नारू : गोलकृमी वर्गातील ड्रॅक्युन्क्युलस मेडिनेन्सिस अथवा गिनी वर्म नावाच्या परजीवी (दुसऱ्या जीवावर उपजीविका करणाऱ्या) कृमीपासून होणाऱ्या विकृतीला (व कृमीलाही) नारू म्हणतात. भारतातील पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या भागांत हा रोग आढळतो. भारताशिवाय ब्रह्मदेश, अरबस्तान, इराण, तुर्कस्तान, रशियाचा तुर्कस्तान विभाग (कझागस्तान, तुर्कमेनीस्तान इ.), आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि दक्षिण अमेरिकेतही तो आढळतो.

आ. १. नारूचे जीवनचक्र : (१) पायातील नारू डिंभ पाण्यात शिरतात, (२) नारू डिंभ, (३) पाण्यातील सायक्लॉप्स डिंभ गिळतात, (४) सायक्लॉप्समिश्रित पाणी मनुष्य पितो व डिंभ त्याच्या शरीरात वाढून नारू बनतो, (५) काडीला गुंडाळलेली नारूची मादी, लांबी १०० ते १२० सेंमी.

या कृमींचे जीवनचक्र पूर्ण होण्याकरिता दोन पोषक (ज्यांच्यापासून कृमी आपली पोषणद्रव्ये मिळवितात ते प्राणी) लागतात. त्यांपैकी पाण्यात राहणारा कवचधारी वर्गातील सायक्लॉप्स (डोक्यावर मध्यभागी एकच डोळा असणारा मध्याक्ष) हा जवळजवळ अदृश्य असलेला प्राणी ‘मध्यस्थ पोषक’असतो आणि मानव ‘अंतिम पोषक’असतो. रोगी माणसाच्या गुडघ्याखालच्या पायाच्या किंवा पावलाच्या भागातून असलेल्या मादीच्या गर्भाशयातून बाहेर पडणारे डिंभ (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या आणि प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असणाऱ्या अवस्थेतील प्राणी) व्रणातून पाण्यात मिसळतात. या डिंभांना सायक्लॉप्स गिळतात व त्यांच्या जठरांत्र मार्गात शिरल्यानंतर ते उदरगुहीय (उदराच्या पोकळीतील) भागात शिरतात व तेथे त्यांची वाढ होते.

मानवातील संक्रामण वरील डिंभ गिळलेले सायक्लॉप्स पाण्याबरोबर पोटात जाण्यापासून होते. जठरांत्र मार्गातील पाचक रस सायक्लॉप्सांचा नाश करतात परंतु डिंभांवर त्यांचा काहीही परिणाम होत नाही. उलट त्यांची क्रियाशीलता वाढते व ते आतड्याच्या भित्तीतून बाहेर पडून उदरगुहेत पर्युदराच्या (उदरगुहा व छाती यांना विभागणाऱ्या स्नायुमय पटलाच्या) मागे असलेल्या ऊतकात (समान कार्य आणि रचना असलेल्या पेशींच्या समूहात) शिरतात. या ठिकाणी सर्वसाधारपणे ८ ते १२ महिन्यांत पूर्ण वाढलेला कृमी तयार होतो. त्यापैकी नर फक्त २·५ सेमीं. X ०·४ मिमी. असतो, तर मादी १०० ते १२० सेंमी. X १·५  सेंमी. असते. नर-मादी यांच्या मैथुनानंतर नर मरतो व या ठिकाणच्या ऊतकात नराचा मृतदेह कॅल्शियमात बंदिस्त केला जातो. उदरगुहेच्या मागील बाजूकडील ऊतकातून खाली सरकत सरकत मांडीतील पुढच्या भागातून जाऊन मादी गुडघ्याच्या आतल्या बाजूकडून पायात घोट्यापर्यंत उतरते. या ठिकाणी ती पृष्ठभागाजवळ येते. तिच्या विषारी स्त्रावापासून बाह्यत्वचेखाली फोड तयार होतो व तो फुटून तेथे व्रण बनतो. व्रणातील व्रणोतक सूक्ष्मजंतू संक्रामण थोपवून धरते. व्रणाच्या तळाशी एक बारीक छिद्र असून त्यामधून द्रव बाहेर पडत असतो. मादीच्या शरीराचा पुष्कळसा भाग हा डिंभ भरलेले गर्भाशयच असते. ज्या ज्या वेळी रोग्याचा पाय पाण्याच्या सान्निध्यात येतो त्या त्या वेळी या छिद्रातील द्रवातून पुष्कळ डिंभ बाहेर पडून पाण्यात मिसळतात. सबंध गर्भाशय मोकळे करण्यास मादीला पंधरा दिवस लागतात. त्यानंतर मादी त्या व्रणातून आपोआप बाहेर पडते व व्रण बरा होतो.

 

लक्षणे : मादीच्या विषारी स्त्रावापासून अधिहर्षताजन्य (ॲलर्जीजन्य) लक्षणे तसेच विशिष्ट जागी फोड तयार होतो. त्वचालाली, पित्त उठणे, मळमळ, उलट्या, अतिसार, कष्टश्वसन, चक्कर येणे वगैरे लक्षणसमूह फोड उठण्यापूर्वी दिसतो आणि फोड फुटल्यानंतर रोग्यास आराम वाटतो. व्रणामध्ये जंतुसंक्रामण झाल्यास कोशिकाप्रधान ऊतकशोथ (पेंशीची संख्या जास्त असलेल्या ऊतकाची दाहयुक्त सूज), विद्रधी (गळू) इ. विकृती उद्‌भवतात. धनुर्वात होण्याचीही शक्यता असते. व्रणातून डिंभ बाहेर पडू लागतात व सर्वसाधारणपणे ३ ते ४ आठवड्यांत ही क्रिया पूर्ण होते. मादी त्यानंतर आपोआप बाहेर पडून व्रण साफ बरा होतो. ९०% वेळा मादी पायाकडेच जाते परंतु ती मुष्क (वृषणप्रजोत्पादक ग्रंथी–असलेली पिशवी), पाठ व क्वचित वेळा नेत्रगोलातही गेल्याचे आढळले आहे.


निदान : तपासणाऱ्या बोटांना त्वचेखाली दोरीखाली मादी लागणे, क्ष-किरण तपासणीत कॅल्शियम बंदिस्त नर दिसणे. व्रणातील स्त्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत डिंभ दिसणे, रक्तातील अरुणकर्षी (इओसीन नावाच्या गुलाबी रंजकाने सुलभतेने रंगविल्या जाणाऱ्या) कोशिका वाढणे आणि अधिहर्षतेकरिता त्वचा परीक्षा (याकरिता कोरड्या नारूपासून तयार केलेले प्रतिजन वापरतात प्रतिजन म्हणजे जे शरीरात शिरले असताना त्यांना रोध करणारे विशिष्ट पदार्थ–प्रतिपिंड–शरीरात तयार होतात असे पदार्थ) निदानाकरिता उपयुक्त असतात.

 

प्रतिबंधात्मक इलाज : पिण्याच्या पाण्यात हातपाय न बुडविणे, पायऱ्यांवरून उतरता येईल अशा विहीरी बंद करणे, सांडपाणी परत विहिरीत न जाऊ देणे इ. उपायांमुळे डिंभ परत पाण्यात शिरू देत नाहीत. सायक्लॉप्स मारण्याकरिता अतिक्लोरिनीकरण (पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्लोरीन मिसळणे), पाणी गाळणे आणि उकळणे हे उपाय उपयुक्त असतात. हा रोग अधिक करून खेड्यातून आढळत असल्यामुळे पिण्याचे पाणी जाड फडक्यातून गाळून व उकळून पिणे हा सर्वोत्तम इलाज होय. या सर्व गोष्टी गावकऱ्यांना समजावून त्यांचे सहकार्य मिळवणे हे सर्वांनाच हितकारक असते.

आ.२. (अ) व्रणाच्या छिद्रातून बाहेर पडलेला नारू (आ) काडीला गुंडाळण्याची पद्धत.

उपचार : डाय-एथिल कार्बामेझीन नावाचे औषध अपक्क मादीचा नाश करते म्हणून नारू संक्रामणाचा संशय आल्यासही हे औषध सुरू करावे. निरिडॅझोल २५ मिग्रॅ. दर किग्रॅ. शरीर वजनाप्रमाणे दोन मात्रांत विभागून दररोज एकूण ५ ते ७ दिवस दिल्याने नारू आहे त्या ठिकाणीच मरतो. थायार्बेडॅझोल वरीलप्रमाणेच दिल्यास तीनच दिवसांत मादी मरते. ही औषधे देऊन प्रथम मादी मेल्यानंतर ती काडीला गुंडाळून सहज बाहेर काढता येते.

 

नारू बाहेर काढताना, विशेषतः जिवंत असलेला, विशेष काळजी घ्यावी लागते. तो शक्यतो तुटता कामा नये. हळूहळू व न तुटता बाहेर पडण्याकरिता तो काडीवर गुंडाळून काढतात. संपूर्ण बाहेर पडण्यास १५ ते २१ दिवसही लागतात. वरील औषधांमुळे तो लवकर काढता येतो.

 

देवधर, वा. वा. भालेराव, य. त्र्यं.