लसीका तंत्र : पृष्टवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये द्रव पदार्थाच्या अभिसरणाची, रक्तवाहिन्यांना समांतर अशी विकसित झालेली प्रणाली म्हणजे लसीका तंत्र होय. रोगप्रतिकारक्षमता यंत्रणेशी घनिष्ठ संबंध असलेल्या या तंत्रामध्ये लसीका कोशिकांइतकाच (पेशींइतकाच) महाभक्षिकोशिकांच्या (सूक्ष्मजंतू आणि इतर परकी कणांचे भक्षण व पाचन करणाऱ्या कोशिकांच्या) कार्याचाही सहभाग व ⇨जालिका-अंतःस्तरीय तंत्रामध्येही लसीकाभ ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांची) उपस्थिती या कारणांमुळे या तंत्राला लसीका-जालिकीय इंद्रिये असेही म्हणतात. त्याचप्रमाणे महाभक्षिकोशिका तंत्र अथवा एककेंद्रकी (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा एकच जटिल गोलसर पुंज असलेल्यांचे) भक्षिकोशिका तंत्र या रोगप्रतिकराक्षमतेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाचा लसीका तंत्रासह अंतर्भाव करून या सर्वांना मिळून ‘रोगप्रतिकारक्षमता-कोशिका जटिल’ असेही नाव दिले जाते. प्रस्तुत नोंदीत वर्णन केलेल्या लसीका तंत्रामध्ये मुख्यत्वे पुढील तीन घटक आहेत : (१) लसीकावाहिन्या, (२) लसीका ग्रंथी, (३) लसीकाभ उतक व चल (किंवा अभिसारी) लसीका कोशिका.

इटालियन शारीरविज्ञ गास्पारो असेल्लौ (१५८१-१६२५) यांनी प्रथम कुत्र्याच्या आंत्रयुजेतील (आतड्याच्या आधारातील) दुधी रंगाच्या वाहिन्या दाखविल्या. तेव्हापासून लसीका तंत्राची माहिती गोळा होऊ लागली. १८८५ मध्ये व्हाल्टर फ्लेमिंग या जर्मन शारीरविज्ञांनी लसीका ग्रंथीतील जनन केंद्रांचे वर्णन केले [⟶ लसीका ग्रंथि]. या तंत्रासंबंधीचे भ्रूणविज्ञान मात्र बऱ्याच उशिरा म्हणजे विसाव्या शतकामध्येच पुढे मांडले गेले व ते अजूनही इतर तंत्रांच्या तुलनेने अपूर्ण आहे.

स्थूल रचना : रक्तवाहिन्यांच्या शाखाविन्यासामध्ये शेवटची पायरी म्हणजे केशवाहिन्या (किंवा केशिका) त्या जिथे रोहिणी व नीलांच्या मध्ये दुवा साधतात, तेथे ऊतकातील आंतरकोशिकीय द्रवात लसीका कोशिकांची सुरुवात होते. रक्तवाहिन्यांच्या कोशिकांमधून ऊतकात आलेल्या द्रवाचा (म्हणजेच कोशिकाबाह्य द्रवाचा) जो अंश नीलांमधून परत रक्तामध्ये शोषला जात नाही तो लसीका-सूक्ष्मवाहिन्यांच्या जाळ्यात प्रवेश करतो व तेथून केंद्रगामी वाहिन्यांतून मोठ्या वाहिन्यांकडे प्रवास करतो. सर्वांत मोठी वाहिनी शेवटी मानेतील अनामिकनीलेतील लसीका द्रव सोडते. वाहिन्यांच्या मार्गात ठिकठिकाणी लसीका ग्रंथींमधून लसीका गाळली जाते व लसीका कोशिकांची भर लसीकेत पडते.

या स्थूल रचनेपर्यंत विकसित होताना प्राण्यांच्या लसीका तंत्रात होणारी प्रमुख स्थित्यंतरे म्हणजे लसीका हृदये, वाहिन्यांमधील झडपा, वाहिन्यांची एकमेकांशी जुळणी, महावाहिन्यांची निर्मिती, जागजागी लसीकाभ ऊतकांचा उद्‌भव व त्यांचे लसीका ग्रंथीमध्ये रूपांतर ही होत.

तुलनात्मक शारीर : प्राणिसृष्टीतील कॉर्डेटा संघातील पृष्ठवंशी उपसंघाशिवाय इतरत्र लसीका तंत्राचा आढळ दिसत नाही. लसीका कोशिकांशी साम्य असलेल्या काही कोशिका वलयी कृमी व मॉलस्का (मृदुकाय) संघातील प्राण्यांमध्ये वर्णिलेल्या आहेत परंतु अशा कॉर्डेटा संघाखेरीज इतर प्राण्यांत रक्तवाहिन्या व लसीकावाहिन्यांमधील भेद ओळखणे अशक्य असल्याने त्यांचे नक्की स्वरूप सांगणे कठीण आहे. एकाच ऊतकजनक कोशिकासमूहापासून या दोन प्रकारच्या वाहिन्या कॉर्डेटा संघात विकसित झाल्या असणे शक्य आहे. या संघातील अँफिऑक्सस प्राण्यांसारख्या खालच्या उपसंघातील (सेफॅलोकॉर्डेटा) प्राण्यात रक्तवाहिन्यांच्या भोवती व इतरत्र काही लसीकावाहिन्या दिसतात. पृष्ठवंशीमध्ये मात्र खोल व पृष्ठस्थ असे लसीकावाहिन्यांचे दोन गट नीलांसमवेत स्पष्टपणे आढळतात. मत्स्य वर्गामध्ये या तंत्राच्या विकासाच्या निरनिराळ्या अवस्था पहायला मिळतात.

 आ.१. टेलिऑस्ट माशाच्या शेपटीतील लसीका हृदय : (१) नीला कोटर, (२) लसीकावाहिनी, (३) निलय, (४) अलिंद, (५) लसीका वाहिनी, (६) लसीका कोटर. मुशी या इलॅत्मोब्रँकिआय उपवर्गातील माशात नीलांच्या समवेत असलेल्या लसीकावाहिन्यांशिवाय महारोहिणीला समांतर असे एक दोन मोठे लसीकामार्ग दिसतात. मानवातील महावाहिनीशी त्यांची तुलना होऊ शकेल. टेलिऑस्ट माशात वाहिन्यांमध्ये झडपा नसतात परंतु लसीकावहनासाठी लसीका हृदय नावाचे स्पंदनशील इंद्रिय असते. लसीकाभ ऊतकांचे पुंज प्रामुख्याने श्लेष्मकलांच्या (बुळबुळीत पातळ पटलांच्या) जवळ असतात. जनन केंद्रांच्या अभावामुळे त्यांना लसीका ग्रंथी म्हणता येणार नाही. शार्क माशांमध्ये असेच ऊतकसमूह अन्ननलिकेच्या बाजूने जठरापर्यंत पसरलेले आढळतात. त्यांना फ्रांट्स फोन लायडिख या जर्मन शारीरवज्ञांच्या नावावरून लायडिख इंद्रिय असे नाव मिळाले आहे. यामध्ये रक्तातील सर्व श्वेतकोशिकांची निर्मिती करणाऱ्या स्कंधकोशिका आढळतात.

उभयचर (जमिनीवर आणि पाण्यातही राहणाऱ्या) प्राण्यांमध्ये (उदा., बेडूक) लसीकावाहिन्यांचा विस्फार होऊन बनलेले कोश आणि त्यांच्या सन्निध लसीकाभ ऊतक अशी लसीका ग्रंथीच्या क्रमविकासाची (उत्क्रांतीची) सुरुवातीची अवस्था पहायला मिळते. शिवाय त्वचेखाली पसरलेली लसीका कोटरे आर्द्रता टिकवून धरण्याचे कार्य करतात.

सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांमध्ये लसीका तंत्राचा विकास जास्त चांगला होऊन, मगरीमध्ये लसीका ग्रंथीही आढळतात.

पक्षी वर्गातील रचना बरीचशी स्तनींप्रमाणेच आढळते पण वाहिन्यांची संख्या थोडी कमी असते. श्वसन व पचन मार्गांमध्ये लसीकाभ ऊतक विकीर्ण (पसरलेले) व ग्रंथिभूत अशा दोन्ही स्वरूपांत दिसते. घशातील गिलायू (टॉन्सिल), बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) सुरुवातीस अंधनाल (खालच्या बाजूला बंद असलेली पिशवीसारखी रचना), पचनमार्गाच्या पश्चभागातील अंघवर्ध (पिशवीसारखा भाग) असा निघालेला फाब्रिसिअस स्यून व उरस्थ ⇨ यौवनलोपी ग्रंथी ही लसीका कोशिकांची महत्त्वाची केंद्रे बऱ्याच पक्ष्यांमध्ये दिसून येतात. भ्रूणावस्थेत सर्व पक्ष्यांमध्ये लसीका हृदयासारखी इंद्रिये आढळत असली, तरी पुढे ती लोप पावतात. हंस व शहामृगासारख्या काही पक्षांत ती ठळकपणे टिकून राहतात.


 सस्तन प्राण्यांमध्ये लसीका ग्रंथींची संख्या, आकारमान, आकार व रचना यांत विविधता आढळते. वाहिन्यांची मांडणी पृष्ठस्थ व खोल (अधस्त्वचीय पातळीच्याही खाली) अशा दोन स्तरांत विभागलेली दिसते. त्या अनुक्रमे नीलांच्या व रोहिण्यांच्या बरोबर जातात. रक्तप्रवाहाच्या स्पंदनामुळे लसीका वाहण्यास मदत होते. सर्वत्र झडपा असल्याने उलट दिशेने म्हणजे हृदयाकडून परिघीय दिशेने लसीका वाहू शकत नाही. वाहिन्यांच्या दोन स्तरांमध्ये व काही ठिकाणी नीलांशी जोडणी आढळते. मानवी शरीराच्या खालच्या भागातील अनेक वाहिन्या एकत्र येऊन पृष्ठवंशाच्या पुढे कटिमधील पहिल्या दोन मणक्यांच्या पातळीवर पयोलसाशय नावाची संचयी वाहिनी तयार होते. तिच्या वरच्या टोकापासून सुरू झोलेली महावाहिनी उदराच्या मागील भागातून वक्षात प्रवेश करते व उरस्थ पाचव्या मणक्यासमोर डाव्या बाजूस सरकून नंतर कण्याच्या डाव्या बाजूने मानेत पोहोचते. तेथे ग्रीवा नीलेच्या (मानेतील नीलेच्या) अघोजत्रुक (गळ्याच्या हाडाखालील) नीलेशी होणाऱ्या संयोगस्थानी ही महावाहिनी नीला तंत्रास मिळते. या मार्गामध्ये कटी, उर, डावा हात आणि मान व डोके यांची डावी बाजू येथील वाहिन्या महावाहिनीला मिळतात आणि शरीराच्या बहुतांश भागातील लसीका या वाहिनीत सोडतात. आंत्रामधून वसांचे (स्निग्ध पदार्थांचे) शोषण करण्यासाठी उपयुक्त अशा लसीका केशिकांना पायसिका (दुग्धाभ लसीकावाहिन्या) म्हणतात. आंत्रातील श्लेष्मकलेच्या रसांकुरांच्या (सूक्ष्म बोटांसारख्या वाढींच्या) मध्यभागी सुरू होणाऱ्या या वाहिन्या दुधी रंगाचा जो पायसद्रव (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांचे मिश्रण) वाहून नेतात त्याला पयोलस (वसालसीका) अशी संज्ञा आहे. या सर्व वाहिन्यांतून तयार झालेली मोठी वाहिनी शेवटी उदरातील महावाहिनीसच मिळते. वसांच्या शोषणाचा हा एक महत्त्वाचा मार्ग ठरतो.

उजवा हात, मानेची व डोक्याची उजवी बाजू एवढ्याच भागातील वाहिन्या एकत्र येऊन तयार होणारी उजवी लसीकावाहिनी उजवीकडील ग्रीवा-अधोजत्रुक संयोगस्थानी नीलाप्रवाहास मिळते. 

आ. २. मानवातील लसीका तंत्र : (१) ग्रीवा लसीका ग्रंथी, (२)अधोजत्रुक नीला, (३) उजवी लसीका वाहिनी, (४) उरस्थ लसीका महावाहिनी, (५) काखेतील लसीका ग्रंथी, (६) पयोलसाशय, (७)उदरीय लसीका ग्रंथी, (८) वंक्षण लसीका ग्रंथी, (९) परिघीय लसीकावाहिन्या.या सर्व वाहिन्यांच्या मार्गात अनेक लसीका ग्रंथी असतात व लसीकेला एक किंवा अधिक ग्रंथींमधून जावे लागते [⟶ लसीका ग्रंथि]. ग्रंथींचे पृष्ठस्य व खोल असे गट प्रत्येक क्षेत्रात आढळतात.

भ्रूणविज्ञान : लसीका तंत्राच्या निर्मितीबद्दल दोन मतप्रवाह आहेत. पहिल्या मतानुसार भ्रूणाच्या प्रारंभिक अवस्थेत निर्माण झालेल्या नीलांच्या अंतःस्तरापासून केंद्रोत्सारी (हृदयापासून दूर जाणारे) उद्वर्ध (फाटे) फुटून त्यांपासून काही कोश तयार होतात. नंतर मान, उदर, आंत्रबंध इ. प्रमुख स्थानी तयार झालेल्या अशा सहा कोशांपासून सर्व वाहिन्यांची उत्पत्ती होते. या उलट दुसऱ्या मताप्रमाणे रक्तवाहिन्यांपासून पूर्णपणे स्वतंत्र रीत्या, भ्रूणाच्या मध्यस्तरापासून लसीका तंत्र विकसित होते. यातील काही मध्यस्तरस्थाने तात्पुरत्या नीला जालिकांच्या किंवा नीलिकांच्या समीप असतात. ऊतक-पुनर्रचनेच्या वेळी ऱ्हास झालेल्या नीलांचे कार्य नवनिर्मित लसीकाकोश व वाहिन्या करू लागतात. लसीकावाहिन्यांची वाढ केंद्रानुगामी दिशेने होते व अनेक वाहिन्या एकत्र येऊन महावाहिन्यांचा विकास होतो. नीलांशी संयोगस्थाने नंतर निर्माण होतात.

कोणतेही मत ग्राह्य धरले, तरी सु. २० ते ३० मिमी. लांव इतक्या लहान मानवी भ्रूणात सर्व मोठ्या वाहिन्या आढळतात. दोन उरस्थ महावाहिन्या सुरुवातीस असतात, त्यांच्यामध्ये अनेक जोड वाहिन्या निर्माण होऊन व काही भागांचा लोप होऊन शेवटी फक्त डावी महावाहिनी शिल्लक रहाते. भ्रूणाच्या सु. पाचव्या महिन्यापर्यंत लसीकावाहिन्यांच्या झडपा तसेच प्रारंभिक स्वरूपाच्या लसीका ग्रंथी तयार झालेल्या असतात.


ऊतकविज्ञान (सूक्ष्म रचना) : लसीका केशिकांची रचना रक्तवाहिन्यांच्या केशिकांसारखीच एकस्तरीय अंतःस्तराची असते परंतु रक्तकेशिकांपेक्षा या अंतःस्तराची पार्यता (पदार्थ पार जाऊ देण्याची क्षमता) जास्त असते. त्यामुळे मोठ्या आकारमानाचे रेणू (उदा., प्रथिने, कलिलरूप पदार्थ [⟶ कलिल], सूक्ष्मजंतू, ऊतकनाशनातून निर्माण झालेले कोशिकांचे भग्नावशेष इ.) ऊतक द्रवातून लसीकावाहिनीच्या आत येऊ शकतात. यासाठी कोशिकाप्राशन (कोशिकेच्या जीवद्रव्यपटलाचे अंतर्वलन व चिमटणे यांद्वारे कोशिकेत द्रवपदार्थ आत घेण्याची प्रक्रिया) व अंतःस्तराच्या कोशिकांमध्ये असलेल्या (आंतरकोशिकीय) फटींमधून गवाक्ष-पारगमन अशी प्रक्रिया घडून येत असतात. केशिकावाहिन्यांची सुरुवात जेथे होते ती गोलाकार बंद टोके आंत्रातील पायसिकांमध्ये स्पष्ट दिसू शकतात. लहान वाहिन्यांमध्ये त्रिस्तरीय रचना (रक्तवाहिन्यांसारखी) आढळते. संयोजी (जोडण्याचे कार्य करणारे) ऊतक, लवचिक तंतू व काही अरेखित (आडव्या रेखा नसलेले, अनैच्छिक) स्नायुतंतू दिसून येतात. सु. ०.२ मिमी. किंवा जास्त व्यासाच्या वाहिन्यांमध्ये बाहेरील व मधला असे दोन्ही स्तर सुविकसित आणि स्नायुयुक्त असतात. इजा झाल्यास प्रतिष्ठापन करण्याची क्षमता सर्व वाहिन्यांमध्ये चांगली असते.

लसीका ग्रंथींची रचना संपुट, बाह्यक आणि मध्यक अशा तीन घटकांची असते. बाह्यकात लसीका कोशिकांची जननकेंद्रे प्रामुख्याने आढळतात. मध्यकात लसीका कोशिकांची रचना रज्जूंच्या रूपात असते. त्याभोवती असलेल्या एकमेकांशी जोडलेल्या मार्गांमधून (कोटरांमधून) लसीका वाहते व अपवाही वाहिन्यांमधून ग्रंथीच्या बाहेर पडते. लसीका व रक्त यांचा निकट संपर्क लसीका ग्रंथीत येतो. त्यामुळे रक्ताला लसीका कोशिका व ⇨प्रतिपिंड प्राप्त होतात. लसीकेतील लसीका कोशिकांची संख्याही वाढते. परिधीय द्रवात ५००-१००० प्रती घ. मिमी. असलेले या कोशिकांचे प्रमाण केंद्राकडे जाताना वाढत वाढत शेवटी सु. ४०,००० इतके होते. ही भर ग्रंथींकडून घातली जाते. [⟶ लसीका ग्रंथि].

लसीका ग्रंथींशिवाय इतरत्र प्रामुख्याने लसीका कोशिकांचा आढळ असणाऱ्या ऊतकांना लसीकाभ ऊतक म्हणतात. लसीका कोशिकांशिवाय या ऊतकांमध्ये जालीय फायब्रिनोजेन (तंतुजनक) प्रथिन, महाभक्षिकोशिका, प्लाविका कोशिका (प्रतिपिंड स्रावक विशिष्ट लसीका कोशिका) व थोड्या अरुणकर्षी (इओसीन या रंजकद्रव्याने सहजपणे रंगविता येणाऱ्या) कणिकाकोशिका आढळतात. लसीकाभ ऊतक गिलायू, यौवनलोपी ग्रंथी, प्लीहा (पानथरी), फाब्रिसिअस स्यून, अस्थिमज्जा (हाडांच्या पोकळीतील मऊसर ऊतक), आतड्यांच्या श्लेष्मकलेखालील विकीर्ण क्षेत्रे (स्वीस वैद्य जे. सी. पेयर यांच्या नावाने ओळखण्यात येणारी पेयर क्षेत्रे), आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) व श्वसनमार्गाचा वरचा भाग या ठिकाणी आढळतात. या सर्व ठिकाणी लसीका कोशिकांची निर्मिती, महाभक्षिकोशिकांची भक्षणक्रिया व प्रतिपिंडनिर्मिती यांद्वारे रोगप्रतिकारक्षमतेचे कार्य घडून येते. (लसीका कोशिकांचे विविध प्रकार, त्यांची निर्मिती व विकसन आणि त्यांचे रोगप्रतिकारक्षमतेमधील कार्य यांचे सविस्तर वर्णन ‘रोगप्रतिकारक्षमता’ या नोंदीत दिलेले आहे). काही ग्रंथकार या संपूर्ण ऊतक समुच्चयाला (लसीका ग्रंथींसिह) ‘लसीकाभ तंत्र’ असे नाव देतात आणि त्याचे केंद्रीय म्हणजे अस्थिमज्जेतील (जिथे लसीका कोशिकांचे बी व टी पूर्व कोशिकांत विभेदीकरण होते) आणि परिघीय म्हणजे इतर सर्व ठिकाणची लसीकाभ ऊतके, असे वर्गीकरण करतात.

लसीका तंत्राच्या अभ्यासासाठी प्रायोगिक पद्धतीमध्ये प्राण्यांच्या अवयवांमध्ये काळी शाई (इंडिया इंक) किंवा प्रशियन ब्ल्यू यांचे अंतःक्षेपण करून व काही काळाने या प्राण्यांचे विच्छेदन करून विविध वाहिन्या व ग्रंथी स्पष्टपणे पहाता येतात. क्ष-किरणांना अपारदर्शी असलेले पदार्थ वापरूनही असा अभ्यास विच्छेदनाशिवाय करता येतो. रुग्णांच्या अभ्यासात ऊतकशोथ (ऊतकाची दाहयुक्त सूज) किंवा मारक अर्बुदाचे (कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीचे) परिणाम कोणत्या ग्रंथीमध्ये प्रथम जाणवत आहेत याचे निरीक्षण करून लसीका तंत्राच्या रचनेबद्दल जास्त ज्ञान प्राप्त होऊ शकते.

लसीकाप्रवाह : मानवी हृदयातून दर मिनिटाला रक्त वाहिन्यांमध्ये सु. पाच लिटर रक्त अभिसरणासाठी फेकले जाते. यापैकी बहुतांश केशवाहिन्यांतून परत नीलांमध्ये येते. संपूर्ण शरीरात मिनिटाला फक्त दोन मिलि. इतक्या द्रवाचे लसीकेत रूपांतर होते. मेंदू व अस्थी सोडून इतर सर्व सजीव ऊतकांमधून ही लसीका निर्माण होत असते. कोशिकांमधून ऊतकांमध्ये आलेल्या ऊतकद्रवाचा दाब लसीकाकेशिकेतील दाबापेक्षा जास्त असल्याने द्रव आंतरकोशिकीय जागेतून लसीकाकेशिकेत येतो. दाबातील हा फरक ऊतकशोथ किंवा उष्णतेने रक्ताभिसरणात झालेली वाढ अशा कारणांमुळे जास्त झाला, तरी लसीकाप्रवाह वाढतो. याउलट लसीकामार्गातील अडथळे किंवा लसीका ग्रंथी व वाहिन्यांचे विकार यांमुळे प्रवाह कमी होतो व ऊतकात सूज निर्माण होते. ऊतकद्रवाच्या गालन दाबाशिवाय लसीकावाहिनींमधील स्नायू, वाहिनीमार्गातील आसपासच्या स्नायूंची हालचाल, झडपा, रक्तवाहिन्यांचे स्पंदन व श्वसनाच्या हालचालीबरोबर ऊरोपोकळीत निर्माण होणारा ऋण दाब या सर्व घटकांची मदत लसीकाप्रवाह अबाधित रहाण्यासाठी होत असते.

लसीकेमध्ये रक्तद्रवातील (रक्तातील कोशिका काढून टाकल्यावर उरणाऱ्या द्रवातील) सर्व घटक आढळतात. त्यामुळे ती स्वच्छ, किंचित पिवळसर वर्णाची दिसते. सर्व प्रथिनांचे प्रमाण रक्तद्रवापेक्षा कमी असते. तसेच सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम किंचित कमी आणि क्लोराइड, बायकार्बोनेट किंचित जास्त असतात. विविध क्षेत्रांतील लसीकांमध्ये घटकांच्या प्रमाणात फरक आढळतो. उदा., यकृत लसीकेत प्रथिने जास्त असतात. आंत्रातील लसीका जास्त वसामय असते. तीमध्ये उदासीन वसाद्रव्ये पायसाणू (सूक्ष्म लिपिड कणांच्या) रूपात आणि कोलेस्टेरॉल व फॉस्फोलिपिडे वसाप्रथिनांच्या रूपात आढळतात. जेवणानंतर या घटकांचे प्रमाण वाढते. वृक्कातून (मूत्रपिंडातून) येणाऱ्या लसीकेमध्ये तेथील रक्तकेशिकांतून ऊतकात निसटणाऱ्या रक्तद्रवप्रथिनांचा समावेश असतो. वृक्कनलिकांमधून परत शोषला जाणारा द्रव ज्याप्रमाणे सोडियमाची व ग्लुकोजाची बचत करतो, त्याप्रमाणे वृक्कातील अंतराली स्थानांतून येणारी लसीका (दिवसाला सु. १.८ लि.) रक्तद्रव-प्रथिनांची बचत करते. वाहिन्यांमध्ये असताना स्वच्छ, वर्णहीन द्रव अवस्थेत असणारी लसीका गोळा करून काही काळ ठेवली असता रक्ताप्रमाणेच तिचे क्लथन (साखळण्याची क्रिया) होते. तिच्यातील फायब्रिनोजेन व प्रोथ्राँबीन या घटकांमुळे ही क्रिया घडते.


कार्य : रक्तद्रवातील महत्त्वाच्या घटकांना ऊतकांतून परत रक्ताकडे नेण्याचे कार्य लसीका करते. त्याचप्रमाणे आंत्रातून वसाद्रव्यांच्या शोषणातही लसीकामार्गाचा मोठा सहभाग असतो. रक्ताशी तुलना करता, लसीका महावाहिनीतील द्रवातील विविध घटकांचे प्रमाण लक्षात घेतल्यास असे लक्षात येते की, रोज रक्तातील एकूण राशीच्या ५० ते १०० ग्रॅ. इतकी राशी लसीका तंत्रातून नीलांमध्ये सोडली जाते. उदा., सु. १०० ग्रॅ. प्रथिने लसीकेतून रोज रक्तात येतात.

विजातीय घातक पदार्थ, सूक्ष्मकण, सूक्ष्मजंतू इत्यादींपासून शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य अनेक प्रकारे लसीका तंत्रात घडून येते. आक्रमणाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या स्थानिक प्रतिक्रियेमुळे जो ऊतकशोथ होतो, त्यात रक्तातून आलेल्या भक्षिकोशिका अनेक प्रकारचे कोशिकाविघटनजन्य कण हलविण्यास साहाय्य करतात. यांतील काही ऊतक-अवशेष, तसेच परकीय रेणू लसीकाकेशिकांमध्ये येतात आणि वाहिन्यांमधून ग्रंथीपर्यंत पोहोचतात. तेथे त्यांना अडवले जाते. ग्रंथीत असलेल्या भक्षिकोशिका त्यांचे भक्षण करतात त्याचप्रमाणे तेथील शाखायुक्त कोशिकांमध्ये या कणांवरील ⇨प्रतिजन दीर्घकाळ बद्ध केले जातात व प्रतिपिंडनिर्मितीसाठी उत्तेजक म्हणून वापरले जातात. या उत्तेजनामुळे लसीका ग्रंथीमधील बी-कोशिकांचे रूपांतरण आणि प्रजनन सुरू होते. रूपांतरणाच्या शेवटी निर्माण झालेल्या प्लाविका कोशिका प्रतिपिंडनिर्मिती करतात. प्रतिपिंड लसीकेमध्ये मिसळून अपवाही वाहिन्यांतून बाहेर जाऊ लागतात आणि महावाहिनीच्या मार्गे रक्तात पोहोचतात. बी-कोशिका मात्र मुख्यत्वे विविध लसीकाभ ऊतकांतील पुटकांमध्येच निर्बंधित रहातात.

टी-कोशिकांच्या प्रजननास असेच उत्तेजन प्रतिजनामुळे मिळते. त्यामुळे विशिष्ट ग्राही असलेल्या कोशिकांचे उत्पादन वाढते [⟶ रोगप्रतिकारक्षमता] परंतु त्या केवळ लसीकाभ ऊतकांमध्ये बद्ध न राहता लसीका ग्रंथीतून किंवा इतर लसीकाभ ऊतकांतून, तेथील कोशिकांचा अंतःस्तर ओलांडून रक्तातही येतात. रक्तातील लसीका कोशिकांपैकी सु. ७०-७५% टी-कोशिका असतात.

विशिष्ट प्रतिकारक्षमता प्रतिसादाशिवाय लसीका तंत्र स्कंधकोशिकांचा साठा म्हणूनही काम करीत असते. या साठ्यातून जरूर तेव्हा टी-व बी-कोशिकांची निर्मिती होत रहाते. रक्तातील कोशिकाही लसीकाभ ऊतकातून मुक्तपणे ये-जा करू शकतात. त्यामुळे लसीका व रक्त या दोन्ही द्रवांना लसीका तंत्राकडून कोशिकांचा पुरवठा होत असतो.

रोगप्रतिकारक्षमतेच्या कार्यांतील या महत्त्वाच्या भूमिकेमुळे लसीकातंत्राची वाढ एकंदर शारीरिक वाढीच्या मानाने जास्त जलद होते. शरीरातींल एकूण लसीकाभ ऊतकांचे आकारमान वयाच्या दहाव्या वर्षीच किंवा तत्पूर्वी प्रौढावस्थेतील आकारमानाएवढे अथवा त्याहून जास्त झालेले आढळते.

विकार : लसीकावाहिन्या, ग्रंथी व इतर लसीकाभ ऊतक अशा तीन प्रकारांत लसीका तंत्राच्या रोगांचा विचार करता येईल. ग्रंथीच्या विकारांसंबंधी ‘लसीका ग्रंथि’ या नोंदीत विवेचन केलेले आहे.

वाहिन्यांच्या प्रारंभस्थानी केशिकांचा अंतःस्तर अनेक प्रकारच्या कणांना व कोशिकांना प्रवेश देत असल्याने संक्रामणे व अर्बुद यांचा लसीकेत सहज शिरकाव होऊ शकतो. त्वचेमधील पूयजनक संक्रामणे, स्ट्रेप्टोकॉकस जंतूमुळे होणारे विकार, गर्भाशयाचे प्रसूतिकालीन संक्रमण यांमुळे नजीकच्या लसीकावाहिन्यांचा तीव्र शोथ होऊ शकतो. पृष्ठस्थ वाहिन्या सुजून लाल रेघांसारख्या दिसतात. क्षयरोगाच्या जंतूंमुळे वाहिन्यांमध्ये मण्याच्या माळेप्रमाणे पिटिकांची रांग निर्माण होते. प्लेगमध्ये किंवा कधी कधी क्षयरोगामध्ये जंतू सरळ ग्रंथीमध्ये जाऊन पोचतात व वाहिन्या अबाधित राहतात.

दीर्घकालीन शोथामुळे लसीका मार्गात रोध निर्माण होऊन ऊतकातील लसीकेचा निचरा न झाल्याने सूज येते. याला लसीकाशोफ म्हणतात. तो दीर्घकाळ टिकल्यास संयोजी ऊतकांची वाढ होऊन सूज कठीण बनते व दाब दिल्यास खड्डा पडण्याचा (निपीडन गर्त) गुणधर्म लोपतो. या प्रकारची सूज फायलेरिया सूत्रकृमींच्या वाहिनीतील वास्तव्यामुळे अनेकदा आढळते. पाय व वृषण (पुरुषाची जनन ग्रंथी) यांच्या प्रचंड सुजेमुळे ⇨ हत्ती रोग ही संज्ञा या उष्ण कटिबंधीय रोगास वापरली जाते. अशाच प्रकारचा रोध लसीकावाहिन्यांतील अर्बुद कोशिकांची वाढ, ⇨लसीका कणार्बुदी वंक्षण रोग, वाहिन्यांचे शस्त्रक्रियेने ग्रंथीबरोबर उच्छेदन (काढून टाकले जाणे) किंवा प्रारण चिकित्सेमुळे (क्ष-किरणांच्या आणि भेदक कण व किरण बाहेर टाकणाऱ्या पदार्थांपासून मिळणाऱ्या किरणांच्या उपचारामुळे) वाहिन्यांचा नाश यांमुळे होतो. उदा., स्तनाच्या कर्करोगासाठी केलेल्या उपचारांमुळे छाती व काखेतील ग्रंथींना व वाहिन्यांना इजा होऊन हातांवर सूज येते.

लसीकावाहिन्यांचे विस्फारण व त्यातून उद्‌भवणारे लसीका/कुहर (पोकळी) किंवा लसीका जालिकेची वाढ अशा प्रकारचे विकारही आढळतात. तसेच लसीकामार्गातील अडथळ्यामुळे किंवा इजा झाल्याने लसीका अपमार्गाने जाऊन तिचा निचरा इच्छित स्थळी न होता इतरत्र होतो. उदा., मूत्रमार्ग, परिफुप्फुस गुहा (फुप्फुसावरील स्रावोत्पादक पातळ पटलाच्या दुपदरी पिशवीसारख्या आच्छादनामुळे तयार झालेली पोकळी), उदरगुहा, त्वचेवरील जखम, व्रण इ. ठिकाणी लसीका पाझरत रहाते. या अपमार्गाला लसीका नाडीव्रण म्हणतात.

लसीका तंत्राचा कोणताही विकार नसताना ऊतकामध्ये सूज निर्माण होऊ शकते. रक्तकेशिकांमधून ऊतकात आलेल्या द्रवाचे प्रमाण लसीकाकेशिकांच्या शोषणक्षमतेपेक्षा बरेच वाढले किंवा नीलिकांकडून होणारे शोषण कमी झाले, तर अशी परिस्थिती उद्‌भवते. लसीकाप्रवाह जास्तीत जास्त वाढूनही ऊतकद्रवाचा पूर्ण निचरा होत नाही, त्यामुळे तो वाढत जातो. रक्तातील प्रथिनन्यूनता, हृद्रोगामुळे नीलामधील दाबात वाढ, दीर्घ काळ एकाच स्थितीत उभे राहणे, गर्भाशयाच्या वाढीमुळे किंवा उदरगुहेतील अर्बुदामुळे मोठ्या नीलांवर येणारा दाब या कारणांनी असा शोफ (विशेषतः पायांवर) दिसू शकतो. याशिवाय जंबुपार किरणांनी (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरणांनी) किंवा हिमदाहाने (अतिशय थंडीत उघडा राहिल्यामुळे होणाऱ्या स्थानिक ऊतक नाशाने) रक्तकेशिकांना इजा, दीर्घ काळ उष्णता (शेक) देणे किंवा संवेदीकारक पदार्थांमुळे हिस्टामिनाचे ऊतकात होणारे विमोचन यांमुळे शरीराच्या कोणत्याही भागात सूज निर्माण होऊ शकते.

लसीकाभ ऊतकांच्या विकारात रक्तातील लसीका कोशिकांची संख्या बदलणे हे एक सहज दिसणारे चिन्ह असते. या कोशिकांच्या आकारमानावरून आणि रोगप्रतिकारक्षमता शास्त्रीय वर्गीकरणाने विकारांचा जास्त सखोल अभ्यास करता येतो. दर घ. मिमी. मध्ये (मायक्रोलिटरमध्ये) सु. १,५०० ते ४,००० लसीका कोशिका असतात (म्हणजेच १.५ ते ४×१० प्रती लिटर). रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोगांमध्ये हे प्रमाण कमी होते. तसेच वृद्धत्व, शारीरिक ताण, प्रारण चिकित्सा, प्रतिकारक्षमता दमनासाठी वापरलेली औषधे, कॉर्टिसोनासारखी अधिवृक्क बाह्यकीय हॉर्मोने [⟶ अधिवृक्क ग्रंथि] यांमुळे लसीका कोशिकान्यूनत्व निर्माण होते.

रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा उत्तेजित झाल्यामुळे लसीका कोशिकाधिक्य होते. विशेषतः सांसर्गिक एककेंद्रकी कोशिकाधिक्य रोग (एप्स्टाइन-बार व्हायरसामुळे – एम्. ए. एप्स्टाइन व वाय्. एम्. बार या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या व्हायरसामुळे- होणारा तीब्र स्वरूपाचा सांसर्गिक रोग), इतर व्हयरसजन्य संक्रामणे, आंत्रज्वर (टायफॉइड ज्वर), ⇨ आंदोल ज्वर (ब्रूसेलोसिस), उपदंश, क्षयरोग व डांग्या खोकला यांमध्ये हा बदल आढळून येतो. अशाच प्रकारची वाढ रक्तार्बुदाच्या (ल्यूकेमियाच्या) सुरुवातीच्या अवस्थांमध्ये आढळते परंतु नंतर मात्र कोशिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढते व अपरिपक्क कोशिका मोठ्या प्रमाणात रक्तात येऊ लागतात. या लसीका कोशिकांचा उगम अस्थिमज्जेत असतो. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या रक्तार्बुदात मुख्यत्वे लसीकाकोशिका जनक-कोशिकाच असल्याने त्याला तीव्र लसीका-कोशिका जनक-कोशिकीय रक्तार्बुद अशी संज्ञा वापरतात. लसीका ग्रंथीची वृद्धी, त्यांमध्ये हळूहळू पसरलेली अर्बुद कोशिकांची आक्रमक वाढ, रक्तक्षय, एक ते दोन लक्ष प्रती घ. मिमी. इतकी लसीका कोशिकांची संख्या, अशक्तपणा इ. लक्षणे असलेला हा विकार त्वरेने वाढत जाऊन औषधोपचार न केल्यास मारक ठरतो. उपचारांचा परिणाम समाधानकारक दिसून येतो.


प्रौढांमध्ये साधारण चाळीशीत आढळणारा दीर्घकालीन लसीका-कोशिकीय रक्तार्बुद विकार हळूहळू वाढत जातो. लसीका ग्रंथी, यकृत व प्लीहा (पानथरी) यांचे आकारमान वाढते. रक्तातील बिंबाणूंची (रक्तातील सर्वांत लहान आकारमानाच्या केंद्रकहीन व विभाजनक्षमता नसलेल्या कोशिकांची) संख्या कमी होते. लसीका कोशिकांची संख्या ५०,००० ते १ लक्ष्य असते. त्यांची अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ सहसा आढळत नाही. कोशिका परिपक्क दिसतात परंतु प्रतिकारक्षम नसतात. औषधोपचार आणि लसीका ग्रंथी व प्लीहा यांवर प्रारण चिकित्सा करून रोग नियंत्रणात ठेवता येतो. पूर्ण शरीराचे किरणीयन देखील उपयुक्त ठरते.

हॉजकिन व हॉजकिनेतर लसीका मांसार्बुदे : लसीकाभ ऊतकांमध्ये लसीका कोशिकांपासून किंवा ऊतक कोशिकांपासून निर्माण होणारी सर्व अर्बुदे लसीका मांसार्बुद या नावाने ओळखली जातात (यात श्वेत कोशिकार्बुदांचा समावेश होत नाही, कारण ती अस्थिमज्जेतून उगम पावतात व रक्तार्बुद गटात गणली जातात). टॉमस हॉजकिन या ब्रिटिश वैद्यांनी १८३२ मध्ये वर्णन केलेल्या मारक अर्बुदाचे महत्त्व आणि सु. ५० लसीका मांसार्बुदे हॉजकिन गटातील असल्यामुळे या सर्वांचे वर्गीकरण स्थूलमानाने हॉजकिन व हॉजकिनेतर असे करतात.

कोशिकांची अनियंत्रित वाढ व आक्रमकता इतर सर्व मारक अर्बुदांप्रमाणे येथेही दिसतात. जननिक उत्परिवर्तनास (आनुवंशिक वैशिष्ट्यांत बदल घडून येण्यास) कारणीभूत होण्याऱ्या घटकांची अनिश्चितता येथेही आहे. तरीपण एप्स्टाइन-बार व्हायरस किंवा मलेरिया संक्रामण आणि बर्किट लसीका मांसार्बुदाचा (डी. पी. बर्किट या ब्रिटिश शस्त्रक्रियाविज्ञांनी प्रथम ओळखलेल्या व त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लसीका मांसार्बुदाचा) आढळ यांचा संबंध जोडता येतो. फेटॉइन व प्रिस्टेन या रसायनांची प्रायोगिक अर्बुदजनकता, रोगप्रतिकारक्षमता मंदावल्यामुळे होणारी अर्बुदनिर्मिती, स्वयंप्रतिकारक्षमता विकार [⟶ रोगप्रतिकारक्षमता] आणि अर्बुदांचा आढळ अशी इतर काही घटकांची उदाहरणे या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

हॉजकिन अर्बुदाचा उद्‌भव वब्हंशी प्रौढावस्थेत एखाद्या लसीका ग्रंथिसमूहाच्या वाढीने दिसू लागतो. कमीजास्त होणारा ज्वर, रात्रीचा घाम, पांडुता इ. लक्षणे आढळतात. टी-कोशिकांची क्रियाशीलता मंदावल्यामुळे क्षयरोग, नागीण [मेखल परिसर्प ⟶परिसर्प], कवकांसारखी (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींची) संधिसाधू संक्रामणे इ. संभवतात. लसीका ग्रंथी सुरुवातीला मऊ व पृथक असल्या, तरी नंतर दृढ व एकत्र बद्ध होतात. रोग लसीकावाहिन्यांमधून मंदगतीने समीपच्या ग्रंथिसमूहात पसरतो. इतर लसीकाभ ऊतक आक्रांत झाल्यावर प्लीहा, यकृत, श्वसनमार्ग इत्यादींमधील कार्यशील ऊतकांवर दाब पडतो व निरनिराळी लक्षणे सुरू होतात. त्यांच्या आधारे रोगाचे चार अवस्थांमध्ये विभाजन करून त्याप्रमाणे उपाययोजना ठरवितात.

आ. ३. हॉजकिन लसीका मांसार्बुद रोगात ऊतकवैज्ञानिक परीक्षणात आढळणारी रीड-स्टर्नबर्ग कोशिका.या रोगात ऊतकवैज्ञानिक परीक्षणात दिसणारे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सु. ४० मायक्रॉन (१ मायक्रॉन = १०-६ मी.) आकारमानाच्या रीड-स्टर्नबर्ग नावाच्या (डोरोथी रीड व जी. एम्. स्टर्नबर्ग या विकृतिवैज्ञानिकांच्या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या) द्विकेंद्रकी बृहत् कोशिका. या कोशिकांचे द्विपाली (दोन खंड असलेले) केंद्रक दर्पणप्रतिमांप्रमाणे दिसते. सदोष टी-कोशिकांपासून या कोशिका निर्माण होत असाव्यात. याशिवाय एककेंद्रकी हॉजकिन कोशिका, मोठ्या नवोत्पन्न कोशिका व शोथसदृश अंतःस्यंद (ऊतकात जाऊन तयार झालेला एखाद्या पदार्थाचा अपसामान्य साठा) हेही आढळतात. ऊतक परीक्षणाच्या आधारे केलेल्या चार वर्गांपैकी चौथा वर्ग लसीका-कोशिकांचा ऱ्हास दाखवितो व तो वृद्ध रुग्णांमध्ये मुख्यतः दिसतो. त्याला हॉजकिन मांसकर्क असेही नाव आहे. उपाययोजनेस तो समाधानकारक प्रतिसाद देत नाही. बाकी सर्व वर्गांसाठी मर्यादित क्षेत्रीय गभीर (खोलवर पोहोचणारी) क्ष-किरण चिकित्सा व पूरक औषध चिकित्सा (रासायनी चिकित्सा) वापरली जाते. सु. ९०% रुग्णांना त्यामुळे दीर्घ काळ जीवदान मिळते.

हॉजकिनेतर लसीका मांसार्बुदांमध्ये बी-किंवा टी-कोशिकोद्‌भव विविध मारक अर्बुदे आहेत. मारकता किंवा ऊतकवैज्ञानिक स्वरूपाप्रमाणे त्यांची निरनिराळी वर्गीकरणे केली जातात परंतु कोशिकेची वंशावळ निश्चित करण्यासाठी रोगप्रतिकारक्षमता शास्त्रीय विश्लेषण किंवा कोशिकापृष्ठावर उपस्थित असलेल्या चिन्हकांचे विश्लेषण उपयुक्त ठरते. उदा., एखादे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारे प्रथिन), ग्राही, प्रतिजन, गॅमा-ग्लोब्युलिनाचा प्रकार इ. चिन्हक शोधून काढता येते.

हॉजकिनेतर गटात लघू व गुरू लसीका कोशिका लसीकाभार्बुदाचे काही प्रकार, बर्किट लसीका मांसार्बुद, लसीका-कोशिका-जनक-कोशिकार्बुद व व्हायरसजन्य टी-कोशिका रक्तार्बुद याचा समावेश होतो. बर्किट अर्बुदाची सुरुवात जबड्यापाशी होते इतरांची सुरुवात माण, काख, आंत्र इ. विविध ग्रंथिसमूहांमध्ये होते. नवोद्‌भूत कोशिकांचे पुंज तयार होऊन ग्रंथिका बनल्या असतील, तर उपाय योजनेस प्रतिसाद चांगला मिळतो. विस्तृत पसरलेल स्तर असल्यास प्रतिसाद कमी व मारकता जास्त असते. सर्वसामान्य उपाययोजना हॉजकिन वर्गाप्रमाणेच ठरविली जाते.

पहा : जालिका-अंतःस्तरीय तंत्र प्रतिजन प्रतिपिंड यौवनलोपी ग्रंथि रक्ताभिसरण तंत्र रोगप्रतिकारक्षमता लसीका ग्रंथि.

संदर्भ : 1. Anderson, J. R., Ed., Muir’s Textbook of Pathology. London, 1985.

           2. Babrior, B. M. Stossel, T. P.Hematology: A Pathophysiological Approach, London,

               1984.

          3. Hladky S. B Rink, T.J. Body Fluid and Kidney Physiology, London,1986.

          4. Last, R. J. Anatomy: Regional and Applied, Edinburgh, 1984.

          5. Thomson, R. B. Proctor, S. J. A Short Textbook of Hematology, London, 1984.

          6. Williams, P. L. Warwich, R., Ed., Gray’s Anatomy, London, 1980.

          7. Young, J. Z. The life of Vertebrates, Oxford, 1981.

श्रोत्री, दि. शं.