डेलिया : (कुल-कंपॉझिटी). हे बागेत लावण्यात येणाऱ्या आकर्षक फुलांच्या वनस्पतीचे नाव आहे, तसेच ते कंपॉझिटी कुलातील (सूर्यफूल कुल) एका वंशाचेही नाव आहे. या वंशातील वनस्पतींची पाने संयुक्त असून मुळे फुगीर व इन्युलीनयुक्त (एक प्रकारच्या कार्बोहायड्रेटाने युक्त) असतात. या वंशात १८ जाती आहेत व त्यांची तीन गटांत विभागणी केली आहे. या सर्व जातींचे मूळ स्थान मेक्सिको आणि मध्य अमेरिका हे आहे. स्यूडोडेंड्रॉन या पहिल्या गटात तीन जाती असून त्यांतील वनस्पती जवळजवळ बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) आणि पुष्कळ उंच (६ ते १० मी. पर्यंत) असतात. दुसरा गट एपिफायटम या नावाने ओळखला जातो. त्यात फक्त एकच जाती आहे ह्या जातीतील वनस्पती मेक्सिकोच्या दाट जंगलांतील उंच वृक्षांवर वाढवतात [⟶ अपिवनस्पति]. तिसरा गट डेलिया (दुसरे नाव निओकॉलॉन) हा असून त्यात १४ जाती आहेत आणि डेलिया या नावाने ओळखले जाणारे बागेतील फुलांचे असंख्य प्रकार या गटात मोडतात. ह्या डेलियाच्या गाटातील जातींचे खोड वर्षायू (एक वर्ष जगणारे) असते आणि ते उंच (२ ते २·५ मी.), सरळ उभे अथवा भूसर्पी (जमिनीवर पसरणारे) पेऱ्याजवळ ते अपूर्ण पटयुक्त (पडदा असलेले) अथवा पट नसलेले असे दोन प्रकारचे असते. खोडाचा इतर भाग भरीव अगर पोकळ असतो. पाने संयुक्त, पिसासारखी (एक ते त्रिगुण पिच्छाकृती) व समोरासमोर असतात. स्तबकाला लांब दांडा व छदमंडलाचे अनेक वेढे असून किरण-पुष्पके वंध्य आणि बिंबपुष्पके (असल्यास) द्विलिंगी व फलोत्पादक असतात [⟶ फूल]. शुष्क फळ (संकृत्स्न) आयत किंवा व्यस्त अंडाकृती, एका बाजूस सपाट, टोकास गोलसर बीज एक. बागेत फुलांसाठी लावण्यात येणाऱ्या डेलिया पिन्नाटा या जातीचे २,००० च्यावर प्रकार निर्माण करण्यात आले असून त्यांची बारापेक्षा जास्त गटांत विभागणी केली आहे. यांतील काही प्रकारांत किरण-पुष्पकांचे एकच वर्तुळ असते, तर काहींमध्ये दोन आणि काही प्रकारांत दोनपासून पाचपर्यंत वर्तुळे असतात. कॅक्टस, डेकोरेटिव्ह, बॉल आणि पॉम्पॉन गटांच्या प्रकारांतील फुलांत फक्त किरण-पुष्पके असतात. डेलियाच्या फुलांचा रंग लाल, पांढरा, पिवळा अगर जांभळा असतो व काही प्रकारांत फुले दोनरंगी असतात. भारतात बगिच्यांतून डेलिया पिन्नाटा जातीच्या प्रकारांची लागवड करण्यात येते.

डेलियाची लागवड ग्रंथिल मुळे अगर त्यांचे डोळे असलेले तुकडे लावून पावसाळ्याच्या सुरुवातीला कुंड्यांमधून अगर वाफ्यांत करतात. बियांपासून अथवा फाटे लावूनही या वनस्पतीची अभिवृद्धी करता येते. भरपूर खत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या जमिनीत डेलियाची चांगली वाढ होते. सपाट प्रदेशापेक्षा डोंगराळ भागातील फुले दुहेरी व जास्त आकर्षक असतात. फुलांचा बहार ऑगस्ट ते नोव्हेंबर अखेरपर्यंत असतो. झाडे वाळल्यावर मुळे खणून थंड कोरड्या जागेत वाळूत अगर लाकड्याच्या भुश्यात झाकून ठेवतात.

आफळे, पुष्पलता द. गोखले, वा. पु.

सोनेरी डेलिया   गुलाबी डेलिया   पिवळा डेलिया