ॲझोटोबॅक्टिरिएसी : सूक्ष्मजंतूंच्या यूबॅक्टिरिएलीझ या चौथ्या गणातील पहिले कुल. या कुलातॲझोटोबॅक्टर हा एकच वंश आहे. ‘ॲझोट’ (= नायट्रोजन वायू) या फ्रेंच शब्दावरून हे नाव आलेले असून यातील सूक्ष्मजंतू हवेतील नायट्रोजनाचे स्थिरीकरण (मुक्त नायट्रोजनापासून नायट्रोजनयुक्त संयुगे तयार करणे) घडवितात.

ॲझोटोबॅक्टर वंशातील सूक्ष्मजंतू लंब शलाकाकार, गोलाकार अथवा यीस्टासारखे, बीजाणुनिर्मिती (लाक्षणिक प्रजोत्पादक अवयवाची निर्मिती) न करणारे, कोशिकांच्या (पेशींच्या) सर्व बाजूंस कशाभिका (हालचालीस उपयोगी पडणारे नाजुक धागे) असणारे, ग्रॅम-रंजक-अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून न राहणारे) व वातापेक्षी (हवेच्या सान्निध्यात वाढणारे) असल्याने संवर्धकाच्या पृष्ठभागावर वाढतात. यांचे अस्तित्व मृदेत व पाण्यात आढळते.

 

या कुलात एकच वंश असल्याने कुलाचे व जातीचे गुणधर्म एकच आहेत. हे सूक्ष्मजंतू सुपीक मृदेत आढळतात. हवेचा आणि शर्करा व तत्सम कार्बनी पदार्थांचा पुरवठा विपुल असल्यास नायट्रोजनाचे स्थिरीकरण अव्याहतपणे चालते व त्यामुळे मृदेतील नायट्रोजनाचे प्रमाण वाढते. नायट्रोजनाच्या स्थिरीकरणाकरिता फॉस्फेट आणि मॉलिब्डेनमाची जरुरी असते.

 

यावंशात ॲ. क्रोकॉकमॲ. ॲजाइलआणि ॲ. इंडिकसया तीन जाती आढळतात. यांपैकी ॲ. क्रोकॉमकमाच्या सूक्ष्मजंतूंचा रंग संवर्धकावर किरमिजी असतो, पण ॲ. ॲजाइल जातीचे सूक्ष्मजंतू रंगहीन असतात. ॲ. इंडिकस जातीचे सूक्ष्मजंतू प्रथमच भारतात आढळले. ते अम्‍लता सहन करू शकतात. त्यांच्या कोशिकांभोवती चिकट पदार्थाचे आवरण असते.

 

डच शास्त्रज्ञ डक्स यांनी ॲ. इंडिकसाच्या आधारे बायरिंकियाहा नवीन वंश या कुलात प्रस्थापित केला आहे. बायरिंकियाचे सूक्ष्मजंतू इतर ॲझोटोबॅक्टरांच्या सूक्ष्मजंतूपेक्षा आकाराने लहान आणि अम्‍लता सहन करणारे आहेत. त्यांना ॲझोटोबॅक्टरहे नामाभिधान देणे योग्य नाही. याबाबत हॉलंड, आफ्रिका व ऑस्ट्रेलियातील सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केलेले आढळते. हे सूक्ष्मजंतू अम्‍लयुक्त अशा जांभ्याच्या मृदेतच आढळतात. ॲझोटोबॅक्टरआढळत नाहीत अशा मृदा मुख्यतः उष्णकटिबंधाच्या प्रदेशातील विपुल पाऊस पडणाऱ्या ठिकाणीच आढळतात. सध्या तरी बायरिंकियाच्या इंडिकाॲसिडा  व लॅक्टोजिनीस अशा तीन जाती अम्‍लता सहन करण्याची व अम्‍ल-उत्पादनाची शक्ती या भेदांवरच केलेल्या आढळतात.

 

 रुइनेन या शास्त्रज्ञ बाईंच्या मते उष्णकटिबंधातील जंगलात काही झाडांच्या पानांवर वाढणाऱ्या बायरिंकियाच्या सूक्ष्मजंतूंमुळे नायट्रोजनाचा पुरवठा होऊ शकतो. मात्र या बाबतीत विशेषसे संशोधन झालेले नाही. बायरिंकिया हा वंश ऑस्ट्रेलिया व यूरोपातील शास्त्रज्ञ मानतात, परंतु अमेरिकन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ तसे मानण्यास तयार नाहीत.

 

ॲझोटोबॅक्टर सूक्ष्मजंतूंचा उपयोग करून पिकांचे उत्पन्न वाढते असे रशियामध्ये सिद्ध झालेले असले, तरी यूरोपीय व अमेरिकन शास्त्रज्ञांच्या मते तसे सिद्ध झालेले नाही.

 

या सूक्ष्मजंतूंचा नायट्रोजनाच्या स्थिरीकरणासाठी उपयोग होण्यास मृदेची अम्‍लता, अन्नाचा व ऑक्सिजनाचा पुरवठा आणि प्रतिजैव (अँटिबायॉटिक) सूक्ष्मजीवाचे मृदेतील अस्तित्व या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणूनच प्रयोगांच्या निष्कर्षांत मतभेद असावेत.

 

पहा : नायट्रोजन सूक्ष्मजीवशास्त्र.

 

संदर्भ :  Salle, A. J. Fundamental Principles of Bacteriology, New York, 1961.

 

भिडे, वि. प.