अरबी तत्त्वज्ञान: ‘अरबी तत्त्वज्ञान’ आणि ‘इस्लामी तत्त्वज्ञान’ या संज्ञा साधारणपणे समानार्थाने वापरल्या जातात. मूळ इस्लाम धर्माची शिकवण प्रामुख्याने आचारप्रधान आहे विचारप्रधान नाही. इक्बाल ह्यांनी म्हटल्याप्रमाणे, कुराणाचा भर शब्दापेक्षा कृतीवर आहे. प्रेषित मुहंमदांकडून इस्लामची दीक्षा प्रथम अरबांनी घेतली. जिच्या आधारावर सुव्यवस्थित धर्मशास्त्र किंवा तत्त्वज्ञान उभारता येईल अशी तात्त्विक विचाराची परंपरा अरबांमध्ये नव्हती, याविषयी फारशी शंका नाही. मूलगामी तात्त्विक विचाराची आपल्या परिचयाची दोन रूपे म्हणजे ईश्वरविद्या आणि तत्त्वज्ञान. त्यांचा इस्लाममध्ये उदय कसा झाला, हळूहळू ही दोन रूपे अधिकाधिक एकवटत जाऊन त्यांच्यापासून ‘कलाम’ ह्या शास्त्राची किंवा विचारपद्धतीची निर्मिती कशी झाली आणि सुरुवातीला धर्मनिरपेक्ष अशा तात्त्विक विचाराचा जो एक प्रवाह आढळत होता तो नंतरच्या शतकात जवळजवळ लुप्त कसा झाला, हे आपल्याला पाहायचे आहे.

 

हिजरी सनाच्या (इ. स. ६२२) पहिल्या शतकातच कुराणाच्या भाषेच्या अर्थमीमांसेचा प्रश्न उपस्थित झाला आणि व्याकरणशास्त्र विकसित होऊ लागले. पहिल्या दोन शतकांत कुराण ज्या लिपीत लिहिण्यात येत होते तीत भिन्न स्वर व्यक्त करणाऱ्‍या चिन्हांचा अभाव असल्यामुळे व्याकरणाची नीट माहिती असल्याशिवाय आणि बराचसा शब्दसंग्रह गाठी असल्याशिवाय कुराण समजून घेणे तर सोडाच, पण वाचणेसुद्धा कठीण होते. कुराणाचा पाठ बऱ्‍याचशा चोखपणे निश्चित झाल्यानंतर कुराणातील वचनांचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्न उभा राहिला. कित्येक वचनांचा अर्थ गुंतागुंतीचा होता. अनेकदा परस्परांशी सुसंगत असलेल्या आदेशांतही काहीशी भिन्नता आढळून येत असे. अशा स्थळी ‘तफ्सीर’ म्हणजे अर्थनिरूपण करणे आवश्यक होते. शिवाय कुराणातील वचनांचा केवळ शाब्दिक अर्थ ग्रहण केल्याने जिज्ञासू मनाचे समाधान होण्यासारखे नव्हते. त्याच्यापुढे अनेक प्रश्न खडे होत. कुराण जर ईश्वराचा शब्द आहे तर ते निर्मित आहे की अनिर्मित? जर सर्व गोष्टी ईश्वरी योजनेप्रमाणे घडत असतात आणि जर ईश्वर सर्वज्ञ आहे, तर आपण नियतिवाद स्वीकारावा, की माणसाच्या संकल्पस्वातंत्र्याला आणि प्रयत्‍नांना काही वाव आहे असे मानावे? कुराणातील कित्येक वचनांचा अर्थ ‘मुहकम्’ म्हणजे निश्चित, स्पष्ट, उघड आहे पण कित्येकांचा अर्थ ‘मुताशाबिह’ म्हणजे लाक्षणिक, रूपकात्मक असा आहे, असे कुराणातच जे वचन आहे, त्याचा अर्थ कसा लावायचा? ईश्वराच्या स्वरूपाची संकल्पना करताना ते मानवी स्वरूपाशी कितपत सदृश आहे असे मानता येईल? याचा अर्थ मानवरूपवाद स्वीकारावा, की ईश्वराचे स्वरूप संपूर्णपणे मानवी विचाराच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे असे मानावे? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे केवळ व्याकरण, शब्दकोश आणि प्राचीन काव्ये ह्यांच्या आधाराने देता येणार नाहीत हे उघड आहे. ज्यू आणि ख्रिस्ती विद्वानांशी अरबांचा संबंध येत होता. त्यामुळे ह्या प्रश्नांविषयीच्या तात्त्विक विचारांची परंपरा त्यांच्यात होती हे अरबांना समजले आणि नंतर जेव्हा ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या, विशेषतः प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्या, लिखाणाशी त्यांचा परिचय झाला, तेव्हा अरबांनी त्याचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचाराचा मागोवा घेत त्यांनी तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र रचले. ⇨ अल्किंदीला जेव्हा इस्लामेतर तत्त्ववेत्त्यांच्या विचारांकडे त्यांच्या मनाचा ओढा असल्याबद्दल जाब विचारण्यात आला, तेव्हा त्याने पुढील उत्तर दिले असे सांगण्यात येते : ‘सत्य शोधून काढण्यात ज्यांचा थोडाफारसुद्धा हातभार लागला असेल त्यांच्याविषयी आपल्या मनात आत्यंतिक कृतज्ञताबुद्धी असणे जरूर आहे. मग सत्य शोधून काढण्यात ज्यांचा फार मोठा वाटा आहे त्यांच्याविषयी काय बोलावे?’ (अल्-किंदी हे ॲरिस्टॉटलला उद्देशून म्हणत आहे, हे उघड आहे. अरब लोक ॲरिस्टॉटलला प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता मानीत.) ‘सत्य आपल्याकडे कुठूनही आलेले असो, परकीयांकडून का ते आलेले असेना, त्याची सत्य म्हणून ओळख पटवून घेण्यात आणि ते आत्मसात करण्यात आपल्याला कमीपणा वाटता कामा नये…तेव्हा आपल्या ह्या सबंध ग्रंथरचनेत आपण ज्या तत्त्वाला अनुसरलो आहोत त्याला आपण चिकटून राहिले पाहिजे. ते तत्त्व असे, की एक तर हाती घेतलेल्या विषयासंबंधी प्राचीनांनी जे जे काही म्हटले असेल, ते आपण नमूद केले पाहिजे आणि दुसरे म्हणजे प्राचीनांनी जे पूर्णपणे व्यक्त केले नसेल, त्याच्यात भर टाकून आपण ते पूर्ण केले पाहिजे आणि ही भर आपल्या अरबी भाषेची प्रकृती, आपल्या युगाचे रीतिरिवाज, आणि आपली वैचारिक कुवत ह्यांना अनुरूप असली पाहिजे.’ ⇨ इब्‍न रूश्द (आव्हेरोईझ) ह्याने तीन शतकांनंतर ह्याच तत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि तोही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जी वैचारिक शिस्त पाळावी लागते तिला आधारभूत असे हे स्वयंसिद्ध, सर्वमान्य असे तत्व आहे, त्याच्यासंबंधी कोणताही वाद नाही, अशा थाटात केला.

 

मुस्लिमांत तात्त्विक विचारांचा उदय पुढील कारणांमुळे झाला असे सामान्यपणे म्हणता येईल : (१) पवित्र कुराणाचा आणि प्रेषित मुहंमदांच्या चरित्राचा अर्थ विशद करण्याच्या त्यांच्या स्वतःच्या प्रयत्‍नातून (२) ज्यू आणि ख्रिस्ती यांच्याशी संबंध येऊन त्यांची प्रगल्भ ईश्वरविद्या आणि तत्वज्ञान यांच्याशी परिचय झाल्यामुळे (३) ग्रीक तत्त्वज्ञान, विशेषतः प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सखोल अभ्यासामुळे आणि (४) साबियन, पर्शियन आणि भारतीय गूढवादी विचारधारा आत्मसात केल्यामुळे. यांपैकी ग्रीकांचे, विशेषतः ज्याला प्राचीन युगातील सर्वश्रेष्ठ, अधिकारी तत्ववेत्ता मानण्यात येत असे त्या ॲरिस्टॉटल, ऋण सर्वांत अधिक होते.

 

इस्लामी तत्त्वज्ञानातील प्रमुख प्रवाहांचे आपल्याला येथे दिग्दर्शन करावयाचे आहे. प्रथम ‘फल्सफा’ ह्या इस्लामी शास्त्राची थोडक्यात माहिती करून घेऊ आणि त्यानंतर त्याच्याशी निकटचा संबंध असलेल्या ‘कलाम’ ह्या शास्त्राचे किंवा विचारपद्धतीचे स्वरूप समजून घेऊ.


‘फल्सफा’ हे शास्त्राचे नाव आहे तर ‘फेलासुफ’ (अनेकवचन ‘फलासिफा’) ह्या शब्दाचा अर्थ ‘तत्त्ववेत्ता’ किंवा ‘दार्शनिक’ असा आहे. ‘फल्सफा’ हा अर्थात मूळचा ग्रीक शब्द आहे आणि अरबी तत्त्ववेत्ते सामान्यपणे ग्रीक तत्त्ववेत्त्यांचा निर्देश करण्यासाठी हा शब्द वापरतात. शहरस्तानी हा तत्ववेत्ता तत्त्वज्ञानाचे आणि ज्ञानाचे (हिक्म) उगमस्थान म्हणून ग्रीसच्या सात ज्ञानी पुरुषांचा उल्लेख करतो आणि त्याशिवाय पायथॅगोरस, सॉक्रेटीस, प्लेटो, झीनो, हेराक्लायटस, एपिक्यूरस, होमर, हिपॉक्राटीझ, यूक्लिड, टॉलेमी, पॉर्फिरी, प्लोटायनस आणि अर्थात ॲरिस्टॉटल यांचाही तो ‘फलासिफा’ म्हणून निर्देश करतो. ह्यांनंतर तो इस्लामी तत्ववेत्यांची यादी देतो. अल्-किंदी, हुनायिन बिन् इस्‌हाक (हा ख्रिस्ती होता), थाबिट बिन् कुर्रा, इब्‍न मिस्कावे, ⇨ अल्फाराबी इ. चा ह्या यादीत उल्लेख आहे. पण शहरस्तानीच्या म्हणण्याप्रमाणे इस्लामचा खराखुरा तत्ववेत्ता म्हणजे ⇨ इब्‍न सीना (ॲव्हिसेना) हा होय. शहरस्तानीचे स्वतःचे तात्त्विक दर्शन इब्‍न सीनाच्या विचारावरच आधारलेले आहे. शहरस्तानीच्या मते हे सर्व इस्लामी तत्त्ववेत्ते मुख्यतः ॲरिस्टॉटलचे अनुयायी होते केवळ कित्येक गौण मुद्दयांवर त्यांनी प्लेटोची काही मते स्वीकारली होती. परंतु ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला, तर हे मत मूलतः बदलणे आवश्यक आहे हे ध्यानी येते. ‘फल्सफा’ (बौद्धिक तत्वज्ञान) आणि ‘हिक्म’ (ज्ञान, शहाणपण) ह्यांचा फार निकटचा संबंध आहे, ह्यात शंका नाही. तत्वज्ञानाचे उद्दिष्ट खरेखुरे ज्ञान प्राप्त करून घेणे हेच आहे. आता ‘हिक्म’ ही संकल्पना ग्रीक तत्त्वज्ञानात आढळते, त्याप्रमाणे कुराणातही आढळते. ग्रीक तत्त्ववेत्त्यांपैकी विशेषतः  ⇨ प्लेटोने ह्या संकल्पनेवर भर दिला आहे आणि प्लेटोच्या दृष्टीने हिक्ममध्ये जीवनाकडे पाहण्याची धार्मिक वृत्ती आणि बुद्धीने स्वतंत्र विचाराच्या जोरावर प्राप्त करून घेतलेले तात्त्विक ज्ञान ह्या दोहोंचा समावेश होतो. हिक्मविषयीची प्लेटोची ही संकल्पना इस्लामी तत्त्ववेत्त्यांच्या दृष्टिकोनाशी जुळणारी आहे. उदा., इस्लामी विचारवंत अनेकदा ‘माकुल’ म्हणजे बुद्धीला प्रमाण दिसणारे सत्य आणि ‘मान्कुल’ म्हणजे कुराणात प्रकट झालेले सत्य ह्यांच्यात भेद करतात. हे परकीय वैचारिक प्रवाह इस्लामी तत्ववेत्यांनी हळूहळू आत्मसात केले आणि ‘कलाम’ ह्या नव्या इस्लामी शास्त्राचा उदय झाला. ‘कलाम’ म्हणजे ईश्वरविद्या. कलाममध्ये कुराणात प्रकट करण्यात आलेली इस्लामची शिकवण आणि प्लोटायनस आदी ग्रीक विचारवंतांचा विचार, त्याचप्रमाणे साबियन, प्राचीन पर्शियन, इतकेच काय, भारतीय गूढवादी विचार ह्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न केलेला आहे.

 

अरबी तत्त्वज्ञानाचा उगम प्रामुख्याने ग्रीक तत्त्वज्ञानात, विशेषतः प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि ॲरिस्टॉटलचे अलेक्झांडर व थीमिस्‌चियस हे भाष्यकार ह्यांच्या विचारांत, आढळतो. ह्या प्रमुख तत्त्ववेत्त्यांच्या विचाराशिवाय इतरही वैचारिक धागेदोरे अरबी फल्सफाच्या पटात मोठ्या कौशल्याने विणलेले आढळतात. उदा., गेलेन (जालीनुस) ह्या पंडिताचे आणि तत्ववेत्याचे विचार, प्लोटायनसचा बौद्धिक गूढवाद, प्रॉक्लसची ‘हेर्मेटिक थिऑलॉजी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेली ईश्वरविद्या इ. साबियन पंथाने रचलेल्या ज्योतिषशास्त्राचा (ह्यात वैज्ञानिक उपपत्ती आणि धार्मिक कल्पना ह्यांची भेसळ आढळते) आणि विशेषतः स्वर्ग आणि मानवलोक ह्यांच्यामध्ये एक अतिमानवी जीवलोक आहे, ह्या त्यांच्या समजुतीचाही अरबी तत्त्वज्ञानावर ठळक प्रभाव आढळतो. इस्लामच्या फल्सफातील विचार किती अनेकपदरी आहे याचे प्रत्यंतर इब्‍न सीनाच्या तत्त्वज्ञानात मिळते. हा थोर पंडित गेलेनचा अनुयायी आहे तो तर्कशास्त्रज्ञ आहे आणि ह्या भूमिकेत तो ॲरिस्टॉटलला अनुसरतो. शिवाय प्लोटायनसकडून त्याने स्वीकारलेल्या गूढवादातून पुढे सुऱ्हावर्दी ह्यांनी स्थापिलेल्या गूढवादी पंथाचा उदय झाला. इब्‍न सीनाच्या तात्त्विक दर्शनाचे स्वरूप एकात्म आहे परंतु अनेक भिन्न घटक एकजीव होऊन हे स्वरूप सिद्ध झाले आहे. हे भिन्न घटक जर आपण ध्यानी घेतले तर फल्सफातील संपन्न अनेकविधता आपल्या ध्यानी येईल.

 

अरबी तत्त्वज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात जरी बुद्धीचे प्रामाण्य सर्वश्रेष्ठ मानण्यात येत असे, तरी हळूहळू नव-पायथॅगोरियन आणि नव-प्लेटॉनिक ह्या गूढवादी विचारसरणींचा शिरकाव अरबी तत्त्वज्ञानात झाला. रसाइल इख्वान अस्-सफा हा ग्रंथ ह्या विचारसरणीचा प्रमुख प्रतिनिधी मानता येईल. ‘पश्चिमी इस्माइली’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जहाल शिया पंथाचे अनुयायी ह्या ग्रंथाला अतिशय पूज्य मानीत. गुह्य तत्त्वज्ञानावर त्यांचे जे प्रमाण ग्रंथ होते त्यांतील हा सर्वश्रेष्ठ मानला गेलेला ग्रंथ. ह्या ग्रंथाची शिकवण जो आत्मसात करील त्यालाच केवळ खरेखुरे ज्ञान प्राप्त होऊ शकेल, असा त्यांचा दृढ विश्वास होता. विज्ञान आणि तत्त्वज्ञान ह्यांच्याबरोबरच गूढविद्येचेही विवरण गूढविद्येचा काही अंशी तरी एक आधार आहे.


फलासिफांच्या विचाराचे विश्लेषण केले तर त्यात पुढील वैशिष्ट्ये आढळून येतील : (१) त्यांची परिभाषा त्यांनी ग्रीक भाषेपासून उचलली आहे पुढे ती अरबी भाषेत रूळली. (२) तर्कशास्त्र हे त्यांच्या मते ज्ञानप्राप्तीचे साधन आहे. हे तर्कशास्त्र त्यांनी प्रामुख्याने ॲरिस्टॉटलपासून स्वीकारले. (३) निसर्गविज्ञानाचा त्यांचा अभ्यास सर्वसमावेशक होता. खगोलशास्त्र, भौतिकी, रसायन, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, वैद्यक, इतकेच काय, तत्त्वमीमांसासुद्धा निसर्गविज्ञानात अंतर्भूत होती. ह्या सर्व विज्ञानशाखांच्या मूलभूत संकल्पना त्यांना तत्त्वमीमांसेपासून प्राप्त होत. प्रयोगशीलता हेही ह्या विज्ञानाचे एक वैशिष्ट्य होते. (४) तत्त्वमीमांसेच्या क्षेत्रात ग्रीक विचारांपासून जरी त्यांनी सुरुवात केली असली तरी ह्या शास्त्रात त्यांनी बरीच प्रगतीही साधली. ‘एकम्’ ह्या मूलतत्त्वापासून सर्व अस्तित्व निःसरणाने आविर्भूत होते, हा नव-प्लेटोमताच्या तत्त्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत ह्या तत्त्ववेत्यांनी स्वीकारला होता. परंतु नवप्लेटोमतात ‘निःसरणा’ची जी संकल्पना होती तिला त्यांनी बरीच मुरडही घातली. इख्वान अस्-सफामध्ये निःसरणाची उपपत्ती अशी दिली आहे: ‘एकम्’ ह्या तत्त्वापासून प्रथम ‘प्रथमा बुद्धी’ हे तत्त्व निःसृत होते त्याच्यापासून ‘दश बुद्धी’ निःसृत होतात आणि त्यांच्यापासून विश्वात्मा आविर्भूत होतो. विश्वात्म्यापासून आद्यस्वरूपातील जडद्रव्य ‘भूतादि’ निःसृत होते. ह्या आदिजडद्रव्यात वेगवेगळी रूपे, आकार धारण करण्याची शक्ती असते. ते जो पहिला आकार धारण करते तो म्हणजे जिला तीन मिती आहेत अशा मूर्ततेचा आकार. ह्याच्या पुढची पायरी म्हणजे ‘केवल जड तत्त्वा’चा आविष्कार (अल-जिस्म अल्-मुतलाक). त्यानंतर वेगवेगळे सचेतन जीव, बाह्य वस्तू आणि प्राण्यांची शरीरे निर्माण होतात. विश्वाची उत्पत्ती कशी होते, ह्याची निःसरणाच्या तत्त्वाला अनुसरून फल्सफामध्ये जी उपपत्ती दिली आहे तिला ह्या तात्त्विक दर्शनात महत्वाचे स्थान आहे. (५) ईश्वरविद्या: ईश्वरविद्येतील पहिला प्रश्न म्हणजे ‘ईश्वराचे स्वरूप काय?’ किंवा ‘त्याचे गुण कोणते?’ हा होय. फलासिफांच्या मते ईश्वर सर्व अस्तित्त्वाचा उगम आहे. ईश्वराचे स्वरूप अविभाज्य आहे. ईश्वराचे ज्ञान हेच केवळ सर्व वस्तूंच्या अस्तित्वाचे कारण आहे. ईश्वर स्वसंवेद्य आहे आणि त्याच्या ज्ञानातून इतर सर्व अस्तित्व निर्माण होते ईश्वर सर्व अस्तित्वाचे आदिकारण आहे. विश्व हे ईश्वराच्या स्वरूपाचा घटक नाही ते ईश्वरात अंतर्भूत नाही. ईश्वर परमकृपाळू असल्यामुळे त्याने निर्माण केलेले विश्व सुव्यवस्थित, नियमबद्ध असे आहे. इस्लामचा प्रेषित मुहंमद हा एक अत्यंत प्रतिभाशाली असा पुरुष होता. त्याचा आध्यात्मिक अधिकार इतका श्रेष्ठ होता, की प्रत्यक्ष प्रथमा बुद्धी (एकम् ह्या आदितत्त्वापासून निःसृत झालेले पहिले तत्त्व) त्याच्या बुद्धीला चालना देत असे. मुहंमदाला वाळवंटातील एक अडाणी अरब किंवा एक सामान्य संसारी पुरुष असे मानणे योग्य नाही. त्याच्या महान कार्याला साजेसे असामान्य बौद्धिक आणि आध्यात्मिक गुण त्याच्या ठिकाणी होते. (६) नीतिशास्त्र आणि मानसशास्त्र : नीतिशास्त्र हे मानवी व्यवहाराचे शास्त्र. माणसाच्या ज्या प्रवृत्ती, गुण, स्वभावविशेष मानवी कल्याण साधायला अनुकूल असतात ते नैतिक. माणसाचे कल्याण कशात आहे, हे मानवी आत्म्याच्या प्रकृतीवरून ठरते. हा दृष्टिकोन अर्थात प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांच्या विचारापासून प्राप्त झालेला आहे आणि अर्थात ह्या तत्त्ववेत्त्यांच्या विचारातील गुंतागुंत ह्या दृष्टिकोनातही उतरली आहे. शिवाय ग्रीक तत्त्वज्ञान आणि कुराण ह्यांच्यात प्रकाशित करण्यात आलेल्या सत्यांचा समन्वय इस्लामी विचारवंतांना साधायचा असल्यामुळे त्यांच्या मतात अनेक अडचणीची स्थळे आणि कित्येकदा अंतर्विरोधही आढळतो. पण ह्या अडचणींनी गांगरून न जाता इस्लामी धर्मशास्त्रज्ञांनी मानवी बुद्धी आणि कुराणात प्रकाशित झालेली सत्ये ह्या दोहोंनाही प्रमाण मानले आणि त्यांचा समन्वय करण्यासाठी ‘ता वील’चा म्हणजे पवित्र कुराणातील वचनांचा शब्दशः अर्थ न घेता रूपकात्मक अर्थ लावण्याच्या मार्गाचा आश्रय घेतला. ‘ईश्वराने प्रकट केलेले ज्ञान आणि मानवी बुद्धीला ज्ञात होणारी सत्ये ह्यांचा परस्परसंबंध काय?’ किंवा थोडक्यात, ‘धर्म आणि तत्त्वज्ञान ह्यांचा परस्परसंबंध काय?’ ह्या प्रश्नावर मतभेद होऊन इस्लाममध्ये अनेक पंथोपपंथ निर्माण झालेले आहेत. इस्लाममध्ये तत्त्वज्ञानाचा धर्माशी आणि गूढवादाशी निकटचा संबंध आढळतो. अर्नाल्डेझ ह्याने म्हटल्याप्रमाणे, ‘मुस्लिमांच्या दृष्टिकोनाप्रमाणे प्लेटोचा शिष्य ॲरिस्टॉटल ह्याच्या विचारात तत्त्वज्ञानाची परिणती झाली आहे. तत्त्वज्ञानात विश्वाचा मानवी जीवनाच्या संदर्भात समग्रतेने अभ्यास करण्यात येतो. तत्त्वज्ञान मानवाकडे विश्वाचा एक घटक म्हणून पाहते आणि मानवाच्या आत्मप्राप्तीचे माध्यम म्हणून विश्वाकडे पाहते. कारण विश्वाचे ज्ञान प्राप्त करून घेत घेत आणि विश्वात सन्मार्गाने जगत आपल्या मूळ प्रकृतीचा शोध घेण्याचे आपले अंतिम उद्दिष्ट माणूस साध्य करतो.’

इस्लामी विचारवंतांनी विकसित केलेल्या ‘कलाम’ ह्या शास्त्राचे आता थोडक्यात विवेचन करायचे आहे. अरबी भाषेत ‘कलाम’ ह्या शब्दाचा अर्थ ‘बोलणे’, ‘शब्द’, असा होतो आणि ह्या अर्थापासून कलामला कुराणावर–ईश्वरी शब्दावर–आधारलेले धर्मशास्त्र हा अर्थ प्राप्त झालेला आहे. कलामप्रकार दोन : लौकिक किंवा मानवी व्यवहारातील शब्द आणि ईश्वरी शब्द म्हणजेच कुराण. आता कुराणाविषयी जे प्रश्न उपस्थित होतात ते असे : ‘ईश्वराने असे म्हटले आहे’ ह्या कुराणात आढळणाऱ्या शब्दप्रयोगाचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर अशरीरी आहे, ईश्वराला देह नाही, मग तो बोलतो कसा? उदा., ईश्वराने मोझेझला उद्देशून काही वाक्ये उच्चारली, असे कुराणात वर्णन आहे. ह्या वर्णनाचा अर्थ कसा लावयाचा? इत्यादी.


कुराणाचा नेमका अर्थ लावण्याच्या आणि ‘ईश्वरी शब्द’ ह्या संकल्पनेचा अर्थ विशद करण्याच्या प्रयत्‍नांतून ‘कलाम’ किंवा इस्लामी ईश्वरविद्या निर्माण झाली. ह्या धर्मशास्त्रज्ञांना ‘मुतकल्लिमून’ म्हणतात. ग्रीक तत्वज्ञानातील ‘डायलेक्‍टिक’चा म्हणजे संकल्पनांचे तार्किक विश्लेषण करून त्यांतील अंतर्विरोध स्पष्ट करण्याच्या आणि त्यांचे निरसन करण्याच्या विचारपद्धतीचा प्रभाव कलामवर पडला आहे. इस्लामी धर्मशास्त्रज्ञांचे ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञांशी निकटचे वैचारिक दळणवळण होते, त्याचाही पगडा कलामवर आढळून येतो. कित्येक भारतीय आणि पर्शियन सिद्धांतांची छायाही त्याच्यावर पडली असणे शक्य आहे. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ अनेकदा अनिर्मित, आदितत्त्व असलेले ‘लोगोस’ म्हणजे शब्दतत्व किंवा बुद्धितत्त्व म्हणजेच ईश्वर आणि निर्मितिशील असलेले व म्हणून विश्वाची निर्मिती करणारे ‘लोगोस’ ह्यांच्यात भेद करतात आणि येशू ख्रिस्ताला आदितत्त्व असलेल्या लोगोसचा नव्हे, तर लोगोसचे निर्मितिशील असे जे स्वरूप किंवा अंग आहे त्याचा अवतार मानतात. मुतकल्लिमूनांनी कुराणाच्या म्हणजे ईश्वरी शब्दाच्या स्वरूपाविषयी स्वीकारलेली भूमिका ह्या सिद्धांताशी बरीचशी मिळतीजुळती आहे. ईश्वरी शब्द हा ईश्वराचा एक चिरंतन, अपरिवर्तनीय असा गुण आहे हे त्याचे एक स्वरूप तसेच एक निर्मितिशील शक्ती हे त्याचे दुसरे स्वरूप. आपल्या परिचयाचे कुराण म्हणजे ह्या निर्मितिशील शक्तीचा कालात झालेला आविष्कार. विशेषतः आशराइट ह्या पंथाच्या धर्मशास्त्रात आणि ज्यू व ख्रिस्ती धार्मिक तत्त्वज्ञानांत बरेच साम्य आढळते. ‘कलाम’ आणि ‘फिक्’ (शब्दशः अर्थ आकलनशक्ती) ह्यांमध्ये भेद करणे आवश्यक आहे ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. ‘फिक्’ ह्या पारिभाषिक संज्ञेचा अर्थ ‘कायदा’ असा आहे. सुरुवातीला ‘फिक्’चा अर्थ कलामच्या अर्थापेक्षा अधिक व्यापक होता. तात्त्विक सिद्धांत त्याचप्रमाणे कुराणात प्रकट झालेली सत्ये ह्या दोहोंचे बौद्धिक आकलन ‘फिक्’मध्ये सामावते. परंतु प्रेषित मुहंमदांनंतरच्या तिसऱ्या व चौथ्या शतकांत ‘इहलोकातील व्यवहाराचे शास्त्र’ म्हणजेच ‘कायद्याचे शास्त्र’ एवढाच ‘फिक्’चा मर्यादित अर्थ रूढ झाला.

 

मफतीह–अल्उलूम ह्या दहाव्या शतकात रचण्यात आलेल्या विश्वकोशाच्या म्हणण्याप्रमाणे ‘कलाम’ हे शास्त्र पुढील सात विषयांचा ऊहापोह करते : तत्त्वमीमांसा इस्लामी धर्मपंथाचे मूलभूत सिद्धांत ख्रिस्ती ईश्वरविद्येतील तांत्रिक मुद्दे आणि पंथ ज्यू ईश्वरविद्येतील तांत्रिक मुद्दे आणि पंथ अन्य (कुराण, बायबल, इ. ईश्वरी शब्द म्हणून मानण्यात आलेल्या ग्रंथांचा आधार नसलेल्या, अनेक देवदेवता मानणाऱ्‍या) धर्मांचे सिद्धांत पेगनधर्म आणि त्याचे सिद्धांत व तत्वमीमांसेतील कूटप्रश्न. कलामची रचना सु. एक हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळाच्या मानाने हे किती व्यापक आणि संग्राहक शास्त्र होते हे सहज ध्यानी येईल.

 

सुरुवातीच्या शे-दीडशे वर्षांत कलाममधील विषयांवर सार्वजनिक वाद होत. विख्यात पंडित आपल्या प्रवचनांतून आपापला पक्ष मांडीत असत. अल्-अल्लाफ (?–८४८) हा कलामवरील पहिला अधिकारी लेखक होय. ‘पाच मूलभूत सिद्धांत’ ह्या शीर्षकार्थाच्या त्याच्या ग्रंथात न्याय, एकेश्वरवाद, अभिवचन (सत्कृत्ये करणारांना पारितोषिक देण्यात येईल हे), धमकी (दुष्कृत्ये करणारांना शिक्षा करण्यात येईल ही) आणि मधली स्थिती (इस्लामवर श्रद्धा ठेवणारा माणूस आणि पाखंडी माणूस ह्यांच्यामधील) ह्या विषयांचे विवरण आहे.

 

मुतकल्लिमून ज्या प्रश्नांची चर्चा करीत त्यांची एक निवडक यादी पुढीलप्रमाणे : अल्-अल्लाफ आणि शहरस्तानी ह्यांच्या ग्रंथांंतून ती निवडण्यात आली आहे. (१) जगाला सुरुवात आहे म्हणजे जग अनादी नाही ह्याचे प्रमाण (२) अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या अस्तित्वाला सुरुवात असते ह्याचे प्रमाण (३) ईश्वराची एकता (४) मानवरूपवादाचे, ईश्वराचे स्वरूप माणसाच्या स्वरूपासारखे आहे ह्या मताचे खंडन (५) ईश्वर निर्गुण आहे ह्या मताचे खंडन (६) ईश्वराच्या गुणांसंबंधीची विधाने ज्ञेय आहेत ह्याचे प्रमाण (७) ईश्वरी इच्छेचे स्वरूप (८) ईश्वराचे ‘दर्शन’ होऊ शकते की नाही? व (९) सार्वभौम सत्तेचे स्वरूप.

 

सर्वसाधारणपणे इस्लामी तत्त्वज्ञानाचे कालखंड पुढीलप्रमाणे मानण्यात येतात : (१) सुरुवातीचा कालखंड (६ वे ते ९ वे शतक). हा ग्रीक ग्रंथांशी परिचय करून घेण्याचा कालखंड होता. (२) दुसरा कालखंड (९ वे ते १२ वे शतक). ग्रीक ग्रंथांची चर्चा, परीक्षण ह्यांचा कालखंड. (३) ⇨ अल्गझालीचा कालखंड (११ वे ते १२ वे शतक). (४) अल्-गझालीनंतरचा कालखंड (१२ वे ते १५ वे शतक). (५) भाष्यकारांचा कालखंड (१५ वे ते १९ वे शतक). (६) आधुनिक कालखंड. ह्या शेवटच्या कालखंडात इस्लामी तत्त्ववेत्त्यांप्रमाणे यूरोपियन तत्त्ववेत्त्वांचाही अभ्यास करण्यात येत आहे. ही विभागणी स्थूल अर्थाने ध्यायची आहे. ती अगदी शास्त्रशुद्ध मानण्याचे कारण नाही.

 

आधुनिक कालखंडाविषयी प्रकाशित लिखाणाच्या स्वरूपात विशेष माहिती उपलब्‍ध नसल्यामुळे काही गोष्टींचा येथे निर्देश करणे इष्ट ठरेल. शाह वली अल्ला दिलवाई हा अठराव्या शतकात भारतात होऊन गेलेला धर्मशास्त्रज्ञ आणि शेख मुहंमद अब्द हा एकोणिसाव्या शतकातील ईजिप्शियन तत्त्ववेत्ता हे ह्या कालखंडातील प्रमुख विचारवंत होत. शाह वली अल्ला हा पूर्वापार चालत आलेल्या भाष्यकारांच्या परंपरेत मोडतो. अब्द ह्याच्यावर जमाल अल्-दीन अफगानी ह्या विचारवंताच्या धार्मिक द्दष्टिकोनाचा, गूढवादाचा आणि राजकीय तत्त्वज्ञानाचा प्रभाव आढळतो. ⇨सर मुहंमद इक्बाल हा जरी प्रामुख्याने कवी होता, दार्शनिक तत्त्ववेत्ता नव्हता, तरी लेक्चर्स ऑन दि रिकन्स्ट्रक्शन ऑफ इस्लाम ह्या आपल्या ग्रंथात त्याने अनेक मौलिक विचार मांडले आहेत. विसाव्या शतकाला अनुरूप असा जागतिक धर्म, हे स्वरूप जर इस्लामला प्राप्त करून द्यायचे असेल तर त्याच्यासाठी कोणता सैद्धांतिक आधार पुरवावा लागेल ह्याचे त्याने दिद्गर्शन केले आहे. इस्लामी तत्त्वज्ञानाच्या परंपरेत जर एक नवीन धर्मशास्त्र विकसित व्हायचे असेल, तर त्यासाठी मुस्लिम विचारवंतांना आधुनिक ज्यू आणि ख्रिस्ती धर्मशास्त्राचा खूपच अधिक अभ्यास करावा लागेल हे उघड आहे. याशिवाय बार्त (अलीकडच्या काळातील एक थोर प्रॉटेस्टंट धर्मशास्त्रज्ञ) किंवा मार्टिन बूबर (एक आधुनिक ज्यू धर्मशास्त्रज्ञ) ह्यांच्या धर्मशास्त्राच्या तोडीचे इस्लमी धर्मशास्त्र निर्माण होऊ शकणार नाही, असे त्यांचे मत आहे.

 

संदर्भ : 1. De Lacy O’Leary, D. D. Arabic Thought and its Place in History, London, 1958.

           2. Lewis, B. and Others, Ed.Encyclopaedia of Islam, Vol. II, London, 1965.

           3. Paul, Edwards, Ed. The Encyclopaedia of Philosophy, Vol. IV, New York, 1967.

           4. Watt, W. Montgomery, Ed. Islamic Surveys: Islamic Philosophy and Theology, Edinbudgh, 1962.

फैजी, अ.अ.अ. (इं.) रेगे, मे.पुं. (म.)