स्वयंजनन : ही प्रचलित झालेली एक काल्पनिक किंवा परि-कल्पित प्रक्रिया आहे. निर्जीव द्रव्यापासून आपोआप किंवा स्वयंस्फूर्त रीतीने जीव विकसित होतो, असे या काल्पनिक प्रक्रियेत गृहीत धरले आहे. तसेच स्वयंजननाचा एक सिद्धांतही असून त्यात जीवनिर्मिती स्पष्ट करण्यासाठी याच प्रक्रियेचा उपयोग केला आहे. इतिहासपूर्व काळापासून चालत आलेला हा सिद्धांत हजारो वर्षे व्यापकपणे स्वीकारण्यात आला होता. ॲरिस्टॉटल यांच्या इ. स. पू. चौथ्या शतकातील लेखनात प्रथम या कल्पनेचा उल्लेख आलेला आढळतो.

कुजणारे मांस, दमट वैरण, चिखल यांसारख्या निर्जीव गोष्टींपासून माशांचे डिंभ, कृमी, अळ्या, उंदीर यांसारखे विशिष्ट जीव विकसित होतात यावर पूर्वी अनेकांचा विश्वास होता. उदा., कुजणाऱ्या मांसापासून अळ्या, किडे, माश्या निर्माण होतात तसेच चीज, पाव यांचे तुकडे कापडी चिंध्यांमध्ये गुंडाळून काळोख्या कोपऱ्यात ठेवून दिल्यास काही आठवड्यांनी त्यातून उंदीर बाहेर पडतात. यांसारख्या सामान्य आभासी निरीक्षणांतून स्वयंजननाची कल्पना पुढे आलेली दिसते. इटालियन वैज्ञानिक फ्रांचेस्को रेअदी यांनी प्रथम स्वयंजननाची वैज्ञानिक दृष्टीने परीक्षा केली. कुजणाऱ्या मांसावर माश्यांना अंडी घालू न देण्याची दक्षता घेतल्यास त्यापासून माश्यांचे डिंभ निर्माण होत नसल्याचे दाखवून त्यांनी या सिद्धांताला आव्हान दिले.

अठराव्या शतकात विज्ञानाचा उदय झाल्याने यूरोपमध्ये स्वयंजननाबद्दल शंका निर्माण झाली होती. सूक्ष्मदर्शक व इतर वैज्ञानिक उपकरणांमुळे उच्चतर प्राण्यांची अंडी व शुक्राणू, बीजुक ( प्रजोत्पादक सूक्ष्मकोशिका म्हणजे पेशी ), पराग, सूक्ष्मजंतू व इतर सूक्ष्मजीव वैज्ञानिकांना प्रत्यक्ष पाहता आले. कीटकांनी अंडी घातली तरच नवीन कीटक निर्माण होतात, हेही लक्षात आले होते. तरीही १८५० पर्यंत स्वयंजननाचा सिद्धांत पूर्णपणे मागे पडला नव्हता.

नुसत्या डोळ्यांनी न दिसणारे सूक्ष्मजंतू आपोआप निर्माण होतात, हा गैरसमज रूढ होता. आंतॉन व्हान लेव्हेनहूक यांनी १६७६ मध्येच सूक्ष्मजंतूंचा शोध लावला होता. दातांची खरवड व मिऱ्यांचा भिजवून तयार केलेला काढा यांचे वर्णनही करताना त्यांनी सूक्ष्मजंतू ( बॅटिरिया ) पाहिले व त्यांचे अचूकपणे वर्णनही केले होते ( मिऱ्याचा तिखटपणा म्हणजे जिभेला कोणी तरी चावते की काय या समजामुळे त्यांचा काढा तपासला होता ). मात्र त्यानंतरही २०० वर्षे सूक्ष्मजंतूंचे महत्त्व वैज्ञा-निकांच्या लक्षात आले नाही. काही सूक्ष्मजीव रोगांना कारणीभूत असू शकतील अशी शंकाही काहींना आली होती. तथापि, सूक्ष्मजंतू कसे निर्माण झाले या प्रश्नाविषयीच वैज्ञानिकांना सर्वाधिक रस होता व तोच चर्चेचा मुख्य विषय होता.

उकळलेला मांसाचा रस बंद पात्रात एक-दोन दिवस राहू दिल्यास त्यात सूक्ष्मजंतू निर्माण होतात, असे जॉन टर्बेरव्हिल नीडम व झॉर्झ ल्वी ललेर ब्यूफाँ यांनी निदर्शनास आणले. यावरून मृत सेंद्रिय द्रव्या-पासून सूक्ष्मजंतू उत्स्फूर्तपणे निर्माण होतात, असा निष्कर्ष त्यांनी व इतरांनी काढला. मांसरस अधिक काळजीपूर्वक उकळून लगेचच वाताभेद्य पात्रात सीलबंद केल्यास त्यात अनेक दिवसच नव्हे तर अनेक आठवड्यांनंतरही सूक्ष्मजंतू निर्माण होत नाहीत, असे इटालियन जीवशास्त्रज्ञ लाद्दझारो स्पाल्लान्त्सानी यांनी दाखवून दिले. या विश्वासार्ह वाटणाऱ्या निरीक्षणा-नंतरही मांसरसातील स्वयंजननाविषयीचा वाद पुढील शंभर वर्षे चालू होता.

लूई ( ल्वी ) पाश्चर जॉन टिंड्ल यांनी याविषयीचे प्रयोग काळजीपूर्वक व कष्टपूर्वक केले. मांसरसाच्या कढणाचा सूक्ष्मजीवांचे बीजुक असणाऱ्या हवेशी संपर्क येऊ दिला तरच त्यात सूक्ष्मजीव वाढतात, असे पाश्चर यांनी १८५० च्या सुमारास दाखवून दिले. अशा प्रकारे सूक्ष्म-जीवांचे प्रजोत्पादन व वृद्धी यांचे निरीक्षण करून त्यांनी सूक्ष्मजीवांचे प्रजोत्पादन कसे होते, ते सिद्ध केले. तसेच १८५८ मध्ये रुडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो यांनी ‘ पूर्व कोशिकेपासूनच नवीन कोशिकेची उत्पत्ती होते ’ हे तत्त्व मांडले. या संशोधनातून सजीव द्रव्याच्या उत्पत्तीचा कोशिका सिद्धांत पुढे आला. कोशिका ही सर्व सजीवांचा मूलभूत घटक असून आधीच अस्तित्वात असलेल्या सजीव द्रव्यापासून सर्व जीव विकसित होतात, असे हा सिद्धांत मानतो. थोडयात जीवापासूनच जीव-निर्मिती होते आणि मृत सेंद्रिय द्रव्यापासून सूक्ष्मजंतू उत्स्फूर्तपणे निर्माण होत नाही, हे सिद्ध झाले आणि स्वयंजननाचा सिद्धांत मागे पडला.

सूक्ष्मजंतू पृथ्वीवरील पहिले कोशिकीय जीवरूप आहे तसेच पृथ्वी-वरील दीर्घकालीन रासायनिक उत्क्रांतीचा कळस या रूपात ते उत्स्फूर्त-पणे अवतरले असे मत मांडले जाते. यावरून १-२ अब्ज वर्षांच्या कालावधीत अगदी खास प्रकारच्या आद्य वातावरणात जीव उत्स्फूर्तपणे अवतरला असण्याची शयता व्यक्त केली जाते.

पृथ्वी निर्माण झाली तेव्हा तिच्यावर जीवसृष्टी नव्हती, असे तिच्या उत्पत्तीच्या सध्या मान्यताप्राप्त सिद्धांतावरून निश्चितपणे म्हणता येते. यावरून कदाचित एक अब्ज वर्षांच्या कालावधीत जीव खरोखरच निर्जीव द्रव्यापासून अगदी सावकाशपणे अवतरला असावा, असे म्हणता येते. विसाव्या शतकात सजीवांत आढळणारे अनेक रेणू संश्लेषित म्हणजे कृत्रिम रीतीने निर्माण करता येतात, असे प्रत्यक्ष प्रयोगांवरून दिसून आले आहे. अशा प्रयोगांवरून जीवपूर्व पृथ्वीवरील स्वयंजनन कसे झाले असू शकेल, याची कल्पना करता येते. पृथ्वीवरील आदिम वातावरणाशी वादळातील विद्युत् ठिणग्यांची क्रिया घडली, तेव्हा सध्याच्या जीवातील मूलभूत निर्मिती घटकांच्या रूपांतील रेणू निर्माण झाले असू शकतील. थोडयात जीवपूर्व पृथ्वीवरील रासायनिक संयुगे व परिस्थिती यांच्या- पासून द्रव्याच्या अंगभूत गुणधर्मांतून जीवनिर्मिती उत्स्फूर्तपणे झाली असू शकेल. म्हणून लाखो वर्षांपूर्वी जीवहीन द्रव्यापासून जीवाचे पहिले रूप ( वा प्रकार ) अस्तित्वात आले, हा सिद्धांत सांप्रत पारखून पहिला जात आहे.

पहा : आनुवंशिकी जीवोत्पत्ति.

ठाकूर, अ. ना.