बोर : या वनस्पतीचा समावेश ⇨ऱ्हॅम्नेसी कुलातील झिझिफस वंशात केला जातो. या वंशातील सु. १७ जाती जंगली अवस्थेत भारतात आढळून येतात व काही नव्या जातींची आयात केली गेली आहे. यापैकी पुष्कळ जातींची मांसल आठळीयुक्त फळे खाद्य आहेत व ती बोर या सर्वसामान्य नावाने ओळखली जातात. भारतात आढळून येणाऱ्या बोरांचे चिनी बोर आणि भारतीय बोर असे दोन गट मानण्यात येतात. चिनी बोराचे शास्त्रीय नाव झिझिफस जुजुबा असून भारतीय बोरांपैकी झि. मॉरिशियाना व झि. नुम्मुलॅरिया या महत्त्वाच्या जाती आहेत. झि. मॉरिशियाना ही जाती रानटी अवस्थेत व लागवडीत अशा दोन्ही अवस्थांत आढळून येते. लागवडीतील प्रकारांपैकी काही प्रकारांची फळे प्रथिने, कॅरोटिने आणि क जीवनसत्त्व या बाबतीत सफरचंदापेक्षा सरस असल्याचे आढळून आले आहे. झि. नुम्मुलॅरिया जातीची पाने पंजाब, हरियाणा व राजस्थानात उन्हाळ्याच्या दिवसांत, विशेषतः जेथे वैरणीचा तुटवडा भासतो तेथे पाळीव जनावरांना खाऊ घालतात.

गेली सु. ४,००० वर्षे भारतात व चीनमध्ये बोर ही वनस्पती लागवडीत असून इ. स. पू. १५००-१००० या काळात हे फळ लोकांच्या खाण्यात होते, अशी माहिती मिळते. वैदिक वाङ्‌मयात व वेदोत्तर वाङ्‌मयात बोराचा उल्लेख आढळतो.

ऱ्हॅम्नेसी कुलाच्या वर्णनात झिझिफस या व इतर वंशांतील वनस्पतीची सामान्य लक्षणे दिली आहेत. झिझिफसच्या बहुतेक जातीत फुलांना पाच पाकळ्या असतात व त्यांत मधुयुक्त बिंब असते केसरदले पाच व किंजदले २-३ आणि किंजपुट अर्ध ऊर्ध्वस्थ असतो [⟶ फूल].

भारतीय (सामान्य) बोर : (हि. बेर( क. एलंजी सं. बदर, अजाप्रिय इं. इंडियन जुजुब, कॉमन जुजुब लॅ. झि. मॉरिशियाना). हा लहान सदापर्णी वृक्ष, निरनिराळ्या आकारमानांचा असून त्याची उंची १५ मी. पर्यंत अथवा त्याहून जास्त असते. तो पसरट माथ्याचा असतो व त्याला उपपर्णी काटे असतात. तो जंगली अवस्थेत अथवा लागवडीत भारताच्या बहुतेक भागांत आढळून येतो आणि हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशातही वाढतो. या जातीचा ठेंगणा आणि झुडपासारखा प्रकार विशेष प्रमाणात आढळून येतो. उन्हाळ्यात (मार्च-एप्रिलमध्ये) याची सर्व जुनी पाने गळतात परंतु त्याच वेळी नवी पालवी फुटत असते. फांद्या काहीशा दुर्बल व लोंबत्या असतात. झाडाची साल खरबरीत, करडी किंवा फिकट काळी असते. पाने साधी, एकाआड एक, गर्द हिरवी असून त्यांची खालची

 

आ. १ भारतीय थोर (अ) पाने, फुले व फळे यासह फाँदी (आ) उम्राण फळे


बाजू बरीच लवदार असते.ती विविध आकारांची (आयत-दीर्घवृत्ताकृती, अंडाकृती किंवा काहीशी गोलसर अथवा दोन्ही टोकांस गोलाकार), काहीशी सूक्ष्म दंतुर (दातेरी) किंवा अखंड किनारीची असून त्यात तीन प्रमुख शिरा असतात. फुले लहान, हिरवट पिवळी व फुलोरे पानांच्या बगलेत वल्लरीवर येतात. फुले येण्याचा काळ निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा असतो. सर्वसाधारणपणे एप्रिल ते ऑक्टोबर या काळात फुले येतात व सु. पाच महिन्यांनी फळे धरतात. जंगली प्रकारात आठळीयुक्त फळे जवळजवळ गोलाकार असून पिकल्यावर ती नारिंगी अथवा लाल रंगाची असतात. लागवडीतील प्रकारांची फळे मोठी व दीर्घवर्तुळाकृती असतात.

हवामान, जमीन व क्षेत्र विस्तार : या बोरीचे झाड फार काटक असून ते सर्व प्रकारच्या हवामानात वाढत असले, तरी उष्ण व कोरडे हवामान त्याला जास्त मानवते. आर्द्र हवेत झाडाची वाढ व फलधारणा समाधानकारक होत नाही. समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंचीपर्यंतच्या भारताच्या बहुतेक भागांत हे झाड जंगली अवस्थेत अगर लागवडीखाली आढळून येते. बहुसंख्य झाडे जंगली अवस्थेत वाढतात. कोरड्या प्रदेशात ही झाडे सामुदायिक स्वरुपात बाभळीच्या झाडांबरोबर वाढतात. कमाल तापमान ३७० ते ४८० सें. अथवा त्याहून जास्त आणि किमान तापमान ७० (अथवा त्याहून कमी) ते १३० सें. आणि १५ सेंमी. पासून २२५ सेंमी. पावसाच्या प्रदेशात ही झाडे चांगली वाढतात. तसेच झाडाच्या योग्य वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. हिमतुषारांमुळे झाडाला सहसा नुकसान पोहोचत नाही. झाडाला कोणत्याही प्रकारची इजा झाली अथवा ते आगीत होरपळून निघाले, तरी ते जिवंत राहते व पुन्हा वाढू लागते.

हे झाड चांगली हवा खेळणाऱ्या वाळूमिश्रित गाळवट जमिनीत चांगले वाढते. तसेच जांभ्या दगडाच्या खडकाळ अथवा चांगल्या निचऱ्याच्या काळ्या जमिनीसह सर्व प्रकारच्या जमिनीतही वाढते. अल्प प्रमाणात लवणांचे प्रमाण असलेली जमीनही चालते. रुक्ष प्रदेशातील पड जमिनीत ही झाडे मोठ्या संख्येने उगवून येतात. नदीकाठच्या वाळूमिश्रित जमिनीत प्रथम बोरीच्या जंगली प्रकारांची झाडे उगवून येतात व मागाहून इतर झाडे वाढतात. या झाडाचे सोटमूळ थोड्या अवधीत खोलवर जाते व जमिनीतील थोड्या प्रमाणातील ओल झाडाच्या वाढीसाठी पुरेशी होते. यामुळे जेथे इतर पुष्कळशी झाडे वाढत नाहीत तेथे बोरीची झाडे वाढतात.

पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यांत या बोरीची झाडे लागवडीत अथवा जंगली अवस्थेत आढळून येतात. लागवडीखालील क्षेत्रासंबंधी निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही कारण पद्धतशीरपणे लावलेल्या मळ्यांची संख्या फार नाही. महाराष्ट्रात जळगाव, अहमदनगर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत बोरीची झाडे विशेष प्रमाणावर आढळून येतात. जळगाव जिल्ह्यातील मेहरुण बोरे प्रसिद्ध आहेत.

लागवडीतील प्रकार : या बोरीची बहुसंख्य झाडे आपोआप वाढणारी असून त्यांना गोल आकाराची फळे मोठ्या संख्येने येतात परंतु ती लहान आकारमानाची व विशेष चांगल्या प्रतीची नसतात. त्यात गर थोडा असतो. डोळे भरुन कलमे केलेल्या झाडांची फळे मोठी, लंबगोल आकाराची व पुष्कळ गर असलेली असतात. कलमी झाडांची व्यापारी प्रमाणावर लागवड पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशामध्ये केली जाते. दक्षिण भारतातील दमट हवामानात या झाडाला फळमाशीचा फार उपद्रव होतो. चांगल्या प्रतीच्या बोरांचे काही प्रकार आणि प्रामुख्याने ते कोणत्या राज्यात लागवडीत आहेत त्याचा तपशील पुढीलप्रमाणे : उम्राण (पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश), कैथ्ली (पंजाब), सनौर (पंजाब), बिनकाट्याचा प्रकार (पंजाब, बिहार), झेडजी-२ (पंजाब), बनारसी पेवंडी (पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश), नारीकेली (पंजाब, प. बंगाल), दंडन (पंजाब), नाजूक (पंजाब), मुरिया मऱ्हारा (उत्तर प्रदेश, दिल्ली), गोला (दिल्ली व आसपासचा भाग) या प्रकारांची फळे उत्कृष्ट प्रतीची असतात परंतु लांबच्या बाजारपेठेत पाठविण्यालायक नसतात. नरमा आणि कराका हे बनारसचे प्रसिद्ध प्रकार आहेत. खीरा आणि चोंचल (चोचीच्या आकाराचा) हे प्रकारही दिल्लीच्या आसपास लागवडीत आहेत. अलवर (राजस्थान) भागातील कोठो अथवा काठा आणि जळगाव (महाराष्ट्र) जिल्ह्यातील मेहरुण या प्रकारांना फळमाशीचा उपद्रव होत नाही. बडोदा आणि अहमदाबाद जिल्ह्यांत चांगल्या प्रतीच्या बोरांची लागवड होते व ती अहमदाबादी बोरे या नावाने बाजारात विकली जातात परंतु या प्रकाराला फळमाशीचा उपद्रव जास्त प्रमाणात होतो.

अभिवृद्धी : जंगली प्रकारांच्या खुंटावर चांगल्या प्रतीच्या झाडांचे डोळे भरुन बोरांच्या चांगल्या प्रकारांची अभिवृध्दी करण्यात येते. रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे सोटमूळ थोड्या अवधीत खोल जाते व स्थलांतर करताना त्याला इजा पोहोचण्याचा संभव असतो. यासाठी शेतातच जंगली प्रकारांची रोपे लावून त्यांवर डोळे भरणे पसंत करतात परंतु विशेष प्रकारचे तंत्र वापरुन रोपवाटिकेत डोळे भरलेल्या कलमांचे स्थलांतर करण्यात पंजाब कृषि विद्यापीठाने यश मिळविले आहे.

पड जमिनीत अथवा शेताच्या बांधावर वाढणाऱ्या बोरीच्या झाडावर चांगल्या प्रतीच्या झाडांचे डोळे बसविल्यास चांगल्या प्रतीची बोरे मिळू शकतात. यासाठी जानेवारी ते मार्च महिन्यात जमिनीपासून १ ते १.२५ मी. उंचीवरील खोडाचा भाग कापून टाकतात आणि फुटून आलेल्या धुमाऱ्यांपैकी एक जोमदार धुमारा ठेवून त्यावर डोळा बसवितात व तो फुटून आल्यावर शेंड्याकडील भाग कापून टाकतात. डोळे भरल्यापासून एक वर्षाच्या आत फळे धरण्यास सुरुवात होते.

खत : लागवडीतील झाडांना झाडांमागे ३० ते १०० किग्रॅ. शेणखत आणि १ किग्रॅ. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट दोन हप्त्यांत देतात.


झाडांना आकार देणे व छाटणी : झाडाला फुटून येणाऱ्या फांद्या लांब, किरकोळ आकारमानाच्या व वेड्यावाकड्या वाढणाऱ्या असतात. झाडे लहान असताना त्या फळांच्या भाराने मोडतात. फांद्यांचा बळकट सांगाडा तयार करण्यासाठी वाढीच्या पहिल्या ३-४ वर्षांच्या काळात सर्व लांबलचक व नको असलेल्या फांद्या छाटतात. त्यानंतर दरवर्षी झाडाची छाटणी करणे आवश्यक असते कारण फळे चालू वर्षाच्या फुटीवर नांच्या बगलेत धरतात. छाटणी केल्याने फळांची संख्या वाढते व त्यांची प्रतही सुधारते. फळे काढून घेतल्यावर खरड छाटणी आणि मोहोर येण्यापूर्वी हलकी छाटणी करतात.

रोग व किडी : रोग : ओइडियम वंशातील कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) भुरी नावाचा रोग कलमी झाडांवर विशेषेकरून आढळून येतो. पाने व फळे गळतात व झाडावर राहिलेली फळे नीट पोसत नाहीत. यावर उपाय म्हणून ५०% ताम्रयुक्त कवकनाशकाच्या चार फवारण्या करतात.

किडी : या फळाला अनेक किडींचा उपसर्ग पोहोचतो परंतु कार्पोमिया व्हेसुव्हिएना या ⇨ फळमाशीमुळे सर्वांत जास्त नुकसान होते. फळाच्या सालीत माशी लांबट आकाराची अंडी घालते व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या फळात शिरुन गर खातात. या फळमाशीवर पुढील उपाययोजना करतात : ०.१% आल्ड्रीन अथवा डिल्‌ड्रीन झाडाखालील जमिनीत मिसळतात. झाडाखालील जमीन हालवून माशीचे कोश पृष्ठभागावर आणतात. सूर्याच्या उष्णतेमुळे ते मरतात. किडलेली फळे गोळा करून त्यांचा नाश करतात. झाडावर डीडीटी, बीएचसी अथवा रोगोर यासारख्या कीटकनाशकांची फवारणी करतात. फळांची काढणी करण्यापूर्वी कमीत कमी १५ दिवस फवारणी थांबवितात.

तयार झालेल्या फळांचे पक्ष्यांपासून फार नुकसान होते. मासे पकडण्याच्या जाळ्यांनी झाड झाकल्यास हे नुकसान पुष्कळ कमी होते.

फलधारणा व फळांची काढणी : कलमी झाडांना ती लावल्यापासून २-३ वर्षांनी व बी लावून तयार केलेल्या झाडांना ४-५ वर्षांनंतर फळे धरण्यास सुरुवात होते. फलधारणेच्या काळात जमिनीत पुरेशी ओल नसल्यास फळे गळतात. कच्ची फळे झाडावरुन काढल्यास पुढे ती पिकत नाहीत. उत्तर भारतात प्रकाराप्रमाणे फेब्रुवारीच्या मध्यापासून एप्रिलअखेरपर्यंत फळे काढणीचे काम चालू राहते. दक्षिण व मध्य भारतात नोव्हेंबरपासून फळे बाजारात येतात.

उत्पन्न : निरनिराळ्या राज्यातील उत्पन्नांत बराच फरक आहे. उम्राण प्रकाराची झाडे प्रत्येकी ८० ते २०० किग्रॅ. पर्यंत फळे देतात. मध्य प्रदेशात सर्वसाधारणपणे दर झाडापासून ३५ ते ५० किग्रॅ. फळे मिळतात.

रासायनिक संघटन : फळातील खाद्य भागात ८१.६% जलांश, ०.८% प्रथिन, ०.३% वसा (स्निग्ध पदार्थ) व १७% कार्बोहायड्रेट (शर्करा) असतात. शिवाय क जीवनसत्त्व आणि खनिजेही असतात. आवळा व पेरु ही दोनच फळे क जीवनसत्वाच्या बाबतीत बोरापेक्षा श्रेष्ठ आहेत. तसेच बोरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह यांचे प्रमाण सफरचंद व संत्रे या फळांपेक्षा जास्त असते. पोषणाच्या दृष्टीने सफरचंदापेक्षा बोर श्रेष्ठ आहे.

उपयोग : पक्व फळे खाण्यासाठी व औषधासाठी वापरतात. फळे ताजी, सुकी, साखरेत मुरविलेली, वाफविलेली व धुरावलेली अशा निरनिराळ्या स्वरुपात खाण्यात येतात. झाडांचा पाला जनावरांना (गाई व शेळ्या) खाऊ घालतात. राजस्थानमध्ये दुभत्या जनावरांना फक्त हाच हिरवा चारा मिळतो. लाखेचे किडे पोसण्यासाठी या झाडांचा वापर करतात. वाऱ्याला अडथळा करून इतर वनस्पतींना संरक्षण देण्यासाठी या झाडांची लागवड उपयुक्त ठरली आहे. जंगली प्रकारांची फळे थंडावा देणारी, वेदनाहारक व पौष्टिक असतात. बियांतील मगज (गर) झोप लागण्यासाठी देतात. बियांतील तेलाचा कातडी कमावण्यासाठी उपयोग करतात. सालीचा काढा अतिसार व आमांश यांवर देतात. पाने काताबरोबर स्तंभक (आकुंचन करणारी) म्हणून देतात. पोटिसासाठीही त्यांचा उपयोग होतो. लाकूड कठीण, मजबूत व टिकाऊ असते आणि त्यापासून शेतीची अवजारे, गाड्यांची चाके व बंदुकीचे दस्ते करतात, तसेच त्यांपासून कोळसाही तयार करतात.

चणी बोर : (हिं. झाडिया बेर गु. चणिमा बेर सं. सूक्ष्मफल इं. वाइल्ड जुजुब लॅ. झि. नुम्मुलॅरिया, झि. रोटुंडिफोलिया). भारतीय बोरांच्या गटातील ही जाती कणखर व लहान काटेरी झुडपांची असून फांद्या वाकड्यातिकड्या, पसरट व एकमेकींपासून दूर असतात. पंजाब, राजस्थान, भारतीय द्विपकल्पातील दख्खन ते कोकणचा भाग व दक्षिणेस सु. ९०० मी. उंचीपर्यंत ती सर्वत्र आढळते.


आ. २. चणी बोर : पाने व फळे यांसह फांदी.

खोड व फांद्या फिकट जांभळट ते करड्या रंगाच्या असून उपपर्णी काटे जोडीने असतात. पाने साधी व अंडाकृती ते गोलसर, खालच्या बाजूस दाट लवदार आणि बारीक दातेरी किनारीची असतात. फुले फिकट पिवळी आणि आठळीयुक्त फळे सु. १ सेंमी लांब व लाल किंवा काळी असतात. गवताळ चराऊ रानात या जातीच्या झुडपांची संख्या मोठी असते. शेतात ती पुष्कळ वेळा तणासारखी वाढतात व खणून काढावी लागतात. हिचा पाला जनावरांना खाऊ घालतात. जमिनीची धूप थांबविण्यासाठी व शेतात बांधावर लावण्यासाठी आणि जळणासाठी या झुडपांची उपयोग करतात. गुजरात व बिहारमध्ये लाखेचे किडे वाढविण्यासाठी या जातीचा उपयोग केला जातो.

चिनी बोर : (रानबोर हि. बनबेर इं. चायनीज डेट लॅ. झि. जुजुबा, झि. व्हल्गॅरिस). सुमारे १२ मी. पर्यंत उंच वाढणारा पानझडी वृक्ष अथवा केव्हा केव्हा मोठ्या आकारमानाचे झुडूप अशा स्वरुपात या जातीची झाडे पंजाबात लागवडीत व नैसर्गिक अवस्थेत आढळून येतात. पाने वरील बाजूस चकचकीत हिरवी, साधी व एकाआड एक, अंडाकृती ते भालाकृती, सु. २.५ ते ५ सेंमी. लांब, काहीशी सूक्ष्म दातेरी असून त्यांच्या तळाशी असलेल्या दोन काट्यांपैकी (उपपर्णी पैकी) एक वाकडा असतो. पानांची खालची बाजू लवदार नसते. आठळीयुक्त फळ आयत ते अंडाकृती अथवा जवळजवळ गोलाकार व सु. ३ सेंमी. लांब असते.

या जातीचे मूलस्थान चीन असून २,५०० ते ३,००० वर्षांपूर्वी तिचा प्रवेश प. आशियात झाला असावा. भारतातील तिच्या प्रवेशाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही. सध्या भारतात व्यापारी दृष्ट्या या जातीची लागवड नाही परंतु चीनमध्ये हे महत्त्वाचे फळ असून ते कमीत कमी ४,००० वर्षे लागवडीत असावे असे मानतात. त्या देशातील सर्वांत महत्त्वाच्या पाच फळांपैकी हे एक असून ‘चायनीज डेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकात मुरविलेल्या फळाची आयात शॅटुंग प्रांतातून होत असे. लाखेच्या किड्यांच्या संवर्धनासाठी आणि कुंपणासाठी या जातीच्या झाडांचा उपयोग भारतात केला जातो.

चिनी बोराची फळे छातीच्या विकारांवर उपयोगी असून वेदनाहारक असतात. पाने सारक असून त्यांचा वापर खरुज, कंडू व खवड्यावर आणि घशच्या विकारावर करतात. फळे व पाने जनावरांना खाऊ घालतात. लागवडीतील प्रकारांची फळे पौष्टिक असतात व जंगली प्रकारांची फळेही शीतकर, वेदनाहारक व पौष्टिक असतात. जुनाट वृक्षाच्या गाभ्याचे लाकूड फण्यांसाठी व कातीव कामासाठी वापरतात. सालीत ७% टॅनीन असते.

संदर्भ :     1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. XI. New Delhi, 1976.                2. Hayes, W. B. Fruit Growing in India, Allahabad, 1960.                3. Singh, R. Fruits, New Delhi, 1969.

पाटील, अ. व्यं. जोशी, रा. ना. जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ. गोखले, वा. पु.


रानबोर : (१) पाने, फुले व फळे यांसह फांदी, (२) वरून दिसणारे फूल.

रूम : (सारोथॅम्नस स्कोपॅरियस) फुलाफळांसह फांदी.

बिब्बा : (१) पाने व फळांसह फांदी, २) पक्व फळ.

बुगनविलिया

बिग्नोनिया व्हेनुस्टा (गोल्डन शॉवर)

बीच : अमेरिकन बीच : (१) हिवाळी कळ्यांसह शाखा, (२)छदकांचा काटेरी पेला, (३) कपाली फळ,(४) वृक्ष (हिवाळी दृश्य).

बॉमंशिया ग्रँडिफ्लोरा