प्राणिजात : (फॉना). एखाद्या लहान किंवा मोठ्या भूप्रदेशात निसर्गतः आढळणाऱ्या सर्वच प्राण्यांविषयी सामुहिक दृष्ट्या उल्लेख केला जातो, त्यास त्या त्या प्रदेशातील प्राणिजात असे म्हणतात. ‘फॉना’ ही संज्ञा रोमन लोकांच्या पितृदेवतेस उद्देशून आहे. ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४-३२२) या ग्रीक तत्त्वज्ञांनी निरनिराळे प्राणी जमवून त्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला. हे वर्गीकरण सदोष असले, तरी काही प्राण्यांविषयीची माहिती सूक्ष्म व काळजीपूर्वक निरीक्षणाने त्यांनी मिळवून संकलित केलेली होती, हे दिसून येते. उदा., काही प्राणी रक्तयुक्त असतात, तर इतर काही रक्तहीन असतात. ग्रीक काळातील हा प्रयत्न ॲरिस्टॉटल आणि त्यांचे शिष्य थीओफ्रॅस्टस (इ. स. पू. सु. ३७२-२८७) यांच्याबरोबर समाप्त झाला.

‘प्राणिजात’ या शीर्षकाने निर्दिष्ट करण्यात येणाऱ्या ग्रंथामध्ये सामान्यतः प्राण्यांची ओळख नुसत्या नामनिर्देशाने केली जाते. इतर काही प्राणिजात ग्रंथांमध्ये नावाच्या यादीऐवजी प्रत्येक प्राण्याचे पूर्ण अधिकृत वर्णन सचित्र दिले जाते. त्यालाही ‘प्राणिजात’ म्हणतात. उदा., एखाद्या बेटावरील सर्व प्रकारच्या परिसरांमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांची यादी म्हणजेच त्या बेटाची प्राणिजात होय. प्राणिजगतातील एखाद्या वर्गाचे वर्णनही ग्रंथरूपाने पहावयास मिळते. उदा., भारतातील मासे, भारतीय पक्षी, सर्प इत्यादी. फक्त जीवाश्मी (शिळारूप अवशेष उपलब्ध असलेल्या) प्राण्यांच्या वर्णनाचे किंवा प्राचीन काळातील एखाद्या युगातील अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या वर्णनाचे ग्रंथही लिहिलेले आढळतात. अनेक मोठ्या देशांतील किंवा भिन्न प्रदेशांतील प्राण्यांच्या याद्या एकत्रित करून कधीकधी वर्णन व चित्रांसह प्राणिजातीय ग्रंथ प्रसिद्ध केले जातात. त्यांवरून तेथील प्राण्यांची चांगली कल्पना येते. एखाद्यास आढळलेला प्राणी पूर्वी नमूद आहे की नाही, त्याचा शोध या ग्रंथाद्वारे घेता येतो व नसल्यास तो नवा मानून त्याचा अभ्यास करता येतो. यावरून प्राणिजातीय ग्रंथ हा उत्तम संदर्भग्रंथ ठरतो. या ग्रंथातील प्राणिवर्णनात प्राण्याचे वर्गीकरणातील स्थान, अधिवास (राहाण्याचे ठिकाण), शारीरिक लक्षणे, प्रजोत्पादनाचा प्रकार इ. माहितीचा समावेश करण्यात येत असून हे वर्णन सर्व विशिष्ट व सर्वमान्य लॅटिन संज्ञांचा उपयोग करून देण्याची आंतरराष्ट्रीय प्रथा आहे. प्राणिजात ग्रंथाचा उपयोग प्राण्यांची जातिगणना करण्यासाठी व ⇨परिस्थितिविज्ञानाच्या अभ्यासासाठी होतो. असे ग्रंथ भिन्न देशांत तेथील संशोधन संस्था, शास्त्रीय उद्याने, विद्यापीठे, प्राणिसंग्रहालये, महाविद्यालये, सरकारी सर्वेक्षणालये इ. ठिकाणी सामान्यतः ठेवलेले असतात. भारताच्या प्राणिजातीविषयीचे विस्तृत कार्य भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने केले असून तत्संबंधीचे ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसिद्ध केलेल्या प्राणिजातीसंबंधीच्या ग्रंथसमुच्चयास फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया असे शीर्षक देण्यात आले होते. जिल्हानिहाय दर्शनिकांमधून (गॅझेटीअर्समधून) तेथील प्राणिजातीसंबंधीची माहिती प्रसिद्ध होत असते.

कुलकर्णी, र. ग.