सँगर, मार्गारेट हिगिन्स : (१४ सप्टेंबर १८८३–६ सप्टेंबर १९६६). शास्त्रीय पद्घतीने संततिनियमन, ⇨ कुटुंब-नियोजन आणि लोकसंख्या वाढीचे नियंत्रण यांकरिता चळवळीचे नेतृत्व करणारी पहिली अमेरिकन महिला. संततिनियमन हा मूलभूत मानवी हक्क सर्वांना मिळण्याकरिता त्यांनी लढा दिला. त्यांचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील कॉर्निंग येथे झाला. त्यांनी हडसन येथील क्लोव्हरॅक महाविद्यालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी न्यूयॉर्क शहरातील गरीब वस्तीत दायीचे काम केले. मोठ्या कुटुंबांमुळे व गर्भपातांमुळे दारिद्र्य आणि मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सँगर यांच्या लक्षात आले. गरोदरपणापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीच्या भीषण मृत्यूमुळे सँगर यांचे मन विषण्ण झाले. त्यांनी नको असलेल्या गरोदरपणापासून स्त्रीची मुक्तता करण्याचे कार्य हाती घेतले. त्या काळातील अमेरिकन लोकांकडून व धर्मगुरुंकडून त्यांच्या कार्याला कडाडून विरोध झाला.

यूरोपमधील काही देशांत संततिनियमनासंबंधीचे ज्ञान सहज उपलब्ध होत असल्यामुळे सँगर यांनी १९१३ मध्ये यूरोपात एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले. अमेरिकेत परत आल्यानंतर १९१४ मध्ये त्यांनी द वुमन रिबेल हे मासिक सुरू केले. यामध्ये त्यांनी ‘बर्थ कंट्रोल’ हा शब्द प्रथम वापरला. १९१६ मध्ये त्यांनी बुकलिनच्या बाउन्सव्हिला ह्या भागात पहिले संततिनियमन चिकित्साकेंद्र काढले परंतु शासनाने या केंद्रावर धाड घातली व सँगर यांना एक महिना तुरुंगवास भोगावा लागला. काही दानशूर नागरिकांच्या अर्थ साहाय्याने त्यांनी बर्थ कंट्रोल रिव्ह्यू हे नियतकालिक सुरू केले. १९१८सालापर्यंत (२३ वर्षे) हे नियतकालिक संततिनियमनाच्या प्रसाराचे प्रमुख माध्यम होते. संततिनियमन हे स्त्रियांच्या मुक्ततेसाठी कसे आवश्यक आहे, याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, जपान, चीन, भारत व यूरोप याठिकाणी दौरे केले.

सँगर यांनी १९२७ मध्ये जिनीव्हा येथे पहिले जागतिक लोकसंख्या संमेलन भरविले. ह्या संमेलनात त्यांनी सर्व देशांना संततिनियमनासंबंधीचे कायदे शिथिल करण्याची विनंती केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अमेरिकेतील शहरांमध्ये १९४० सालापर्यंत अनेक संततिनियमन केंद्रे निघाली. लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी १९४६ मध्ये त्यांनी इंटरनॅशनल प्लॅण्ड पेरेण्टहूड फेडरेशनही जागतिक संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

सँगर यांनी लिहिलेली पुस्तके अशी : द केस फॉर बर्थ कंट्रोल (१९१७),द पिव्हट ऑफ सिव्हिलायझेशन (१९२२), माय फाइट फॉर बर्थ कंट्रोल (१९३१) आणि मार्गारेट सँगर ॲन ऑटोबायोग्राफी (१९३८).

ट्यूसन (ॲरिझोना) येथे त्यांचे निधन झाले.

गोगटे, म. ग.