करडई : (कुसुंबा हिं. बर्रे, कर्रक गु. करडा क. कुसुंबा सं. कुसुंभा, अग्‍निशिखा इं. सॅफ्फ्लॉवर लॅ. कॅर्थॅमस टिंक्टोरियस कुलकंपॉझिटी). सुमारे एक मी.पर्यंत उंचीच्या या लहान वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचे [Ž→ओषधि] मूलस्थान निश्चितपणे माहीत नाही. तथापि ते डोंगराळ ॲबिसिनियाचा प्रदेश व अफगाणिस्तान असावे असे काही तज्ञ मानतात. हे क्षुप (झुडूप) फुलांपासून मिळणार्‍या लाल रंगाकरिता बहुतेक पौर्वात्य व पाश्चिमात्य देशांत फार वर्षांपासून लागवडीत आहे. द कांडॉल यांच्या माहितीप्रमाणे ईजिप्शियन ममीवरच्या कपडयांना हाच रंग दिला असावा. भारतात गुजरातमध्ये आणि दख्खनमध्ये रंग व बियांतील तेलाकरिता हिची फार मोठया प्रमाणावर लागवड केली जाते. सामान्य शारिरिक लक्षणे लक्षणे ⇨ कंपॉझिटी कुलात वर्णिल्याप्रमाणे पाने साधी, एकाआड एक, आयत-कुंतसम (भाल्यासारखी), ताठर, बिनदेठाची व कडांवर मऊ काटे असलेली पिवळी अथवा नारिंगी स्तबके [→ पुष्पबंध] नोव्हेंबरात येतात. छदे (ज्यांच्या बगलेत स्तबके येतात अशी पाने) हिरवी,अनेक, काटेरी व फळे पांढरी , लांबट, चौधारी असतात. बिया तैलयुक्त. कोवळ्या पानांची भाजी करतात. फुलांच्या रंगाने सुती व रेशमी कपडे व चीनमध्ये भेंडापासून केलेली खेळणी रंगवितात. सुकलेली फुले व अभ्रक यांपासून ओठास व गालास लाली आणणारी पूड बनवितात. फुले उत्तेजक, कफोत्सारक (कफ मोकळा करणारी), शामक, आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) व काविळीवर गुणकारी. प्रसूतीनंतर दाह कमी होण्यासाठी ओटी पोटावर बियांचे पोटीस लावतात. पंजाबमध्ये बी मूत्रल (लवघी साफ करणारे) व पौष्टिक मानतात.

आफळे, पुष्पलता द.

करडई हे महत्त्वाचे गळिताचे धान्य आहे. सध्या भारतात या पिकाखाली सु. पन्नास लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सु. तीन लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे.

हंगाम : रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पिकांत करडई मिश्रपीक म्हणून घेतात, तेव्हा वरील पिकांच्या ६–१२ ओळींनंतर करडईच्या एक-तीन ओळी पेरतात.

मशागत व पेरणी : हे मिश्रपीक असल्यामुळे गहू, ज्वारी किंवा हरभरा या मुख्य पिकांना दिलेल्या मशागतीचा फायदा त्याला मिळतो. काही ठिकाणी खरीप मुगाच्या पिकानंतर रब्बीमध्ये करडई पेरतात. अशावेळी मूग काढून घेतल्यानंतर ती जमीन वखरून पोकळ करून, दोन ओळींत सु. अर्धा मी. अंतर ठेवून तिफणीने तिच्यात करडई ऑक्टोबरमध्ये पेरतात. स्वतंत्र पिकासाठी २०–२५ किग्रॅ. व मिश्रपिकासाठी ५–१५ किग्रॅ. बी हेक्टरला लागते. मिश्रपिकात पाभरीमागे मोघण लावून पेरणीकरतात. गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना गुरांची वर्दळ  होणाऱ्या कडेने करडईचे पाटे घालतात. करडईच्या काटेरीपणामुळे वर्दळ बंद पडून पीक बचावते.

  खत : बदनापूर (जि. औरंगाबाद) येथील कृषि-संशोधन केंद्रात प्रयोगान्ती असे आढळून आले की, नायट्रोजनयुक्त खत (अमोनियम सल्फेट) हेक्टरी ११० किग्रॅ. पेरणीपूर्वी दिल्याने करडईचे उत्पन्न खात्रीने जास्त येते.

 आंतर मशागत : पीक सात-आठ सेंमी. उंच वाढल्यावर पंधरा दिवसांच्या अंतराने तीन कोळपण्या देतात.

 काढणी व उत्पन्न : पीक चार ते साडेचार महिन्यांत तयार होते. त्यावेळी पाने पिवळी पडतात. काढणी सकाळी केल्यास बोंडे गळून पडत नाहीत. काढणीच्या वेळी झाडाचे काटे टोचू नयेत म्हणून काढणी करणारे हातापायांना गोणपाटाचे तुकडे लपेटून घेतात. काढणी करताना झाडे नीट रचून ती वार्‍याने उडून जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर वजन ठेवतात. नंतर सवडीने ती खळ्यावर काठीने बडवून मळणी करून दाणे काढून घेतात. मिश्रपिकापासून हेक्टरी २०० किग्रॅ. आणि स्वतंत्र सलग पिकापासून ६०० किग्रॅ. उत्पन्न येते.

 सुधारलेल्या जाती : निफाड ६२–८ आणि नागपूर क्र. ७ या सुधारलेल्या जाती असून त्यांच्या संबंधीची माहिती खालील कोष्टकात दिली आहे.

करडईच्या सुधार लेल्या जाती 

सुधारलेल्या जातीचे नाव

सलग पिकाचे प्रती हेक्टर उत्पन्न किग्रॅ. 

तेलाचे प्रमाण टक्के 

शंभर दाण्यांचे वजन ग्रॅ.  

वैशिष्ट्ये 

निफाड६२–८ 

५०० 

३० 

५२⋅२० 

शेंदरी फुलांची, अधिक उत्पन्न देणारी, दाण्यात अधिक तेल असणारी जात. 

नागपूरक्र. ७ 

६००ते७०० 

३० 

६४⋅०० 

पांढऱ्याफुलांचीजात. 

 

तेल : करडईच्या तेलास व्यापारी दृष्ट्या फार महत्त्व आहे. बियांमध्ये तेल २० ते ३० टक्के पेंड ३४ टक्के व टरफले ४६ टक्के असतात. बियांवरील टरफले काढून अगर टरफलांसह बिया घाण्यात गाळून तेल काढतात. टरफले काढलेल्या दाण्यांच्या तेलाची व पेंडीची प्रत चांगली असते. त्यांना भावही चांगला मिळतो. पेंड गुरांना खाऊ घालतात. तेल मुख्यत्वेकरून खाण्यासाठी वापरतात. हे हृदरोगपीडीतासाठी फार चांगले आहे. ते सौम्य रेचक असून संधिवात खरूज व व्रणांवर लावतात. त्याचप्रमाणे दिव्यात जाळण्यासाठी साबण व वनस्पती तूप बनविणे वगैरेंसाठीही वापरतात. लवकर वाळण्याच्या गुणधर्मामुळे हल्ली या तेलाचा उपयोग व्हार्निश रंग वगैरे औद्योगिक उत्पादनांत केला जातो. १४८⋅८० से. तपमानात हे तेल तापवून एकदम थंड केल्यास उत्तम प्रकारचे रोगणतेल मिळते.

 

कुलकर्णी, य.स. 

 

पालेभाजी : करडईची मुद्दाम पालेभाजीसाठीही काही ठिकाणी लागवड करतात. कोवळ्या पानांची भाजी स्वादिष्ट असून तिच्यामध्ये कफनाशक पित्तनाशक इ. गुण असून ती पचनाला हलकी असते. महाराष्ट्रात पालेभाजी म्हणून करडई हिवाळी हंगामात लावतात. हे पीक पाण्याखाली मध्यम काळ्या जमिनीत इतर भाजीपाल्याच्या पिकांसाठी करतात तशी जमिनीची मशागत करून खत घालून वाफ्यात लावतात. हेक्टरला २० किग्रॅ. पर्यंत बी लागते. पेरल्यापासून चार-सहा आठवड्यांत रोपे भाजी म्हणून विक्रीसाठी काढतात. हेक्टरमधून ४, ०००–६, ००० किग्रॅ. पालेभाजी मिळते.

 

पाटील, ह.चिं. 

 


 

कीड : पाने खाणारी अळी व माशा ह्या कीटकांपासून करडईला उपद्रव होतो [→ मावा].  पाने खाणार्‍या अळीच्या पतंगाचे पुढील पंख काळसर तपकिरी रंगाचे असून मागील पंख फिक्कट तपकिरी व चमकदार असतात. पाय मजबूत असून त्यांच्यावर जाड केस असतात. मादी पानांवर अंडी घालते. ती चार दिवसांत उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. त्या लहान असताना हिरवट असतात आणि जशा वाढत जातात तसा त्यांचा रंग गडद तपकिरी होत जातो. पीक लहान असताना अळ्या पाने खातात त्यामुळे फार नुकसान होते. अळ्या पाने खाऊन दोन -तीन आठवड्यांत वाढ पुरी करतात. अळीची लांबी सु. २⋅५ सेंमी. असते. कोषावस्था जमिनीत असून आठ दिवस टिकते. या अळीच्या नियंत्रणासाठी पिकावर दहा टक्के बीएचसी भुकटी पिसकारतात.

दोरगे, सं.कृ.

संदर्भ :Chavan, V. M. Niger and Safflower, Hyderabad, 1961.