कील होर्न, फ्रांट्स : (१८४०–१९०८). विख्यात जर्मन प्राच्यविद्यापंडीत. संस्कृत भाषा आणि व्याकरण ह्यांवर असामान्य प्रभुत्व संपादून ‘पुना कॉलेज’ मध्ये संस्कृत आणि प्राच्यभाषा ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून ते काम करू लागले (१८६६). सायणभाष्यासह ऋग्वेदसंहिता प्रसिद्ध करण्याच्या उपक्रमात ⇨मॅक्स  म्यूलर  ह्यांस त्यांनी भरीव साहाय्य दिले. शांतवनाचार्यकृत फीट्सूत्रांचे संपादन केले. ⇨ परिभाषेन्दुशेखरांचे इंग्रजी भाषांतर आणि  ⇨ पतंजलीच्या महाभाष्याचे संपादन ही त्यांची प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील अत्यंत मोलाची कामगिरी होय. तसेच गुप्तकालापासूनच्या भारतातील विविध राजघराण्यांचा निश्चित कालनिर्णय करण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. कलचुरी किंवा चेंदी संवत् ह्यांचे आरंभस्थान त्यांनीच शोधून काढले. भारतातील शिलालेख, ताम्रपट आदी इतिहास साधनांचाही त्यानी चांगला अभ्यास केला होता. काटेकोर संशोधनाबद्दल त्यांची ख्याती होती. त्यांच्याच प्रयत्नांनी एपिग्राफीका इंडिका  हे त्रैमासिक अस्तित्वात आले. जर्मनीस परत गेल्यांनतरही तेथील गटिंगेन विद्यापीठात त्यांनी संस्कृतीचे प्राध्यापक म्हणून काम केले. भारतीय विद्या व शास्त्रे ह्यांची वास्तव प्रतिमा पाश्चिमात्यांसमोर उभी करणाऱ्या पश्चिमी विद्वानांत त्याची गणना होते.

कुलकर्णी, अ. र.