बाँइस, सिरील : (२१ सप्टेंबर १८५९ – २६ जुलै १९३२). फ्लेमिश कादंबरीकार. घेंटजवळच्या नेव्हल येथे जन्म. फ्लेमिश कुटुंबातील सुखवस्तू मुलांना मिळणारे फ्रेंच भाषेचे शिक्षण त्यालाही मिळाले होते.‘द राइट ऑफ द स्ट्राँगेस्ट’ (१८९३, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. शेतमजुरांच्या दुःखमय जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण तीत केले आहे. विख्यात फ्रेंच साहित्यिक एमिल झोला ह्याच्या निसर्गवादी लेखनतंत्राचा प्रभाव ह्या कादंबरीवर दिसून येतो. त्याच्या पुढील लेखनातून त्याचे समाजवादी विचार स्पष्टपणे प्रत्ययास येतात. फ्लेमिश साहित्याच्या विकासार्थ ‘टुडे अँड टुमॉरो’ (इं. शी.) हे एक नियतकालिकही त्याने चालविले होते.

बॉइसने काही नाटकेही लिहिली आहेत.‘द पेमेल फॅमिली’ (१८९३, इं. शी.) आणि ‘द सबस्टिट्यूट मॅजिस्ट्रेट’ (१८९५, इं. शी.) ह्या त्याच्या उल्लेखनीय नाट्यकृतींपैकी काही होत. ड्यूरल (बेल्जियम) येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.