ब्रह्मपुरी – २ : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवढे तालुक्यातील एक इतिहासप्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या १,८५९ (१९७१). पंढरपूर शहराच्या आग्नेयीस सु. २५ किमी. भीमा नदीतीरावर हे वसले आहे. मराठा साम्राज्यावरील स्वारीच्या वेळी (१६९५) औरंगजेबाने आपली छावणी येथे उभारून कायम घरांची बांधणी केली. औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा उर्फ बेगमसाहेबा ही १९०२ मध्ये येथे मरण पावली. तिच्या स्मरणार्थ ‘बेगमपूर’ अशा नावानेही ब्रह्मपुरीचा निर्देश केला जाई. येथे सिद्धेश्वर हे एक जुने हेमाडपंती मंदिर असून महाशिवरात्रीला तेथे जत्रा भरते.

चौधरी, वसंत