प्रदर्शन-प्रवृत्ती : (एक्सिबिशनिझम). कामपूर्तीचा नैसर्गिक मार्ग म्हणजे रतिक्रिडा. स्त्री-पुरुषांच्या समागमात परिणत होणारी ही क्रिया मानवी व्यक्ती अनेक कारणांनी व अनेक मार्गांनी अनैसर्गिक रित्या करू लागतात. या प्रकारचे अपमार्गण कामप्रेरणेचा उद्दीपन-विषय, उद्दीपन-प्रसंग आणि स्वत्वाशी सुसंगत सामाजिक भूमिका या तीन प्रमुख बाबतींत घडून येते. प्रदर्शन-प्रवृत्ती म्हणजे विपरीत उद्दीपन-प्रसंगात कामपूर्ती करण्याचा एक अनैसर्गिक मार्ग आहे. स्वतःचे जननेंद्रिय सार्वजनिक ठिकाणी, अनोळखी, भिन्नलिंगी व्यक्तीसमोर उघडे करून त्यातूनच कामपूर्ती साधण्याचा हा प्रकार असतो.

ह्या प्रवृत्तीचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. त्यात साधारणपणे वीस ते चाळीस या वयोगटातील व्यक्ती असतात. लैंगिक गुन्ह्यांसाठी पकडल्या जाणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी सु. ३५% व्यक्ती या वर्गात मोडतात. परंतु प्रदर्शन-प्रवृत्ती सौम्य स्वरूपाचा गुन्हा मानली जाते. अर्थात काही व्यक्तींमध्ये प्रदर्शन-प्रवृत्तीचा जोडीने आक्रमकताही असते. अशा व्यक्तीचे अपमार्गण अधिक विकोपाला गेलेले असते. [⟶ लैंगिक अपमार्गण].

नैसर्गिक रतिक्रीडेतील प्रणयाराधनाच्या अवस्थेत जोडीदाराकडे बघणे आणि स्वतःचे शरीर दिसू देणे हे टप्पे असतात परंतु या प्रकारच्या (प्रदर्शन-प्रवृत्ती) अपमार्गणात प्रदर्शनाने संपूर्ण कामपूर्ती करण्याचा प्रकार घडून येतो. एकतर ज्या भिन्नलिंगी व्यक्तीसमोर लिंगप्रदर्शन केले जाते त्या अनोळखी असतात व अनोळखीच राहतात. दुसरे असे, की प्रदर्शनाला प्रतिसादादाखल मिळणारी अवलोकनाची प्रतिक्रिया आणि तिच्यावरून घडणारे उद्दीपन या गोष्टी या बाबतीत घडत नाहीत.

अशा व्यक्तींची तपासणी केली असता त्या अबोल, कुड्या, भित्र्या, बोटचेप्या स्वभावाच्या असतात असे दिसते. त्यांना स्वतःविषयीच्या अपात्रतेच्या कल्पनांनी ग्रासलेले असते त्यामुळे ताकद दाखवून वर्चस्व प्रस्थापित करण्याची सर्वसामान्य तयारी त्यांच्यात नसते. अशा व्यक्ती विवाहित असल्यास त्यांचे लैंगिक जीवन असमाधानकारक असते. त्यांच्या आयुष्यात आई किंवा पत्नी अतिशय वर्चस्व गाजवणाऱ्या असतात आणि लहानपणी अतिशय कडक शिस्तीत त्यांना वाढवलेले असते. ही प्रवृती म्हणजे जणू काही आपले पौरुष प्रस्थापित करण्याचा कमालीचा शारीरिक, मूर्त आणि हातघाईचा मार्ग असतो. या व्यक्तींचा व्यक्तिमत्त्वात आवेगांना अनिवार्यता प्राप्त झालेली असते आणि मनावरील ताण वाढला, की या प्रवृतीचा जोर वाढतो असे दिसते. वैयक्तिक मानसोपचाराचा त्यांना थोडाफार उपयोग होऊ शकतो.

स्त्रियांमधील प्रदर्शन-प्रवृती योनिप्रदर्शनाप्रमाणेच स्तनप्रदर्शनासही कारणीभूत होते. परंतु स्त्रियांचे या गुन्ह्याखाली पकडले जाण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे.

या प्रवृत्तीचे मनोविश्लेषणवादी स्पष्टीकरण फ्रॉइड, ओ. फेनिकेल, एफ्. नाव्हील आणि एच्. द्यूब्वा-फेऱ्या यांनी वेगवेगळे दिले आहे. फ्रॉइडच्या मते प्रदर्शन-प्रवृत्ती आणि अवलोकन-प्रवृत्ती (स्कोपोफिलिआ) यांची जोडी मिळून लहान वयातील मुलांची कामप्रेरणा घडत असते परंतु ती जननेंद्रियात केंद्रित झालेली नसते. प्रौढपणी या अपमार्गणाला आत्यंतिक प्रतिकार करण्याने व्यक्ती नसविकृत (न्युरॉटिक) होतात परंतु त्यांच्या आहारी जाणाऱ्या व्यक्ती मात्र प्रत्यक्षात प्रदर्शन करणाऱ्या होतात. या दृष्टीने ‘प्रदर्शन-प्रवृती म्हणजे नसविकृतीच्या उलट्या ठशाची मनोरचना होय’, असे फ्रॉइडने म्हटले. प्रदर्शन-प्रवृती असणाऱ्या अपमार्गी व्यक्तींच्या आत्मसंरक्षण यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिझम) ‘तादात्म्य’ (आयडेंटिफिकेशन) रूपी असतात. ज्या व्यक्तींसमोर प्रदर्शनवर्तन केले जाते, त्यांच्याशी तादात्म्य पावून या व्यक्ती अवलोकन-प्रवृत्तीचाही उपशम करून घेत असतात.

फेनिकल यांच्या मते लिंगच्छेदाच्या (कॅस्ट्रेशन) नाकारण्यातून ही प्रवृत्ती निर्माण होते आणि आपला लिंगच्छेद झालेला नाही हे ही व्यक्ती प्रत्यक्ष लिंग दाखवून सिद्ध करीत असते.

नाव्हील आणि द्युब्वा-फेऱ्या यांच्या मते अतिकामुकता, न्यूनकामुकता, मतिमंदत्व, वेड, अपस्मार, बेभान बरगळणारी अवस्था, नग्नताप्रेम इ. इतर विकृतींच्या समवेत ही प्रवृती आढळून येते. तिची कारणे त्या त्या विकृतींच्या कारणपरंपरेतच असतात.

संदर्भ : 1. Eidelberg, Ludwig, Ed. Encyclopedia of Psychoanalysis, New York, 1968.

    2. Ellis, Albert Abarbanel, Albert, Ed. The Encyclopaedia of Sexual Behaviour, 2 Vols., New York, 1961.

वनारसे, श्यामला