रायचौधरी, हेमचंद्र : (६ एप्रिल १८९३ – ४ मे १९५७). भारतीय धर्म, संस्कृती आणि इतिहास ह्यांचे गाढे अभ्यासक. बंगालमधील बारिसाल जिल्ह्यातील पोनाबालिया (आता बांगला देशात) येथे जन्म झाला. १९०७ साली बारिसाल व्रजमोहन इन्स्टिट्यूटमधून ते प्रवेशपरीक्षा (एन्ट्रन्स एक्झॅमिनेशन) उत्तीर्ण झाले आणि १९११ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी परीक्षेत सर्वांत जास्त गुण मिळवून त्यांनी ‘ईशान स्कॉलर’ हा मान मिळविला. कलकत्ता विद्यापीठाच्या एम्. ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत प्रथम स्थान त्यांनी मिळविले (१९१३). संशोधनपर ग्रंथाला दिला जाणारा ग्रिफिथ पुरस्कार त्यांना १९१९ मध्ये मिळाला. १९२१ साली ते पीएच्. डी. झाले. १९१३ साली बंगवासी कॉलेजात ते अध्यापन करू लागले. त्यांच्या प्राध्यापकीय जीवनाची ही सुरुवात होती. त्यानंतर बंगालच्या शिक्षण सेवेत (बेंगॉल एज्यूकेशनल सर्व्हिस) समाविष्ट होऊन प्रथम प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आणि चट्टग्राम सरकारी महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. पुढे डाक्का विद्यापीठात ते इतिहासाचे प्रपाठक आणि विभागप्रमुख झाले.

कलकत्ता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती ह्या विषयांचे ते कारमायकेल प्राध्यापक होते (१९३६ – ५२). १९५२ साली ते निवृत्त झाले. त्यांच्या विद्वन्मान्य ग्रंथांत पोलिटिकल हिस्टरी ऑफ एन्शंट इंडिया (१९२३), स्टडीज इन इंडियन ॲटिक्विटीज (१९३२), ग्राउंडवर्क ऑफ इंडियन हिस्टरी (दुसरी आवृ. १९३३) इत्यादींचा समावेश होतो. १९४६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि इतिहासाच्या अभ्यासकांना प्रमाणभूत असलेल्या ॲन ॲड्व्हान्स्ड हिस्टरी ऑफ इंडिया (१९४६) ह्या ग्रंथाच्या लेखनात आर्. सी. मजुमदार आणि कालिकिंकर दत्त ह्यांच्याप्रमाणे रायचौधरी ह्यांच्याही सहभाग असून इतिहासाच्या अभ्यासकांनी हा ग्रंथ प्रमाणभूत मानलेला आहे. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

कोपरकर, द. गं.