लीफ, (लेव्ह) एरिकसन : (सु. ९७१-१०१५). एक नार्वेजियन समन्वेषक आणि उत्तर अमेरिका खंडाच्या किनाऱ्याला भेट देणारा पहिला यूरोपीय खलाशी. त्याविषयाची माहिती नंतरच्या काळातील आइसलँडिक प्रवासवृत्तांतांवरून मिळते त्यांतील घटनाक्रम, तपशील आणि कालक्रम यांत एकवाक्यता नाही. यांतील सागा ऑफ एरिक द रेड, सागा ऑफ एरिक आणि टेल ऑफ ग्रीनलंडर हे महत्वाचे संदर्भ होत, तरीसुद्धा लीफचे बालपण, शिक्षण यांची त्यांत फारशी माहिती नाही. त्याचा जन्म आइसलँडमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्रसिद्ध मार्गदर्शक एरिक द रेड ह्यांचा तो दुसरा मुलगा. त्यांचे मूळ आडनाव थॉरव्हाल्सान असून त्यांनी ग्रीनलंडचा नैर्ॠत्य किनारा शोधून या नवीन भूभागास ग्रीनलंड हे आकर्षक नाव दिले (९८२-९८५) आणि सध्याच्या यूल्यानहॉप या गावाजवळ त्यावेळी वसाहत स्थापन केली. पुढे ते काही जहाजे व सु. पाचशे लोक घेऊन सहकुटुंब येथे आले (९८६). मात्र ब्यॉद्नी हर्जोल्फसन हा थोरला मुलगा वडिलांच्या मागून जहाजातून निघाला परंतु मार्ग चुकून तो नैर्ॠत्येकडे वळला आणि लॅब्रॅडॉरचा किनारा व न्यू फाउंडलंड या प्रदेशापर्यंत फेरफटका मारून ग्रीनलंडला परतला. वाटेत त्याने या प्रदेशातील घनदाट जगंल पाहिले. त्याच्या प्रवासातील चित्तथरारक कथांनी लीफचे लक्ष वेधले आणि धंद्यात पडण्यापूर्वी हा प्रदेश पाहण्याची त्यास उत्कंठा लागली. वडिलांच्या संमतीने त्याने नैर्ॠत्येकडील भागास भेट देण्याचे ठरविले व ब्याद्नीचेच तयार जहाज घेतले.

लीफने या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करून उत्तर अमेरिकेकडे जलप्रवासास सुरुवात केली आणि मार्कलँड (बहुधा लॅब्रॅडॉर) ओलांडले (९९५) व न्यू फाउंडलंड गाठले. या भागात मूळ वस्ती नसल्यामुळे तेथे मुक्काम करणे त्याला सुलभ झाले. तेथे त्याला व त्याच्या सहप्रवाशांना जंगली द्राक्षे विपुल प्रमाणात आढळली. म्हणून त्या प्रदेशाला त्याने विनलंड (वाइनलँड) हे नाव दिले. काही महिने वसती करून लाकूडफाटा आणि मौल्यवान वस्तू घेऊन तो ग्रीनलंडला परतला. वाटेत त्याला काही खलाशी व जहाजे अडकलेली आढळली. त्यांना त्याने आश्रय दिला व परिणामतः त्यांवरील काही वस्तू त्यास बक्षिसादाखल मिळाल्या आणि त्यास भरपूर संपत्ती प्राप्त झाली. म्हणून नशिबवान लीफ हे नामाभिधान त्यास प्राप्त झाले. यानंतर त्याच्या स्वैर सफरीवर वडिलांनी बंधन घातले आणि त्यास नॉर्वेला पाठविले (९९७). या प्रवासात त्याने आपली गरोदर पत्नी योगुन्ना हिला हेब्रिडीझ बेटावर ठेवले. तिला पुढे मुलगा झाला आणि ती काही महिन्यांनी त्यास नार्वेत येऊन मिळाली. नॉर्वेचा राजा पहिला ओलाफ ट्रयुग्व्हेसॉन (कार. ९६४-१०००)ह्याची त्याच्यावर मर्जी बसली. त्याने त्यास ख्रिस्ती धर्माची दीक्षा देवविली आणि ग्रीनलंडमघ्ये जाऊन ख्रस्ती धर्माचा प्रसार-प्रचार करण्याची आज्ञा दिली. सोबत काही पाद्री तसेच ख्रस्ती धर्माची तत्त्वे घेऊन तो ९९८ मध्ये ग्रीनलंडला आला. त्याने प्रथम आपल्या आईला ख्रस्ती बनविले. तिने ग्रीनलंडमध्ये पहिले चर्च बांधले. उर्वरित आयुष्य त्याने व्यवसाय आणि धर्माचा प्रसार-प्रचार यात व्यतीत केले. पुढे त्याच्या धाकट्या भावाने समन्वेषणाचे कार्य हाती घेतले.

आइसलँडिक वृत्तांतावरून जी माहिती मिळते, तीवरून त्याच्या उत्तर अमेरिकेच्या सफरीविषयी आधुनिक विचारवंतांत मतभेद आढळतात. काही विद्वान तो न्यू फाउंडलंडमध्ये वसती करून राहिलाच नाही, असेही म्हणतात. त्याच्या समन्वेषणाच्या सनांबद्दल मतभेद असून काही विद्वान सागा ऑफ एरिक द रेड याचा आधार घेऊन तो ख्रिस्ती झाल्यांनतर उत्तर अमेरिकडे १०००-१००२ मध्ये गेला असावा, असे मानतात.

संदर्भ : 1. Jones, Gwyn, A History of the Vikings, Oxford, 1968.

           2. Mowat, Farley, Westviking : The Ancient Norse in Greenland and North America, Toronto, 1965.

           3. Oleson, Tryggvi Julius, Early Voyages and Northern Approaches : 1000-1632, Oxford, 1964.

           4. Reeves, A. M. The Finding of Wineland, London, 1973.

देशपांडे सु. र.