मोगरा : (बटमोगरा हिं. बनमल्लिका, चंबा, मोघ्रा क. एलुसुत्तू मल्लिगे, इरूवंतिगे, सज्जिमल्लिगे, कोलुमल्लिगे सं. मल्लिका इं. अरेबियन जॅस्मिन, तस्कन जॅस्मिन लॅ. जॅस्मिनम सँबॅक कुल-ओलिएसी). हे झुडपासारखे काहीसे सरळ वाढणारे फुलझाड भारतात सर्वत्र आढळते. हे उष्ण व उपोष्ण कटिबंधात सर्वत्र लागवडीत आहे. प्राचीन काळापासून ह्याची भारतात लागवड होत असून हे मूळचे भारताच्या पश्चिमेकडील भागातील असावे. ह्याच्या उपशाखा लवदार असतात. पाने साधी, समोरासमोर किंवा कधीकधी त्रिदली, विविध आकारांची, बहुधा अंडाकार किंवा दीर्घवृत्ताकार, केशहीन किंवा जवळ-जवळ गुळगुळीत असतात. फुले पांढरी, फार सुवासिक, एक-एकटी वा तीन फुलांच्या वल्लरीवर फांद्याच्या टोकांना येतात [→ पुष्पबंध]. संवर्तदले ५–९, रेखीय आराकृती पाकळ्या अरुंद, आयत, टोकदार अथवा बोथट असतात [→ फूल]. मृदुफळे पिकल्यावर काळी होतात. इतर शारीरिक लक्षणे ⇨ ओलिएसात (पारिजातक कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

मोगऱ्याच्या शारीरिक लक्षणांत खूपच विविधता आढळते. त्यामुळे त्याचे पुष्कळ प्रकार आहेत. भारतीय प्रकारांचे चार सुस्पष्ट गट करतायेतात : (१) मोतिया बेलाची फुले दुहेरी, पाकळ्या गोलसर व कळ्या गोल असतात. (२) बेलाचीही फुले दुहेरी व पाकळ्या लांबट असतात. (३) हझारा बेलाची (हजारी मोगरा) फुले एकेरी असतात. (४) मुंग्राच्या फुलांच्या पाकळ्यांची बरीच मंडले (वेढे) असतात आणि त्या गोलसर कळ्यांचा व्यास सु. २·५० सेंमी. असतो.

लागवड : मोगऱ्याला सर्व प्रकारची जमीन चालते परंतु सुपीक जमीन, कोरडे हवामान व भरपूर सूर्यप्रकाश याला चांगले मानवतात व फुलांचा उत्तम बहार येतो. जमीन खोल खणून किंवा नांगरून मऊ व भुसभुशीत करतात व तीत शेणखत वा कंपोस्ट खत घालून मिसळून घेतात. वाफे अगर आळी तयार करून १ ते १·५ मी. अंतरावर पावसाळ्यात लागवड करतात. ती छाट कलमे, मुनवे (बुंध्यातून निघालेले कोंब अगर धुमारे) अगर दाब कलमे लावून करतात. लागवड केल्यावर लगेच फुले येत नाहीत. नोव्हेंबरमध्ये पाणी द्यावयाचे थांबविल्याने पानगळ होऊन झाडांना विश्रांती मिळते. कधीकधी जानेवारीत फोक मध्यावर छाटून काही दिवस मुळ्या उघड्या करतात. प्रत्येक झाडाला १० किग्रॅ. शेणखत वा कंपोस्ट खत घालून पाणी देतात. झाडावर कळ्या दिसू लागल्या म्हणजे भरपूर पाणी देतात. फुलांचा बहार उन्हाळ्यात व पावसाळ्यात विशेषतः जून-जुलैमध्ये अधिक येतो व वर्षभर थोडीथोडी फुले येत असतात.

दुहेरी फुलांचे प्रकार सर्वाधिक लोकप्रिय असून उत्तर प्रदेश व तमिळनाडूत त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. फुलांचे हेक्टरी १,५०० किग्रॅ. उत्पन्न येते. सर्वाधिक उत्पन्न २,५०० किग्रॅ. आल्याची नोंद आहे. एक किग्रॅ. मध्ये ३,००० ते ४,००० फुले मावतात.

कीड : मोगऱ्यावर खवले कीटकांचा उपद्रव होतो व त्यामुळे पानांवर कवकांची (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींची) वाढ होते. जॅस्मिन प्लायमुळे (मोगरा माशीमुळे) कळ्यांचे बरेच नुकसान होते. कृत्रिम पायरेथ्रॉइडयुक्त कीटकनाशकाची फवारणी केल्यास किडीला बराच आळा बसतो.

उपयोग : मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग भारतात हार, तुरे, गुच्छ, गजरे, वेण्या व देवपूजेत सर्वत्र विस्तृत प्रमाणावर होतो. तसेच उन्हाळ्यात पाण्याला स्वाद आणण्यासाठी माठात मोगऱ्यात कळ्या टाकतात. चीनमध्ये त्यांचा उपयोग चहाला स्वाद आणण्यासाठी करतात. मलायात केसांना लावण्याच्या खोबरेलात सुगंधासाठी ती वापरतात. मोगऱ्याच्या फुलांचा उपयोग सुवासिक द्रव्ये व अत्तरे काढण्यासाठी जाईच्या फुलांप्रमाणे करतात. फुलातील पिवळ्या रंगाचा उपयोग केशराला पर्याय म्हणून करतात. पानांचा काढा तापावर देतात. व्रण (जखमा) व त्वचारोग यांवर पानांचे पोटीस बांधतात. पाने व मुळे यांचे धावन डोळ्यांच्या तक्रारीवर उपयुक्त असते. बाळतपणात स्तनांत दुधाच्या गाठी झाल्यास फुले ठेचून स्तनांवर बांधतात, ७–८ तासांनी ते बदलून पुन्हा नवीन ठेचा बांधतात. त्यामुळे दूध बंद होते, सुज उतरते व पू होत नाही. रक्ती हगवणीवर पाने थंड पाण्यात देतात. मुळांचा काढा घेतल्यास थांबलेला विटाळ पुन्हा सुरू होतो. फुलांपासून तयार केलेले धावन चेहरा व डोळे धुण्यासाठी वापरतात. महाभारता, सुश्रुतसंहितेत पुष्पवर्गात व पतंजलीच्या महाभाष्यात मल्लिकेचा उल्लेख आढळतो.

पहा : जाई बाष्पनशील तेले सुवासिक द्रव्ये.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

             2. Dastur. J. F. Medicinal Plants of India and Pakistan, Bombay, 1962.

             ३. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतीचा इतिहास, नागपूर, १९७४.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ. चौधरी, रा. मो.