रकारे झाली आहे, वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमुळे आपण दडपले गेलो आहोत, ह्या दडपशाहीचे भान स्त्रियांनी आपल्या लेखनातून कसे व्यक्त केले आहे, ह्याचा शोध स्त्रीवादी समीक्षा घेते. पुरुषी साहित्यापेक्षा स्त्री--साहित्याचे जे वेगळेपण संभवते, त्या वेगळेपणाची-भिन्नत्वाची कारण-मीमांसा, त्याचे स्वरूप व नेमकेपणा यांचे विवेचन-विश्लेषण स्त्रीवादी समीक्षेत केले जाते. स्त्री व पुरुष यांचे जगाकडे पाहण्याचे दृष्टिकोणच मुळात भिन्न असतात, असे ही समीक्षा मानते. परंपरेने स्त्री व पुरुष यांच्याकडे सोपविलेल्या वेगवेगळ्या विषमतावादी भूमिकांमुळे ( उदा., पुरुषसत्ताक समाज व संस्कृतीच्या वर्चस्वभावाने स्त्रियांना बहाल केलेल्या पत्नी-माता-गृहिणी ह्या भूमिका ) तसेच भिन्न व्यवसायांमुळे स्त्री-पुरुषांच्या लेखनातला भेद निर्माण होतो, असेही मानले जाते. स्त्रियांचे स्त्रियांनी केलेले चित्रण, स्त्रियांचे खास वेगळे अनुभव व विषय यांचे स्त्रीवादी दृष्टिकोणातून दर्शन घडविणारे साहित्य, स्त्रीचे स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे, स्वत्वाच्या जाणिवेने केलेले आत्मप्रकटीकरण व आत्मशोध ह्या स्त्रीवादी साहित्याच्या वेगवेगळ्या दिशा आहेत. स्त्रीवादी समीक्षा ही अशा अनेकदिशीय, बहुजिनसी स्वरूपाच्या स्त्रीवादी साहित्याचे विवेचन-विश्लेषण करून त्यातील स्वत्वाचा, वेगळेपणाचा शोध घेऊ पाहते.

स्त्रीवादी साहित्य व स्त्रीवादी समीक्षा हे प्रकार स्त्रीमुक्ती चळवळीतून उदयाला आले. सीमॉन द बोव्हारने (१९०८—८६) लिहिलेल्या ल दझिॲम सॅक्स (१९४९ इं. भा. द सेकंड सेक्स,१९५३ म. भा. २ ०१२ ) या ग्रंथापासून स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. स्त्रीवादी साहित्यात एक अभिजात ग्रंथ म्हणून तो मान्यता पावला आहे. ‘ शाश्वत स्त्रीत्व ’ ( इटर्नल फेमिनिन ) ही पूर्वग्रहदूषित संकल्पना समाजजीवनातून हद्दपार करण्यासाठी तिने या प्रबंधातून बौद्धिक व भावनिक पातळीवर युक्तिवाद मांडले. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत व पुरुषी मूल्यांच्या चौकटीत स्त्री ही पुरुषाशी अनेक नात्यांनी जखडून ठेवली जाते. त्यातही पुरुष हा मुख्य व स्त्री ही ‘ इतर ’ ( दुय्यम ) असा विषमभाव आहे. स्त्री–पुरुषातील ही विषमता जीवशास्त्रीय वा दैवी नसून ती संस्कृतिनिर्मित आहे. दोघांत इतर कुठलाही भेद नसताना केवळ नैसर्गिक शारीरिक रचनेतील भेदामुळे स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. तिला स्वतःच्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर जन्मतःच कोणी ‘ स्त्री ’ असत नाही तर ‘ स्त्रीत्व ’ हे समाजाने, संस्कृतीने घडविलेले असते — अशा आशयाचे सीमॉन द बोव्हारचे विधान संस्कृतिनिर्मित स्त्री-पुरुष भेदावर व स्त्रीच्या दुय्यम स्थानावर अचूक शरसंधान करणारे आहे. अर्थातच स्त्री-पुरुष शारीर भेद इथे नाकारायचा नाही परंतु स्त्री-देहाबरोबरच तिचा लाजाळूपणा, विनयशीलता, नाजूकपणा, भावनाप्रधानता, मातृभाव, स्वार्थत्याग, समर्पण वगैरे तिला बहाल केले जाणारे गुण हे जन्मजात असतात, हे येथे नाकारावयाचे आहे. हे गुण समाजाने व संस्कृतीने स्त्रीत्वावर लादलेले असतात. तेव्हा जैविक लिंगभेद म्हणजे सांस्कृतिक लिंगभेद नव्हे, हे या स्त्रीवादी भूमिकेने स्पष्ट केले आहे. आपल्या प्रतिपादनात सीमॉन द बोव्हारने ‘ सनातन/ केवल स्त्रीत्व ’ ही संकल्पना नाकारून टोकाची भूमिका घेतली आहे. ही भूमिका तिच्या अस्तित्ववादी विचारसरणीचाच परिपाक म्हणता येईल. स्त्रियांना उपलब्ध असणारे निवडीचे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या जीवनातील निर्णयांची जबाबदारी स्त्रियांनी घेण्याची आवश्यकता, या अस्तित्ववादी-स्त्रीवादी विषयसूत्रांची मांडणी बोव्हारने लँव्हिते (१९४३, इं. भा. शी केम टू स्टे, १९४९) आणि ले माँदारँ (१९५४, इं. शी. ‘ द मँडरिन्स ’ ) ह्यांसारख्या कादंबर्‍यांतूनही केलेली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रीवादी चळवळीला एक सखोल तत्त्वज्ञानात्मक परिमाण बोव्हारच्या द सेकंड सेक्स या ग्रंथामुळे लाभले यात शंकाच नाही.

पाश्चात्त्य देशांत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात स्त्रीवादी साहित्य प्रभावीपणे जोम धरू लागले. या काळात सामाजिक--सांस्कृतिक पार्श्वभूमीवर ‘ घर नावाचे मंदिर आणि त्यातली त्यागी, देवतेसमान असणारी गृहिणी ’ या सांकेतिक स्त्रीप्रतिमेचा उदोउदो चालू होता तेव्हा एलिझाबेथ गॅस्केल (१८१०—६५) तसेच एमिली ब्राँटीशार्लट ब्राँटी या भगिनी आदी स्त्रीलेखिकांनी आपल्या लेखनातून विचार आणि कृती करू पाहणार्‍या स्त्रीचे एकटे अस्तित्व आग्रहाने मांडले. शार्लट गिलमन (१८६०—१९३५) ही स्त्रीवादी लेखिका,व्याख्याती व सिद्धांतकार ह्या काळात जगभर नावाजली गेली. विमेन अँड इकॉनॉमिक्स (१८९८) ह्या तिच्या विख्यात ग्रंथात तिने स्त्रीच्या आर्थिक स्वावलंबनावर व स्वातंत्र्यावर विशेष भर दिला. स्त्रीच्या लैंगिकतेला व मातृत्वाला जास्त प्राधान्य दिले गेल्याने तिच्या सामाजिक व आर्थिक क्षमतांना हानी पोहोचली आहे आणि आर्थिक स्वावलंबन हेच तिला खरे स्वातंत्र्य मिळवून देईल, असे आग्रही प्रतिपादन त्या काळात तिने केले. स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात तिची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे ‘ द यलो वॉलपेपर ’ (१८९९) ही तिची अत्यंत गाजलेली लघुकथा. तिची ही कथा आणि व्हर्जिनिया वुल्फचा ‘ ए रूम ऑफ वन्स ओन ’ (१९२९) हा निबंध म्हणजे स्त्रीवादी साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. स्त्री वा पुरुष असण्यातील निरर्थकता दाखवून, सांकेतिक व साचेबद्ध व्यक्तित्वाच्या समाजमान्य संकल्पना नाकारणारे हे लेखन बंडखोरीचा आद्य आविष्कार घडविणारे आहे.

इंग्रज कादंबरीकर्त्री व्हर्जिनिया वुल्फ (१८८२ —१९४१ ) हिने स्त्रीमुक्तीच्या संदर्भात दोन निबंध लिहिले : ‘ ए रूम ऑफ वन्स ओन ’ आणि ‘ थ्री गिनीज ’ (१९३८). ‘ ए रूम ऑफ  … ’ह्या निबंधात साहित्यिक स्त्रिया आणि कादंबरी ह्यांच्यातील ऐतिहासिक संबंधाचा आढावा तिने घेतला आहे. पितृसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांना दीर्घकाळ उच्च शिक्षणा-पासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे काही क्षेत्रे — उदा., व्यावसायिक लेखन — स्त्रियांना बंद झाली वा प्रवेशास अवघड झाली. आर्थिक पारतंत्र्य, दडपणूक, समाजातला निकृष्ट दर्जा हेही त्यांच्या वाट्याला आले, तथापि असली बंधने दूर होताच, त्याही सर्जनशीलतेची अत्युच्च शिखरे गाठू शकतील, अशी व्हर्जिनियाची धारणा होती. विविध क्षेत्रांतून स्त्रियांना वगळण्याचा पुरुषी कावा असला,तरी त्यामुळे आपली स्वतंत्र राजकीय-सांस्कृतिक अस्मिता सिद्ध करण्याची संधी स्त्रियांना प्राप्त होईल, असे विचार तिने ‘ थ्री गिनीज ’ मध्ये मांडले आहेत. व्हर्जिनियाने पुराणकथांना नव्या स्त्रीवादी दृष्टीने नवे अर्थ देता येतात, हेही सिद्ध केले. स्त्रियांनी आपल्या लेखनात उपरोध, विनोद, विडंबन ही शस्त्रे वापरून पुरुषी व्यवस्थेविषयीचा आपला संताप व विरोध प्रकट करावा असेही तिने सूचित केले, तसेच स्वतःच्या लेखनातही उपहासात्मक विडंबनाचा सूर आळवला.


अमेरिकन स्त्रीवादी समीक्षिका ॲलन शोवॉल्टर हिने स्त्रीवादी समीक्षेचे प्रारंभिक अवस्थेतील आद्य प्रारूप विकसित केले. इंग्रजी वाङ्मयातील उपेक्षित स्त्रीलेखिका शोधून काढून त्यांना समीक्षेतून न्याय दिला. अठराव्या शतकातील ब्रिटिश स्त्री-कादंबरीकारांच्या लेखनपरंपरेचा अभ्यास करताना तिने समाजशास्त्रातील पोटसंस्कृती व वर्चस्ववादी संस्कृतीतील संबंध-रूपाचा आधार घेतला. ब्रिटिश स्त्री-कादंबरीकारांच्या लेखनातून तिला जे तीन प्रवाह दृष्टोत्पत्तीस आले, त्यांचे तिने तीन टप्प्यांत वर्गीकरण केले. केवळ स्त्रियांनी केलेले लेखन ( फीमेल ) पुरुषसत्ताक समाजात गौणत्व स्वीकारून जगणार्‍या स्त्रियांनी त्याबद्दल राजकीय भूमिका न घेता केलेले लेखन ( फेमिनिन ) आणि पुरुषसत्ताक वा लिंगवादी समाज व विचारसरणी यांच्याविरुद्ध ठाम राजकीय दृष्टिकोण स्वीकारून स्त्रियांनी केलेले लेखन ( फेमिनिस्ट ) असे या तीन टप्प्यांचे स्वरूप तिने विशद केले. स्त्रीची विशिष्ट अशी संस्कृती असते. स्त्रियांच्या लेखनातून — त्यांच्या आगळ्यावेगळ्या पृथगात्म अनुभवचित्रणातून त्यांचे आशय-विषय, वाङ्मयीन रूपबंध, आविष्कार-रीती, शैली, भाषा इ. वाङ्मयीन घटकांतून — ही स्त्री-संस्कृती वेगवेगळ्या रूपांत प्रकटत असते. स्त्रीवादी समीक्षा स्त्रियांच्या साहित्याचा जीवशास्त्रीय, भाषिक, मानसशास्त्रीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या दृष्टि-कोणांतून वेध घेऊन त्यातील वेगळेपण अधोरेखित करते. स्त्रियांच्या लेखनाचा असा वेगळा स्वतंत्र विचार करणार्‍या समीक्षेला ॲलन शोवॉल्टरने ‘ गायनोसेंट्रिक फेमिनिस्ट क्रिटिसिझम ’ व समीक्षकाला ‘ गायनोक्रिटिक (स्त्री-समीक्षक ) असे संबोधिले आहे. स्त्रीवादी समीक्षेचा ‘ वाचक स्त्री ( वुमन ॲज अ रीडर ) असा वेगळा घटकही तिने मानला आहे.

स्त्रीवादी भूमिकेतून स्त्रियांच्या लेखनपरंपरेचा इतिहास सिद्ध करण्याचे जे प्रयत्न झाले, त्यांतून एक ‘ स्त्रीकेंद्री ’ साहित्यप्रवाह निर्माण झाला. ॲलन मोअर्सचे लिटररी विमेन (१९७६),ॲलन शोवॉल्टरचे अ लिटरेचर ऑफ देअर ओन (१९७७) आणि सँड्रा गिल्बर्ट आणि सूसान ग्यूबर यांचे द मॅड-वुमन इन द ॲटिक : द वुमन रायटर अँड द नाइन्टीन्थ सेंचरी लिटररी इमॅजिनेशन (१९७९) या तीन पुस्तकांतून प्रामुख्याने ह्या स्त्रीकेंद्री साहित्यप्रवाहाचे दर्शन घडते. स्त्रीवादी लेखनपरंपरा निर्माण करून, स्त्रियांमध्ये ‘ भगिनीभाव ’ निर्माण करून,पुरुषप्रधान संरचनेला हादरवून टाकण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे.

सँड्रा गिल्बर्ट व सूसान ग्यूबर यांनी द मॅडवुमन इन द ॲटिक : द वुमन रायटर अँड द नाइन्टीन्थ सेंचरी लिटररी इमॅजिनेशन या ग्रंथात एकोणिसाव्या शतकातील लेखिकांच्या साहित्याचे विश्लेषण करून स्त्रीवादी काव्य-शास्त्राची ( फेमिनिस्ट पोएटिक्स ) मांडणी करणारे विवेचन केले. पुरुषांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये दडपशाही करून स्त्रियांची मुस्कटदाबी केली आहे. या पुरुषी अत्याचाराला स्त्रियांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या प्रतिक्रिया व त्यामागची मानसिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी तार्किक अनुबंध ( मॉडेल ) तयार करणे,हे स्त्रीवादी काव्यशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट या लेखिकांनी मानले. गिल्बर्ट व ग्यूबर यांना इंग्रजी लेखिकांच्या साहित्यकृतींत दबलेल्या रागाचा स्फोट करणार्‍या स्त्री व्यक्तिरेखा बर्‍याच आढळल्या. ‘ मॅडवुमन ’ म्हणजे विद्रोह करणारी, उद्वेगाने सर्व उद्ध्वस्त करायला निघालेली स्त्री. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत उपेक्षित व एकाकी अवस्थेत जगणार्‍या व शेवटी संतप्त होऊन स्वतःलाच पेटवून घेणार्‍या स्त्रिया किंवा घरे, प्रार्थनास्थळे मोडून-तोडून टाकायला निघालेल्या स्त्रिया ही ‘ मॅडवुमन ’ ची रूपे केवळ स्त्रीवादी साहित्यातच दिसतात, असे गिल्बर्ट–ग्यूबर यांचे प्रतिपादन आहे. लेखिका बनू पाहणार्‍या स्त्रीला एकोणिसाव्या शतकातील पितृसत्ताक व पुरुषप्रधान समाजचौकटीमध्ये वेडसर मानले जाई, असा त्यांचा दावा होता. त्या दृष्टीने त्यांनी पुस्तकाला दिलेले शीर्षक मॅडवुमन  इन द ॲटिक …… ( पोटमाळ्यावरील वेडी ) हे पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील स्त्रियांचे उपेक्षित दुय्यम स्थान व संतप्त विद्रोह यांचे प्रतीक ठरते.

पाश्चात्त्य देशांत स्त्रीमुक्ती चळवळ वेगाने फोफावली व तिचाच एक भाग असलेली स्त्रीवादी साहित्यसमीक्षा वेगवेगळ्या अंगोपांगांवर भर देत विकास पावली. उदा., इंग्रजी स्त्रीवादी समीक्षेने स्त्रियांच्या शोषणावर भर देऊन मार्क्सवादी दृष्टिकोण स्वीकारला. फ्रेंच स्त्रीवादी समीक्षेने विरचनावादी पद्धती स्वीकारून मुख्यत्वे भाषिक अंगाने स्त्रीवादी साहित्याचा वेध घेतला तसेच मानसशास्त्रीय भूमिकेतून स्त्रीवादी साहित्यातून प्रकटणार्‍या स्त्रीच्या मानसिक कोंडमार्‍याचे, परवशतेचे विश्लेषण केले. अमेरिकन स्त्रीवादी समीक्षेने पाठचिकित्सक पद्धतीवर भर देऊन स्त्रियांच्या वाङ्मयीन आविष्कारांचा शोध घेतला. हे सर्व प्रकार स्त्री साहित्याचा स्त्रीवादी भूमिकेतून अभ्यास करणारे आहेत. केट मिले, बेट्टी फ्रीडन, जर्मेन ग्रीअर या लेखिकांनी समाजातील सांस्कृतिक घटकांचा अन्वयार्थ लावून समकालीन सामाजिक स्थितीतील स्त्रियांच्या सांस्कृतिक कुचंबणेचा व दडपणुकीचा अर्थ स्पष्ट केला, पुरुषप्रधान व पितृसत्ताक व्यवस्थेचे त्यामागचे राजकारण स्पष्ट केले आणि ही पुरुषी सांस्कृतिक दडपशाही नष्ट करण्यासाठी स्त्रीवादी समीक्षेची आवश्यकता प्रतिपादन केली. इंग्लंडमध्ये मेरी वुलस्टोन क्राफ्ट (१७५९—९७)हिनेथॉट्स ऑन द एज्युकेशन ऑफ डॉटर्स (१७८७) आणि अ व्हिंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ विमेन (१७९२ ) ही पुस्तके तसेच मेरी : अ फिक्शन (१७८८) ही कादंबरी लिहून शैक्षणिक व सामाजिक पातळीवर स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व प्रतिपादन केले. मेरी वुलस्टोन क्राफ्ट-पासून बेट्टी फ्रीडन (१९६० चे दशक ) पर्यंतच्या स्त्रीवादी चळवळीच्या मागण्यांना उदारमतवादी बैठक आहे. बेट्टी फ्रीडनचे फेमिनिन मिस्टिक (१९६३ ‘स्त्रीभावाचे गूढ’) हे पुस्तक नव्या स्त्रीवादी चळवळीसाठी पायाभूत मानले जाते. १९७० सालापर्यंत ही चळवळ स्थिरावली. केट मिलेटच्यासेक्शुअल पॉलिटिक्स (१९७७ ‘लैंगिकतेचे राजकारण’) या पुस्तकात मान्यवर पुरुषलेखकांच्या साहित्यकृतींतून स्त्रीप्रतिमांचे साचेबद्ध, सांकेतिक चित्रण कसे केले जाते, ह्याचे धारदार विश्लेषण केले आहे. हे पुस्तक जहाल स्त्रीवादी विचारसरणीचा प्रारंभबिंदू मानले जाते. जर्मेन ग्रीअरचे द फीमेल यूनक हे पुस्तकही सामाजिक-सांस्कृतिक स्त्रीवादी समीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचे मानले जाते.

स्त्रीवादी फ्रेंच लेखिका जुलिया क्रिस्तेवा (१९४१) हिच्या मते बाई किंवा स्त्री या शब्दाची रूढ व्याख्या स्वीकारणे आणि आपण बाई किंवा पुरुष आहोत हे मान्य करणे, ह्यातच एक प्रकारची अर्थशून्य विसंगती ( ॲब्सर्डिटी ) आहे. स्त्रियांचे स्थान परिघावर असते, अशी मांडणी पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेच्या आधारेच केली जाते म्हणून ही मूल्यव्यवस्था उलथवून टाकण्याचे प्रयत्न करणारे साहित्यच स्त्रीवादी साहित्य मानले पाहिजे, अशी टोकाची आग्रही भूमिका घेतली जाते. क्रिस्तेववादी विचारसरणीनुसार अस्मिता व अस्मितेचे राजकारण हे संशयास्पद आहे. मूलतः बाईपणा व त्यातून लिहिले गेलेले साहित्य असे काही नसतेच. क्रिस्तेवाने मुलाच्या भाषापूर्व अवस्थेत आईवर पूर्णपणे निर्भर असण्याच्या टप्प्याला ‘सेमिऑटिक’ ( अव्यक्त ) भाषा आणि नंतरच्या समाजात तो मिसळल्यानंतरच्या टप्प्याला ‘ सिंबॉलिक ’ ( व्यक्त ) भाषा अशा संज्ञा वापरल्या आहेत. या संकल्पना तिने व्यक्तिमत्त्वाशी जोडल्या आहेत.

सेमिऑटिकचा संबंध स्त्री-व्यक्तिमत्त्वाशी व मातृत्वाशी असतो, तर सिंबॉलिकचा संबंध पितृत्वाशी, जाणिवेशी, दमनाशी असतो. क्रिस्तेवाच्या मते स्वतःचे वेगळे अस्तित्व जोपासणार्‍या स्त्रिया सिंबॉलिक-सेमिऑटिक भाषेचा समन्वय साधतात पण ज्यांना सेमिऑटिक भाषाच ( किंवा अंतर्मनाची साद ) महत्त्वाची वाटते, त्या वेगळा मातृसत्ताक समाज निर्माण करण्याचा आग्रह धरतात. साहित्याच्या भाषेचे रूपच सेमिऑटिक प्रेरणांसाठी योग्य ठरत असल्याने त्या व्यक्त करताना पुरुषांपेक्षा स्त्रियाच अधिक भावनोत्कट होण्याची शक्यता असते, असे क्रिस्तेवा म्हणते. ‘ आंतर-संहितात्मकता ’ ( इंटरटेक्श्‍चुॲलिटी ) ही संज्ञा वापरून क्रिस्तेवा सुचवते, की ‘ सिंबॉलिक ’ आणि ‘ सेमिऑटिक ’ अशा दोन्ही रचनांचा, भाषांचा वापर स्त्रियांनी तारतम्याने केला पाहिजे. विशेषतः आत्मटीकेची किंवा उपहासाची भाषा लेखिका त्यासाठी वापरू शकतात. भावनातिरेका-पेक्षा स्त्रियांच्या साहित्यात उपरोध, विडंबन, विषादगर्भ विनोद ( ब्लॅक ह्यूमर ) यावा, असे क्रिस्तेवा सुचवते. थोडक्यात, समाजातील माणसांशी जुळवून घ्यायची, समाजाच्या नीतिनियमांची भाषा ही सिंबॉलिक तर स्त्रीची एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःच्या मनाची, शरीराची भाषा ही सेमिऑटिक अशा प्रकारचे भाषिक प्रतिमान क्रिस्तेवाने स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात सुचवले आहे व या दोन्ही भाषांचा समन्वय स्त्रीवादी साहित्यात साधला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

स्त्रीजातीवर झालेल्या जुलूमाच्या कारणांची मीमांसा करताना व स्त्रीवरील अन्यायाचा परिहार करण्याचे उपाय सुचविताना स्त्रीवादी विचारवंतांनी विविध दृष्टिकोण स्वीकारले आहेत,त्यामुळे स्त्रीवादी विचारसरणींचे विविध प्रवाह निर्माण झाले. त्यांची मांडणी करून या प्रवाहांचे वर्गीकरणही गेल येट्स, ॲलिसन यागर व जॉन शॉर्वेट या स्त्रीवादी विचारवंतांनी केले आहे. यांतील काही प्रमुख प्रवाह असे : उदारमतवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, समाजवादी स्त्रीवाद आणि कृष्णवर्णीय स्त्रीवाद. ह्या विविध स्त्रीवादी प्रवाहांचे प्रतिबिंब स्त्रीवादी साहित्य व समीक्षेत वेळोवेळी उमटले आहे. त्यांपैकी उदारमतवादी व जहाल स्त्रीवादी विचारधारांविषयीचे विवेचन आधी येऊन गेलेच आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद जगातल्या सर्व कामगारांप्रमाणेच स्त्रियांनीही एकत्र यावे, असे आवाहन करतो. ‘ भगिनी-भाव ’ ही संकल्पना मार्क्सवादी, समाजवादी स्त्रीवादातून आली आहे. भगिनीभावाचा पुरस्कार अनेक स्त्रीवादी साहित्यकृतींत आढळतो. कृष्णवर्णीय स्त्रीवादी जाणीव यूरोप-अमेरिकेत १९७० च्या दशकाखेरीस विकसित होऊ लागली. गौर स्त्रीवादी जाणीव कृष्णवर्णीय स्त्रीला सामावून घेऊ शकत नाही, या अभावात्मक धारणेतून कृष्णवर्णीय स्त्रीवाद विकसित झाला. कृष्णवर्णीय स्त्री ही वंश, वर्ग व लिंगभाव या तिन्हींचा बळी आहे हे भान ठेवून लिंगभावाविरुद्ध लढताना वंशवाद निपटून टाकण्यासाठीही लढले पाहिजे, असे या विचारसरणीचे सार आहे. मराठी साहित्यातील दलित स्त्रीवादी जाणिवेचा प्रवाहही असाच विविध पातळ्यांवरील विषमतेविरुद्धच्या संघर्षातून विकसित होताना दिसतो आहे. या सैद्धांतिक पार्श्वभूमीवर ‘ भारतीय स्त्रीवाद ’ अशी वेगळी संकल्पना विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत.


 आज पाश्चात्त्य देशांतील स्त्रिया कलावंत म्हणून आपल्या बाईपणातून वेगळे शहाणपण, आत्मशक्ती गवसल्याचा दावा करीत आहेत. त्यात ‘ कृष्णवंशीय ’ स्त्रियांच्या लेखनाने फार मोलाची भर घातली आहे. 

 

 भारतातील स्त्री-लेखनाची परंपरा जाणीवपूर्वक एकत्र आणून, भारतीय स्त्रियांच्या लेखनाचा इतिहास निर्माण करण्याचा स्त्रीवादी प्रयत्न विमेन रायटिंग इन इंडिया ६०० बी. सी. टू द प्रेझेंट खंड १  व २ (१९९२-९३) या ग्रंथाने केला. विविध कालखंडांत स्त्रियांनी लिहिलेले तेरा भारतीय भाषांतील १४० साहित्यिक वेचे त्यात आहेत. त्यातून अगदी बुद्धकालीन थेरीगाथांपासून भक्तिकाळातील स्त्रियांचे लेखन, आधुनिक काळातील स्त्रियांची चरित्रे, आत्मचरित्रे व वर्तमानकालीन बंडखोर लेखन एकत्र सापडते. प्रस्थापित पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेचा प्रतिकार करणारे वा ती उलथवून टाकण्याची शक्यता व शक्ती दाखवून देणारे विपुल व वैविध्यपूर्ण स्त्री-साहित्य भारतीय भाषांमध्ये दिसते. 

 

 स्त्रीवादी मराठी साहित्य : मराठी साहित्यात साधारणतः १९६० नंतरच्या दशकांत स्त्रीवादी साहित्य जाणीवपूर्वक लिहिले जाऊ लागले आणि सत्तर-ऐंशीच्या व नंतरच्या दशकांतही स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह काव्य, कथा, कादंबरी अशा प्रकारांत जोमाने विकसित होऊ लागला. मात्र तत्पूर्वीही स्त्रीकेंद्री साहित्याची निर्मिती अगदी प्राचीन काळापासून मौखिक वा लिखित स्वरूपात होत होती, असे दिसून येते. स्त्रियांच्या साहित्याचे मूळ प्राचीन काळापर्यंत जाऊन पोहोचते. स्त्री आपल्याशीच किंवा आपल्यासारख्याच दुसरीशी चाललेल्या संवादातून‘बाई असण्याचा , ‘ बाईपणाचा ’ अर्थ व्यक्त करीत आली आहे. मराठी लोकगीतां त हा स्त्रीत्वाचा स्वर सतत ऐकू येतो. अन्याय, बंधने, शिक्षा, दंड, तक्रार, शोषण, पुरुषांकडून मिळणारी अन्यायकारक व अपमानास्पद वागणूक, सततची अवहेलना व उपेक्षा, अपाय, इजा, आपल्याकडून चूक वा अपराध घडेल का ह्याची स्त्रीला वाटणारी धास्ती इ. स्त्रियांच्या अनु-भवविश्वाच्या कक्षेतील अशा अनेक भावना आणि तथ्ये त्यांनी लोकवाङ्मयातून शब्दांकित केलेली दिसतात. समाजाने दुर्लक्षित केलेले हे वाङ्मय स्त्रीवादी समीक्षकांनी शोधून त्यावर नवा प्रकाश टाकला आहे. मराठीत तारा भवाळकर, कुमुद पावडे, सरोजिनी बाबर इत्यादींनी लोकगीतांचे संशोधन केले आहे. 

 

 महाराष्ट्रातील महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई इत्यादींनी तसेच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक इ. लेखिकांनी ललित व वैचारिक पातळीवर स्त्री-पुरुष विषमतेचे, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे, तसेच स्त्रियांवरील अन्याय, जुलूम, शोषण व त्यांतून स्त्रियांना भोगावी लागणारी दुःखे, वेदना यांचे  प्रभावी चित्रण केले. 

 

 एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुषतुलना ह्या ग्रंथात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत स्त्रियांच्या होत असलेल्या  शोषणाविरुद्ध लिहून, स्त्रीशोषणाचे विश्लेषण करणारी सैद्धांतिक मांडणी केली. मालतीबाई बेडेकर म्हणजेच विभावरी शिरूरकर यांच्या लिखाणातही ( हिंदोळ्यावर, १९३४ — कादंबरी ) पुरुषाकडून स्त्रीच्या  शारीरिक व मानसिक पातळीवर होत असलेल्या शोषणाची जाणीव व्यक्त झाली आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘ भरली घागर ’ कवितेत स्त्री-पुरुष भेदावर भाष्य आहे, तर स्मृतिचित्रे ( ४ भाग१९३४,१९३५, १९३६ ) मध्ये विनोदाच्या, उपरोधाच्या अंगाने स्त्री-पुरुष विषमतेचे चित्रण आहे. व्हर्जिनिया वुल्फचा सिद्धांत — स्त्रियांनी उपरोध, विनोद ही शस्त्रे वापरून आपल्या व्यथा,शोषण,अन्याय यांना वाचा फोडावी — इथे मराठीत प्रत्यक्षात आला आहे. अलीकडच्या काळात मंगला गोडबोले यांच्या लिखाणातही पुरुषप्रधान व्यवस्थेतील रूढी, परंपरांचा निषेध करताना विनोद, उपरोध यांचा वापर केला आहे. 

 

 विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यात कमल देसाई, गौरी देशपांडे, शांता गोखले, कविता महाजन, प्रिया तेंडुलकर, सानिया ( सुनंदा कुलकर्णी ), मेघना पेठे, नीरजा यांच्या कथा कादंबर्‍यांनी मोलाची भर घातली आहे. कमल देसाईंच्या काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई (१९७५) या कादंबरीत प्राचीन मिथ्यकथांना नवे स्त्रीवादी अर्थ दिले आहेत. काळा सूर्य या कादंबरीची नायिका शेवटी गावातील पुरातन मंदिर तोडून टाकते आणि स्वतःही मरते. हे गिल्बर्ट-ग्यूबरच्या ‘ मॅडवुमन ’ प्रतिमेचे मराठीतील उदाहरण म्हणता येईल. अरुणा ढेरे, गौरी देशपांडे, श्यामला वनारसे यांनी त्यांच्या साहित्यकृतींतही प्राचीन पुराणकथांचे स्त्रीवादी दृष्टि-कोणातून नवे अन्वयार्थ लावले आहेत. गौरी देशपांडे यांच्या कथा--कादंबर्‍यांत स्वतंत्र, मुक्त, प्रगल्भ स्त्रीची अनेक रूपे आढळतात. स्त्रीवादी दृष्टिकोणातून स्त्रियांचे अनेक प्रश्न व जाणिवा यांची  अभिव्यक्ती, पुरुषसत्ताक व्यवस्था व पुरुषी मानसिकता यांची उपरोधपूर्ण टिंगलटवाळी, करिअरला प्राधान्य देणार्‍या स्त्रीच्या समस्या व व्यथा यांचे प्रभावी चित्रण ही त्यांच्या स्त्रीवादी साहित्याची ठळक वैशिष्ट्ये होत. शांता गोखले यांच्या रीटा वेलिणकर या कादंबरीची मानसशास्त्रीय तसेच समाजशास्त्रीय स्त्रीवादी भूमिकेतून चिकित्सा करता येते. स्त्रीवादातील ‘ भगिनीभाव ’ या संकल्पनेचा पुरस्कार करणारी ही कादंबरी आहे. आशा बगे यांची भूमी ही कादंबरी, तसेच प्रिया तेंडुलकरांच्या कथा ( ज्याचा त्याचा प्रश्न व जन्मलेल्या प्रत्येकाला (१९९१) हे कथासंग्रह ) यांचे मूल्यमापन भारतीय स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून करता येते. कविता महाजन यांची ब्र ही कादंबरी भारतीय व समाजशास्त्रीय अशा द्विविध स्त्रीवादी दृष्टिकोणांतून अभ्यासता येते. मेघना पेठे यांच्या लिखाणात ( हंस अकेला — कथासंग्रह वनातिचरामि ही कादंबरी ) मुक्त जीवनपद्धती, बिनधास्त जीवनशैली यांचा पुरस्कार आढळतो. नीरजा ह्या अलीकडच्या स्त्रीवादी साहित्यप्रवाहातील एक प्रमुख व महत्त्वाच्या कवयित्री व कथाकार ( ओल हरवलेली माती — कथासंग्रह ) असून, स्त्रीवादी जाणिवांचे विविध पैलू त्यांनी वास्तववादी, चिंतनशील पद्धतीने व्यक्त केले आहेत. 

 

साठोत्तरी कालखंडात, १९७०—८० च्या दशकांत व नंतरच्या काळातही काव्यनिर्मिती करणार्‍या अनेक कवयित्रींनी स्त्रीवादी काव्याचे दालन समृद्ध केले आहे. त्यांतील काही प्रमुख कवयित्री अशा : अनुराधा पाटील, रजनी परुळेकर, मलिका अमर शेख, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, कविता महाजन, आसावरी काकडे, सिसिलिया कार्व्हालो इत्यादी. स्त्रीत्वाचे, स्त्रीवादी जाणिवेचे, स्त्रीच्या विशिष्ट अनुभव-विश्वाचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, भिन्न भिन्न स्वरूपाचे चित्रण त्यांच्या कवितांत आढळते. व्यक्तिनिष्ठ तसेच सामाजिक-सांस्कृतिक वास्तवाचे थेट चित्रण करणार्‍या या कविता स्त्रीत्वाचा आत्मभानयुक्त स्वर आळवणार्‍या आहेत. बाईचे सामर्थ्य व अनेकविध क्षमतांच्या शक्यता सूचित करणार्‍या भविष्यवेधी कविता काही कवयित्रींनी लिहिल्या आहेत. बाईतील अपार करुणा, तिची सर्जनशीलता, नवनिर्मितीची क्षमता ही तिची बलस्थाने अनेक कवितांतून व्यक्त झाली आहेत. १९८०—९० च्या दशकांत स्त्रीवादी जाणिवेच्या काव्याचा प्रवाह लक्षणीय होता. स्त्रीकेंद्री काव्यलेखनाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढतच गेले.

 

 स्त्रियांच्या आत्मकथनांनी स्त्रीवादी साहित्यात मोलाची भर घातली आहे. उदा., सुनीता देशपांडे यांचे आहे मनोहर तरी (१९९०), कमल पाध्ये यांचे बंध अनुबंध ही आत्मकथने उल्लेखनीय आहेत.

 

 दलित स्त्रियांची आत्मकथने ही स्त्रीवादी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. बेबी कांबळे ( जिणे आमचे ), कुमुद पावडे ( अंतःस्फोट ), शांताबाई कांबळे ( माज्या जलमाची चित्तरकथा ), मुक्ता सर्वगौड ( मिटलेली कवाडे ), ऊर्मिला पवार ( आयदान ), सिंधुताई सपकाळ ( मी वनवासी ) इत्यादींचे स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात महत्त्वाचे योगदान आहे. भारतीय व समाजशास्त्रीय अशा दुहेरी स्त्रीवादी भूमिकांतून त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.

 

पहा : स्त्रीमुक्ती आंदोलन स्त्रीवाद स्त्रीवादी साहित्य समीक्षा.

 

संदर्भ : 1. Buck, Claire, Ed. Bloomsbury Guide to Womens Literature, London, 1992.

           2. Gilbert, Sandra Gubar, Susan, The Norton Anthology of Literature by Women, New York, 1985.

           3. Moi,Toril, Sexual / Textual Politics : Feminist Literary Theory, Methuen, 1985.

           4. Tharu, Susie K. Lalita, Eds. Women Writing in India : 600 B. C. to the Present,Vol. I &amp II, New York, 1990 1993.   

           ५. नाईक, शोभा, भारतीय संदर्भातून स्त्रीवाद, मुंबई, २००७.

           ६. बोव्हार, सीमॉन द अनु. गोखले, करुणा, द सेकंड सेक्स, पुणे, २०१२ .

           ७. भागवत, विद्युत, स्त्रीजन्माची वाटचाल, पुणे, २ ००४.

          ८. मेश्राम, केशव, संपा. वाङ्मयीन प्रवृत्ती : तत्त्वशोध  ड्ढडॉ. दादा गोरे गौरवग्रंथ  पुणे, २००७.

          ९. वरखेडे, मंगला, संपा. स्त्रीवादी समीक्षा : संकल्पना व उपयोजन, धुळे, १९९९.

        १०. सारडा, शंकर, स्त्रीवादी कादंबर्‍या, पुणे, १९९३.

 

 इनामदार, श्री. दे. भागवत, विद्युत