निरुपमा देवी :(? मे १८८३–७ जानेवारी १९५१). बंगाली लेखिका. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरमपूर येथे त्यांचा जन्म झाला. १८९३ मध्ये नवगोपाल भट्ट यांच्याशी त्यांचा विवाह झाला पण अल्पावधीतच त्यांना वैधव्य आले. त्यांनी घरीच अभ्यास करून आपली शैक्षणिक पातळी उंचावली. बंगाली स्त्री-कादंबरीकारांमध्ये निरुपमा देवींचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रथमपासूनच कादंबरीलेखनातील त्यांचा सहजपणा वाचकांच्या लक्षात आलेला आहे. त्यांच्या दिदि या कादंबरीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले. निरुपमा देवी लघुकथाही लिहीत परंतु कथालेखिका म्हणून त्यांची फारशी ख्याती झाली नाही. त्यांच्या काही कथा त्यांचे थोरले बंधू विभूतिभूषण भट्ट यांच्या कथांसह अष्टक (१९१७) नावाने संकलित आहेत. निरुपणा देवींचे स्वतःचे कथासंग्रह आलेया (१९१७) व बंधु (१९२१) हे होत. त्यांची पहिली कादंबरी अन्नपूर्णार मंदिर (१९१३) ही होय. याशिवाय त्यांनी दिदि (१९१५), श्यामली (१९१९), बिधिलिपि (१९१९), उच्छृंखल (१९२०), परेर छेले (१९२४), आमार डायरी (१९२७), अनुकर्ष (१९४१), देवत्र (१९४७) आणि युगांतरेर कथा ह्या कादंबऱ्या लिहिल्या. यांतील दिदिश्यामली ह्या कादंबऱ्या विशेष गाजल्या.

निरुपमा देवींच्या लेखनावर शरत्‌चंद्रांची छाप आहे. सर्वसामान्य कुटुंबातील साधेसुधे जीवनचित्रण त्यांच्या कादंबऱ्यांतून आढळते. त्यांच्या कादंबऱ्यांची घडण सरळ आणि शैली ओघवती आहे. पतिप्रेमाला पारख्या झालेल्या दुर्देवी स्त्रियांच्या मनोवेदनाच विशेषत्वाने त्यांच्या कादंबऱ्यांत आढळतात. शरत्‌चंद्रांनी निरुपमा देवींच्या कादंबऱ्यांची प्रशंसा केली होती.

निरुपमा देवींच्या श्यामली कादंबरीला देवनारायण गुप्त यांनी दिलेले नाट्यरूप इतके यशस्वी झाले होते, की बंगाली रंगभूमीवर सर्वप्रथम पाचशे प्रयोग होण्याचे सद्‌भाग्य त्या नाटकाला लाभले. वृंदावन येथे निरुपमा देवींचे निधन झाले.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)