होलोथूरॉयडिया : हाएकायनोडर्माटा प्राणिसंघातील एक वर्ग असून दंडगोलाकार शरीर व बिनकाटेरी चामड्यासारखी कातडीहे त्यांचे खास लक्षण आहे. यामध्ये सर्व सागरी काकडींचा समावेशहोतो. हे प्राणी मुक्तजीवी असून त्यांना बाहू नसतात तथापि मुखाभोवतीपाच किंवा जास्त संस्पर्शकांचे कडे असते. सामान्यत: मुख शरीराच्या एका टोकाला असते. संदंशिका नसतात नलिकापाद असतात किंवा नसतात.चरणार प्रसीता नसतात तथापि त्यांचे प्रतिनिधित्व उपरीस्थित अरीय मज्जातंतूंच्या अंतर्गत अधितंत्रिका नालाने केलेले असते. ई. डायकमनयांनी होलोथूरॉयडियांना अस्तित्वात असलेल्या एकायनोडर्माटातील सर्वांत अनियमित गट मानले. 

 

होलोथूरियन प्राणी कृमीसारखे दिसतात. कारण पंचतयी सममिती (पाच भागांनी बनलेली) द्विपार्श्व सममितीने मोठ्या प्रमाणात झाकलेल्या असतात. सर्वसाधारण बाह्य कंटकांचे अस्तित्व नसल्यामुळे ते इतर अस्तित्वात असलेल्या एकायनोडर्माटांपासून वेगळे ओळखले जातात. ते एका बाजूवर स्थिरावल्यासारखे वाटतात, त्यामुळे अरीय सममितीचा अक्ष क्षितिजसमांतर होतो. ह्या सवयीमुळे वरचा (पृष्ठीन) पृष्ठभाग व खालचा (अधर) पृष्ठभाग असा भेद केला जातो. वरची बाजू आंतरत्रिज्येशी समान असून तीमध्ये मॅड्रेपोराइट (एक चापट, वाटोळे किंवा पंचकोनी पृष्ठावर खोबणी असलेले व आरपार भोक पडलेले कॅल्शियमी तकट) असते आणि त्यामुळे खालची बाजू ही एक त्रिज्या असते. प्रत्येक त्रिज्या पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत जाते. नलिकापाद जर विकास पावले, तर त्याची रचना त्रिज्या निर्देशित करतात. 

 

होलोथूरॉयडिया वर्गातील सु.१,१०० जिवंत जातींची सु. १७० प्रजातीं-मध्ये वर्गवारी करण्यात आली असून त्यांचे खालील सहा गण करण्यात आलेले आहेत. खाली देण्यात आलेल्या प्रत्येक गणांच्या वर्णनात पॉसन आणि स्माइले यांनी किरकोळ बदल केलेले आहेत. 

 

(१) डेंड्रोचिरोटिडा : या गणात ५५० जाती, ९० प्रजाती व ७ कुलांचा समावेश होतो. यातील प्राण्यांना संस्पर्शिका फाटेयुक्त असून श्वसन-वृक्ष असतात. काहींमध्ये कॅल्शियमयुक्त कडे बऱ्याचशा लहान तुकड्यांचे किंवा लांब पश्‍च प्रवर्धकाचे असते. तकटासारख्या अस्थिकामुळे देहभित्ती कठीण असतात. ते कठीण आधारकाला चिकटलेले असतात किंवा स्वतःला गाळामध्ये पुरून घेतात. त्यांचा आढळ समुद्रात उथळ पाण्यात असतो. 

 

(२) डॅक्टिलोचिरोटिडा : या गणात ३५ जाती, ७ प्रजाती व ३ कुलांचा समावेश होतो. यांतील प्राण्यांना संस्पर्शिका साध्या व श्वसन-वृक्ष असतात. कॅल्शियमयुक्त कडे पश्च प्रवर्धकविरहीत असते. यातील प्राण्यांचा आकार इंग्रजी यू (ण) अक्षरासारखा असतो. ते स्वत:ला गाळामध्ये पुरून घेतात. त्यांचा आढळ खोल पाण्यात असतो. 

 

(३) ॲस्पिडोचिरोटिडा : या गणात ३४० जाती, ३५ प्रजाती व ३ कुलांचा समावेश होतो. संस्पर्शिका त्रायक आकाराच्या असून श्वसन-वृक्ष असतात. देहभित्ती मऊ व लवचिक असतात. या गणामध्ये एका कुलातील प्राणी खोल पाण्यात आणि इतर सर्व उथळ पाण्यात आढळतात. 

 

(४) इलॅसिपोडिडा : या गणात १४१ जाती, २४ प्रजाती व ५ कुलांचा समावेश होतो. संस्पर्शिका त्रायक आकाराच्या असून श्वसन-वृक्ष असतात. कॅल्शियमयुक्त कडे पश्च प्रवर्धकविरहीत असते. डेमाटिडीचा अपवाद वगळता देहभित्ती मऊ व श्लेषी असतात. त्यांचा आढळ खोल पाण्यात असतो. 

 

(५) मोलपोडिडा : या गणात ९५ जाती, ११ प्रजाती व ४ कुलांचा समावेश होतो. संस्पर्शिका साध्या असून श्वसन-वृक्ष असतात. देहभित्ती मऊ व लवचिक असून कॅल्शियमयुक्त कडे पश्च प्रवर्धक-विरहीत असते. बरचसे प्राणी उथळ पाण्यात, तर एका कुलातील प्राणी खोल समुद्रात आढळतात.

 

(६) ॲपोडिडा : या गणात २६९ जाती, ३२ प्रजाती व ३ कुलांचा समावेश होतो. संस्पर्शिका ५?९ पिसांसारख्या किंवा साध्या असून श्वसन–वृक्ष नसतात. नलिकापाद नसतात. देहभित्ती पातळ व पारदर्शक असून कॅल्शियमयुक्त कडे पश्च प्रवर्धकविरहीत असते. त्यांचा आढळ उथळ व खोल पाण्यात असतो. 

 

वैशिष्ट्ये : डेंड्रोचिरोटिडा व ॲपोडिडा या दोन गणांचा प्रसार इतर गणांच्या मानाने बराच मर्यादित आहे. इतर गणांचा प्रसार जगभर सर्वत्र आहे. होलोथूरियन प्राणी सर्व समुद्रांत आढळतात. ओहोटीच्या नीच पातळीपासून खाली ते शोधलेल्या सर्वांत खालच्या नीच पातळीपर्यंततो आढळतो. 

 

सर्वसाधारणपणे यांमधील प्राण्यांची लांबी ३ सेंमी. ते १.५ मी.पर्यंत असते. सर्वांत मोठे प्राणी उष्ण कटिबंधातील सिनॅप्टिडी कुलातील आहेत. उदा., सिनॅप्टा मॅक्युलेटा याची लांबी सु. ५ मी.पर्यंत असते. सिनॅप्टिडी कुलातील प्राणी अतिशय चमकदार रंगांचे असतात. पिवळे, लाल, जांभळे, हलकी पिवळसर तपकिरी छटाही त्यांच्यात आढळते. पुष्कळ जाती गर्द व धुसर छटांच्या किंवा काळ्या असतात. 

 

प्रोटोझोआ, चापटकृमी, नेमॅटोडा व ॲनेलिडा यांचा परजीवींमध्ये समावेश होतो. काही खेकडे (उदा., पिन्नोथेरस) प्राण्यांच्या अवस्करकिंवा श्वसन-वृक्षामध्ये आढळतात तर इतर काही खेकडे (उदा., लिसोकार्सिनस) संस्पर्शकांमध्ये आढळतात. काही गॅस्ट्रोपॉड (उदा., एंटोकाँकबा व एंटोकोलॅक्स) कातडी, देहगुहा किंवा अग्रांत्रात आढळतात. फिअरेस्पर मासा मोठ्या ॲस्पिडोचिरोटिडाच्या अवस्करात सापडतो. 

 

होलोथूरियन प्राण्यांना वयाच्या तिसऱ्या वर्षांनंतर लैंगिक पक्वता येते व त्यांची वाढ तशीच पुष्कळ वर्षे होत राहते, म्हणून त्यांचे आयुर्मान समुद्री अर्चिन व सागरी ताऱ्यांपेक्षा बरेच दीर्घ असते. ते दहा वर्षांपर्यंत असते. 

 

जनन तंत्रात एक किंवा दोन जनन ग्रंथींचा समावेश होतो. तसेच त्यांच्या जोडीला त्यांच्या वाहिन्याही असतात. जनन रंध्रे सामान्यतः तारका पृष्ठीय असतात. सामान्यतः लिंगे भिन्न असतात. ॲपोडिडा गणात उभयलिंगता सर्रास आढळते परंतु कोणत्याही वेळेला प्राणी नर किंवा मादी असतो. त्यामुळे स्वयंनिषेचन होत नाही. जीवनचक्रात मुक्तप्लावी डिंभाचा (ॲरिक्युलॅरिया) समावेश असतो. थंड पाण्यातील अनेक जाती आपल्या पिलांना विविध प्रकारे जन्म देतात. लेप्टोसिनॅप्टा मायन्युटा हा प्राणी विकास पावणारा आपला भ्रूण देहगुहेत वाहून नेतो. सोलस प्रजातीतील काही जाती त्वचेतील पाकिटात पिले वाहून नेतात. त्यांची त्वचा कॅल्शियमयुक्त तकटांनी आच्छादिलेली असते. इतर जाती अंडी व पिलांवर झोपून त्यांचे संरक्षण करतात. क्युक्युमॅरिया प्लान्सी यांसारख्या जाती आडव्या स्वयंविभाजनाने अलैंगिक प्रजोत्पादन करतात. बहुतेक जातींत नष्ट झालेल्या अवयवांचे पुनर्जनन होते. सर्व आतडी, जनन ग्रंथी व श्वसन-वृक्ष हे अवस्करातून बाहेर येतात व मुक्त केले जातात. फाटलेल्या मध्यांत्रापासून गमावलेल्या संरचनांचे पुनर्जनन होते व या क्रियेला पुष्कळ महिने लागतात. पुनर्जननाच्या वेळी प्राणी काही खात नाहीत. त्याऐवजी स्नायूंचे सावकाश पचन केले जाते. 

 

आर्थिक दृष्ट्या होलोथूरियन प्राणी (उदा., सागरी काकडी) खूप महत्त्वाचे आहेत. काही जाती विष तयार करतात, त्याचा उपयोग औषधनिर्मितीमध्ये होतो. काही होलोथूरियन स्वादिष्ट अन्न समजले जातात. त्या दृष्टीने स्टायकोपस व होलाथूरिया या प्रजातींतील वीस जाती विशेष महत्त्वाच्या आहेत. काही होलोथूरियन प्राणी माशांना विषारी असतात. हिंदी व पॅसिफिक महासागरांत त्यांची मासेमारी चालते. सागराच्या पाण्यात हेप्राणी वीस मिनिटे उकळतात, धुरी देतात व वाळवितात अशा पदार्थाला चेटिन, ट्रेपांग किंवा बेके-डी-मेर म्हणतात.

 

 पहा : सागरी काकडी. 

जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.