काळा आजार : हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या, प्रोटोझूनच्या) संसर्गामुळे निर्माण होणारा रोग असून त्यात प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ), अनियमित ज्वर व अतीव अशक्तता असते. या रोगाला ‘डमडम ताप’, ‘बरद्वान ताप’ अशी दुसरी नावे असून भारताच्या पूर्व भागात त्याचा फार प्रसार आहे. भूमध्यसमुद्राचा किनारा, सूदान, पश्चिम व पूर्व आफ्रिका, दक्षिण ‌रशिया, उत्तर चीन आणि ब्राझील येथेही हा रोग आढळतो. काळा आजार हे नाव मूळ भारतीय असून या नावावरून रोगाचे मारकत्व दिसून येते.

या रोगाच्या प्रजीवाला लिशमॅनिया डोनोव्हनाय  म्हणतात. मनुष्यातील हा प्रजीव लहान, लंबगोल आकाराचा असून त्यात दोन केंद्रके (पेशीतील क्रिया नियंत्रित करणारे व गोलसर आकाराचे भाग) असतात. या रोगाचे प्रजीव ट्रिपॅनोसोमिडी या कुलातील असून त्यांना लिशमॅनिया  असे म्हणतात. निरनिराळ्या भागांत तीन तऱ्हेचे रोग होतात. काळा आजार रोगाचा प्रजीव एका रोग्यापासून दुसऱ्या माणसास वालुमक्षिकांमार्फत पसरतो. तिच्या जठरात प्रजीवाची पूर्ण वाढ होऊन त्याला कशाभिकायुत (चाबकाच्या दोरीसारखी शेंडी असलेले) स्वरूप प्राप्त होते नंतर तीच मक्षिका दुसऱ्या व्यक्तीस चावली की, हा प्रजीव त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून त्याच्या रक्तातील एककेंद्रकीय कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) जाऊन तेथे त्याचे प्रजनन होते आणि त्यामुळे रोगोत्पत्ती होते. भारतातील विशिष्ट भागातील काही व्यक्तींच्या शरीरात हे प्रजीव असतात इतर देशांत कु‌त्रे, कोल्हे वगैरे प्राण्यांत हे आढळतात आणि त्यांच्यापासून रोगप्रसार होऊ शकतो. या रोगाच्या प्रजीवांची वाढ प्लीहेतील, यकृतातील व अस्थिमज्जेतील (लांब हाडांच्या पोकळीतील वाहक संयोजी पेशीसमूहातील) बृहत्‌कोशिकांमध्ये (मोठ्या पेशींमध्ये) होते.

हा रोग शहरापेक्षा खेडेगावात जास्त प्रमाणात आढळतो. या रोगाचा ‘शैशव काळा आजार’ म्हणून एक प्रकार आहे. तो लिशमॅनिया इन्फंटम या प्रजीवामुळे होतो. हा प्रकार भूमध्यसागरीय प्रदेशात दिसून येतो.

रोगाचा परिपाककाल अनिश्चित असून तो दहा दिवसांपासून ते एक वर्षापेक्षाही जास्त असतो. बहुधा तो तीन महिने असतो. रोगाची सुरुवात अगदी हळुवारपणे होते व लवकर लक्षात येत नाही. अशक्तपणा वाढत जातो व वजन घटते. काही वेळा अतिसार होतो, घाम येतो किंवा नाकातून रक्तस्त्राव होतो. काहींत रोगाची सुरुवात एकाएकी होते व मग हिवतापाचा किंवा विषमज्वराचा (टायफॉइडाचा) भास होतो. वृद्धी पावलेली प्लीहा हाताला लागते. अनियमित ताप असतो. काही वेळा ताप २४ तासांत दोनतीन वेळा चढतो व उतरतो. रक्त तपासल्यास पांडुरोगाची (ॲनिमियाची) चिन्हे दिसून येतात व काही वेळा रक्तातील अनेकाकार – केंद्रकी कोशिकांत लिशमॅनिया डोनोव्हनाय  प्रजीव दिसून येतात. उरोस्थीचा (छातीच्या हाडांचा) वेध करून त्यातील बृहत केंद्रकी श्वेतकोशिकांत (मोठे केंद्रक असलेल्या पांढऱ्या पेशींत) रोगाचे प्रजीव आढळणे हे खात्रीचे निदान होय.

चिकित्सा : ज्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव असतो अशा ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून रोग्यांना‌ निरोगी माणसापासून पूर्णपणे निराळे ठेवले पाहिजे. वालुमक्षिकेच्या नाशाकरिता डीडीटीच्या फवाऱ्यांचा चांगला उपयोग होतो.

या रोगावर उत्तम गुणकारी औषध म्हणजे त्रिसंयुजी (अणूंची परस्परांशी संयोग पावण्याचा शक्तिदर्शक अंक तीन असणारी) अँटिमनी लवणांची (उदा., अँटिमनी टार्ट्रेट) अंत:क्षेेपणे (इंजेक्शने) ही होत. त्याचप्रमाणे पंचसंयुजी अँटिमनी औषधेही चांगली उपयोगी पडतात. क्वचित अँटिमनी औषधांनी बऱ्या झालेल्या १० टक्के रोग्यांना एकदोन वर्षांनंतर त्वचेवर व्रण उत्पन्न होतात. या व्रणांत रोगाचे प्रजीव सापडतात. या व्रणांवरही अँटिमनी औषधांचा उपयोग होतो. ज्या रोग्यांना अँटिमनी औषधांचा उपयोग होत नाही त्यांना पेंटामिडीन किंवा हायड्रॉक्सिस्टिल बामि‌डीन ही औषधे गुणकारी ठरतात. मात्र ती या प्रजीवांमुळे होणाऱ्या त्वचारोगावर उपयुक्त नसतात.

रानडे, म. अ.