पुरळ : त्वचेवर निरनिराळ्या कारणांमुळे उत्पन्न होणाऱ्या उत्स्फोटाला सर्वसाधारण भाषेत पुरळ म्हणतात. पुरळ हे एक लक्षण असून ते निरनिराळ्या त्वचारोगांत किंवा सार्वदेहिक रोगांतही आढळते. ते एक महत्त्वाचे लक्षण असून त्याच्या प्रकारावरून (शरीरावर कोठे, केव्हा उमटला, प्रसार कसा झाला वगैरेंवरून) स्फोटक ज्वरासारख्या सार्वदेहिक रोगांचे निदान करता येते [→ कांजिण्या गोवर देवी ]पुष्कळ वेळा पुरळ हे दुय्यम लक्षण असते उदा., विषमज्वरात दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दिसणारा अत्यल्प पुरळ. औषधी प्रतिक्रिया म्हणून पुरळ अनेक वेळा दिसतो आणि हे पुरळाच्या अनेक कारणांपैकी नेहमी आढळणारे एक कारण अलीकडे बनले आहे. बार्बिच्युरेटे (शामक औषधांचा एक गट), प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे यांच्या (उदा., पेनिसिलीन) आणि काही मूत्रल (लघवी साफ करणारी) औषधे यांच्या सेवनामुळे पुरळ उमटण्याचा नेहमी संभव असतो. काही जीवनसत्त्वन्यूनता रोगांतही पुरळ हे एक लक्षण असते [→ वल्कचर्म स्कर्व्ही]. त्वचा अधिहृषता (ॲलर्जी) किंवा सार्वदेहिक अधिहृषता यामध्ये पुरळ हे महत्त्वाचे लक्षण असते [→ ॲलर्जी]. पुरळ पुष्कळ वेळा निरुपद्रवी असू शकतो उदा., लंगोटामुळे अर्भकाच्या मांड्या व नितंबावर दिसणारा पुरळ किंवा उन्हाळ्यातील घामोळे, खाज, मुंग्या येणे, जळजळणे, वेदना किंवा ज्वर यांसारखी काही लक्षणे पुरळाबरोबर आढळतात किंवा तो लक्षणविरहितही असू शकतो. ज्वर आणि शारीरिक अस्वस्थता, अतिखाज वगैरे लक्षणांसहित असलेल्या पुरळाकडे दुर्लक्ष करता कामा नये. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे जरूर असते.
संदर्भ : 1. Chamberlain, E. N. Ogilvie, C. Symptoms and Signs in Clinical Medicine, Bristol, 1974.
भालेराव, य. त्र्यं.