चित्रे, दिलीप पुरुषोत्तम : (१७ सप्टेंबर १९३८-  ). स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील मराठी कवी, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत. जन्म बडोदे येथे. वडील पु. आ. चित्रे हे अभिरुचि  ह्या वाङ्‌मयीन नियतकालिकाचे संपादक असल्यामुळे चित्र्यांवर लहानपणापासूनच वाङ्‌मयीन संस्कार झाले. १९५१ मध्ये ते मुंबईला आले. इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन ते मुंबई विद्यापीठाचे बी.ए. झाले (१९५९). त्यानंतर ते इथिओपियात तीन वर्षे शिक्षक होते. भारतात परत आल्यानंतर जाहिरात व विक्री अधिकारी, सांस्कृतिक अधिकारी, पत्रकार असे विविध व्यवसाय त्यांनी केले. १९७१ पासून इंडियन एक्सप्रेस ह्या इंग्रजी वृत्तपत्राच्या कलाविभागात अधिकारी.

त्यांची प्रकाशित पुस्तके अशी : कवितासंग्रह–कविता (१९६०). कथासंग्रह–ऑर्फियस (१९६८). कांदबरी–त्याची व्याली असे पोरे (१९७१). प्रवासवर्णनात्मक आत्मवृत्त–शीबा राणीच्या शोधात (१९७०). कविता आणि ऑर्फियस  ह्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.

ॲन अँथॉलजी ऑफ मराठी पोएट्री (१९६७) या त्यांनी संपादिलेल्या पुस्तकात १९४५ ते १९६५ या काळातील विवक्षित दृष्टीकोणातून निवडलेल्या मराठी कवितांचे इंग्रजी अनुवाद दिलेले आहेत.

यांशिवाय बऱ्याच इंग्रजी आणि मराठी संपादित ग्रंथांत त्यांचे लेखन समाविष्ट करण्यात आलेले आहे. विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या पण अद्याप पुस्तकरूपात न आलेल्या त्यांच्या लेखनात १९६० नंतरच्या त्यांच्या कविता ‘आधुनिक कवितेला सात छेद’ ही लेखमाला, ‘सफायर’ व ‘रुधिराक्ष’ या लघुकांदबऱ्या, तुकारामांच्या निवडक अभंगांचा आणि श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृताचा इंग्रजी अनुवाद ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

शब्द  ह्या मराठीतील पहिल्या अनियतकालिकाच्या प्रवर्तकांत चित्रे होते. नवसाहित्याची एक पिढी त्यांच्याबरोबर सुरू होते. ⇨अतिवास्तववाद, ⇨अभिव्यक्तिवाद  या यूरोपीय कला-साहित्यसंप्रदायांशी नाते असलेली ही बंडखोर पिढी एकंदर सामाजिक आणि सांस्कृतिक विनिमयाच्या संदर्भात साहित्याचा जागरूकपणे विचार करणारी होती.

भोवतालचे समाजजीवन आणि भाषा यांतून प्राप्त होणारे परंपरेचे संचित, वाङ्‌मयीन रूपसंकल्पना, तसेच वाङ्‌मयीन मूल्ये व भाषेचा उपयोग यांबाबतच्या प्रस्थापित अपेक्षा हे सर्व चित्र्यांनी नाकारले. ह्या संकेतमुक्तीमुळे त्यांचे लेखन अतिशय ताजे व वेगळे वाटते. काव्य व कथा या दोन्ही प्रकारांत त्यांनी सर्वस्वी नवी वाट काढली.

आपल्या वेगळेपणाची, अलगपणाची व जीवनातील असंबद्धतेची जाणीव त्यांच्या बाबतीत निर्णायक ठरलेली दिसते. मृत्यूची अटळता, जबर जीवनेच्छा व भेडसावणारे एकाकीपण हे त्यांच्या व्यक्तिकेंद्री जाणिवेचे काही घटक. त्यामुळे ऐंद्रीय संवेदना व प्रेम ह्यांना चित्र्यांच्या विश्वात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. एखाद्या भाषिक किंवा राष्ट्रीय समूहाच्या स्वभावधर्मापलीकडे असणाऱ्या व विश्वसाहित्यात सर्वत्र प्रत्ययास येणाऱ्या आधुनिक जाणिवेचा त्यांच्या लेखनात आविष्कार झालेला दिसतो. सूक्ष्म व कठोर अस्तित्वशोधाचे एक उत्कट, निष्ठापूर्ण व समग्र विचारविश्व त्यांच्या लेखनामागे उभे असल्याचे जाणवते.

आपली भाषा प्रत्येक लेखनात ते नव्याने घडविताना दिसतात. ध्वनि-आकार व प्रतिमा ह्यांच्या नियंत्रित आवर्तनांतून आणि अनपेक्षित शब्दसंहतीमधून ते आपल्या भाषेला अतिशय प्रत्ययकारी बनवितात.

परांजपे, प्र. ना.