भारतीय कृषिसंशोधन संस्था : शेतीविषयी संशोधन करणारी ही भारतातील प्रमुख संस्था असून जगातील मोठ्या कृषी संशोधन संस्थांपैकी ती एक आहे. ही संस्था ‘पुसा इन्स्टिट्यूट’ या नावाने किंवा आयएआरआय (I A R I) या आद्याक्षरांनी ओळखली जाते. हेन्री फिल्स या अमेरिकन गृहस्थांनी दिलेल्या देणगीतून ही संस्था प्रथम बिहारमधील पुसा येथे १९०५ मध्ये सुरू झाली. त्यानंतर १९३४ मध्ये भूकंपामुळे संस्थेच्या इमारतीचे फार नुकसान झाल्याने ही संस्था १९३६ साली नवी दिल्ली येथे हलविण्यात आली. सैद्धांतिक व अनुप्रयुक्त कृषी संशेधनासाठी विविध अत्याधुनिक उपकरणांनी व साधनांनी सुसज्ज प्रयोगशाळा, शेतावर प्रयोग करण्यासाठी २९६ हेक्टरचे विस्तृत क्षेत्र व उत्तम प्रशिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ ही या संस्थेची वैशिट्ये आहेत. १९५८ साली ह्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व आता कृषिविज्ञानाच्या विविध शाखांतील एम्. एस्सी. व पीएच्. डी. स्तरावरील पदव्युत्तर शिक्षण येथे देण्यात येते. १९८१ मध्ये संस्थेतील शिक्षकांची संख्या ३८५ व विद्यार्थांची संख्या ५४१ होती. या संस्थेची देशात १४ प्रादेशिक संशोधन केंद्रे असून १९८१ साली संस्थेतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सु. ५,००० होती आणि त्यात एम्. एस्सी. व पीएच्. डी. पदव्या घेतलेल्या सु. १,५०० व्यावसायिक शास्त्रज्ञांचा अंतर्भाव होता.

सुरुवातीला या संस्थेत कृषिविज्ञान, पशूप्रजनन (जनावरांची पैदास), रसायनशास्र, आर्थिक वनस्पतिविज्ञान, कीटकविज्ञान व कवकविज्ञान (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा) हे फक्त पाच विभाग होते. आता मात्र तेथे पुढील एकवीस विभाग आहेत : कृषिविद्या, कृषी विस्तार, कृषी अर्थशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, आनुवंशिकी (जैव आनुवंशिक लक्षणांचा अभ्यास करणारे शास्त्र), उद्यानविद्या, भाजीपाल्याची पिके व पुष्पसंवर्धन, वनस्पतिप्रवेशन (वनस्पतीच्या नवीन जाती प्रचारात आणणे), बीज तंत्रविद्या, सूक्ष्मजीवविज्ञान, मृदाविज्ञान व कृषी रसायनशास्त्र, अखिल भारतीय मृदा व भूमी उपयोगिता सर्वेक्षण, कृषी भौतिकी, कीटकविज्ञान, सूत्रकृमिविज्ञान, कवकविज्ञान व वनस्पतिरोगविज्ञान, कृषी रसायने, वनस्पती जीवरसायनशास्त्र, अणुकेंद्रीय संशोधन प्रयोगशाळा व जल तंत्रविद्या केंद्र. यांतील शेवटच्या दोन विभागांत बहुविध विद्याशाखांतर्गत संशोधनासाठी अत्याधुनिक सुविकसित उपकरणांनी व साधनांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. कृषिक्षेत्रीय क्रिया व व्यवस्थापन विभागातर्फे प्रयोगासाठी राखून ठेवलेल्या २९६ हेक्टर शेतची व शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची देखभाल केली जाते. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संशोदनाबरोबरच ही संस्था गहू, मका, कापूस, ज्वारी, तृणधान्ये, गळिताची पिके (तेलबिया), कडधान्ये, सातू (बार्ली), भाजीपाल्याची पिके, सुगंधी व औषधी वनस्पतींची पिके, पुष्पसंवर्धन, मृदेची भौतिकी संरचना, शैवले, सूत्रकृमी इ. विषयींच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्पांचे मुख्यालय म्हणून काम पाहते. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील समन्वय कृषिविद्या प्रयोग, मृदापरीक्षण व पीक प्रतिसाद यांतील सहसंबंध आणि इतर कित्येक कृषी संशोधन कार्यक्रमांचे संयोजन या संस्थेतूनच करण्यात येते.

वरील एकवीस विभागांशिवाय गहू, कापूस, कडधान्ये, गळिताची पिके व समशीतोष्ण कटिबंधीय भाजीपाल्याची पिके आणि बीजोत्पादन व वनस्पतीप्रवेशन आणि व्हायरस यांवर संशोधन करणारी केंद्रे पुढील ठिकाणी आहेत पुसा (बिहार), सिमला व काट्रेन (हिमाचल प्रदेश), सिर्सा व कर्णाल (हरियाणा), भोवाली व कानपूर (उत्तर प्रदेश), इंदूर (मध्य प्रदेश), वेलिंग्टन व कोईमतूर (तमिळनाडू), कालींपाँग (प. बंगाल), पोर्ट ब्लेअर (अंदमान), पुणे व अमरावती (महाराष्ट्र) यांशिवाय नागपूर, बंगलोर व कलकत्ता येथे प्रत्येकी एक मृदा सहसंबंध केंद्र आहे. भारतातील इतर कृषी संघटना व संस्था, तसेच रॉकफेलर फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन, अमेरिकेचे शेती खाते, संयुक्त राष्ट्रांची अन्न व शेती संघटना, इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी इ. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या व संघटनांच्या सहकार्याने ही संस्था संशोधन व प्रशिक्षणाचे प्रकल्प हाती घेते.

या संस्थेत संशोधन व प्रशिक्षणाची उत्तम सोय असून येथे भारतातील विद्यार्थ्याशिवाय आशिया, आफ्रिका, यूरोप व अमेरिका या विविध प्रदेशांतील विद्यार्थी येतात. एकाच वेळी ४५० ते ५०० विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतात आणि दर वर्षी ९५ ते ११० नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. १९८१ पर्यंत १,२६७ एम्. एस्.सी. व १,३१७ पीएच्. डी. पदवीधर संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले. या संस्थेतील शिक्षण पद्धती अमेरिकन विद्यापीठात अनुसरलेल्या क्रेडिट कोर्स पद्धतीसारखी आहे. संस्थेच्या ग्रंथालयात १९८१ साली २,७५,००० ग्रंथ होते व दरवर्षी या ग्रंथालयात १,५०० नियकालिके येतात. भारतातील कृषिविषयक सर्वांत मोठे ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाची ख्याती असून संस्थेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या खेरीज भारतातील इतर शास्त्रज्ञही या ग्रंथालयाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात.

कीटक, कवके, व्हायरस, सूत्रकृमी, पिकांच्या प्रकारांची व जातींची आनुवंशिकीय सामग्री यांचा गेली ६० – ७० वर्षे संस्थेने जमविलेला संग्रह अद्वितीय आहे. येथील कीटकसंग्रहाची कीटकांच्या वर्गीकरणविषयक संशोधनात फारच मदत होते. पौर्वात्य देशांतील कवकांचा अनन्यसाधारण संग्रह संस्थेने जमविला असून त्यात ५,००० जातींच्या कवकांचे २७,००० नमुने आहेत. येथील सूक्ष्मजीव संग्रहात सूक्ष्मजीवांचे १,२०० नमुने आहेत व तो भारतातील अशा प्रकारचा सर्वांत मोठा संग्रह आहे. यात सूत्रकृमी, ऱ्हायझोवियम वंशातील सूक्ष्मजंतू, नीलहरित शैवले यांचेही नमुने आहेत. या दोन्ही संग्रहांमुळे वनस्पतींच्या रोगाचे अध्ययन व त्यांचे नियंत्रण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याच्या कामी फारच मदत होते. वनस्पति – प्रजननाच्या मार्गाने जास्त उत्पन्न देणारे प्रकार निर्माण करण्यासाठी वनस्पतींच्या देशी व विदेशी प्रकारांचा विस्तृत संग्रह करण्यात आला आहे. गहू, मका, ज्वारी, बाजरी व इतर तृणधान्यांच्या जननद्रव्याची पेढी संस्थेने उभारली असून तिचा उपयोग अन्य पुष्कळ देशांनाही होतो.

कृषिविज्ञानात अणुऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या किरणोत्सर्गी (अतिशय भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) मार्गण तंत्रासाठी [⟶ अणुऊर्जेचे शांततामय उपयोग] उपयोग करणारी एक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. त्याच बरोबर २०० क्यूरी कार्यप्रवणतेच्या किरणोत्सर्गी उद्गम असलेले ‘गॅमा उद्यान’ व २,००० क्यूरी कार्यप्रवणतेच्या किरणोत्सर्गी कोबाल्ट (६०) उद्‌गमाचा उपयोग करणारी कोठी यांचीही उभारणी करण्यात आलेली आहे. वनस्पतीवर गॅमा किरणीयन करून (गॅमा किरण टाकून) उत्परिवर्तन प्रजनन (ज्यात आनुवंशिक लक्षणांत आकस्मिक बदल होतो असे प्रजनन) करण्याकरिता व इतर संशोधन करण्यासाठी या अत्याधुनिक उपकरणे आणि साधने यांनी युक्त असलेल्या सुविधांचा देशातील अनेक संशोधक शास्त्रज्ञ उपयोग करीत आहेत. ही अणुकेंद्रीय संशोधन प्रयोगशाळा संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या आर्थिक मदतीने उभारण्यात आली आहे.


शेवंती, बोगनवेल व इतर शोभिवंत फुलझाडांच्या संग्रहाखेरीज संस्थेकडे ८०० हून अधिक प्रकारांच्या गुलाबाची बाग आहे. तेथील डोळे भरलेल्या कलमांना फार मागणी आहे.

या संस्थेच्या कोईमतूर येथील पूर्वीच्या उपकेंद्राने (सध्याच्या ऊस पैदास व संशोधन केंद्राने) निर्माण केलेले ऊसाचे कोईमतूर प्रकार (उदा., को – ७४० इ.) हे उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळे साखर उद्योगात क्रांती झाली आहे. याशिवाय अन्नधान्य, चारा, भाजीपाला, फळे व उद्योगधंद्यांत कच्चा माल म्हणून उपयोगी पडणारी पिके यांचे सुधारित प्रकार संस्थेने शोधून काढले आहेत. या प्रकारांमध्ये जास्त उत्पादन देणे, अवर्षणाचा ताण सहन करणे आणि रोग व किडींचा प्रतिकार करणे यांपैकी एक अगर अधिक गुण आहेत. या संस्थेतील संशोधनातून निर्माण झालेले काही विशेष उल्लेखनीय प्रकार पुढील प्रमाणे आहेत :

(१) गहू : कल्याणसोना, सोनालिका, सफेद लर्मा, छोटी लर्मा, शरबती सोनोरा आणि पुसा लर्मा हे सर्व बुटके व जास्त उत्पन्न देणारे प्रकार आहेत. शरबती सोनोरा व पुसा लर्मा हे सोनोरा ६४ व लर्मा रोजो या मेक्सिकन तांबूस गव्हापासून किरणीयनाने उत्परिवर्तन घडवून निर्माण केलेले अंबर रंगांचे प्रकार आहेत. याशिवाय हिरा, मोती, शेरा, अर्जुन व प्रताप हे त्रिगुण बुटके गव्हाचे प्रकार अलीकडे निर्माण करण्यात आलेले आहेत. बुटक्या व जास्त उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या नवीन प्रकारांमुळे भारतात हरित क्रांतीचा पाया घातला गेला आहे. हे प्रकार भारतात व इतर देशांतही मान्यताप्राप्त झालेले आहेत.

(२) मका : अंबर, जवाहर, किसान, विक्रम, सोना व विजय. शिवाय शक्ती व रतन हे प्रथिने व लायसीन जास्त प्रमाणात असलेले पिवळ्या व अपारदर्शक दाण्याचे संयुक्त प्रकार आहेत.

(३) भात : साबरमती, जमुना, सुधारित साबरमती, पुसा २ – २१, पुसा ३३, पुसा १५० आणि पुसा १६७. जास्त उत्पादनक्षम परदेशी बुटके भाताचे प्रकार व बासमती यांच्या संकरांपासून हे सुधारित प्रकार निर्माण करण्यात आलेले आहेत.

(४) बाजरी : संकरित प्रकार – एचबी ४, एचबी ५ आणि गोसावी रोगाला प्रतिकारक एनएचबी ३, एनएचबी ५, बीजे १०४, बीके ५६० – २३० आणि बीडी ७६३.

(५) कडधान्ये : (अ) मूग : पुसा वैशाली, पीएस १०, पीएस १६ (आ) तूर : मुक्ता, शारदा आणि पुसा अगेती.

(६) मोहरी : पुसा कल्याणी आणि पुसा बोल्ड.

(७) भाजीपाला : (अ) वांगी : पुसा क्रांती व पुसा अनमोल (आ) टोमॅटो : एस १.१२० (इ) मुळा : पुसा चेतकी, पुसा देशी आणि पुसा हिमानी (ई) सलगम : पुसा स्वेती व पुसा चंद्रिमा (उ) दुधी भोपळा : पुसा मंजरी आणि पुसा मेघदूत (ऊ) मटार : अरकेल आणि मिटिऑर (ए) खरबूज : पुसा शरबती (ऐ) कलिंगड : पुसा बेदाणा.

(८) फळे : (अ) आंबा : मल्लिका, आम्रपाली (आ) द्राक्ष : ब्युटी सीडलेस व पुसा सीडलेस.

(९) चाऱ्याची पिके : (अ) गवत : पुसा जायंट नेपिअर (नेपिअर गवत व बाजरी यांच्या संकरापासून) (आ) वरसीम : पुसा जायंट (इ) वैरणीचा जोंधळा : पीसी ६ आणि पीसी ९.

बहुगुणित पीक पद्धती (एका वर्षात जास्त पिके घेणे) आणि शेतात एक पीक उभे असतानाच दुसरे पीक काढणे किंवा तिसऱ्याची लागवड करणे अशा पीक पद्धतीविषयी पायाभूत काम संस्थेने केले आहे. यांशिवाय १९३० पासून गोबर वायूवर संस्थेत संशोधन चालू आहे. तसेच धान्य साठविण्यासाठी पुसा बिन (कणगे) संस्थेने तयार केले आहेत.

संस्थेतील सूक्ष्मजीवविज्ञान विभागाचे विशेष उल्लेखनीय कार्य पुढीलप्रमाणे आहे : कडधान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ऱ्हायझोबियम वंशातील जास्त कार्यक्षम सूक्ष्मजंतूंचा शोध लावून त्याचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन भाताचे उत्पन्न वाढविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या नीलहरित शैवलाच्या जास्त कार्यक्षम वाणांचा शोध कंपोस्ट खत निर्मितीमध्ये वनस्पतींच्या अवशेषांतील तुलीर (सेल्युलोज) व काष्ठीर ही ऊतके (पेशीसमूह) जलद रीतीने कुजण्यास साहाय्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या जास्त कार्यक्षम वाणांचा शोध. 

कवकविज्ञान व वनस्पतिरोगविज्ञान विभागाने भूछत्रांच्या व्यापारी प्रमाणावरील निर्मितीसंबंधी काही अंगांचा सखोल अभ्यास केला आहे. 

संस्थेने दिल्लीच्या जवळपासच्या भागात १९४९ पासून सधन शेती योजनेखाली शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिके व नवे प्रयोग केले आहेत. १९६५ पासून संस्थेन सुरू केलेल्या राष्ट्रीय प्रात्यक्षिक कार्यक्रमामुळे शेतीचे शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान खेडोपाडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात आहे. संस्थेतील संशोधनातून उपलब्ध होणाऱ्या उपयुक्त माहितीचा प्रसार विविध शास्त्रीय नियतकालिकांतून तसेच इंग्रजी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषांतून लोकप्रिय स्वरूपाच्या लेखांद्वारे आणि आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमांद्वारे करण्यात येतो.

पहा : कृषि संशोधन कृषि संस्था.

संदर्भ :  1. IARI The Premier Agriculture Research Centre, Journal of Industry and Trade, New Delhi, March, 1976.

            2. The Indian Agricultural Research Institute, Everyman’s Science, Calcutta. August – September, 1981.

            3. Randhawa, M. S. Agricultural Research in India, New Delhi, 1963.

जमदाडे, ज. वि.