कॉक्रॉफ्ट, सर जॉन डग्लस : (२७ मे १८९७ – १९ सप्टेंबर १९६७). इंग्लिश भौतिकीविज्ञ. १९५१ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म टॉडमॉर्डन येथे झाला व शिक्षण मॅंचेस्टर विद्यापीठात व केंब्रिज येथील सेंट जॉन महाविद्यालयात झाले. १९३९ – ४६ या काळात केंब्रिज विद्यापीठात ते भौतिकीचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनच्या हवाईसंरक्षण संशोधनाचे व कॅनडाच्या नॅशनल रिसर्च कौन्सिलच्या अणुशक्ती विभागाचे संचालक होते. १९४६ मध्ये इंग्लंडमधील हारवेल येथील अणुसंशोधन संस्थेच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली व तेथे त्यांनी १९५९ पर्यंत काम केले. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य (१९४८– ५२) आणि ब्रिटनच्या संरक्षण खात्याचे शास्त्रीय सल्लागार व संरक्षण संशोधन समितीचे अध्यक्ष या पदावर त्यांनी काम केले. १९५९ मध्ये केंब्रिज येथील चर्चिल महाविद्यालयाचे मास्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली.

कॉक्रॉफ्ट यांनी १९३२ मध्ये वॉल्टन यांच्या साहाय्याने पहिला उच्च ऊर्जा कणवेगवर्धक (अणूतील कणांना उच्च ऊर्जा प्राप्त करून देणारे उपकरण) तयार केला व त्याच्या साहाय्याने लिथियमाच्या अणूंवर प्रोटॉनांचा भडिमार करून लिथियमापासून हीलियमाचे अणू तयार केले. या प्रयोगामुळे आइन्स्टाइन यांच्या ऊर्जा व वस्तुमान यांच्या सममूल्यतेच्या सिद्धांताला प्रायोगिक पुरावा मिळाला. १९३४ मध्ये कॉक्रॉफ्ट व वॉल्टन यांनी बोरॉन व कार्बन यांच्यावर प्रोटॉन व ड्यूटेरॉन यांचा वेगवर्धकाच्या साहाय्याने भडिमार केल्यास किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर फेकणारी) अणुकेंद्रे तयार होतात असे दाखविले. कृत्रिमरित्या प्रवेगित केलेल्या (वेग वाढविलेल्या) कणांच्या साहाय्याने मूलद्रव्यांतरण (एका मूलद्रव्याचे दुसऱ्या मूलद्रव्यात रूपांतर) करण्याच्या कार्यातील मूलभूत संशोधनाकरिता कॉक्रॉफ्ट व वॉल्टन यांना १९५१ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 

लंडनच्या रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर त्यांची १९३६ साली निवड झाली व १९४८ मध्ये त्यांना नाईट हा किताब मिळाला. ते केंब्रिज येथे मृत्यू पावले.

 

भदे, व. ग.