कायटिन : हे नायट्रोजन असलेले पॉलिसॅकॅराइड (ज्याच्या रेणूंमध्ये तिनापेक्षा जास्त शर्करा एकके आहेत असे कार्बोहायड्रेट) असून ते जीवसृष्टीत विपुल प्रमाणात आढळते. आर्थ्रोपोडा (संधिपाद) ह्या संघातील प्राण्यांच्या बाह्यकंकालाचा (बाह्य सांगाड्याचा) हा महत्त्वपूर्ण घटक असतो. कीटकांच्या बाह्यकंकालातही कायटिन आढळते. कित्येक कवकांच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींच्या) पेशींच्या भित्तीतही हा टिकाऊ पदार्थ आढळतो. काही प्राणी व वनस्पती यांचे संश्लेषण करतात (शरीरांतर्गत रासायनिक विक्रियेने तयार करतात). खेकडे आणि शेवंडे यांचे कठीण कवच कॅल्शियम कार्बोनेटादी खनिज द्रव्ये, प्रथिन व कायटिन यांपासून बनलेले असते. खाद्य म्हणून प्राण्यांना याचा उपयोग होतो असे अजून तरी आढळून आलेले नाही. काहींच्या मतानुसार हीलिक्स ही गोगलगाय कायटिनाचे पचन करू शकते. कायटिन हे लवचिक नसल्यामुळे आर्थ्रोपोडा आपल्या वाढीच्या वेळी बाह्यकंकाल टाकून देतात व नवे आवरण तयार करतात. रासायनिक दृष्ट्या कायटिन अत्यंत अक्रिय आहे. कायटिन वर्णहीन व अस्फटिकी असून सेल्युलोजाप्रमाणेच ते पाणी, विरल खनिज अम्‍ले व क्षार यामध्ये विरघळत नाही. श्वाइत्झर यांनी शोधून काढलेल्या विक्रियाकारकामध्ये (तीव्र अमोनियातील कॉपर हायड्रॉक्साइडाच्या विद्रावात) ते अविद्राव्य (न विरघळणारे) आहे. संहत (प्रमाण जास्त असलेल्या) अम्‍लात याचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रयेने घटक द्रव्ये अलग होणे) होते. कायटिनाचा रेणू हा एन-ॲसिटील-डी-ग्‍ल्युकोसामीन याची एकके जोडून तयार झालेला अशाख दीर्घ रेणू आहे.

कुलकर्णी, स.वि.