जीव : सृष्टीतील वस्तूंची ‘जड’ आणि ‘चेतन’ किंवा चर आणि अचर अशी विभागणी फार पूर्वीपासून केली गेली आहे. यांपैकी चेतनायुक्त विभागात सर्व सजीवांचा आणि जड विभागात सर्व निर्जीवांचा समावेश होतो. वनस्पतींचा फारसा अभ्यास झाला नव्हता त्या वेळी वनस्पतींत चैतन्य नसावे अशी समजूत होती आजही ते अज्ञान कोठे कोठे आढळते. वनस्पती प्राण्यांइतक्या क्रियाशील दिसत नाहीत हे खरे, परंतु सजीवत्वाची अनेक लक्षणे कमीजास्त प्रमाणात वनस्पतींत आढळतात त्यामुळे प्राण्यांबरोबर त्यांचाही समावेश सजीवांत केला जातो. इतकेच नव्हे, तर प्राणी आणि वनस्पती यांमध्ये चैतन्याबाबत नाममात्रच फरक आहेत, हे सर्वमान्य झाले आहे. चैतन्य हे जिवंतपणाचे लक्षण असून मृत जीवांत चैतन्य नसल्याने त्यांची लक्षणे जड वस्तूंप्रमाणे असतात. चैतन्य जडत्वापासून निराळे करता येते कारण विशिष्ट लक्षणांमुळे चैतन्य अनुभवास येते ही लक्षणे असलेल्यांना ‘जीव’ म्हणतात. तसेच जीव ही संज्ञा सजीव वस्तूंतील जीवतत्त्वाला म्हणजेच चैत्यनालाही वापरतात. प्रारंभिक जीवांतील कोणती लक्षणे चैतन्यनिदर्शक आहेत, याबद्दल एकमत नाही. चैतन्याचे सर्वात ठळक लक्षण म्हणजे प्रजोत्पादनाची क्षमता असे मानतात त्यावरून जास्तीत जास्त स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या वस्तूला जीव म्हणता येईल. अशा जीवनिर्मितीच्या परंपरेत नूतन संततीत ⇨उत्परिवर्तने (एकाएकी घडणारे बदल) आढळतात व ⇨ आनुवंशिकतेने ती चालू राहिल्याने नवीन जातींची निर्मिती होत रहाते, ही गोष्ट अभिप्रेत आहे. विशिष्ट प्रकारचे संघटन, आयोजन, हालचाली व शरीरकार्ये यांचा अंतर्भाव जीवांच्या सर्वसाधारण लक्षणांत केला जातो व त्यांवरून सजीव व निर्जीव वेगळे ओळखणे शक्य होते. तसेच काही लक्षणांवरून वनस्पती व प्राणी परस्परांपासून वेगळे करता येतात तथापि काही जीव इतके साधे आहेत की, त्यांची गणना या दोन्हीपैकी कोणत्या गटात करावी, हे ठरविणे कठीण पडते. अनेक विविध प्राणी आणि विचित्र आकारांच्या व प्रकारांच्या वनस्पती यांतील फरक वरवरचे असून त्या सर्वांत सतत आढळणारा सजीव पदार्थ [→ जीवद्रव्य] तत्त्वतः एकच आहे, त्यामुळे सर्व सजीवांत सामान्य असे मूलभूत गुणधर्म सारखेच आहेत. जीवांच्या विविधतेतील हे एकत्व ‘एकं सत्‌ विप्राः बहुधा वदन्ति’, ह्या शास्त्रवचनाशी सुसंगत वाटते म्हणजेच बहुविध चराचर विश्व भरून उरलेल्या ब्रह्मतत्त्वाप्रमाणे ते एकमेवच आहे.

सजीव व निर्जीव यांमध्ये मौलिक फरक नसून सर्व जैव घटना भौतिकी व रसायनशास्त्र यांतील नियमांनुसार चालू असतात, त्यामुळे केव्हा तरी जीवद्रव्याचे संश्लेषण (कृत्रिम रीतीने तयार करण्याची क्रिया करणे) करता येईल, अशी एक विचारसरणी आहे तिला ‘यांत्रिक सिद्धांत’ म्हणतात. याउलट असणारी विचारसरणी म्हणजे निर्जीव व सजीव हे मूलतः भिन्न असून त्यांतील क्रिया-विक्रियांना सारखेच नियम लागू पडत नाहीत हिला ‘जैव शक्ती सिद्धांत’ म्हणतात पहिली विचारसरणी अधिक तर्कशुद्ध मानली जाते.

सर्व जीवांत आढळणाऱ्या सामान्य जीवद्रव्यात काही मूलद्रव्ये सतत आढळतात. उदा., कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, क्लोरीन, कॅल्शियम, मॅग्‍नेशियम, लोह व कमी प्रमाणात मँगॅनीज, तांबे, आयोडीन, फ्ल्युओरीन इत्यादी. ही सर्व मूलद्रव्ये खनिज निक्षेप (साठे), समुद्र व वातावरण यांतही असतात म्हणजे जीवांच्या मूलद्रव्य संघटनात अद्वितीय असे काही नाही. समान मूलद्रव्ये असलेले परंतु भिन्न असे काही पदार्थ आढळतात (उदा., कार्बन मोनॉक्साइड व कार्बन डाय-ऑक्साइड ऑक्सिजन व ओझोन इ.) कारण त्यांचे रासायनिक संघटन भिन्न असते. जड वस्तूंतील काही संयुगे व जीवांतील संयुगे सारखी असतात, परंतु कोणत्याही जीवातील रासायनिक संयुगांचे संपूर्ण मिश्रण जड वस्तूंच्या रासायनिक आयोजनापेक्षा भिन्न असते. हेच जीवद्रव्याचे वैशिष्ट्य आहे. सर्व जीवांतील पाण्याचा अंश साधारणतः ६५ – ९० टक्के असतो. हायड्रोजन व ऑक्सिजन यांपासून बनलेला हा पदार्थ निर्जीवांतही आढळतो तसेच जीवात आढळणारे पदार्थ म्हणजे अम्‍ले, क्षार (अल्कली) व लवणे हे प्रयोगशाळेतही असतात. जीवांतच आढळणारे अथवा जीवोत्पाद असे इतर काही पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेटे, प्रथिने, मेद (स्‍निग्ध पदार्थ) व न्यूक्लिइक अम्‍ले हे होत. ह्यांत कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असतात. ⇨प्रकाशसंश्लेषणाने हिरव्या वनस्पतींत कार्बोहायड्रेटे निर्माण होतात त्यावेळी सूर्यापासून घेतलेली प्रकाश-ऊर्जा त्यात साठविली जाते व पुढे आवश्यकतेप्रमाणे तिचा वापर वनस्पती व प्राणी करतात. मेदी पदार्थांत संचित उर्जा अधिक असून कार्बोहायड्रेटांपेक्षा ते अधिक जटिल असतात. आता प्रयोगशाळेत या दोहींचे संश्लेषण करणे शक्य झाले आहे. प्रथिनांचे संघटन बरेच जटिल असून त्यांत नायट्रोजन असतो. प्रयोगशाळेत अद्याप प्रथिननिर्मिती शक्य झालेली नाही, परंतु त्यांचे पॉलिपेप्टाइडासारखे भाग मात्र बनविता येतात. अनेक जीवांत सारखीच कार्बोहायड्रेटे व मेद आढळतात, परंतु भिन्न जीवांतील प्रथिने मात्र भिन्न असतात व त्याचे कारण आंतरिक (आनुवंशिकता) असावे असे दिसते. जीवांतील भेदांचे मूळही यांत असावे. जीवांतील प्रकल-प्रथिनांत (कोशिकेतील कार्यांचे नियंत्रण करणाऱ्या जटिल गोलसर पुंजातील म्हणजे प्रकलातील प्रथिनांत) प्रथिने अम्‍लाशी जोडलेली असून जीवांच्या सूक्ष्म शरीर घटकांतील (कोशिकांतील, पेशींतील) कार्याचे नियंत्रण व आनुवंशिकता प्रकल-प्रथिनांतून उगम पावतात. सर्व जीवांत आढळणाऱ्या चैत्यन्याचा आविष्कार ज्या सामान्य, अत्यंत जटिल व अनेक प्रथिने असलेल्या कार्बनी पदार्थांत होतो, त्यास ‘जीवद्रव्य’ म्हणतात. वनस्पती व प्राणी यांच्या जातीजातींत जीवद्रव्यात जरी फरक आढळत असला, तरी त्याची सामान्य लक्षणे सर्व जातींत सारखी असतात. अनेक वैज्ञानिक उपकरणे, रसायने व रंजके इत्यादींच्या साहाय्याने जीवद्रव्याचा सूक्ष्म अभ्यास चालू असून त्याची संरचना व त्यातील अनेक भागांची कार्ये यांबद्दल आता बरीच निश्चित माहिती मिळाली आहे. जीवद्रव्याची संरचना व त्यातील जीवनकार्ये यांमध्ये विलक्षण समन्वय साधलेला असून त्यातच जीवद्रव्याचे वैशिष्ट्य आढळते [→ कोशिका आनुवंशिकता आनुवंशिकी].

जीवांचे शरीर व प्रभेदन : जीवांतील मौलिक जिवंत पदार्थ (जीवद्रव्य) काही अपवाद वगळल्यास बहुधा कोशिका नावाच्या सूक्ष्म घटकात (एककात) असतो साधे जीव एककोशिक (एकाच कोशिकेचे बनलेले) असतात. त्यात सूक्ष्मतर भाग (कोशिकांगे) असून त्यांची कार्ये भिन्न असतात. त्यांत श्रमविभागणी असते. उच्च दर्जाच्या प्राण्यांत व वनस्पतींत कोशिकांची संख्या फारच जास्त असते. त्यांमध्ये कोशिकांच्या आकारात आणि आकारमानात बरेच फरक आढळतात तसेच त्यांची संरचना व कार्ये भिन्न असतात. समान आकार, संरचना व कार्ये असलेल्या कोशिकांच्या समूहास ऊतक म्हणतात. जीवांच्या शरीरात भिन्न ऊतकांचे स्थान व कार्ये भिन्न असून ऊतकांची संरचना व कार्य यांचा निकट संबंध असतो त्यामुळे ऊतकांत प्रभेदन (श्रमविभागणीमुळे झालेले संरचनेतील फेरबदल) आढळते. भिन्न ऊतकांच्या साहचर्याने व समन्वयाने अवयव बनतात आणि म्हणून कित्येक जीवांचे शरीर अनेक अवयवांचे बनलेले असते अनेक अवयव मिळून तंत्र (संस्था) बनते. प्रत्येक अवयव किंवा तंत्र यांना एक प्रमुख कार्य तर असतेच शिवाय काही इतर दुय्यम व तिय्यम कार्येही असतात. प्रत्येक जीव हा संरचना व कार्ये यांच्या समन्वयाने बनलेला एक नमुना (साचा) असतो, असे अनेक नमुने भिन्न ⇨जाती   म्हणून ओळखले जातात. काही सूक्ष्मजीव त्यांच्या उत्पादांमुळे किंवा त्यांनी घडवून आणलेल्या विकृतीमुळे (उदा., काही सूक्ष्मजंतू, आदिजीव-प्रोटोझोआ इ.) ओळखले जातात. जीवांतील संरचना व आकार यांतही समन्वय आढळतो. प्रत्येक जातीतील व्यक्तीचे कमाल व किमान आकारमान विशिष्ट मर्यादेत असते. आकारमान फारच मोठे होते त्या वेळी आकारातही (स्वरूपातही) फरक पडतो. लहान जीवांचा पृष्ठभाग सापेक्षतः त्यांच्या आयतनापेक्षा (घनफळापेक्षा) मोठा असतो, तर मोठ्या जीवांचा पृष्ठभाग त्यांच्या आयतनापेक्षा सापेक्षतः लहान असतो.


वायुविनिमय, अन्नशोषण आणि उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणे) या प्रक्रियांशी पृष्ठभागाचा संबंध असल्याने सूक्ष्मजीवांना या कार्याकरिता साधी संरचना पुरेशी होते. मोठ्या प्राण्यांमध्ये अधिक पृष्ठभागातून उष्णता जलद बाहेर पडते, त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर राखण्याची समस्या उद्‌भवते तसेच शरीरांतर्गत पदार्थांची ने-आण करण्यास अधिक विशिष्ट साधने (वाहिका, वाहिन्या इ.) लागतात, त्यामुळे मोठ्या जीवांची संरचना अधिक जटिल असते. काहींतील अधिक विस्तृत संरचना त्यांच्या अनुकूलनाशी (ज्या प्रक्रियेत एखादा जीव विशिष्ट परिस्थितीत रहाण्यास योग्य होतो त्या प्रक्रियेशी) निगडीत असतात यावरून संरचना व कार्ये यांतील जटिलता फक्त आकारमानाशी संबंधित असते, असे आढळत नाही.

जीवांच्या शरीरातील महत्त्वाची कार्ये : हिरव्या वनस्पतींत प्रकाशसंश्लेषणामुळे प्रथम कार्बोहायड्रेटे व नंतर इतर अन्नपदार्थ निर्माण होतात व त्यांचा उपयोग शरीरनिर्मितीत होतो. वनस्पतींत हे अन्न साठूनही राहते व त्याचा उपयोग अन्न व ऊर्जा मिळविण्यास प्राणी करतात तसेच जरूरीप्रमाणे वनस्पतींतही संचित अन्नापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर होतो. कमीजास्त प्रमाणात सर्व जीवांत ही प्रक्रिया चयापचयात [शरीरात घडून येणाऱ्या भौतिक आणि रासायनिक बदलात, → चयापचय] अंतर्भूत असते. जीवांतील रासायनिक संयुगांतून ऊर्जा उपलब्ध होताना बहुधा ऑक्सिजनाचा वापर होतो व या प्रक्रियेस श्वसन म्हणतात [→ श्वसन तंत्र श्वसन, वनस्पतींतील]. जीवांतील कोशिका, ऊतके व अवयव ह्या ऊर्जेचा उपयोग नवीन शरीरघटक निर्मितीसाठी करतात. कोणत्याही प्राण्याला ऊर्जेची आवश्यकता असल्याने ती मिळविण्यास अन्नाची जरूरी असते. हे अन्न काही प्राणी इतर प्राण्यांना मारून घेत असले, तरी काही इतर प्राणी अन्नाकरिता वनस्पतींवर अवलंबून असतात, हे सत्य आहे. वनस्पती सजीव असल्याने  त्यांच्यावर अवलंबून असणारे प्राणी व त्यांचाही अन्नाकरिता उपयोग करणारे इतर प्राणी यांचा साकल्याने विचार केल्यास ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या उक्तीतील सत्यता पटण्यास हरकत नाही. मात्र बहुसंख्य वनस्पती आवश्यक ती ऊर्जा सूर्यप्रकाशातून घेत असल्याने ती स्वतंत्र मानणे आवश्यक आहे.

आरंभी सांगितल्याप्रमाणे ⇨ प्रजोत्पादन  हे जीवांचे वैशिष्ट्य असून त्यामुळे जीवांच्या जातींचे सातत्य चालू राहते व त्यांचा प्रसारही होतो. याशिवाय मर्यादित स्वरूपाची वाढ [→ वृद्धि, प्राण्यांची वृद्धि, वनस्पतींची] हेही जीवांचे महत्त्वाचे लक्षण मानले आहे. रासायनिक संश्लेषणामुळे आकारमान आणि अवयव वाढतात आणि कित्येकांत अवयवांची संख्याही वाढते. कालपरत्वे वाढ थांबून जीवास परिपक्वता येते. वाढ चालू असताना कोशिकांची संख्या व आकारमान ही वाढतात. बहुदा अशी वाढ अनुत्क्रमणीय असते (उदा., पूर्ण वाढ झालेल्या पानाचे किंवा फळाचे आकारमान फारसे कमी होत नाही पूर्ण वाढ झालेला प्राणीही शरीराने मर्यादेतच कमी होईल त्याच्या अवयवांची संख्या मात्र कमी होत नाही). कमीजास्त प्रमाणात सर्व जीवांत संवेदनाक्षमता [→ वनस्पतींचे चलनवलन] आढळते भिन्न उत्तेजकांना (चेतकांना) प्रतिसाद देण्यास ती व्यक्त होते. यामुळेच सर्व जीव पर्यावरणाशी (सभोवतालच्या परिस्थितीशी) समरस होण्याचे कार्य सतत करीत असतात त्यात यशस्वी झाल्याशिवाय जीवन अशक्य ठरते. पर्यावरणात प्रकाश, तापमान, संपर्क, विशिष्ट पदार्थांचे सान्निध्य, पाणी, हवा, गुरूत्वाकर्षण इ. जीवांवर प्रभाव पाडणाऱ्या घटकांचा समावेश होतो. हे पर्यावरण भिन्न प्रदेशांत भिन्न असते, इतकेच नव्हे, तर कालपरत्वे पूर्वीपासून ते बदलत आले आहे. संख्यावाढीमुळे व मर्यादित जीवनसाधनांमुळे जीवांमध्ये स्पर्धा निर्माण होणे अपरिहार्य होते. या स्पर्धेत (कलहात) पर्यावरणाशी आपल्या वैशिष्ट्यांमुळे समरस झालेल्या जीवांची नैसर्गिक निवड होऊन ते यशस्वी होतात व प्रजोत्पादनाने आपले सातत्य चालू ठेवतात त्यामुळे भिन्न पर्यावरणात असे अनुकूलित जीव बहुसंख्येने आढळतात. ⇨लवनस्पती मरुवनस्पती लवण वनस्पती  पक्षी, उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी या सर्वांत संरचना, आकार, आकारमान, वर्तन व जीवनरीती या सर्व दृष्टींनी आवश्यक ते अनुकूलन झालेले आढळते. त्याशिवाय ते जीव तेथे जगूच शकले नसते. स्वसंरक्षणाकरिता काही प्राणी भोवतालच्या रंगाशी किंवा पार्श्वभूमीशी (बर्फ, जमीन, खडक, पाने, फुले इ.) इतके सादृश्य दर्शवितात की, त्यांची व्यक्तिशः ओळख पटणे कठीण जाते [→ मायावरण]. परिस्थितिसापेक्ष जीवांचे परस्परसंबंध फार गुंतागुंतीचे असल्याचे आढळते. काही जीव स्वतः परिस्थितीपैकी एक घटक ठरतात व इतरांवर प्रभाव पाडतात तर केव्हा एका परिस्थितीचा दुसरीवर प्रभाव पडतो [→ परिस्थितिविज्ञान].

जीवांसंबंधींचा विचार करताना जीवांच्या उत्पत्तीसंबंधीचा प्रश्न पुढे येणे अटळ आहे. त्यासंबंधी काही सिद्धांत [→ क्रमविकास जीवोत्पत्ति] व काही साधार तर्क मांडले गेले आहेत. पृथ्वीच्या आरंभी बराच काळपर्यंत जीवाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही त्यानंतर बहुधा अपघातानेच प्रथम विशिष्ट रासायनिक (प्रथिनासारखे) पदार्थ आणि त्यानंतर त्यांपासून फार साधे जीवद्रव्य व त्यापासून पुढे काही आदिजीव व आदिवनस्पती निर्माण झाल्या असाव्यात, असे मानतात. साध्यापासून अधिकाधिक जटिल जीवप्रकार विकास पावून आजची वैचित्र्यपूर्ण जीवसृष्टी बनली आहे. आपल्या पृथ्वीप्रमाणे याच ग्रहमालेतील किंवा इतर ग्रहमालांतील पृथ्वीसारखी परिस्थिती असलेल्या ग्रहांवर जीव असणे असंभवनीय नाही, परंतु त्याबद्दल खात्रीलायक पुरावा उपलब्ध नसून फक्त तर्कच आहेत. अन्य प्रकारचे जीव व जीवनपद्धती एखाद्या ग्रहावर असणे शक्य आहे पण हाही एक तर्कच आहे. चंद्रावर जीवन नाही, हा शोध नुकताच लागला आहे.

पहा : ऊतके, प्राण्यांतील ऊतके, वनस्पतींतील कोशिका जीवद्रव्य जीवोत्पत्ति परिस्थितिविज्ञान शारीर.

संदर्भ : 1. Villee, C. A. and others, General Zoology, Tokyo, 1968.

   2. Whaley, W. G. and others, Principles of Biology, New York, 1964.

परांडेकर, शं. आ.