भेंडी : (हिं. भिंडी, भिंडी तोरी, रामतुरई गु. भिंडा क. भेंडे, भेंडीकाई सं. गंधमूळ इं. लेडीज फिंगर, ओक्रा, गंबो लॅ. अबेलमोशस एस्कुलेंटस, हिबिस्कस कुल-माल्वेसी). ही फळभाजीची परिचित वनस्पती मूळची आफ्रिकेच्या अथवा अशियाच्या उष्ण भागातील असून आता उष्ण व उपोष्ण कटीबंधातील देशांत लागवडीत आहे. हे १ ते २.३ मी. उंच, वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणारे) व कापसाच्या झाडासारखे दिसणारे क्षुप (झुडूप) असून त्याच्या खोडावर केस असतात. पाने साधी, एकाआड एक, ह्रदयाकृती, ३-५ अल्पखंडीत पुष्पकोशाच्या खालच्या भागाची ८-१० छदे अरूंध व संदलाइतकी लांब फुले कक्षास्थ (पानांच्या बगलेत), एकाकी व पिवळी असून मध्ये लाल किंवा जांभळट ठिपका असतो. [⟶ फूल]. फळ लांबट (१२-३० सेंमी.), शिंगासारखे हिरवे किंवा पिवळट, कमी जास्त केसाळ (रोमश) किंवा गुळगुळीत बोंड असून त्यावर लांबीच्या दिशेने ५-८ धारा असतात. ते पुटक भिदुर (कप्पावर तडकणारे ) असते बी गोलसर व रेषांकित. कच्चा फळात भरपूर श्लेष्मल (बुळबुळीत) पदार्थ असतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ माल्व्हेसी कुलात (भेंडी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

 हवामान व हंगाम : जगाच्या सर्व उष्ण व समशीतोष्ण भागांत हे भाजीपाल्याचे पीक म्हणून लागवडीत आहे. भारतात १,२०० मी. उंचीपर्यंत याची सर्वत्र लागवड करतात. उन्हाळी व पावसाळी हंगामात हे पीक घेता येते. उन्हाळी पीक फेब्रुवारी-मार्च मध्ये पेरून जुलै-ऑगस्ट मध्ये फळे तोडतात. पावसाळी पीक जूनमध्ये पेरतात व ऑक्टोबरमध्ये तोडणी करतात. हे पीक हिवाळी हंगामात घेता येत नाही कारण थंड हवामान पिकाला अपायकारक असते तथापि दक्षिण भारतात हे पीक वर्षभर थोड्याफार प्रमाणात घेण्यात येते.

प्रकार : या पीकात बरेच प्रकार आहेत. हिरवी, लांब व ५-७ धारा असलेली लुसलुशीत भेंडी उत्कृष्ट समजली जाते. उन्हाळी पिकासाठी ५ धारांच्या गुळगुळीत फळांचे हळवे प्रकार जास्त पसंत करतात. पावसाळी हंगामासाठी गरवे व ८ धारा असलेल्या गुळगुळीत अगर केसाळ फळांचे प्रकार लावतात. पुसा सावनी हा मऊ, गुळगुळीत व हिरव्या रंगाची फळे असलेला आणि उन्हाळी व पावसाळी हंगामांत लागवडीसाठी योग्य असा लोकप्रिय प्रकार आहे. झाडे १.५ ते २ मी. उंच असून फळे १७-२० सेंमी. लांब व ५ धारांची असतात. पेरणीपासून ६० दिवसांत फळे तोडणीसाठी येतात. हा प्रकार केवडा रोगाला कमी प्रमाणात बळी पडतो. पुसा मखमली या सुधारीत प्रकारची फळे पिवळसर हिरवी, १५-२० सेंमी. लांब, गुळगुळीत व ५ धारायुत्क असतात. पेरणीनंतर ५०-६० दिवसांनी फळे तोडणीसाठी येतात व नंतर २ महिन्यांपर्यंत फळे मिळत राहतात. हा प्रकारही दोन्ही हंगामांत लागवडीस योग्य आहे. पंजाब १३, सिलेक्शन १-१ व सिलेक्शन २-२ हे सुधारीत प्रकार उत्पादनाला चांगले आहेत.


जमीन, मशागत, खत, पेरणी व पाणीपुरवठा : हे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत घेता येते परंतु पाण्याचा निचरा होणारी मध्यम प्रकारची कसदार जमीन जास्त चांगली. उन्हाळी पिकासाठी मध्यम ते भारी जमीन जास्त पसंत करतात. मात्र जमीन चांगल्या निचऱ्याची असावी. ती १५-२२ सेंमी. खोल नांगरून कुळवून घेतात. हेक्टरी १२ टन कुजलेले शेणखत घालून ती पुन्हा कुळवून घेतात. पेरणीपूर्वी अथवा बी टोकण्यापूर्वी हेक्टरी ७५ किग्रॅ. नायट्रोजन, ७५ किग्रॅ. फॉस्फोरिक अम्ल आणि ७५ किग्रॅ. पोटॅश जमिनीत मिसळतात. पावसाळ्यात ६० सेंमी. उन्हाळ्यात ४५ सेंमी. अंतरावर सऱ्या काढून त्यांच्या दोन्ही बगलेत ४५ सेंमी. अंतरावर दोन बिया टोकतात. हेक्टरी १०-१२ किग्रॅ. बी लागते. पावसाळी पिकाची पेरणीही करतात. फळांचा सतत पुरवठा व्हावा म्हणून दर पेरणीच्या हंगामात २-३ आठवड्यांनी निरनिराळ्या वाफ्यांत बी पेरतात. तसेच हे पीक गवारीबरोबर मिश्रपीक म्हणूनही घेतात. सरीच्या एका बाजूला भेंडी आणि दुसऱ्या बाजूला गवार लावतात. पेरणीनंतर ३ आठवड्यांनी ७५ किग्रॅ. नाट्रोजन वरखत म्हणून देतात व दोन महिन्यानंतर दर आठवड्यास १% यूरियाचा फवारा दिल्याने उत्पादन वाढते. पावसाळ्यात पाऊस नसल्यास ७-१० दिवसांनी पाणी देतात.रोग व किडी : भुरी व केवडा हे या पिकावरील महत्त्वाचे रोग आहेत. भुरी रोग एरिसायके सिकोरेसियारम या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. पाने आणि शेंड्यांवर राखट पांढऱ्या रंगाची कवकाची वाढ आढळून येते. पाने वाळून गळून पडतात.उपाय : गंधक भुकटी (३०० मेश) हेक्टरी ७५ ते ८० किग्रॅं. या प्रमाणात पिस्कारल्याने रोगाला आळा बलतो.केवडा हा व्हायरसजन्य असून सर्वत्र आढळून येणारा व या पिकावरील विशेष नुकसानकारक रोग समजला जातो. रोगामुळे प्रथम पानांच्या शिरांना हिरवट-पिवळट रंग येतो. रोगाचे प्रमाण तीव्र असल्यास पाने पूर्णपणे पिवळी पडतात. रोगट झाडे खुजी राहून त्यांना फळे कमी प्रमाणात लागतात व तीही हिरवट-पिवळ्या रंगाची असतात. रोगाचा प्रसार पांढऱ्या पिसवाद्वारे होतो. कीटकनाशकाचा वापर करून व रोगट झाडे दिसताच ताबडतोब नष्ट केल्याने रोगाला आळा बसतो. झाडावर राख पिस्कारल्यामुळे रोगाला आळा बसतो. असा उल्लेख आढळतो. रोगाचे निर्मूलन करण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात २ महिने भेंडीचे पीक कोठेही न लावण्याची शिफारस करण्यात येते.तुडतुडे व बोंड अळी या कापसावरील किडी भेंडीच्या पिकावरही पडतात. या किडींवरील उपायांसाठी ‘कापूस’ ही नोंद पहावी.तोडणी व उत्पादन : फळे हिरवी व अपक्व स्थितीत परंतु फार कोवळी नसताना तोडतात. पावसाळ्यात फळांची वाढ जलद गतीने होत असल्यामुळे ती तोडणीसाठी १-२ दिवसांच्या अंतराने तयार होतात. उशिरा तोडणी केल्यास फळे जून व रेषाळ बनतात व बाजारात त्यांना योग्य भाव मिळत नाही. उन्हाळी पिकात २-३ दिवसांच्या अंतराने सु. २ महिने तोडणी चालू राहते. पावसाळी पिकाची फळे थंडीचा हंगाम सुरू होईपर्यंत मिळतात.पावसाळी पिकाचे दर हेक्टरी सरासरी १०,००० किग्रॅ., उन्हाळी पिकाचे ५,००० किग्रॅ. आणि मिश्र पिकाचे १,५०० किग्रॅ. उत्पादन मिळते. पुसा मखमली प्रकाराचे हेक्टरी उत्पादन १८,६०० ते २३,३०० किग्रॅ. मिळाल्याचा उल्लेख आहे.

 रासायनिक संघटन व उपयोग: फळात ८८% जलांश, २.२% प्रथिने व ७.७% कार्बोहायड्रेटे आणि पुरेशा प्रमाणात लोह व कॅल्शियम असतात. कोवळ्या भेंडीपेक्षा जून भेंडीमध्ये क जीवनसत्त्व कमी प्रमाणात असते.

अपक्व फळे अनेक प्रकारे स्वयंपाकात वापरतात. फळ शक्तिवर्धक, पेक्टीन व स्टार्चयुक्त असून ते मूत्रदोषांवर व पचनाच्या विकारांवर उपयुक्त आहे. फळांचा काढा वेदनाशामक व मूत्रल (लघवी साफ करणारा) असून शैत्य विकारावर व प्रमेहावर (परम्यावर) गुणकारी असतो. बियांत १६-२०% खाद्य तेल असून सरकीच्या तेलाऐवजी ते वापरता येते. पेंडीचा उपयोग गुरांना खाऊ घालण्यासाठी करतात. खोड आणि पक्व फळांपासून धागा काढतात परंतु त्याचा व्यापारी प्रमाणावर उपयोग केला जात नाही.

झाडाच्या हिरव्या देठांतील श्लेष्मल पदार्थाचा उपयोग उसापासून गूळ तयार करताना रस स्वच्छ करण्यासाठी करतात. देठांचा खालचा भाग व मुळांचा काही भाग ठेचून बाहेर पडणारा रस पाण्यात काढून व गाळून तो उकळत्या उसाच्या रसात घालतात. या पद्धतीने स्वच्छ केलेल्या रसाचा गूळ कठीण, रवाळ व आकर्षक सोनेरी रंगाचा तयार होतो.  

जोशी, गो.  वि  भोरे, दा. पा. रुईकर,  स. के.

‘भेंडी’ या नावाने मराठी भाषेत ओळखल्या जाणाऱ्या इतर वनस्पतींची (कस्तुरी भेंडी, बदलरंग भेंडी, रानभेंडी, कापूर भेंडी व भूरभेंडी) माहिती खाली दिली आहे.


आ. २. कस्तुरी भेंडी : (१) कळ्या, फुले व पाने यांसह फांदी, (२) फळ (बोंड), (३) फळाचा आडवा छेद, (४) बी.

कस्तुरी भेंडी: (हिं. मुश्क दाना, लताकस्तुरी क. कस्तुरी बेंडे सं. लताकस्तुरिका इं. मस्क मॅलो लॅ. अबेलमोशस मोशाटस, हिबिस्कस अबेलमोशस कुल-माल्व्हेसी). हे सु. १-२ मी. उंचीचे वर्षायू व ताठ केसांचे झुडूप मूळचे भारतातील असून भारताच्या उष्ण भागात सर्वत्र आढळते. तसेच उष्ण कटिबंधातील बहुतेक इतर देशांत बियांसाठी त्याची लागवड करतात. भारतात या वनस्पतीची लागवड करण्याचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. पाने साधी, एकाआड एक, विविध आकारांची, बहुधा हस्ताकृती (पंजासारखी), ३ ते ७ खंडांत अंशतः विभागलेली असतात. फुले पानांच्या बगलेत, मोठी, सु. १० सेंमी. व्यासाची व पिवळी असून त्यांच्या तळात किरमिजी ठिपका असतो. फळ (बोंड) भेंडीसारखे, सु. ३-८ सेंमी. लांब असून त्यात अनेक मूत्रपिंडाकृती, बारीक (सु. ४ मिमी.) लांब, करड्या तपकिरी रंगाच्या व सुगंधी बिया असतात. त्यावंर नाभीभोवती अनेक समकेंद्री रेषा दिसतात. बियांतून मिळणाऱ्या कस्तुरीसारख्या सुगंधी तेलामुळे त्यांना फार महत्त्व आले आहे. बिया चिरडून ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून घटक वेगळे काढण्याच्या प्रक्रियेने) तेल काढतात व त्याचा उपयोग उच्च दर्जाच्या सुगंधी द्रव्य उत्पादनात आनुषंगिक पदार्थ म्हणून केला जातो. अत्तरातही हे तेल मिसळतात. बियांचे चूर्ण कीटकनाशक आहे. बिया पौष्टिक, वातनाशक, दीपक (भूक वाढविणाऱ्या), उत्तेजक व आकडीला विरोध करणाऱ्या आहेत. खोडाच्या सालीपासून तागासारखा धागा मिळतो परंतु त्यांचे व्यापारी प्रमाणावर उत्पादन केले जात नाही. उत्तर भारतात पानातील श्लेष्मल द्रव्याचा उपयोग उसाचा रस स्वच्छ करण्यासाठी करतात.

पहा : अंबाडी.

परांडेकर, शं. आ. 

बदलरंग भेंडी किंवा बदलरंग : (जास्वंद पं. गुले अजयब इं. चेंजिएबल रोझ, चायनीज रोझ लॅ. हिबिस्कस म्युटाबिलिस ). हे बिनकाटेरी झुडूप भेंडीच्या वंशातील असून ते मूळचे चीनमधील आहे. भारतात व इतर उष्ण देशांत बागेत शोभेकरिता लावतात. पाने १०-१५ सेंमी. लांब, केसाळ, हृदयाकृती, ३-५ खंडयुक्त. फुले ७.५-१२.५ सेंमी. व्यासाची, कक्षास्थ, सकाळी पांढरी किंवा गुलाबी परंतु रात्रीपर्यंत तांबडी होतात. फळे गोलसर, २ सेंमी, व्यासाची व केसाळ. खोडाच्या सालीपासून धागा मिळतो परंतु दोऱ्यासाठी फारसा उपयुक्त नसतो. या वनस्पतीचे अनेक औषधी उपयोग आहेत. पाने गळवांवर पोटीस लावण्यासाठी वापरतात. फुले व पाने खोकल्यावर गुणकारी आहेत.

रानभेंडी: (क. हुळी गौरी लॅ. हिबिस्कस फर्‌कॅटस). भेंडीच्या वंशातील ही एक जाती असून तिची वनस्पती आरोही (वर चढणारे) झुडूप आहे. तिला वाकडे काटे असतात. उष्ण कटिबंधात आणि भारतात (महाराष्ट्रात कोकण, घाटमाथा इ.) सामान्यपणे ही आढळते. फुले मोठी व पिवळी असून तळाशी जांभळा ठिपका असतो. बोंड सहवर्धिष्णू (बरोबर वाढत राहणाऱ्या) संवर्ताने वेढलेले छदे ८-१२ व प्रत्येकावर टोकास लांब शिंगासारखे उपांग उपपर्ण कुंतसम (भाल्याच्या आकाराची) [⟶ फूल]. खोडाच्या सालीपासून बळकट, पांढरा, लवचिक धागा मिळतो परंतु काट्यांमुळे तो काढण्यास कठीण जाते.

जोशी, गो. वि.


आ. ३. कापुर भेंडी : (१) फुलांसह फांदी, (२) उलगडलेले फूल, (३) परागकोश, (४) फळाचा आडवा छेद, (५) बी. कापूर भेंडी: (लॅ. तुरीया व्हिलोजा कुल-मेलिएसी). फुल झाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] या मोठ्या क्षुपाचा प्रसार भारतात (कोकण, प. घाट, कारवार, गुजरात, तमिळनाडू, अन्नमलई टेकड्यांत सु. १,२०० मी.पर्यंत) आणि जावात टेकड्यांवर अथवा समुद्रकिनारी आहे. पेण, महाबळेश्वर, कोयना दरी इ. ठिकाणी ते सामान्यपणे आढळते. पाने साधी, एकाआड एक, पातळ, कोवळेपणी लवदार पण पुढे गुळगुळीत, दीर्घवर्तुळाकृती, अखंड व ५-१० X ३.५-६.५ सेंमी. असतात. फुले कक्षास्थ एकेकटी किंवा २-६ च्या चवरीसारख्या झुबक्यांनी एप्रिल ते जूनमध्ये येतात. ती पांढरी किंवा पिवळी, ३.५-५ सेंमी. लांब व सुगंधी असतात. संदले ५, पाकळ्या ५,लांबट व चमसाकृती (चमच्यासारख्या) केसरदलांची (पुं-केसरांची) नलिका २.५ सेंमी. लांब किंजपुटात (स्त्री-केसराच्या तळभागात) ५ कप्पे. फळे (बोंडे) साधारण लांबट-गोलसर (१-२ सेंमी. व्यासाची) व बी अपक्ष (पंखहीन) असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨मेलिएसी कुलात (निंब कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.याची मुळे औषधी असून महारोग्यास पोटात घेण्यासाठी देतात भगंदरावर बाह्यलेप करतात व पोटातही देतात. मूळ शोथहर (दाहयुक्त सूज कमी करणारे) व व्रणशोधक (जखम स्वच्छ करणारे) आहे.

वैद्य, प्र. भ. 

आ. ४. भूरभेंडी : (१) फुलांसह फांदी, (२) फूल, (३) कच्च्या फळाचा आढवा छेद.भूरभेंडी: (रान-वन-भेंडी, विलायती-परदेशी भेंडी लॅ मलाक्रा कपिटॅटा कुल-माल्व्हेसी) सुमारे ३ मी.पर्यंत उंच वाढणारी ही वर्षायू ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पती भारतातील उष्ण व दमट भागात पूर्णपणे स्थिरावली आहे. तिचे मूलस्थान अमेरिकेतील उष्ण भाग आणि वेस्ट इंडीज बेटे आहे. हिच्या मलाक्रा वंशात एकूण दहा जाती असून भूरमेंडी ही त्यांपैकी एक जाती आहे. कित्येक ओसाड जागी व शेताच्या आसपास ती आढळते. विशेषतः मुंबई व बंगाल येथे ज्या जमिनीवर पावसाळ्यात भरपूर पाणी काही वेळ साचून राहते अशा ठिकाणी ती तणासारखी उगवलेली आढळते. हिच्या खोड, फांद्या, देठ इ. भागांवर राठ केसांचे आवरण असते. पाने सोपपर्ण (उपपर्णयुक्त), साधी, एकाआड एक, अंडाकृती-हृदयाकृती किवा गोलसर असून त्यांची किनार काहीशी दातेरी असते. त्यांच्या बगलेत किंवा जवळपास पिवळ्या किंवा पांढऱ्या लहान फुलांचे झुबके येतात. फळे अर्धगोलाकार, मधे काहीशी खोलगट असून त्यांचे एकबीजी भाग अलग होतात बिया गुळगुळीत व तपकिरी किंवा काळपट व मूत्रपिंडाकृती असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे माल्व्हेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

सालीपासून रुपेरी, चकाकणारा, रेशमासारखा मऊ व लांब वाख निघतो व त्याकरिता हिची लागवड करतात. हिची पावसाळ्यात  लागवड केल्यास लक्ष न देताही ही चांगली वाढते मात्र झाडे जवळजवळ लावून वाऱ्यापासून संरक्षण करावे लागते. त्याकरिता बी दाट पेरावे लागते. तीन-चार महिन्यांनी  ताटे कापून पाने काढतात आणि ताटे पाण्यात भिजत व कुजत घालून वाख काढतात. ही प्रक्रिया तागाप्रमाणेच करण्यात येते [⟶ ताग]. चांगल्या प्रकारे सुकविलेल्या ताटांपासून सु. ११% व एका हेक्टरातून सु. १,८०० किग्रॅ. वाख निघतो. तागापेक्षा याची मजबुती कमी असते. वाखाचा उपयोग दोर, पिशव्या, पोती, जाडेभरडे कापड इत्यादींकरिता करतात. तागाच्या गिरणीतील यंत्रावर तो पिंजता येतो व तागाऐवजी त्याचा उपयोग करता येतो, त्याची तागात भेसळही करतात. कागद कारखान्यात ह्याचा उपयोग करणे शक्य आहे. या वनस्पतीत बुळबुळीत पदार्थ असतो, त्यामध्ये वेदनाहारक व छातीसंबंधीच्या तक्रारींवर उपयुक्त गुणधर्म असतात. संधिवात व कटिशूल यांवर मुळे वापरतात. मुळे ज्वरनाशकही असतात पाने कृमिनाशासाठी वापरतात.

चौधरी, रा. मो. परांडेकर, शं. आ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

            2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

            ३. देसाई, वा. ग. ओषधीसंग्रह, मुंबई, १९७५.