पतंग – २: पतंगांचा समावेश लेपिडॉप्टेरा गणात होतो. याच गणात ⇨ फुलपाखरांचाही अंतर्भाव होतो. पतंगांच्या पंखांवर तसेच शरीराच्या इतर भागांवर खवले असतात. खवल्यांमुळे त्यांना विविध प्रकारच्या रंगच्छटा प्राप्त होतात. त्यांच्या शृंगिका (सांधेयुक्त स्पर्शेंद्रिये) निमुळत्या, बहुधा शाखायुक्त किंवा कंकतिक (फणीसारख्या) असतात. याउलट फुलपाखरांच्या शृंगिका टोकाला गदाकृती असतात. विश्रांती घेताना पतंग आपले पंख उदरावर छपरासारखे धरतात किंवा त्याच्या शरीराशी पंखांचा ९० अंशांचा कोन असतो, तर फुलपाखरे आपले पंख उदरावर जुळवून उभे धरतात. बहुतेक सर्व पतंग निशाचर असतात, तर फुलपाखरे दिनचर असतात. पतंग प्रकाश उद्‌गमाकडे आकर्षिले जातात व ते त्याभोवती घिरट्या घालतात.

पतंगांचे आकरमान एकमेकांहून भिन्न असते. सूक्ष्म नेप्टिक्युलिड पतंगाच्या पंखांचा विस्तार ३ मिमी. पेक्षा थोडा जास्त असतो, तर मोठ्या ॲटलास पतंगाच्या काही रूपांत तो ३० सेंमी.पेक्षा जास्त असतो. पतंगांची अंडी सामान्यतः अधिक गोल किंवा लंबगोल असतात. अंडी एकेकटी, अनियमित पुंजक्याच्या किंवा नियमित संरचनेच्या रूपात असतात. अंड्यांना फक्त कवचाचेच संरक्षण असते किंवा मादीने स्रवलेल्या आवरणाचे आच्छादन असते. पतंगांच्या अळ्यांना सुरवंट किंवा घुले म्हणतात. विविध युक्त्या योजून ते आपले संरक्षण करतात. लष्करी अळ्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या दिवसा जमिनीतील भेगींत लपून बसतात. कित्येकींच्या अंगावर विषारी केस असतात.

पतंगांचे कोश पुढच्या टोकाला दंडगोलाकार, लांबट गोलाकार व मागच्या टोकाला निमुळते असतात. कोश उघडे किंवा रेशमी कोशावरणात बंदिस्त असतात.  बहुतेक कोश अचल असतात पण भोके पाडणाऱ्या पतंगांचे कोश कोशावरणाच्या छिद्रापर्यंत हालचाल करतात.

प्रौढ पतंगांच्या उड्डाणात खूपच विविधता आढळते. शिकरा पतंग खूप वेगाने उडतो व फुलातील मध खाताना फुलापुढे संथपणे तरंगत असतो व तो मागेही येऊ शकतो. सर्व मोठे व छोटे पतंग हवेत लाटेप्रमाणे खालीवर खालीवर होत उडत असतात. रेशमाच्या किड्याच्या पतंगाच्या मादीला व जिप्सी पतंगाच्या मादीला पंख असतात पण त्या उडू शकत नाहीत. बाकीच्या माद्यांना पंख नसतात व त्या रांगत रांगत एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात.

पुष्कळ पतंग फारच उपद्रवी आहेत परंतु काही उपयुक्तही आहेत. रेशमाच्या किड्यापासून (बाँबिक्स मोरी) रेशीम मिळते. त्याच्या इतर जातींपासूनही रेशीम मिळते पण त्याची प्रत चांगली नसते [⟶ रेशीम]. आदिवासी लोक पतंगांच्या अळ्या खातात. उपद्रवी वनस्पतींचा नाश करण्याच्या कामी मानवाने पतंगाचा उपयोग केलेला आहे. उदा., ऑस्ट्रेलियात निवडुंगाचा नायनाट करण्यासाठी कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम या पतंगाचा उपयोग करण्यात आला. फळातील रस शोषणारे पतंग, बटाट्यावरील पाकोळी हे उपद्रवी पतंग आहेत. बहुतेक पतंग अळीअवस्थेत पिकांचे, साठविलेल्या  धान्याचे व इतर पदार्थांचे नुकसान करतात. ह्या अळ्यांचे नियंत्रण जठरविषे, विषारी आमिषे इ. वापरून करतात परंतु पतंगांचाही बंदोबस्त करणे किडीचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यासाठी त्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होण्याच्या प्रवृत्तीचा उपयोग करून वा काही रसायानांच्या साहाय्याने पतंग आकर्षित करून त्यांचा नाश करतात. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी कंदील व दिवे लावून अगर आंबूस काकवी पत्र्याच्या डब्यात ठेवून पतंग पकडतात. (चित्रपत्रे ३९, ४०).

पहा : पाकोळी–२ फळरस शोषक पतंग.

दोरगे, सं. कृ. जमदाडे, ज. वि.


नॅपॅटा्प्लेंडिडा (बोलिव्हिया)लायमँट्रिया डिस्पर (जिप्सी पतंग, उ. अमेरिका)क्रिसोकेल प्रिन्सीपॅलीस (मेक्सिको)ॲक्टिॲस ल्यूना (ल्यूना पतंग, उ. अमेरिका)सिथेरोनिया रिगॅलीस (रॉयल वॉलनट पतंग, अमेरिका)झँथोस्पायलोप्टेरिक्स सुपर्बा (आफ्रिका)युक्रोमिया फोर्मोसा (मॅलॅगॅसी)इरॅस्मिया पल्चेल्ला (भूतान)


डायाक्रिसिया ऑब्लिक्वा (भारत)प्रोडेनिया लिटुरा (भारत)अचेरोन्शिया स्टिक्स (भारत)हायालोफोरा सेक्रोपिया (सेक्रोपिया पतंग, उ. अमेरिका)कॉसिनोसेरा हर्क्युलिस (मोठा हर्क्युलिस पतंग, न्यू गिनी व ऑस्ट्रेलिया)स्पोडोप्टेरा मॉरिशिया (भारत)